Vikram - 1
@अनुप देवधर
भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट म्हणजे ‘विक्रम-1’ होय. या आकाशात झेपावलेल्या रॉकेटने आपल्या देशाला थेट अंतराळ क्षेत्रात फक्त एक महासत्ता बनवले नाही, तर जागतिक कमर्शियल स्पेस मार्केटचा नवा केंद्रबिंदू बनवले आहे. विशेष म्हणजे ’विक्रम-1’चे सगळे तंत्रज्ञान हे स्वदेशी आहे. या कामगिरीने भारतातील खासगी अंतराळ उद्योगाला जागतिक स्तरावर पोहोचवणार्या नव्या युगाची सुरुवात होते आहे.
18 जुलै 1980 म्हणजे बरोबर 46 वर्षांपूर्वी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पहिल्या सॅटॅलाइट लाँच व्हेईकलचे (SLV-3) यशस्वी प्रक्षेपण झाले होते. भारताच्या अंतराळ क्षेत्रातली ही ऐतिहासिक घटना होती. 46 वर्षानंतर बरोबर याच दिवशी म्हणजे 18 जुलै 2026ला पुन्हा भारताने पराक्रम केला. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटामध्ये असलेल्या डॉ. सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँचपॅडकडे सगळे आपल्या प्राणाची शक्ती डोळ्यात एकवटून बसले होते. बघता बघता काऊंटडाऊन सुरू झाला, आणि 12 वाजून 5 मिनिटे आणि 30 सेकंदांनी प्रक्षेपणाच्या वेळी निघणारे धुराचे लोट निघाले आणि 7 मजली इमारतीएवढे म्हणजेच 24 मीटर उंच विक्रम1 अवकाशात झेपावले आणि भारताने आपले पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट ’विक्रम-1’ प्रक्षेपित केले.
रॉकेट प्रक्षेपणाचे हे चित्र आपण यापूर्वी बर्याच वेळा बघितले असले, तरी यावेळी हे बर्याच अर्थाने वेगळे होते. आकाशात झेपावलेल्या या रॉकेटने आपल्या देशाला थेट अंतराळ क्षेत्रात फक्त एक महासत्ता बनवले नाही, तर जागतिक कमर्शियल स्पेस मार्केटचा नवा केंद्रबिंदू बनवले आहे. कारण विक्रम-1 हे भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल-क्लास रॉकेट आहे...
एलोन मस्क आणि स्पेस एक्स ही नावे आता आपल्याला अतिपरिचित आहेत. अंतराळ प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणे आणि मानवाला मंगळ ग्रहावर वसवणे या ध्येयाने 2002 साली स्थापन झालेल्या SpaceXच्या गोष्टी आपण भरपूर ऐकल्या आहेत.
पण आपल्या हैद्राबाद च्या ’स्कायरूट एरोस्पेस’ (Skyroot Aerospace) या स्पेस स्टार्टअप कंपनीने ‘मिशन आगमन’ (Mission Aagaman) अंतर्गत हे आपले पहिले ऑर्बिटल-क्लास रॉकेट ’विक्रम-1’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले आहे.
या यशस्वी उड्डाणामुळे अमेरिका आणि चीननंतर खाजगी रॉकेटद्वारे उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवणारा भारत हा जगातला केवळ तिसरा देश ठरला आहे.
आतापर्यंत भारतात रॉकेट बनवणे आणि ते अवकाशात सोडणे ही केवळ सरकारी संस्था असलेल्या ’इस्रो’ (ISRO) ची जबाबदारी आणि मक्तेदारी मानली जात होती. मात्र, 2020 मध्ये केंद्र सरकारनं अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केले आणि ’इन-स्पेस’ (IN-SPACe) या संस्थेची स्थापना केली. या धोरणात्मक बदलाचा सर्वात मोठा फायदा भारतीय तरुणांना आणि स्टार्टअप्सना झाला.
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ पवन कुमार चंदाना आणि नागा भरथ डाका यांनी स्थापित केलेल्या ’स्कायरूट एरोस्पेस’ने हा विडा उचलला. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी ’Vikram-S’ हे छोटे सब-ऑर्बिटल रॉकेट चाचणी म्हणून सोडले होते. त्या चाचणीच्या यशानंतर, तब्बल चार वर्षांच्या अहोरात्र मेहनतीनंतर पूर्ण क्षमतेचे ’विक्रम-1’ या ऑर्बिटल रॉकेटचे प्रक्षेपण झाले आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव ’विक्रम’ ठेवण्यात आलं आहे. ’विक्रम-1’च्या यशाने भारतातल्या खाजगी कंपन्या आता जागतिक स्तरावर स्पेस तंत्रज्ञानाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.
विक्रम-1 हे साधारण 7 मजली बिल्डिंगएवढे म्हणजेच 24 मीटर उंच असलेले 4 टप्प्यांचे (4-Stage) रॉकेट आहे. वजनाने हलके आणि ताकदीने मजबूत करण्यासाठी या रॉकेटची संपूर्ण रचना अत्यंत प्रगत अशा ’कार्बन कंपोझिट’ मटेरिअलने केली आहे. यामुळे रॉकेटचे स्वतःचे वजन प्रचंड कमी झाले असून, उपग्रह वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे.
या रॉकेटचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अत्याधुनिक 3D-प्रिंटेड लिक्विड इंजिन. या 3D-प्रिंटेड तंत्रज्ञानामुळे इंजिन बनवण्याचा खर्च आणि वेळ कमालीचा कमी झाला आहे. या रॉकेटने ’SCOPE’ आणि ’Solaras’ हे दोन व्यावसायिक उपग्रह अवकाशात सोडले. याशिवाय, देशातल्या युवा शास्त्रज्ञांच्या आणि इंजिनिअर्सच्या स्वाक्षर्या तसेच हिर्यापासून बनवलेली ’डायमंड लोटस’ ही कलाकृतीही अंतराळात पाठवण्यात आली.
यामुळे हे रॉकेट सुमारे 350 किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (Low Earth Orbit - LEO) म्हणजेच साधारण 450 किमी उंचीवर अचूकपणे प्रस्थापित करेल
विशेष म्हणजे ’विक्रम-1’चे सगळे तंत्रज्ञान हे स्वदेशी आहे. यासाठी आपण आता कोणावरही विसंबून राहिलेलो नाही.
आपण काय करू शकतो हे जगाला दाखवण्यासाठी या पहिल्या मोहिमेतल्या रॉकेटने डॉ. विक्रम साराभाई, नोबेल विजेते सी. व्ही. रमण आणि माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सुईच्या नेढ्यात मावतील इतक्या लहान आकाराच्या 18 कॅरेट सोन्याच्या सूक्ष्म प्रतिमांचा विशेष पे-लोड अंतराळात नेला होता.
’विक्रम-1’चे यश फक्त एका स्टार्टअपच्या यशापुरते किंवा विज्ञानापुरते मर्यादित नाही; तर त्याचा थेट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
ओला-उबर प्रमाणे ’ऑन-डिमांड’ स्पेस सर्व्हिस यातून शक्य होणार असून अवघ्या 24 तासांत रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज होऊ शकते. सध्या जगभरात लहान उपग्रहांची (Nano-Satellites) मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, इस्रोच्या मोठ्या रॉकेट्समधून प्रक्षेपण मिळवण्यासाठी कंपन्यांना अनेक महिने किंवा वर्षे वाट बघावी लागते. विक्रम-1 हे रॉकेट अवघ्या 24 तासांत प्रक्षेपणासाठी एकत्र (Assemble) करून उभे केले जाऊ शकते. यामुळे कोणत्याही देशातील कंपनीला हव्या त्या वेळी उपग्रह सोडण्याची ’ऑन-डिमांड’ सुविधा उपलब्ध होईल.
यामुळं इस्रोचा ताण कमी होणार आहेच पण, देशाचा मोठा फायदा होणार आहे. लहान आणि व्यावसायिक उपग्रह सोडण्याचे काम खाजगी कंपन्यांकडं गेल्यामुळे, इस्रो आता आपला मौल्यवान वेळ आणि पैसा ’गगनयान’ (मानवी अंतराळ मोहीम), ’चांद्रयान’, आणि ’मंगळयान’ सारख्या देशाच्या मोठ्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या वैज्ञानिक मोहिमांवर केंद्रित करू शकेल. विक्रम-1 सारख्या रॉकेटमुळं हजारो लहान उपग्रहांचे जाळे अवकाशात निर्माण होईल. त्यामुळे आपल्यासारख्या कृषीप्रधान देशात शेतीसाठी फायदा होणारे पिकांवरील रोग आणि हवामानाचा अगदी अचूक अंदाज शेतकर्यांना मिळेल. त्याचप्रमाणे आपत्कालीन स्थितीची चक्रीवादळ, पूर किंवा भूकंप आदीची पूर्वकल्पना मिळून नैसर्गिक आपत्तीपासून हजारो नागरिकांचे प्राण वाचवता येतील. देशाच्या दुर्गम भागातही हाय-स्पीड इंटरनेट आणि दळणवळण यंत्रणा पोहोचवणे अशा उपग्रहामुळे शक्य होणार आहे.
स्पेस एक्स सारख्या कंपन्यांमुळे अब्जावधी डॉलर्सच्या जागतिक कमर्शियल स्पेस मार्केटवर अमेरिका आणि चीनसारख्या देशांचा असणारा ताबा आता भारताकडे येऊ शकतो. भारत आता त्या पंगतीत बसला आहे. भारतामध्ये कमी खर्चात आणि अचूक प्रक्षेपण करण्याची क्षमता असल्यामुळे, जगभरातील खाजगी कंपन्या आपले उपग्रह सोडण्यासाठी भारताकडे येतील. यामुळे देशात मोठा परदेशी महसूल येईल आणि हजारो उच्च-तंत्रज्ञान रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन सिस्टीमला यातून मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
हे सगळे असले, तरी विश्वाचा विचार करणारे आपण इतरांपेक्षा वेगळे का ठरतो, याचे अत्यंत उत्तम उदाहरण आपण विक्रम-1 मधून जगाला दिले आहे. आतापर्यंत जगाने सोडलेल्या अनेक उपग्रहांचा, निष्क्रिय उपग्रहांचा, त्यातील काही उपकरणांचा, निकामी झालेल्या आणि नादुरुस्त झालेल्या हजारो उपग्रहांचा आणि त्याच्या वेगवेगळ्या सुट्ट्या भागांचा अंतराळात मोठ्या प्रमाणावर कचरा झाला आहे. हा अंतराळातला कचरा साफ करण्यासाठी (Space Debris Removal) विक्रम-1च्या पहिल्याच मोहिमेत ’Embrace’ नावाच्या एका रोबोटिक तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात अंतराळात फिरणारा निकामी उपग्रहांचा कचरा साफ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
’स्कायरूट एरोस्पेस’चे संस्थापक पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे भारताच्या खासगी अंतराळ क्रांतीचे प्रमुख शिल्पकार आहेत.
देशातले लाखो तरुण ज्या ड्रीम जॉबची स्वप्न बघतात, त्या ISRO मधली सुरक्षित नोकरी सोडून त्यांनी 2018 मध्ये Skyroot Aerospaceची स्थापना केली.
यातले पवन कुमार चंदना हे हैद्राबादचे. लहानपणापासून विज्ञान, विमान आणि रॉकेट यांची आवड होती. जन्म आणि बालपण हैद्राबादमध्ये झाल्यावर त्यांनी IITखरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि थर्मल सायन्समध्ये डिग्री घेतली. शिक्षणानंतर त्यांची ISRO च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये निवड झाली.
आणि त्यांनी सुमारे सहा वर्षे ISRO मध्ये काम केले. ङतच3 या भारताच्या सगळ्यात शक्तिशाली प्रक्षेपण रॉकेटच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले होते. प्रोपल्शन (इंजिन), रॉकेट डिझाइन आणि उड्डाणप्रणालींवर त्यांनी काम केले.
दुसरे संस्थापक नागा भरत डाका यांनी IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक्समध्ये शिक्षण घेतले. त्यांचीही ISROच्या VSSCमध्ये नियुक्ती झाली.
ISROमध्ये असताना त्यांनी फ्लाईट कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम केले. रॉकेटचं ऑनबोर्ड कॉम्प्युटर, गायडन्स- नेविगेशन आणि कंट्रोल (GNC) प्रणाली विकसित केल्या. त्याचप्रमाणे लाँच व्हेइकलच्या हार्डवेअर आणि फर्मवेअरवरही त्यांनी काम केले होते.
ISROमध्ये काम करताना दोघांच्या लक्षात आले की लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी अनेक कंपन्यांना महिनोन्महिने किंवा अनेक वर्षे वाट बघावी लागत होती. लाँचचा खर्चही खूप जास्त होता. त्यामुळं त्यांनी अवकाशात जाणे हे विमानप्रवासाएवढे सोपे आणि परवडणारे करायचे या ध्येयातून 2018मध्ये ’स्कायरूट एरोस्पेस’ची स्थापना केली.
पण संघर्ष थांबला नव्हता, तर सुरू झाला होता. कारण त्यावेळी भारतात खासगी रॉकेट उद्योगासाठीचे धोरण स्पष्ट नव्हते. गुंतवणूकदार अंतराळ स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवण्याबाबत साशंक होते. रॉकेट इंजिन, टेस्टिंगची सुविधा आणि उत्पादन क्षमता शून्यातून उभारावी लागली.
सुरुवातीला स्कायरूटमध्ये केवळ मोजके अभियंते होते. पण आज कंपनीत 1,000हून अधिक तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून टप्प्याटप्प्याने भांडवल उभारले. त्यामुळे इथून पुढच्या काळातले अंतराळ तंत्रज्ञान बदलून टाकणारे 3D-प्रिंटेड इंजिन, कार्बन कॉम्पोझिट रॉकेट, आधुनिक टेस्टिंग फॅसिलिटीसोबतच विक्रम-1चा विकास होऊ शकला. 2021मध्ये त्यांनी ISRO सोबत करार केला आणि 3D-प्रिंटेड इंजिनची यशस्वी चाचणी घेतली होती. 2022 मध्ये ’विक्रम-एस’ या सबऑर्बिटल उडाणाची यशस्वी चाचणी त्यांनी घेतली आणि भारतातली पहिली खासगी कंपनी म्हणून अंतराळात रॉकेट प्रक्षेपित केले. हा प्रवास केवळ दोन अभियंत्यांच्या व्यावसायिक यशाची कथा नाही, तर भारतातील खासगी अंतराळ उद्योगाला जागतिक स्तरावर पोहोचवणार्या नव्या युगाची सुरुवात होती.
एकीकडे भारतातले तरुण शिक्षणाच्या नावाखाली विद्ध्वंसक आंदोलन करत असताना याच तरुण पिढीच्या अथांग क्षमतेचे आणि भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेले रॉकेट अवकाशात जात होतं. हे यश फक्त एका रॉकेटचे उड्डाण नसून भारताच्या खाजगी अंतराळ युगाचे एक यशस्वी ’आगमन’ आहे. स्कायरूट ही कंपनी आता याहून अधिक शक्तिशाली आणि वजनदार उपग्रह वाहून नेणार्या ’विक्रम-2’ आणि ’विक्रम-3’ या रॉकेट्सवर काम करत आहे.
दुसरीकडे चेन्नईची अग्नीकुल कॉसमॉस ही दुसरी खाजगी अंतराळ तंत्रज्ञान कंपनी धनुष्य नावाचे स्वतःचे लाँचपॅड तयार करण्याच्या आणि रॉकेटचे बुस्टर पुन्हा वापरण्यासाठी समुद्रात नियंत्रित पद्धतीने उतरवण्याची रिकव्हरीचे तंत्रज्ञान विकसित करत आहे. भारतीय अंतराळ क्षेत्राची ही खाजगी झेप येणार्या काळात जागतिक नकाशावर भारताचं नाव अधिक ठळक करेल, यात शंका नाही.