अलिकडच्या काळात काही लोक देवभक्ती, समाजभक्ती व देशभक्ती यामध्ये भिंत उभी करतात. संत रविदासांच्या जीवनातून व विचारातून वरील तिन्ही गोष्टी कशा परस्परपूरक आहेत हे लक्षात येते. भक्तीमुळे मनुष्याचे मन व्यापक होते. सर्वत्र परमेश्वर आहे ही भावना समाजरूपी परमेश्वराची भक्ती (सेवा) करायला लावते. संस्कृतिरक्षण हेच राष्ट्ररक्षण आहे हा बोध होतो व समाज परकीय सत्तेला नाकारतो.
संतांनी आक्रमणाच्या काळात समाजाला भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून जोडून ठेवले. धर्म व संस्कृतीला अभेद्य कवच दिले. या संतमालिकेतील संत रविदासांचे विचार, कार्य व शिकवणीचे आजच्या परिस्थितीतही मोलाचे स्थान आहे. आचार्य रामानंदांच्या शिष्य परिवारातील ते एक संत. गुरुबंधू संत कबीर यांचा सहवास रविदासांना लाभला. आचार्य रामानंद हे ब्राह्मण आणि त्यांचा शिष्य परिवार बघितला तर 15व्या शतकातील समरसतेचे ते उत्कृष्ट उदाहरण दिसून येते. सर्व जाती व व्यवसायातील मंडळी यामध्येे आहेत. संत कबीर, संत रविदास, संत सेना महाराज, सनद कसाई, पिपा दर्जी इ. यातील बहुतांश संतांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला आपला देव मानले. पंढरीशी उत्तर भारत जोडला गेला.
संत रविदास जन्माने चर्मकार होते. आपला व्यवसाय करतांनाच प्रभू रामाच्या भक्तीत तल्लीन होऊन जात होते. देवभक्ती व समाजातील सर्व घटकांशी चालणारा प्रेमळ संवाद यातून रविदासांचे महान व्यक्तिमत्व घडले गेले. त्यांची असामान्य प्रतिभा, प्रभावी वाणी आणि सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सामान्य जनांबद्दलची उत्कट आस्था. परमेश्वराप्रति दृढ व एकनिष्ठ भक्ती हे त्यांचे विशेष गुण होते. धर्मयात्रांच्या निमित्ताने त्यांनी समाजाचे अवलोकन केले.
तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, स्पृश्यास्पृश्यता, उच्चनीचता या दोषांनी समाजात तीव्र भेद निर्माण झाले होते. हे भेद नष्ट व्हावे यासाठीच संत रविदास सतत प्रबोधन करत राहिले. रविदासांच्या मनात समाजाविषयी अपार करुणा होती. समाजात बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी ते अखंड कार्यरत होते. संत रविदासांनी मोठमोठ्या पंडित व महापुरुषांशी संवाद करून त्यांचे मनपरिवर्तन केले.
सामाजिक सुधारणा वा योग्य परिवर्तनाचे कार्य ज्यांना करायचे आहे, अशा मोठ्या व्यक्तींनी आपले कार्य समर्पण भावनेने करावे. परमेश्वरभक्तितून हा संस्कार येतो. परमेश्वर आणि भक्त यांच्यात केवळ प्रेमाचा संवाद असतो. अहंकाराला तेथे थारा नसतो. अलिकडच्या काळात काही लोक देवभक्ती, समाजभक्ती व देशभक्ती यामध्ये भिंत उभी करतात. संत रविदासांच्या जीवनातून व विचारातून वरील तिन्ही गोष्टी कशा परस्परपूरक आहेत हे लक्षात येते. भक्तीमुळे मनुष्याचे मन व्यापक होते. सर्वत्र परमेश्वर आहे ही भावना समाजरूपी परमेश्वराची भक्ती (सेवा) करायला लावते. संस्कृतिरक्षण हेच राष्ट्ररक्षण आहे हा बोध होतो व समाज परकीय सत्तेला नाकारतो. देवभक्ती समाजमनात दृढ करण्याचे कार्य संतांनी प्रत्येक कालखंडात केले. समाजाचे मनोबल यामुळेच टिकून राहिले.
संत रविदासांचे कार्य
मध्ययुगीन कालखंडात संत रविदासांनी मुस्लीम दहशतवांद्याच्या आणि समाजातील तीव्र जातिभेदाच्या काळात तळागाळातील लोकांना आत्मसन्मान बहाल केला. त्याकाळी मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतरणाला आळा घातला. हिंदू समाजाला मुस्लीम होण्यापासून वाचवले. त्यांनी आपल्या चर्मकार जातीचा उघडपणे उल्लेख केला. या जातीत कराव्या लागणार्या कर्मांचा पुन:पुन्हा उल्लेख केला आहे. परंपरेने आपल्या जातीला करावे लागत असलेले चर्मकाराचे कर्म, मेलेली जनावरे ओढून नेणे, त्यांची कातडी सोलणे हे सारे रविदास कुठलाही आडपडदा न ठेवता सांगतात. आजच्या काळात जातिपातींचे गट/समूह हिंदू समाजाला विभाजित करण्यासाठी निर्माण केले जातात. संतांना जातींच्या चौकटीत बसवण्याचा आटापिटा केला जातो. संत रविदास स्वतःचा परंपरागत व्यवसाय करीत असतांना आपल्या ’बनारस’ वास्तव्याचा व ’रिदै राम’ असल्याचे सांगतात. परमेश्वर भक्तीचा अधिकार सर्वांनाच आहे हे दर्शवण्यासाठी आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणांशी शरणागत असल्याचे देखील पुन्हा पुन्हा सांगतात.
देवभक्ती हा हिंदू माणसाचा सहज स्वभाव आहे. तसेच हाच हिंदू एकतेचा भक्कम आधार आहे. हाच आधार रविदास आपल्या नित्य व्यवहारातून दर्शवतात. भक्तीचा प्रचार करीत समाजाला समरसतेच्या सूत्रात बांधून ठेवण्याचे महान कार्य संत रविदासांनी शांतपणे, कुणावरही कठोर दोषारोपण न करता केले आहे. समाजपरिवर्तन करतांना नेहमीच समाजाविषयीची आपुलकीची भावना आवश्यक असते. आजकाल समाजसेवेचाही अहंकार अनेकांचे ठायी दिसून येतो. अशा वेळी रविदासांच्या समाजाविषयीच्या सहृदयतेचा परिचय होतो.
धर्म, ज्ञान, विद्या यावर आचार्य, विद्वान यांच्याशी झालेल्या संवादातून रविदासांच्या महानतेचा परिचय भल्याभल्यांना झाला. अनेकांची अहंकारातून सुटका झाली व त्यांनी रविदासांची महानता अनुभवली. चर्मकार जातीमध्ये जन्माला आलेली व तोच व्यवसाय मन लावून करणारी व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रात एक अधिकारी पुरूष म्हणून योग्यता प्राप्त करू शकते हा विलक्षण अनुभव या क्षेत्रातील विद्वानांना झाला.
आचार्य सोमदेव एकदा शास्त्रार्थ करण्याच्या उद्देशाने संत रविदासांकडे आले. सोबत काही शिष्य होते. सोमदेव ज्ञानी होते पण अहंकारी होते. दोघांच्या संवादातून रविदासांच्या महान व्यक्तिमत्त्वाचा सर्वांनाच परिचय झाला. संत रविदासांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांच्याकडे बघितल्यावर बाह्यदृष्टीने विद्वत्तेची कोणतीही ओळख दिसत नव्हती. समोर ग्रंथ नव्हते. परंतु आचार्य सोमदेवाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहजपणे रविदास देत होते. प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यात होता. वर्तमानात विद्वतजनांसाठी हा संवाद बोधप्रद तर आहे, आत्मपरीक्षण व आत्मचिंतन करायला लावणारा आहे.
संत रविदास म्हणतात, ज्ञान हा चर्चेचा विषय आहे. संवादातून विचारांची देवाणघेवाण होते. शंका दूर होतात. विद्वान व्यक्ती विनम्र असावी. जिथे अहंकार येतो, तिथे ज्ञान समाप्त होत जाते. केवळ ग्रंथ, पुस्तके वाचल्याने ज्ञान प्राप्ती होईलच असे नाही. ग्रंथ पठणातून जर व्यक्तीमध्ये दया, प्रेम, विनम्रता हे गुण आले नाहीत तर ते ज्ञान म्हणजे केवळ शब्दांचे ओझे होईल. त्यामुळे अर्थपूर्ण जीवन जगता येणार नाही. विद्वतजनांमधे सेवाभाव असायला पाहिजे. सेवेतून महान व्यक्तिमत्त्व घडत जाते. माणसाची ओळख केवळ परिधान केलेल्या कपड्यावरून केली जात नाही तर विचार आणि आचरण यावरून ती होत असते. संत रविदासांचे विचार आजच्या परिस्थितीत किती प्रासंगिक आहेत हे यावरून लक्षात येते.
मनुष्यमात्राची धडपड सुख प्राप्तीसाठी निरंतर सुरू असते. भौतिक संसाधनातून सुख शोधणारी माणसं नेहमीच असमाधानी दिसतात. याबाबत संत रविदास फार मौलिक मार्गदर्शन करतात. ते म्हणतात,
सुख बाहेर शोधायचे नसते, तर ते अंतर्मनात असते. खरे सुख तेच जे मनाला नेहमीच समाधान व संतोष देणारे असते.
धर्म ही संकल्पना व्यापक आहे. परंतु गुलामगिरीतून आलेल्या दोषांमुळे धर्माला उपासनेत बांधले गेले. धर्म व्यक्तीला समाजाशी व चराचर सृष्टीशी जोडतो. माध्यमं वेगवेगळी असू शकतात. संत रविदासजी धर्माचे चार आधार सांगतात-सत्य, तप, दया आणि दान. मनुष्याच्या आचरणातून या गोष्टी प्रगट व्हाव्यात. प्रत्येक युगाची ओळख ही केवळ अंकावरून होत नसते, तर मानवी व्यवहारातून त्या युगाची ओळख निर्माण होते. रविदासांच्या दृष्टीतील समाजपरिवर्तनाची दिशा व धर्माधारित समाजाचे निर्माण हे चित्र त्यांच्या विचारांतून लक्षात येते.
संत रविदासांच्या विचारांच्या केंद्रस्थानी सनातन वैदिक विचारधारा आणि परबह्मस्वरुप राम असल्यामुळेच हिंदुत्वाच्या सत्यधारेला रविदासांनी समृद्ध केले. श्रेष्ठ कनिष्ठता ही कोणत्या जातीमधे जन्म झाला यावर अवलंबून नाही तर गुण व कर्मावर आधारित आहे. हे स्पष्ट करतांना ते म्हणतात ..
ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन ।
पूजिये चरण चांडाल के जो होवे गुण प्रवीण ॥
समरसतेचे सूत्र व त्याचा जागर संत रविदासांनी 14-15 व्या शतकात केला.
रविदासांचा कालखंड गुलामगिरीचा होता. ’पराधीनता पाप आहे’ असे सांगून स्वातंत्र्याचा उद्घोष केला.
पराधीनता पाप है , जान लेहु रे मीत ।
रविदास दास पराधीन तो कौन करे प्रीत ॥
ही भावना ’स्व’ जागृत करणारी आहे.
भक्ती आंदोलन स्वातंत्र्याची चेतना निर्माण करणारे होते. संतांनी प्रबोधनातून पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आणि एकमेकांपासून दुरावलेल्या समाजाला त्यांनी जागे केले. ते म्हणतात,
हिल, मिल चलो जगत में फूट पडो दो नहीं ।
फूट पडी माची तो देश नष्ट हो जाई ॥
एकात्म समाजाचे महत्त्व रविदास अशा प्रकारे विशद करतात. म्हणूनच आजच्या काळात त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक आहे.
- लेखक संत साहित्य अध्ययन समूह,
महाराष्ट्राचे संयोजक आहेत.