@डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक
9604859509
आपली परंपरा संत मीराबाई यांना संत रविदास यांची शिष्या मानते. थोडक्यात, तिचे गुरुपद हे रविदासांना दिले गेलेले आहे. त्यादृष्टीने पाहता रामानंद हे तिचे परात्पर गुरू ठरतात. त्यांची लोकप्रियता तर वादातीत, कालातीत आहे. रामानंद, रविदास, मीराबाई या त्रिमूर्तींनी तत्कालीन समाजात समरसता, समता जागविली. ढोंगी वृत्तीवर कठोर प्रहार केले. या गुरु शिष्य परंपरेने अक्षुण्ण असे कार्य केले. जे आजही दीपस्तंभासारखे प्रेरक ठरावे, मार्गदर्शक ठरावे.
प्राचीन काळापासून सर्व मानवसमूह कोणत्या ना कोणत्या अतिमानवी शक्तीची भक्ती करीत आले आहेत. भारतातील भक्तीचा उगम हा स्वतंत्रपणे भारतीय भूमीतच झालेला आहे. वेद संहिता व ब्राह्मण ग्रंथ यामध्ये भक्ती हा शब्द आढळत नाही. एखाद्या कालखंडात विशिष्ट शब्द आढळत नसला तरी त्या शब्दांतून व्यक्त होणारी संकल्पना मात्र अस्तित्वात असू शकते. भक्तीचा उगम द्रविड देशात झाला असे वर्णन भागवत पुराणात येते.
महाभारतात भक्तीची परंपरा पुढीलप्रमाणे सांगितली आहे. जगाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीला भक्तीचा उपदेश केला. त्यानंतर आदित्य, विवस्वान मनू, इक्ष्वाकू या क्रमाने प्राप्त झालेली भक्ती सर्व लोकांमध्ये पसरली. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पारंपरिक चार पुरुषार्थ मानलेले आहेत. पहिले तीन साधनीभूत असून चौथा मोक्ष म्हणजे साध्य होय. ज्ञानेश्वरांनी भक्ती हा पाचवा पुरुषार्थ म्हणजे मोक्षाहून श्रेष्ठ साध्य मानला आहे. भक्ती ही साध्य असल्याने ती दुसर्या कोणाचे साधन नाही. ज्ञानदेवांनी भक्तीचे तात्त्विक स्वरुप आपल्या अमृतानुभव ग्रंथात स्पष्ट केले आहे. भक्ती ही सहज अगर अकृत्रिम आहे. याचा अर्थ ती परमात्म्याची अंगभूतच आहे. जीव हा त्या प्रीतीचा निर्माता नसून सेवन करणारा आहे.
भारतात इतिहास पुराणांनी परिपुष्ट केलेल्या आणि विविध संतांनी अंगीकारलेल्या भक्तिमार्गामुळे वैदिक यज्ञयागांची पिछेहाट झाली. यज्ञात गुंतागुंतीचे कर्मकांड होते. तर भक्तीमार्ग मात्र अगदी सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनेेदेखील सुलभ, सुबोध व सहजसाध्य होता. सर्व जातीच्या व वर्णाच्या स्त्रीपुरुषांना या मार्गात प्रवेश होेता. हा मार्ग प्रामुख्याने प्राकृत भाषांतून मांडला गेल्यामुळेही तो सर्वसामान्यांना अधिक जवळचा वाटला. कष्ट, पैसा, वेळ इ. बाबतीत हा मार्ग सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातील होता. म्हणूनच तो अधिक लोकप्रिय झाला.
संतांनी भक्तीला मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ मानले. ईश्वरभक्ती करीत असताना जन्ममरणाच्या फेर्यात पुन्हापुन्हा फिरावे लागले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, असे भक्तीचे माहात्म्य त्यांनी सांगितले आहे. अंतिम सत्याचा या जगातच अनुभव घेता येतो हेही या मार्गाचे एक वैशिष्ट्य होय. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे तिच्यामध्ये भक्तीमार्गाचा फार मोठा वाटा आहे. जगातील अन्य देश व धर्म त्यांच्या संस्कृतीची निर्मिती करण्यामध्येही त्या त्या ठिकाणच्या भक्तिमार्गाने महत्त्वाची कामगिरी पार पाडल्याचे दिसते.
जगातील विविध भाषांतून निर्माण झालेल्या वाङ्मयाचा बराचसा भाग भक्तिविषयक साहित्याने भरलेला आहे. भारताच्या सर्व प्रमुख भाषांतून विपुल प्रमाणात भक्तिविषयक साहित्य आढळते. भगवद्गीता आणि भागवत पुराण हे भक्तीमार्गाचे दोन प्रमुख आधारग्रंथ होत. शांडिल्य भक्तिसूत्रे आणि नारदभक्तिसूत्रे हे दोन सूत्र ग्रंथ भक्तीची शास्त्रीय मांडणी करणारे असून या ग्रंथांवर भाष्येही झाली आहेत. भक्ती हा स्वतंत्र रस मानून त्यानुसार साहित्यशास्त्राची फेरमांडणी करणारे ‘शास्त्रकार’ही होऊन गेले आहेत. भरताचार्य आणि मम्मटादी इतर प्रमुख शास्त्रकारांनी भक्तीला ‘रस’ मानलेले नाही. परंतु मधुसूदन सरस्वती, रूप गोस्वामी इत्यादींनी मात्र भक्ती हा रस मानून स्थायीभाव, विभाव इत्यादीचे विवेचन केले आहे.
रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्क या वेदांती आचार्यांनी मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून भक्तीचे माहात्म्य प्रस्थापित केले. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने वैष्णव भक्तीचा प्रभाव निर्माण केला. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, एकनाथ, तुकाराम, रामदास आदी संत महाराष्ट्रात होऊन गेले. शिव, विष्णू, गणपती, काली, सूर्यदेवता, दत्तात्रेय आदी विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची भक्ती करणारे अनेक संप्रदाय भारतात होऊन गेले. त्यांचा समाजजीवनावर मोठा प्रभाव पडलेला आहे.
संत रामानंद
उत्तर भारतात भक्तियुगाचा प्रारंभ इसवीसनाच्या पंधराव्या शतकात झाला. रामानुजांच्या परंपरेतील स्वामी रामानंद यांनी उत्तर आणि मध्य भारतात भक्तीचे एक अत्यंत प्रभावी आंदोलन निर्माण केले. या युगात रामाश्रयी व कृष्णाश्रयी अशा भक्तीच्या दोन शाखा पुढे आल्या. रामशाखेचा उगम काशीत तर कृष्णशाखेचा उगम वृंदावनात झाला असे परंपरा मानते. भक्तिमार्ग हा रामानंदांनी दक्षिणेतून उत्तरेत आणला आणि त्याचा प्रसार केला. काही संशोधकांच्या मते ही गोष्ट रामानंदांचे गुरू ‘राघवानंद’ यांनी केली. राघवानंद प्रथम दक्षिणेत होते. तेथून ते उत्तरेला येऊन काशीत राहिले. ते रामाचे भक्त होते म्हणून त्यांनी काशीतून रामभक्तीचा पंथ वाढविला. रामानंद हे राघवानंदांचे पट्टशिष्य होय. त्यांच्याजवळ विद्वत्ता, कर्तृत्व, संघटनाकौशल्य आदी अनेक गुण होते. त्यांनी आपल्या गुरुंचा रामभक्ती पंथ वाढविला म्हणून त्यांना उत्तर भारतातील भक्तीप्रवर्तकाचे श्रेय दिले जाते. (काहीजण याचे श्रेय संत नामदेवांना देतात.)
कबीर व तुलसीदास हे रामाश्रयी शाखेचे दोन प्रमुख प्रतिनिधी होत. कबीराने रामाच्या निर्गुण भक्तीला प्राधान्य दिले. तुलसीदासाने सगुण भक्तीचा महिमा वाढविला. सूरदास, मीराबाई, अष्टछाप कवी, सहजोबाई आदी असंख्य भक्तांनी भक्तीमार्गामध्ये आपले महान योगदान दिले.
रामानंद यांच्या जन्माविषयी, जन्मस्थानाविषयी निश्चित माहिती मिळत नाही. आख्यायिका, दंतकथा भरपूर आहेत. यांचे मूळ ‘भक्तमाल’ या ग्रंथात आहे. त्यांचे प्रमुख बारा शिष्य आहेत. त्यांना बारा (द्वादश) महाभागवत म्हणून ओळखले जाते. ते पुढीलप्रमाणे आहेत. अनंतानंद, कबीर, सुखानंद, सुरसुरानंद, नरहरीयानंद, पीपा, भावानंद, रविदास (रैदास), धन्ना, सेन, पद्मावती, सुरसुरी (शेवटच्या दोन स्त्रिया आहेत.) ‘जात पात पूछे ना कोई, हरि को भजै सो हरि का होई।’ हे त्यांचे तत्त्व असल्यामुळे त्यांच्या शिष्य परिवारात दोन स्त्रियांसोबत अन्य जातीचे लोकही होते. उदा. अनंतानंद (ब्राह्मण), कबीर (जुलाही), पीपा (क्षत्रिय राजपूत), धन्ना जट (राजस्थान, शेतकरी), सेन-सेना (न्हावी). महाराष्ट्रातील सेना न्हावी यांना उत्तर भारतानेही संत म्हणून स्वीकारले आहे, हे विशेष!
परंपरेच्या मान्यतेनुसार रामानंद यांना सुमारे 120 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या वडिलांचे नाव राम किंवा अजय शर्मा तर आईचे नाव सुमती सांगितले जाते. त्यांना उद्धवाचे अवतार समजतात. त्यामुळे त्यांच्या संप्रदायाला उद्धव संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते. विशिष्टाद्वैती संप्रदायाचे प्रवर्तक रामानुजाचार्य यांनी त्यांना स्वप्नदीक्षा दिल्याचे सांगितले जाते. त्यांच्या तरुण वयात ते श्रीरंगम या क्षेत्री गेले. सौराष्ट्रात पण त्यांनी भ्रमंती केली. स्वामीनारायण संप्रदायाच्या निर्मितीला त्यांचीच प्रेरणा प्राप्त झाली अशीही मान्यता आहे.
खरा गुरु स्वत: प्रकाशात न येता शिष्याच्या कार्याला प्रेरणा देऊन त्याची प्रसिद्धी वाढवितो अशी एक धारणा आहे. महाराष्ट्रात संत निवृत्तीनाथ यांनी आपले कार्य संत ज्ञानेश्वरांच्या करवी करवून घेतले. स्वत: मात्र प्रसिद्धीपासून दूर राहिले. तीच गोष्ट संत जनार्दन स्वामी व संत एकनाथ यांच्याबाबतीत घडून आल्याचे दिसते. संत नामदेव यांनी आपले शिष्य संत जनाबाई, संत चोखामेळा यांना गुरुप्रेरणा दिली. ‘माझा गुरू नामदेव। त्याने निरसिला माझा भेव।’ असे उद्गार चोखामेळा काढतात. तर ‘एका जनार्दनी’ या नाममुद्रेप्रमाणेच ‘नामयाची जनी’ अशी मुद्रा जनाबाई अभिमानाने मिरवतात. संत ज्ञानेश्वर यांनीसुद्धा ज्ञानेश्वरी व अभंगगाथा या वाङ्मयातून ‘निवृत्तीदासु’, ‘दास निवृत्तीचा’ अशा नाममुद्रा धारण केलेल्या आहेत. तीच परंपरा उत्तर भारतात आढळते. रामानंद तसे अलक्षित राहिले परंतु त्यांचा शिष्य परिवार - संत कबीर, संत रविदास यांना भरपूर जनमान्यता मिळाली. परंपरा संत मीराबाई यांना संत रविदास यांची शिष्या मानते. थोडक्यात, तिचे गुरुपद हे रविदासांना दिले गेलेले आहे. त्यादृष्टीने पाहता रामानंद हे तिचे परात्पर गुरू ठरतात. त्यांची लोकप्रियता तर वादातीत, कालातीत आहे. रामानंद, रविदास, मीराबाई या त्रिमूर्तींनी तत्कालीन समाजात समरसता, समता जागविली. ढोंगी वृत्तीवर कठोर प्रहार केले. या गुरु शिष्य परंपरेने अक्षुण्ण असे कार्य केले. जे आजही दीपस्तंभासारखे प्रेरक ठरावे, मार्गदर्शक ठरावे.
संत रविदास
संत रविदास यांचा जन्म इ.स. 1388 किंवा 1399ला वाराणसी येथील गोवर्धन पुरा येथे झाला. संतोख दास आणि कळसा देवी ही त्यांच्या मातापित्यांची नावे. त्यांची ज्ञाती आणि व्यवसाय चर्मकार होता. त्यांना निर्गुणोपासक मानले जाते. अवधी, राजस्थानी, खडीबोली, उर्दू, फारसी या भाषांचा प्रभाव त्यांच्या रचनांवर दिसून येतो. रामानंद हे त्यांचे गुरू. महात्मा कबीर यांचाही सहवास त्यांना लाभला. ‘मन चंगा तो कटौती में गंगा’, हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. चांभाराजवळ चामडे व अन्य साहित्य ओले करण्यासाठी वाटीसारखे एक पसरट भांडे असते. त्यात पाणी भरून ठेवलेले असते. त्याला कटौती म्हणतात. याच कटौतीतून त्यांनी एका लोभी ब्राह्मणाला सोन्याचे कंकण काढून दिले. ते त्याने राणीला विकले. राणीला ते अतिशय आवडले. आणखी कंकण प्राप्त करण्यासाठी ती रविदासांकडे आली. तिला बर्याच दिवसांचा चर्मरोग होता. तो रविदास यांनी बरा केला. राणी त्यांची भक्त झाली. दर पौर्णिमेला काशीमध्ये सामुदायिक ब्राह्मण भोजन घालण्याचा तिचा नियम होता. येणार्या पौर्णिमेला तिने ब्राह्मणांच्या पंक्तीला आपले गुरु रविदास यांना बसविले. ब्राह्मण रागावले. रविदास ब्राह्मणांच्या मागे आपल्या पादत्राणाशेजारी बसले. ब्राह्मण भोजन करू लागले. प्रत्येकाला आपल्या पुढे-मागे रविदास भोजनाला बसले आहेत असे दृश्य दिसले. रविदास यांनी 700 रूपे धारण केली. ब्राह्मणांना आपली चूक उमगली. ते त्यांच्या भक्त परिवारात सामील झाले. जातीचे श्रेष्ठत्व त्यांना मान्य नव्हते. कर्मश्रेष्ठत्व त्यांना मान्य होते. ते म्हणत,
ब्राह्मण मत पूजिए, जो होवे गुणहीन।
पूजिये चरण चंडाल के जो होवे गुण प्रवीण ॥
कर्मठ ब्राह्मणांना त्यांनी आपल्या छातीवर सोन्याचे जानवे दाखविले आणि त्यांचा गर्वपरिहार केला.
कनक जानेऊ कंप दिखाया, भक्ती करी रैदासा।
त्यांनी जातीपातीवर, स्पृश्य-अस्पृश्यतेवर कडाडून टीका केली.
जाती जाती में जाति है जो केतन के पात।
रैदास मनुष ना जुड सके, जब तक जाति न जात॥
चारही वेदांमधील कर्मकांडावर त्यांनी टीका केली. मन शुद्ध असायला हवे. स्वकर्मावर निष्ठा असायला हवी, असा संदेश ते पुढील दोह्यांतून देतात.
1) चारो वेद करे खंडौती, ते रविदास करे दंडौती।
2) कर्म बंधन मे बंध रहियो, फल की न मंजीयो।
आस कर्म मानुष का धर्म है सत लाखे रविदास॥
माणसांमाणसांमधील प्रेम, बंधुभाव यांचा पुरस्कार त्यांनी केला.
रैदास प्रेम नहि छिप सकई, लाख छिपाए कोय।
प्रेम न मुख खोले कभऊँ, नैन देत है रोय॥
सर्व समाज एकदिलाने रहावा, हे त्यांचे स्वप्न आहे.
ऐसा चाहू राज मै, जहाँ मिले सबन को अन्न।
छोटे बडे सब सम बसै, रविदास रहे प्रसन्न॥
उपमा, रूपक हे त्यांचे आवडते अलंकार आहेत. आपल्या हृदयाशी थेट संवाद साधणारी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आपल्या जातीविषयी त्यांच्या मनात खंत नाही. उलट ते प्रतिप्रश्न करतात.
बता रे पंडित ज्ञानी, कौन चाम से न्यारा।
चाम का ब्रह्मा, चाम का विष्णु, चाम का सकल पसरा॥
चाम का अंबर, चाम की धरती, चाम का है जुग सारा॥
चाम का चंदा, चाम का सूरज, चाम का नौलख तारा॥
चाम का योगी, चाम का भोगी, चाम का गुरु तुम्हारा॥
कहे रैदास सुनो रे पंडित, चाम का नाही गुरु हमारा॥
गुरुतत्त्व हे मात्र ‘चर्म’ या घटकापासून अलिप्त आहे अशी त्यांची धारणा आहे. येथे संत चोखामेळा आणि त्यांचा परिवार यांचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. हा संपूर्ण परिवार समाजाला, देवाला विटाळपणाचा जाब परखडपणे विचारतो. ‘विटाळ’, ‘विटाळ’ म्हणून आक्रोश करणार्या समाजाला चोखोबा निरुत्तर करणारा प्रश्न विचारतात. चोखोबा उच्चवर्णियांना उद्देशून म्हणतात.
आदि अंती अवघा विटाळ संचला। सोंवळा तो झाला कोण न कळे॥
चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळा परते आहे कोण॥
(सा.विवेक प्रकाशित संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंगगाथा, प्र.व. 2022/अभंग क्रमांक 84)
‘साधु दिसती वेगळाले। परि ते स्वरुपी एक जाले॥’ या वैश्विक सत्याचे येथे प्रत्यंतर येते. ‘चाम’ म्हणजे आवरण हा अर्थ जास्त सुसंगत ठरेल. या दंतकथांच्या आवरणांना दूर केले तर त्यातून रविदास-रैदास-रोहिदास यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे तसेच व्यक्तित्वाचे सहजसुंदर दर्शन घडते. आपल्याला लाभलेले सर्व ज्ञान हे रामानंद यांच्या गुरुकृपेचे फळ आहे, अशी त्यांची विनम्र भावना होती. माघ पौर्णिमेला त्यांचा उत्सव साजरा केला जातो.
संत मीराबाई
मीराबाई या राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होत्या. इ.स. 1498 हे त्यांचे जन्मवर्ष मानले जाते. वैष्णव भक्ति परंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत. संत रविदास हे त्यांचे गुरू. मीरेची अशी मानली जाणारी सुमारे 1300 भजने आहेत. ती भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने तिचे ईश्वराप्रती असलेले बिनशर्त प्रेम व्यक्त केलेले आहे. राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दादूजी हे मीरेचे आजोबा. मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला विचारले, “माझा पती कोण होणार?” तेव्हा आईने तिला घरातील एका कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि ‘हा तुझा पती’ असे सांगितले. तिच्या घरी येणार्या साधूंकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला खूप आवडत असे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वत:कडे ठेवून घेतली. पुढे ‘तू ईश्वराला खूश ठेवू शकणार नाहीस’ असे सांगून साधूने ती मूर्ती नेली. मीरा मैत्रिणीला व जयमाल या चुुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदानुसार ती मूर्ती रडू लागली. दुसर्या दिवशी ती मूर्ती साधूने मीराला दिली. ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा ‘मूर्तीप्रेमी’ बनली. तिने या मूर्तीशी स्वत:चे लग्न लावले, असेही सांगितले जाते. लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्यासोबत मीरेचा विवाह ठरला. मीरेला हा विवाह अर्थातच पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ.स. 1527मध्ये एका लढाईत भोजराज मारला गेला. क्षणभंगुर गोष्टी सोडून तिने शाश्वताकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. दु:खाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णन करणारी तिची भजने याची साक्ष देतात. ती कृष्णरूपाशी एकरूप झाली होती.
1) जो मैं ऐसा जानती प्रित किये दु:ख होय।
नगर ढिंढोरा पीट के कहती प्रीत ना करिये कोय॥
2) ए री मै तो प्रेम दिवानी मेरा दरद ना जाणे कोय॥
प्रारंभी तिचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती. नंतर ती आनंदाने रस्त्यावर नाचू लागली. नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. तिच्यावर विषप्रयोग केला गेला. तिने कृष्णभक्ती एकनिष्ठेने केली.
1) मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोय।
जाके सर मोर मुकुट मेरो पती सोय॥
2) मैं तो हरिगुन गावत नाचूंगी।
अपने मंदिर में बैठ बैठकर गीता भागवत बाचूंगी॥
मीरा के प्रभू गिरीधर नागर, सदा प्रेमरस चाखूंगी॥
तिच्या या भावविश्वात श्रीकृष्णावाचून अन्य कोणाला स्थान नव्हते. समाजाने तिला टाळले, परंतु तिने समाजाला दोष दिला नाही. समाजचित्रण केले नाही. उपदेशकाची भूमिका स्वत:कडे घेतली नाही. ‘समयासी सादर व्हावे’ या उक्तीनुसार ती स्वत:ला समजाविते.
करना फकिरी फिर क्या दिलगिरी सदा मगन मैं रहना जी॥
कोई दिन गाडी कोई दिन बंगला, कोई दिन जंगल बसनाजी॥
कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चलना जी।
कोई दिन खाजा, कोई दिन लाडू, कोई दिन फाकमफाका जी।
कोई दिन ढोलिया, कोई दिन तालिया, कोई दिन भुयी पर लेटनाजी।
मीरा के प्रभु गिरीधर नागर, आए पडे सो सहेना जी॥
‘देव ठेवील तैसे राहावे’ अशी तिची वृत्ती या पदातून प्रतीत होते.
गुरूगौरव
भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरू हे तत्त्व आहे. त्याचे अस्तित्व सदासर्वकाळ आहे. भक्ती म्हणजे केवळ ईश्वरभक्ती नव्हे, तर त्यात आणि नवविधा भक्तीत गुरूभक्ती ही अध्याहृत आहे. मीरेनेसुद्धा गुरू गौरव केलेला आहे. लोकांचे लक्ष मात्र फक्त तिच्या कृष्णभक्तीकडेच गेले. तिने रामाचेसुद्धा गुणगान केलेले आहे. पुढील पदात तिने रामाबरोबरच गुरूंचा उल्लेखही सूचक पद्धतीने केला आहे.
पायोजी मैने रामरतन धन पायो।
वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु किरपा कर अपनायो।
जनम जनम की पूँजी पाई, जग मे सबी खोवायो॥
खरचे न खुटै चोर न लुटै दिन दिन बढत सवायो।
सत की नाव खेवटिया सतगुरु भवसागर तर आयो।
मीरा के प्रभू गिरीधर नागर, हरख हरख जस गायो॥
गुरूमुळेच रामनामरूपी रत्नाचा लाभ झाला. तो कर्णधार असल्यामुळे या भवसागरातून मला सहज तरून जाता आले. म्हणून मी मोठ्या आनंदाने त्याची कीर्ती वर्णन करत आहे.
मोहे लागी लगन गुरुचरणन की।
चरण बिना मोहे कछु नही भावे, जग माया सब सपनन की॥
भवसागर सब सुख गयो है, फिकर नही मोरे तरनन की॥
मीरा के प्रभु गिरीधर नागर, आस वही गुरुशरणन की॥
या पदातून तिचे गुरूप्रती पूर्ण समर्पण दिसून येेते. गुरूचरणाशी ती तादात्म्य पावली आहे. गुरूचरणाशिवाय तिला सर्व संसार मिथ्या, विनाशी, नश्वर वाटतो. उपरोक्त पदानुसार गुरूरूपी नावाडी तिच्यासोबत असल्यामुळे भवसागराची भीती नष्ट झाली आहे. जणू भवसागर तिच्यासाठी कोरडा झाला आहे. आता बुडण्याचे भय कसले? गुरूने आपल्यावर असीम कृपा करून आपला उद्धार केला आहे. गुरूच्या या ॠणातून उतराई होणे शक्य नाही. त्याच्या चरणाचे निरंतर अनुसंधान राहावे हेच ‘पसायदान’ ती गुरूंजवळ मागत आहे.
गुरु-शिष्य साम्यस्थळ
संत रविदास-मीराबाई यांच्या पदातील शब्दात, आशयात साम्यस्थळे आढळतात. त्यातील एक साम्यस्थळ उदाहरणादाखल पाहू या.
संत रविदास -
अब कैसे छुटे नाम रट लागी।
प्रभुजी तुम चंदन हम पानी। जाकी अंगभंग बास समानी॥
प्रभुजो तुम घन बन हर मोरा। जैसे चितवत चंद चकोरा॥
प्रभुजी तुम दीपक हम बाती। जाकी जोति जरे दिनराती।
प्रभुजी तुम मोती हम धागा। जैसे सोनही मिलत सुहागा॥
प्रभुजी तुम स्वामी हम दासा। ऐसी भगति करै रैदासा॥
संत मीराबाई -
जो तुम तोडो पिया, मै नाही तोडू रे।
तोरी प्रीत तोडी कृष्णा कौन संग जोडू रे॥
तुम भये तरुवर मै भई पंखीया॥
तुम भये सरवर मै भई मच्छीया॥
तुम भये गिरीवर मै भई चारा॥
तुम भये चंदा मै भई चकोरा॥
तुम भये मोती मै भई धागा॥
तुम भये सोना मै भई सुहागा॥
बाई मीरा के प्रभु ब्रीज के बासी।
तुम मेरे ठाकुर मै तेरी दासी॥
हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. काव्यसौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून याचा आनंद घेता येतो.
संत तुकाराम यांचा ‘उच नीच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ती देखोनिया॥’ हा एक प्रसिद्ध दीर्घचरणी अभंग आहे. यात त्यांनी वरील दोन्ही गुरु-शिष्यांचे कर्तृत्व, भक्तमालेतील त्यांचे स्थान उत्तमप्रकारे अधोरेखित केले आहे.
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे।
मीराबाईसाठी घेतो विष प्याला।
रामानंदांपासून सुरू झालेली ही गुरु-शिष्य परंपरा अशा रितीने मराठी-हिंदी या संतमालिकेचा सेतू ठरतो.
- लेखक संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.