अस्थिरता ते स्थिरतेपर्यंतचा प्रवास यशवंत निंबाळकर

विवेक मराठी    13-Jul-2026   
Total Views |
Yamgarwadi
संघविचारप्रणित यमगरवाडी प्रकल्प हा भटकंती करणार्‍या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणारा आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून यशवंत यांच्या अस्थिर जीवनाला स्थिरता मिळाली. यशवंत यांचे भाग्य असे थोर की, ज्या छत्रछायेमध्ये ते वाढले त्याच ठिकाणी त्यांना ‘प्रयोगशाळा सहाय्यक’ म्हणून नोकरीच्या निमित्ताने सेवा देण्याची संधी मिळाली.
”यशवंत सर...यशवंत सर...” करत पोरांचा गलका यशंवत यांच्या अवतीभोवती आता नेहमीच असतो. यमगरवाडीतील लेकरांना ज्येष्ठत्वाच्या नात्याने आणि पूर्वानुभावातून शिक्षणाचे महत्त्व सांगणे, शंकाचे निरासन करणे, त्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगणे, आपल्या आज्या-पणज्यांनी दाखविलेल्या वाटेचा सन्मान करून त्यात कालानुरूप बदल करा, अशी सारी हितगुज ओघाओघात दिवसातून किती वेळा होत असेल याचा पत्ता नाही.
 
यमगरवाडीतील विद्यार्थ्यांचेे लाडके यशवंत सर म्हणजे यशवंत मनोहर शुक्राबाई निंबाळकर. यशवंत हे मूळ पेनूर तालुका, मोहोळ जिल्हा सोलापूरचे. मरगम्मावाले, कडकलक्ष्मीवाले म्हणजे मरीआई समाजातील. या समाजातील बाया डोक्यावर मरीआईचा गाडा घेऊन, तर बापे आभरान आणि घुंगरू लेवून लोकांच्या नवसासाठी, त्यांच्या पापनिवारणासाठी पोतराज बनून अंगावर रक्तबंबाळ होईसतोपर्यंत आसुडाचे फटके घेत दारोदार भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे. यशवंत यांच्या या अस्थिर जीवनाला स्थिरता मिळाली ती यमगरवाडीच्या उजाड माळरानावर. यशवंत यांचे भाग्य असे थोर की, ज्या छत्रछायेत अनेक भाग्यविधात्यांनी यशवंत यांचे भाग्य घडविले, त्याच ठिकाणी कणभर का होईना भाग्यदात्याचे काम करण्याचा मान त्यांना मिळाला, हे पूर्वजन्मीचे संचित असल्याचे यशवंत निंबाळकर यांच्याशी संवाद साधताना जाणवत होते.
“संघाच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या समाजातील जाणत्या लोकांच्या संगनमताने आमच्या समाजासाठी ‘मरिआईवाले सर्वांगीण विकास संस्था’ सुरू केली होती. याच माध्यमातून माझे चुलते दगडू निंबाळकर यांनी संघाचे प्रचारक आणि परिषदेचे कार्यकर्ते प्रकाश ढवळे यांच्याशी चर्चा करून आणि घरच्यांची संमती घेऊन मला आणि माझ्या मोठ्या भावाला यमगरवाडीत शिक्षणासाठी प्रवेश करून दिला. कुटुंबापासून दूर असलो तरी थोड्याच दिवसांत यमगरवाडीतील एका नवीन कुटुंबव्यवस्थेत मन रमू लागले. यमगरवाडीतील प्रत्येक शिक्षकांना-मदतनीसांना आम्ही घरातील नात्याप्रमाणेच संबोधत होतोे, किंबहुना आमचे आचरणही कौटुंबिकच होते आणि आजही आहे. आज मीदेखील यमगरवाडी प्रकल्प परिवारात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून रूजू झालो आहे; पण मला मात्र विद्यार्थी ‘सर’ म्हणतात. कारण नात्यागोत्यातील सगळी नावे संपली आहेत, हा झाला गमतीचा भाग. खरं तर यमगरवाडीतील प्रत्येक व्यक्तीच्या आचरणात असणारा कौटुंबिक जिव्हाळा, माया, आणि संरक्षणाची ऊब मुलांना कधी परकेपणाची जाणीव होऊ देत नाही, हे विशेष.
यमगरवाडीत प्रवेश घेताच समाजातील वेगवेगळ्या समाज घटकांचे दर्शन झाले. प्रत्येकाची बोलीभाषा, राहणीमान, स्वभाव याच्या वेगवेगळ्या तर्‍हा, त्यांच्याशी जुळवून घेणे आव्हानात्मक वाटलं खरं, पण विविधतेत एकता म्हणतात तसंच बंधुतेचं-मैत्रीचं नातं अल्पावधीतच दृढ होत गेलं.” यशवंत सांगत होते. संघविचारप्रणित यमगरवाडी प्रकल्प हा भटकंती करणार्‍या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणारा आहे. त्यामुळे स्वाभाविकच संघ कार्यकर्त्यांनी प्रकल्पाचे पालकत्व स्वेच्छेने घेतले आहे. या पालकत्वाच्या नात्यानेच अनेक संघ प्रचारक यमगरवाडीला कधी धावती भेट तर कधी मुक्कामी असतं. आपल्या घरी वडीलधारे पाहुणे आले की, कसं वाटतं अगदी त्याप्रमाणेच ते वातावरण असे. मात्र त्यात थोडे वेगळेपण होते, ते संघसंस्काराचे.
संघ प्रचारक बौद्धिक, संस्कार कथा, बोधकथा, चरित्रकथा यातून बालमनावर संस्कार घडवत होतेच. त्याशिवाय संघ कार्यकर्ते आणि प्रचारक यांच्या जीवनचरित्रातून आम्हाला आपसुकच जीवनदिशा मिळत होती. एकात्मता स्तोत्र, सायम्वंदना, संघशाखा, हेमंत शिबीर, प्राथमिक वर्ग, निवासी वर्ग, यातून आमचा व्यक्तिमत्त्व विकास होत होता. आज मी चांगला कार्यकर्ता, नागरिक आणि माणूस म्हणून जगत असेल तर याचे पूर्ण श्रेय हे माझ्या बालमनावर संस्कार करणार्‍या संघ परिवारातील व्यक्ती, प्रकल्पांवरील कार्यकर्ते, शिक्षक, पर्यवेक्षक यांना जाते, त्याबद्दल मी कायम त्यांचा ऋणी राहू इच्छितो, असे कृतज्ञतापूर्व यशवंत सांगत होते.
तुमच्या शिक्षणातील संघर्षमय टप्पे, त्यावर तुम्ही केलेली मात, काही मदतीचे हात त्या काळात सरसावले का? या प्रश्नावर यशंवत बोलू लागले,“2009साली इयत्ता दहावीत प्रथम क्रमांकाने पास होऊन यमगरवाडीतून बाहेर पडलो असलो तरी यमगरवाडी प्रकल्पाने माझी पुढील शिक्षणाची सोय ही धाराशिव येथील संत गाडगेबाबा वसतिगृहात केली.
शासकीय तंत्रनिकेतनमधून स्थापत्य अभियंता बनण्यासाठी प्रयत्न केले; मात्र पॉलिटेक्निकला प्रवेश मिळाला नाही. म्हणून आर्य चाणक्य धाराशिव येथे अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. वसतिगृहात राहण्याची सोय झाली असली तरी इतर गरजांसाठी बेकरीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पॉलिटेक्निकलचे खूळ काही डोक्यातून गेले नव्हतेच, पुन्हा एकदा तेथे प्रवेश मिळविण्याचे ठरवले आणि यंदा प्रवेशही मिळाला, अर्थात संघरूपी वटवृक्षाच्या छायेमुळेच हे शक्य झाले. संघाची मदत मिळत होतीच; पण संघसंस्कार हा आहे की, सक्षम व्यक्तिनिर्माण. याच संस्कारामुळे ’कमवा आणि शिका’ हे धोरण मी अवलंबिले. जेणेकरून आपल्या स्वतःचा थोडातरी भार हलका होईल.
 
 
आता सारे सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच द्वितीय वर्षाच्या प्रवेशाच्या वेळेस घरची बेताची आर्थिक स्थिती आता हलाखीची होत असल्याचे वृत्त कळाले. अवसान गळून पडावे असेच काहीतरी त्यावेळेस झाले. झालं स्वप्न स्वप्नच राहिले आणि गाडी वळली ती पुन्हा कम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेण्याकडे. नशीब झोकांड्या खात असतानाच डॉ. शहापूरकर यांचा फोन आला, त्यांना सगळी हकीकत सांगितली. डॉक्टरांनी धीर देत धाराशिवला हॉस्पिटलमध्ये नोकरीची व्यवस्था करतो, मात्र शिक्षण सोडू नकोस हा बहुमोलाचा सल्ला दिला. नोकरी करून विज्ञानशाखेचा अभ्यास होणे कठीण होत होते, तेव्हा कलाशाखेत प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास त्यांनी सुचवलं. वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षेचा निकाल अवघ्या काही मार्कांनी हुकत होता आणि पदरात वारंवार निराशा येत होती.
शिक्षण घेत असताना येणारी आर्थिक अडचण तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदरात पडणारी वारंवार निराशा यातून बाहेर पडण्याचे विविध मार्ग शोधणे सुरू झाले. अशातच नशीब आणि योग दोन्ही जुळून आले. ...आणि 2016 यावर्षी यमगरवाडीच्या आठवी ते दहावी माध्यमिक विभागासाठी सरकारी मान्यता मिळाली. यमगरवाडीतून फोन आला,‘प्रयोगशाळा साहाय्यक पद’ रिकामे आहे आणि सर्वानुमते (निकष - बारावी विज्ञानशाखेतून पास) या पदासाठी तुझ्याच नावाची चर्चा आहे, केवळ तुझ्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. क्षणाचाही विलंब न करता डॉ. शहापूरकर सरांना फोन लावला आणि ’तुझी आर्थिक निकड आणि यमगरवाडीतील त्या पदासाठी असलेले निकष पाहता तू या संधीचा विचार करावास’, असे त्यांनी सुचविले.
 
 
ज्या छत्रछायेमध्ये मी वाढलो त्याच ठिकाणी मला नोकरीच्या निमित्ताने सेवा देण्याची संधी मिळाली याचे मी देवाचे मनापासून आभार मानले आणि प्रकल्पावरती प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून रूजू झालो. ज्या भाग्यविधात्यांनी बालवयात चांगला नागरिक घडविण्यासाठी कष्ट घेतले आज त्यांच्याचसोबत काम करण्याची संधी मिळाली, याचा मनस्वी आनंद होताच; परंतु सर्व शिक्षक कार्यकर्ते, पर्यवेक्षक यांच्याप्रती कृतज्ञतादेखील होती. प्रयोगशाळा साहाय्यक आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे आली.
येथील विद्यार्थी ज्या समाजघटकातून आलेले असतात, त्यांच्या भावविश्वाशी मी लवकर समरस होऊन गेलो, कारण याच प्रकल्पात मी शिकलो होतो. त्यांना माझ्या विद्यार्थी दशेतील अनेक उदाहरणे देऊन त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच माझे मूळ काम हे ‘प्रयोगशाळा साहाय्यक’ असल्यामुळे प्रयोगशाळा संबंधित कामांची अद्ययावतता आणि विद्यार्थ्यांना यामध्ये रूची निर्माण व्हावी याकडे कल असतो. आजच्या वेगवान जगात आपल्या बालपणाचे स्मरण करणे हेच दुरापास्त असताना या माध्यमातून मी माझे बालपणही जगत आहे, त्यामुळे येथे नोकरीची संधी दिल्याबद्दल देवाचे आणि येथील व्यवस्थापनाचे आभार मानण्यासोबत मी भाग्यवान आहे असेच म्हणावेसे वाटते.
 
 
मरीआई समाजाच्या पाचवीला भ्रमंतीचा शाप आहे, अजूनही आहे. हा शाप दूर करण्याचे बळ माझ्यासारख्या मुलात निर्माण केले, ते संघविचार प्रमाण मानणार्‍या यमगवाडी प्रकल्पाने. हा प्रकल्प माझ्या आयुष्याचा जसा कायापालट करणारा ठरला तसा तो माझ्या समाजाचाही कायापालट करणारा ठरावा हे उराशी धरले आणि त्याप्रमाणे प्रयत्नही सुरू केले. मरीआई समाज हा समाजाच्या मुख्यप्रवाहात आणायचा असेल तर ‘शिक्षण’ ही मूलभूत गरज आहे, हे पटवून देणे गरजेचे होते. संघाच्या प्रयत्नाने मरीआईवाले सर्वांगीण विकास संस्था या संदर्भात काम करीतच होती. संघातील आणि परिषदेच्या ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाने आमच्या समाजातील जास्तीत जास्त मुलांना यमगरवाडीतील शिक्षणप्रवाहात आणत आहे.
 
 
सरकार दरबारीही भटके समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कागदपत्रांची व्यवस्था होत आहे. मात्र शिक्षणाचा अभाव आणि समाजापासून दूर असलेल्या आमच्या समाजात ही धोरणे पोहचत नाहीत. सरकारला मदतनीस ठरावे तसे परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कागदपत्र काढून देण्याच्या अभिनव उपक्रमात मी सक्रिय सहभागी असतो. समाजातील रूढी, परंपरा, जात -पंचायत तसेच शिक्षण याबाबत जागृती निर्माण करून सर्वांना योग्य दिशा दाखवण्यात खारीचा वाटा मी उचलत आहे. बालवयापासून ते आतापर्यंत समाजात निकटचा संबंध असल्यामुळे समाजातील अनेक प्रकारच्या समस्या परिषदेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
 
यशंवत यांचे काम पहिले तर बंधुता, समरसता, एकात्मभाव, हे केवळ शब्द नव्हेत ते आचरणाधीन व्यवहार आहेत, हे लक्षात येते. संघाची ही शिदोरी कृतीरूप करण्याचा प्रयत्न त्यांच्या आचरणातून प्रतीत होत आहे. ‘भारतमातेचे पुत्र’ या अर्थाने कुणी न् इथे परका आपण सारे एक आहोत, हा संघ संस्कार यशवंत निंबाळकर यांच्या कृतीतून प्रतिबिंबित होत आहे. यातून संघ कार्यकर्त्यांनी यमगरवाडीच्या उजाड माळरानावर समरसतेचे बीज लावून भटके विमुक्त समाजातील आपल्या बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणण्याचे जेे धाडसी पाऊल उचलले. त्या प्रयत्नांना मधुर फळे यशवंत निंबाळकर यांच्यासारख्यांच्या रूपात दिसत आहेत.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.