मध्ययुगीन भक्ती चळवळीतील थोर प्रबोधनकार संत रविदास यांनी सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध आपल्या साहित्यातून प्रखर आवाज उठवला. त्यांच्या विचारधारेचा कळस असलेल्या ‘बे गमपुरा’ संकल्पनेतून त्यांनी एका वर्गविहीन, जातीविहीन आणि दुःखमुक्त आदर्श समाजाचे स्वप्न मांडले. पाश्चात्य जगातील थॉमस मोर यांच्या ‘युटोपिया’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मूल्यांशी नाते सांगणारी ही संकल्पना मानवी कल्याणाचा खरा मार्ग दाखवते.
संत रविदास हे भारतीय संत परंपरेतील थोर समाजसुधारक संत होते. मध्ययुगीन भक्तिकाळातील श्रीगुरू रामानंद यांच्या शिष्य परिवारातील रविदास हे अग्रणी सिद्धसाधक होते. ’निर्गुण भक्ती परंपरेतील आचार्य’ अशी त्यांची मान्यता होती. संत कबीर, त्यांचे गुरुबंधू, संतसांगाती होते; तर महाराणी मीराबाई त्यांची शिष्या होती. रविदासांची स्वतंत्र ग्रंथ रचना नाही; पण अनेक पदांचे संकलन, ‘पदावली’ उपलब्ध आहे. ‘गुरुग्रंथसाहिब’ या शिखांच्या परमपवित्र धर्मग्रंथात संत रविदासांच्या पदांचा समावेश आहे. त्यांच्या पदांमधील ‘बे गमपुरा’ ही एक संकल्पना भेदभावविरहीत, सुखी संपन्न, एकात्म, समरस अशा समाजाची सुंदर, मनोज्ञ मनोकामना आहे. ‘बे गमपुरा’ हे पद वाचून वाचकांना संत ज्ञानदेवांच्या ‘पसायदान’ या दिव्य प्रार्थनेची आठवण होते.
आरंभिक
हिंदुस्थानच्या इतिहासात ‘भक्तिकाल’ आणि त्या काळात देशाच्या विविध प्रांतात, विविध भाषेत, विविध पंथ-संप्रदायांमध्ये होऊन गेलेल्या संतांचे कार्य प्रामुख्याने धार्मिक-पारमार्थिक असले तरी त्याला मानवतावादी, लोककल्याणकारी करुणेचे उदात्त अधिष्ठान आहे. म्हणूनच, ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती।’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. मध्ययुगीन भक्तिकाळामध्ये जे असंख्य संत होऊन गेले; त्यांचे क्षेत्र, भाषा, पंथ वेगवेगळे होते तरी त्यांच्यामध्ये अंतरंग साम्य होते.
‘साधु दिसती वेगळे। परी अंतरी मिळालेले॥’ असे त्यांच्या कार्यामध्ये विलक्षण एकरूपता होती.
शेकडो वर्षे आपला देश परधर्मीय राजवटींच्या गुलामगिरीत होता तरी या काळात समाजाचे स्वत्व, स्वाभिमान, स्वधर्म यांचे संरक्षण झाले ते या संतांनी केलेल्या कार्यामुळेच! सारे संत मानवतावादी होते, त्यांनी कधीही शस्त्र हाती घेतले नाही; पण आक्रमकांच्या धर्मांध अन्यायाविरूद्ध एतद्देशीय समाजाचे मन व मनगट बळकट करण्याचे कार्य, सकल संतांनी आपल्या काव्यातून केले; अशा महान संतपरंपरेतील एक साक्षात्कारी संत व समाज प्रबोधनकार संत रविदास तथा रैदास हे एक अग्रणी संत आहेत. त्यांचे कार्य व साहित्य ‘सामाजिक एकता, प्रेम आणि बंधुता’ यांचे शाश्वत, प्रेरणादायी दर्शन आहे.
अनुभव व प्रचिती
संत रविदास यांचा जन्म झाला, तेव्हाची एकूण परिस्थिती विचित्र होती. आपला देश धर्मांध आक्रमकांच्या गुलामगिरीत होता. आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व दृष्टीने दुर्बल व स्वत्वहीन झालेला होता. धार्मिक क्षेत्रात धर्ममार्तंड व पुरोहितांचे वर्चस्व होते.हिंदू समाजातील फार मोठा समाज शुद्र, अस्पृश्य ठरवून त्याला धर्मज्ञानापासून दूर ठेवलेले होते. अशा समाजातील लोकांना ना धर्मांध बादशहा, ना स्वकीय धर्मबांधव माणुसकीची वागणूक देत होते. उपेक्षा व अभाव यांनी ग्रस्त अशा दलित वर्गातील चांभार समाजात संत रविदासांचा जन्म झाला होता. त्यामुळे उपेक्षित, वंचित, अभावग्रस्त समाजाची दुःखे रविदासांनी स्वतः अनुभवलेली होती. जातिभेदाचे विदारक सत्य त्यांनी अनेक पदांमध्ये व्यक्त केले आहे.
जाति जाति में जाति हैं, जो केतन के पात।
रैदास मानुष ना जुड सके, जब तक जाति न जात॥
हे ‘पद’ रविदासांचे स्वानुभव प्रचितीचे बोल आहेत. एकीकडे परधर्मीय राज्यकर्ते, त्यांची धर्मांध जुलुमी राजवट आणि दुसरीकडे स्वकीय धर्मबांधवांकडून होणारी उपेक्षा, घृणित व्यवहार अशा बिकट परिस्थितीत संत रविदास लहानाचे मोठे झाले; पण त्यांनी सकल समाजाविषयी प्रेम, आस्था बाळगली. समाजाला भक्तीबरोबरच प्रेमधर्माची, माणुसकीची शिकवण दिली. त्यांनी हिंदू समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, कुरिती यांच्यावर जोरदार प्रहार केला; पण त्यात कोणतीही द्वेषभावना नव्हती, ‘समाजाचे हित’ आणि ‘सामाजिक ऐक्य’ यांवर त्यांचा भर होता. देव देवळात-मूर्तीत नसून रंजल्यागांजल्या, उपेक्षित, वंचित समाजाच्या सेवेत आहे. आधी माणसातील देव ओळखा आणि करुणाभावाने त्याची पूजा करा. ’कर्मकांड’, ’अघोरी साधना’, ’हटयोग’ यांपेक्षा सहज सोपी नामसाधना-नामभक्ती करा, असा रविदासांनी बोध केलेला आहे.
ब्रह्मानुभूतीचा स्वर
संत रविदासांचे साहित्य आपणास ‘आदि’ ग्रंथ संकलनात व त्यांच्यावर लिहिलेल्या मान्यवर लेखक-अभ्यासकांच्या ग्रंथातून वाचावयास मिळते. पंडित रामानंदशास्त्री, डॉ. पद्म गुरुचरण सिंह, डॉ. शर्मा, डॉ. परशुराम चतुर्वेदी, संगमलाल पांडे, डॉ. जोगींदर सिंह, धर्मपाल मौनी अशा अनेक संशोधक, साहित्यिक, लेखकांनी रविदासांची थोरवी आपल्या ग्रंथातून गायलेली आहे.
संत रविदासांची ‘पदावली’ हीच त्यांची वाङ्मयमूर्ती आहे. त्यांची ही पदे कोरडी शुष्क पांडित्यदर्शी विचारधारा नसून मनुष्याप्रती असलेल्या असीम करुणेची भावधारा आहे. जसे सुचले तसे सहजपणे त्यांनी पदांमधून व्यक्त केले आहे. त्यामुळे साहित्यकृतीपेक्षा ‘प्रत्यक्ष अनुभूतीचे बोल’ म्हणून त्याचे मोल अनमोल आहे. ती पदे एक प्रकारची रसात्मक पदावलीचा आनंद आणि चिरंतनाचा बोध देणारी आहेत. पारमार्थिक ‘साधनावस्था’ आणि ‘सिद्धावस्था’ अशा दोन्हींचे उत्कट दर्शन आपणास या पदावलींमधून घडते. ‘ब्रह्मानुभूतीच्या परमावस्थेतील स्वर, उद्गार’ अशी ही पदे हिंदी साहित्यातील अनमोल माणिकमोती आहेत. ‘सामाजिक न्याय’,‘श्रमप्रतिष्ठा’, ‘सामाजिक एकता’, ‘आत्मगौरव’ आणि ‘आत्मविश्वास’ अशा अनेक पैलूंनी रविदासांची पदावली संपन्न आहे.
‘बे गमपुरा’ दिव्य मनोकामना
संत रविदासांच्या ‘पदावली’मध्ये ‘बे गम पुरा’ नावाची एक काव्यरचना आहे. ही काव्यरचना, पद म्हणजे संत रविदासांच्या कल्पनेतील एका आदर्श नगराची दिव्य मनोकामना आहे. या पदामध्ये रविदासांनी ज्या समान, सुखी, संपन्न समाजाची कल्पना केली आहे ती जणू ‘रामराज्य’ कल्पनेसारखीच आहे. या काव्य रचनेत सात अंतरे, कडवी आहेत. पदाचा शेवट ‘कहे कबीर’,‘तुका म्हणे’ प्रमाणेच ‘कहि रविदास’ असा रविदासांच्या नाममुद्रेने झालेला आहे.
‘बे गमपुरा’ ही केवळ भक्तिमार्गी पारमार्थिकाची कल्पना नसून वर्गविहीन, जातीविहीन, अशा सुखी, संपन्न आणि एकात्म अशा आदर्श मानव समाजाच्या नगराची-वस्तीची, राज्याची एक दिव्य मनोकामना आहे. त्या मनोकामनेला मानवतावादाचे व्यापक अधिष्ठान आहे. सामाजिक उदात्त दृष्टी व करूणा यांची बैठक आहे.
‘बे गमपुरा’ हा एक शब्द नसून ’बे’, ’गम’ आणि ’पुरा’ अशा तीन शब्दांचा संयुक्त शब्द आहे. यातील ‘गम’ शब्दाचा अर्थ दुःख, व्यथा, वेदना असा असून ‘बे गम’ म्हणजे ज्या ठिकाणी दुःख, व्यथा, वेदना नाहीत असे ‘पुरा’ म्हणजे नगर, शहर, बस्ती, व्यापक अर्थाने राज्य.
बे गम पुरा शहर को नाऊ।
दुख अंदोहु नही तिही ठाऊ॥1॥
‘बे गम पुरा’ काव्यरचनेतील या पहिल्या ओळीमध्ये संत रविदास म्हणतात - माझ्या मनोकामनेतील हे असे शहर आहे की ज्या ठिकाणी दुःख, काळजी, क्लेश यांना स्थान नाही.
ना तसवीस खिराजू न मालु।
खौफु न खता न तरसु जवालु॥2॥
या नगरीमध्ये ना अन्यायी कर असेल, ना जुलूम जबरदस्ती, ना सक्तीची वसुली असेल.
ऊब मोहि खुब वतन गहि पाई।
ऊहां खैरि सदा मेरे भाई॥3॥
माझ्या कल्पनेत मातृभूमीचे असे सुंदर स्थान आहे की, जेथे सुखाचे आगर असेल व लोकांचे कल्याण होईल. या ओळीतील ‘वतन’, मातृभूमी आणि ‘मेरे भाई’ हे शब्द रविदासांच्या अंतरंग स्नेहभावाचे, देशप्रेमाचे द्योतक आहेत.
काइमु दाइमु सदा पातिसाही।
दोम न सेम एक सो आही॥4॥
माझ्या संकल्पनेतील बे गम पुरातील राज्य कायम स्थिर असेल तसेच ते न्यायपूर्ण असेल. प्रत्येकाच्या जीवनाला स्थैर्य असेल. या नगरीमध्ये कोणत्याही प्रकारचा, हा वरिष्ठ हा कनिष्ठ, हा पहिला तो दुसरा-तिसरा असा भेदभावाचा लवलेशही नसेल. सर्व लोक समान व सर्वांना एकसारखा सन्मान असेल.
आबादान सदा मसहून।
ऊहा गनी बसहि मामूर॥5॥
आबादान म्हणजे समृद्ध. मसहूर-प्रसिद्ध. हे शहर सर्व सुखांनी, साधनांनी समृद्ध असेल तसेच ते समृद्धीसाठी सर्वत्र प्रसिद्धही असेल. तेथे सर्व लोकजीवन आनंदी, समाधानी असेल.
तिउ तिउ सैल करहि जिउ भावै।
मरहम महल न को अटकावै॥6॥
या शहरात प्रत्येक प्राणीमात्राला आपल्या इच्छेनुसार मुक्तपणे जगण्याचा अधिकार असेल. सर्वांना सर्व ठिकाणी मुक्त संचार करण्याचाही अधिकार असेल, कोणताही मज्जाव-अडथळा नसेल.
कहि रविदास खलास चमारा।
जो हम सहरी सो मीत हमारा॥7॥
या अखेरच्या ओळींमध्ये रविदासांनी आपले नाव घातले असून आपण दलित-चांभार समाजातील आहोत हे ते स्वाभिमानपूर्वक सांगतात. कोणत्या समाजात, कोणा पोेटी, कोणत्या ठिकाणी जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसते. त्यामुळे ज्या समाजात जन्म झाला त्याचा प्रत्येकास स्वाभिमान असला पाहिजे. कारण माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा ठरतो. असा रविदासांचा सकल समाजाला उपदेश आहे.
रविदास जनम के कारणे होत न कोऊ नीच।
नर को नीच करि डारि है, ओछे करम की कीच॥
‘बे गमपुरा’ काव्यरचनेचा समारोप करताना शेवटच्या ओळीत रविदास म्हणतात- ‘जो जो माणूस या बे गम पुराचा नागरिक-रहिवासी आहे, तो तो माझा खरा मित्र, सोबती, सखासांगाती आहे.’
संत रविदासांचे ‘बे गमपुरा’ पद शिखांच्या परमपवित्र ‘गुरुग्रंथसाहिब’ या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे. आपले मराठी राष्ट्रसंत नामदेव यांची ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये 61 हिंदी पदे आहेत. तेच भाग्य संत रविदासांना लाभले. त्यांच्या 41 पदांचा ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये समावेश आहे. ‘बे गमपुरा’ हे पद शुद्ध संस्कृतप्रचुर भाषेत नाही, तर हिंदीची उपभाषा ‘साधुक्कडी’ भाषेत आहेत. खडीबोली, ब्रजभाषा, अवधी या तीन भाषांच्या मिश्रणातून ‘साधुक्कडी’ ही मिश्रभाषा जन्मलेली आहे.
ऐसा चाहु राज मैं, जहाँ मिले सबन को अन्न।
छोटे-बडे सब सम बसे, रैदास रहे प्रसन्न॥
हाच विचार रविदासांनी ‘बे गमपुरा’ पदामध्ये वेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेला आहे.
’बे गमपुरा’ पदातून व्यक्त झालेली संकल्पना, मनोकामना एक प्रकारे समाजवादी समाजचित्र आहे. हे काव्य रविदासांच्या द्रष्टेपणाचे दर्शन आहे. पाश्चात्य जगात पुढील काळात समाजचिंतक-लेखक ‘थॉमस मोर’ यांनी ‘युटोपिया’ (णीेंळिर) जे वर्गहीन, शोषणविरहीत समाजाचे चित्र मांडले तेच त्याआधी काही शतके संत रविदासांनी ‘बे गमपुरा’ मधून मांडलेले आहे. साम्यवादी विचारवंत कार्ल मार्क्सच्या कल्पनेतील समताधिष्ठित समाजाचे अनेक पैलू बीजरूपाने रविदासांच्या बे गमपुरा काव्यात दिसून येतात. एवढेच नव्हे तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय राज्य घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचे दर्शन आपणास ‘बे गमपुरा’मध्ये दिसते. रविदासांच्या ‘बे गमपुरा’मधील सार्या कल्पना वाचून मराठी वाचकांना संत ज्ञानदेवांच्या पसायदानामधील उदात्त व्यापक विश्वकल्याणकारी विचारांचे स्मरण होते.
अशा प्रकारे मध्ययुगीन भक्तिकाळातील अग्रणी संत रविदास तथा ’रैदास’ यांचे ‘साहित्य-पदावली’ परिवर्तनवादी नव्या सामाजिक संरचनात्मक दृष्टीच्या क्रांतिकारी समाजसुधारकांचे सदैव प्रेरणादायी अक्षर वाङ्मय आहे आणि ‘बे गमपुरा’ त्याचा कळस आहे.
- लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ’साईलीला’ आणि ’एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत.
एारळश्र : र्ींळवूरवहरीींरींहशसारळश्र.लेा