प्रा.डॉ. श्यामा घोणसे
9890615861
मध्ययुगीन भारतातील परकीय आक्रमणे आणि जातिभेदाच्या अंधकारात महाराष्ट्रातील संतपरंपरेने सामाजिक समता व समरसतेचा विचार प्रत्यक्ष जगून दाखवला. या संतपरंपरेने केवळ मायबोली मराठीतच नव्हे, तर हिंदीसारख्या लोकभाषांचा स्वीकार करून संपूर्ण देशाला भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध ठेवले. संत नामदेव, संत सेना महाराज आणि संत रविदास यांच्या याच व्यापक, अहिंदी रचनांचा गौरवशाली समावेश पुढे शीख धर्माच्या ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’मध्ये करण्यात आला. प्रस्तुत लेखात या द्वैभाषिक संतपरंपरेचा व त्यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचा वेध घेतला आहे.
धर्म हाच जगण्याचा मूलाधार असलेल्या मध्ययुगीन हिंदुस्थानातील सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीला परिवर्तनाची गती देणारे, जातिभेदाच्या गदारोळात, माणुसकीचा विसर पडला आहे, असे वाटावे अशा काळात सामाजिक समता-समरसतेचा जागर करीत ती प्रत्यक्ष जगण्यात यावी यासाठी प्रयत्न करणारे ’सक्रिय समाजसुधारक’ म्हणून ’महाराष्ट्रातील संतपरंपरा’ प्रसिद्ध आहे.
समाज परिवर्तनाचे अनेक मार्ग व दिशा असतात. संतांचा मार्ग हा मुख्यतः साहित्याचा मार्ग आहे. लोकमानसाशी जिव्हाळ्याने निगडित असलेले आणि स्थलकालपरिस्थितीचे उल्लंघन करण्याची ताकद असलेले शब्द हे प्रभावी अक्षर रूप धारण करतात. याचे भान असलेल्या सार्याच भारतीय संतांनी आपल्या प्रबोधनकार्यासाठी शब्द माध्यमाचा प्रामुख्याने आधार घेतला; मात्र मराठी संत परंपरेचे वेगळेपण म्हणजे या संतपरंपरेने केवळ मायबोलीशीच नव्हे तर देशातील अन्य बोलींशी आपले नाते जोडत विविधतेने नटलेल्या या देशाला एकसंध राखले होते.
इतिहासाचा मागोवा घेता, मराठी संतकवींनी बहुजनप्रिय हिंदीचा स्वीकार करीत लोकभाषेचे व्यापक तत्त्वच अमलात आणले. त्यामुळे भक्तिपरंपरा आणि हिंदी काव्यरचना यांमध्ये निकटचे नाते निर्माण झाल्याचे जाणवते. ’आद्य अहिंदी प्रदेश’ म्हणून महाराष्ट्र ख्यातकीर्त आहे. याकडे मात्र आपले फारसे लक्ष जात नाही. मात्र ही परंपरा जपणार्या तीन महान संतांच्या रचनेचा समावेश ’श्रीगुरुग्रंथसाहिब’मध्ये केला गेला आहे, हे गौरवाने नमूद करायला हवे.
मराठी - हिंदी स्नेहबंधाची व्यापकता
आर्य परिवाराच्या भाषा असणार्या हिंदी-मराठीचे संस्कृत भाषेशी अंतरंग नाते असल्याने त्यांच्या उच्चार, शब्दसंग्रह, लिपी आदींमध्ये बरेचसे साम्य आढळते. त्यामुळेच ’महाराष्ट्र के संतों को इसे अपनाने में सुविधा हुई और उन्हों ने राष्ट्र की बहुसंख्य जनता तक अपने हृदय की मंगल अनुभूति का रस उस मे प्रवाहित कर, उसे राष्ट्रभाषा का गौरव प्रदान किया।
(शर्मा आचार्य विनयमोहन : ’हिंदी को मराठी संतों की देन’, बिहार राष्ट्रभाषा परिषद, पटना, प्रथम संस्करण, पृ. 1.)
भारतीय जीवनात असणार्या धार्मिक अधिष्ठानाचा परिणाम विशेषतः चारधाम यात्रेचा परिणाम मराठी-हिंदीच्या स्नेहवृद्धीवर झाला.
या भाषिक देवाणघेवाणीत नाथसांप्रदायिकांचे विशेष महत्त्वपूर्ण योगदान आहे. उदयकाळापासून महाराष्ट्राशी नाते सांगणार्या या संप्रदायाने, महाराष्ट्रातील सर्वच संप्रदायांना प्रभावित केले होते. त्यामुळेच नाथकाव्याचा साक्षेपी अभ्यास मांडणार्या डॉ. कामत यांना ’गोरखबानी’ची भाषा आणि संत नामदेवांची मराठी प्रभावित ’खडी बोली’ यांत भाषिक, वैचारिक आणि शैलीदृष्ट्या साम्य आढळते. अर्थात महाराष्ट्रात हिंदी रचना करण्याचे प्रथम श्रेय महानुभवाव आचार्य दामोदर पंडित यांना द्यावे लागते. किंबहुना तेच ’आद्य अहिंदी कवी’ ठरतात. दामोदर पंडितांनंतर संत नामदेवांची हिंदी रचना विपुल प्रमाणात उपलब्ध होते. संत सेना, संत एकनाथ, संत तुकाराम व त्यांच्या शिष्या संत बहिणाबाई, समर्थ रामदास यांच्याप्रमाणेच मराठी वीरशैव संत म्हणजे संत लक्ष्मण महाराज, संत महादेव प्रभू आदी संतांच्या हिंदी रचना आज उपलब्ध होतात.
त्यामुळेच मातृभाषेचे माय मराठीचे प्रेम आणि तिचा स्वत्व, स्वाभिमान टिकवत तत्कालीन हिंदुस्थानाला कोणताही प्रचारकी थाट न अवलंबता मराठी संतांच्या मराठी-हिंदी उद्गारांनीच एकसंघ राखले असे अभिमानाने नोंदविता येते.
संत नामदेवराय
या संदर्भात संत नामदेवरायांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. भाषेच्या माध्यमातून लोकसंघटन करणारा पहिला समाजसंघटक संत म्हणून नामदेवरायांचे स्थान अढळ आहे. प्रचाराची फारशी साधने नसताना मध्ययुगातील संत नामदेवरायांनी केलेले हे कार्य आजही प्रेरणा देणारे आहे.
भारतीय माणसाचे स्वत्व, स्वाभिमान, संस्कृती यावर आक्रमण करणार्या इस्लामी राजवटीत हिंदू म्हणून ताठ मानेने निर्भय मनाने जगायचे असेल तर भांबावलेल्या तत्कालीन समाजाला एक निर्णायक आधारस्तंभ देणे आवश्यक होते. वैयक्तिक नामसाधनेचा उपयोग करीत व्यापक लोक संघटन उभारणे आवश्यक होते.
लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारे, त्यांना आपुलकीने जवळ आणणारे साधन म्हणजे प्रादेशिक भाषा आहेत आणि त्या आत्मसात करीत अन्य भाषकांशी संवाद साधला तर हा खंडप्राय देश एका सूत्राने बांधता येईल हे मराठी नामदेवरायांनी प्रथमतः ओळखले.
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥ हे ध्येय उराशी बाळगून इस्लामच्या आक्रमणाविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी, लोकांच्या मनात आत्मविश्वास पेरण्यासाठी ते महाराष्ट्राबाहेर पडले. त्यांनी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रादेशिक भाषांना आत्मसात केले व त्यांना मराठीच्या रंगामध्ये रंगवून टाकले. लोकप्रबोधन करण्यासाठी हिंदीबहुल प्रदेशांमधून हिंडत असताना मराठीचा गाभा असलेली आणि प्रादेशिकतेचा साज ल्यायलेली त्यांची भक्तिपर हिंदी काव्यरचना जन्माला आली.
एकै पाथर की जै थाऊ।
दूजे पाथर धरिए पाऊ॥
जै इहु देऊ तहु भी देवा।
कहि नामदेऊ हम हरि की सेवा॥
(ना.गा. 2258)
हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातून सर्वसामान्यांच्या मनात ईश्वरी तत्त्वावरील विश्वास दृढ झाला. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी उत्तर, पश्चिम आणि वायव्य भारतात उभी राहिली. या विश्वासाची परिणतीदेखील द्रष्ट्या नामदेवांना दिसत होती. म्हणूनच -
कलिचिये अंति होणार कलंकी। मारिल म्लेंछ की घोड्यावरी।
फिरून उभारील धर्माची गुढी। कृतयुगी प्रौढ करी तोची॥
(ना.गा. 2011)
ही स्वराष्ट्रनिर्मितीची प्रेरणा जागृत त्यांनी शूर निर्भय अशा सिक्ख गुरुपरंपरेचा पाया घातला. संत एकनाथांच्याही आधी हिंदवी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा जणू जागवली. नामदेवरायांच्या 61 पदांचा समावेश ’मुखबानी’ म्हणून ’श्रीगुरुग्रंथसाहिब’मध्ये आहेत.
संत सेना महाराज
द्विभाषिक मराठी संतपरंपरेत आवर्जून एक नाव घ्यावे लागते ते म्हणजे संत सेना महाराजांचे. सेना महाराज हे हिंदी आणि मराठीतील सर्वमान्य संत असून हिंदीमध्ये त्यांची एक रचना उपलब्ध आहे जी ’गुरुग्रंथसाहिब’मध्ये समाविष्ट केलेली आहे. दुर्दैवाने त्यांच्या आणखीही रचना असल्या तरी आज त्या उपलब्ध नाही.
सेना महाराज बांदलगडच्या राजाच्या सेवेत होते; परंतु त्यांच्या भक्तीमुळे घडलेल्या चमत्काराने प्रभावित होऊन राजाने सेना महाराजांचे शिष्यत्व पत्करले, असे सांगितले जाते.
संत रविदास उर्फ संत रोहिदास
असामान्य प्रतिभा, प्रभावी वाणी, उल्लेखनीय संघटनकौशल्य तसेच जनसामान्यांबद्दल असणारी उत्कट आस्था, समाजातील सर्व स्तरांमध्ये जातीय व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी अखंड कार्यरत असणारी समन्वयशील समरस वृत्ती आणि आपल्या कार्य-काव्यातून तळागाळातील बांधवांना दिलेले आत्मसामर्थ्य, आत्मविश्वास असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ’संत रोहिदास’ उर्फ ’रविदास’ यांनी नामदेवरायांचा वारसा पुढे नेला.
संत रविदासांची वृत्ती, मृदुमवाळ होती; परंतु तत्कालीन समाजाच्या विषमतावादी मानसिकतेचा, जातिभेद मानणार्या कर्मठ वृत्तीचा आणि पढीक परंपरेचा त्यांनी एखाद्या शूर योद्ध्यासारखा प्रतिकार केला. आपल्या कार्याने, सदाचारसंपन्न वर्तनाने त्यांनी आत्मसन्मानपूर्वक ही लढाई जिंकलीदेखील. शिवाय इतरांनाही आत्मसामर्थ्याने कसे जगायचे, याची प्रेरणा दिली आणि जन्मगत विषमता पाळणार्यांना अंतर्मुख बनविले.
जन्म के कारनै होतं ना कोई नीच ।
नर को नीच करि डारी है ,
ओछे करम की कीच ॥
अर्थात माणसाचे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व त्याच्या जन्मगत जातीवरून नव्हे तर त्याच्या कर्माने ठरले पाहिजेत, यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
म्हणूनच,’केवळ उच्च वर्ण मानल्या गेलेल्या कुळात जन्म घेतला म्हणून कोणी ब्राह्मण होत नाही. ज्याला ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान झाले आहे आणि ज्यामध्ये ब्रह्मात्मा विद्यमान असतो तोच ब्राह्मण होय,’ असे ते सांगतात.
त्यांच्या मते,’गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या रक्षणासाठी जो आपले प्राण पणाला लावतो तो क्षत्रिय होय. तर सन्मार्गाने पैसे कमावणारा, समाजकल्याणासाठी आपली पुण्य कमाई देणारा आणि योग्य माप (वजन) करीत ग्राहकांना वस्तू देणारा खरा वैश्य होय.’
तर शूद्र कोण हे सांगताना रविदास म्हणतात, जो कुकर्म करतो, समाजहिताच्या विरोधात गोष्टी करतो तोच शूद्र, अपवित्र असतो.
संत रविदासांच्या कार्याचा एक दुर्लक्षित उल्लेखनीय विशेष म्हणजे त्यांनी सत्तांध मुस्लीम शासकांच्या काळात स्वातंत्र्याचा केलेला उद्गोष होय.
पराधीनता पाप है, जान लेहु रे मित।
रविदास दास पराधीन तो कौन करे हैं प्रीत॥
स्वातंत्र्याशिवाय मानवी जगण्याला आणि राष्ट्राच्या नावलौकिकाला अर्थ प्राप्त होत नाही, असे वाटणारे रविदास समाजातील एकात्मता किती महत्त्वाची आहे हे सांगताना लिहितात ,
हिल मिल चलो, जगत में फूट पडो दो नहि।
फूट पडी माची तो देश नष्ट हो जाई॥
पराधीनता पाप हैं, जान लेहु रे मीत।
रविदास दास पराधीन तो कौन करे हैं प्रीत॥’
(मा.आ. कारंडे, संत रोहिदास चरित्र आणि वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई 1997)
जर देशाचे विघटन झाले, इथल्या बांधवांमध्ये मनभेद निर्माण झाले आणि त्याचे पर्यवसान म्हणून पारतंत्र्याचे दुःख भोगायला लागले तर जगामध्ये माणूस म्हणून आणि राष्ट्रभक्त म्हणून आपल्याला किंमत उरणार नाही. हे संत रोहिदासांचे सांगणे आजच्या संदर्भातही अत्यंत महत्त्वाचे आहे, हे आवर्जून ध्यानात ठेवायला हवे.
संत रविदासांच्या 41 पदांचा समावेश ’श्रीगुरुग्रंथसाहिब’मध्ये आहे. मात्र त्यांच्या चरित्राचा आणि साहित्याचा अधिक सखोलतेने, अभ्यासपूर्ण वेध घेता यावा तसेच या निमित्ताने मराठी आणि हिंदीतील अनुबंध अधिक दृढ व्हावे, यासाठी नवीन पिढीतील संशोधकांनी त्यांच्या मराठी रचनांचा शोध घेणे आवश्यक आहे.
- लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.