दिशाभूल करणारी क्रांती

विवेक मराठी    24-Jul-2026
Total Views |
@जी.के. आदित्य
 
सीजेपी नेमके कशासाठी लढत असल्याचा दावा करतात आणि प्रत्यक्षात काय मागण्या करत आहेत, यातील तफावत पाहणे गरजेचेे आहे. भारतातील तरुणांची मुख्य समस्या जर NEET परीक्षेतील गैरप्रकार आणि अत्यंत जीवघेणी स्पर्धा ही असेल तर त्यांच्या मागण्या या केवळ शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेवर केंद्रित असणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजीच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने राजकीय मागण्यांचा समावेश आहे. ते शैक्षणिक समानतेसाठी लढत नसून,NEET परीक्षार्थींच्या खर्‍याखुर्‍या निराशेशी खेळत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना ‘मानवी ढाल’ म्हणून वापरत, नेहमीचे पठडीतील संधीसाधू राजकारण करत आहेत.

CJP
 
एखाद्या राजकीय चळवळीने स्वतःच्याच उपहासात्मक नावाला इतक्या भयानक आणि तंतोतंत वास्तवतेने सार्थ ठरवणे, हा इतिहासातील एक दुर्मीळ योगायोग म्हणावा लागेल. एका न्यायालयीन टिप्पणीनंतर 16 मे 2026 रोजी उदयाला आलेल्या कॉक्रोेच जनता पार्टीने (CJP) त्यांच्या नावामुळे नैसर्गिकरीत्या मिळालेल्या सर्वच मूलतत्त्वांचा हिरिरीने अंगीकार केला आहे. जसा की, अंधार पडताच दिशाहीन पळ काढणे, फक्त गोंधळ घालून स्वतःची संख्या वाढवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाठीचा कणा नसणे.
 
 
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुण आणि कार्यकर्त्यांना कॉक्रोेच (तिलचट्टे) आणि परजीवी असे संबोधल्यानंतर ही पार्टी जन्माला आली. आळशी आणि बेरोजगारांचा आवाज (Voice of the Lazy Unemployed) या नावाने इंटरनेटवर सुरू झालेला एक विनोद, अल्पावधीतच राजकीय दिशाहीनतेचे एक उत्तम उदाहरण बनला आहे आणि यामागच्या मागण्या जितक्या स्वयंविरोधी आहेत, तितक्याच त्या वास्तवापासून पार तुटलेल्या आहेत.
 
 
CJP
 
पीआर रणनीतीकार आणि पलायनवाद
 
या कणाहीन क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे 30 वर्षांचा अभिजित दिपके - एक पोलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट, ज्याच्याकडे बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स (PR) ची पदव्युत्तर पदवी आहे आणि त्याच्या बायोडाटामध्ये आम आदमी पार्टीसाठी मीम-आधारित डिजिटल कंटेंट तयार केल्याचा अनुभव आहे. आपल्या या शैक्षणिक व व्यावसायिक अनुभवाच्या जोरावर दिपकेने एक तुफान व्हायरल होणारी डिजिटल लाट उत्तम प्रकारे तयार केली.
 
 
मात्र, जमिनीवरील त्याचे नेतृत्व एखाद्या जादूगाराच्या पलायनविद्येच्या (Houdini act) प्रदर्शनासारखेच राहिले आहे. जेव्हा NEET पेपरफुटीप्रकरणी जंतरमंतरवर आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून हटवले, तेव्हा दिपके मात्र तिथून गायब होता. आंदोलनाच्या या सर्वात महत्त्वाच्या व नाजूक क्षणी गैरहजर राहण्याचे त्याचे कारण काय? तर म्हणे, तो जवळच राहणार्‍या एका मित्राच्या घरी टॉयलेट वापरण्यासाठी गेला होता! जेव्हा त्याचे हजारो समर्थक अश्रुधूर आणि पोलिसांचे बॅरिकेड्स झेलत संसदेच्या दिशेने कूच करत होते, तेव्हाही दिपके समोरून नेतृत्व करत नव्हता; तो स्टेजच्या मागे सुरक्षितपणे थांबून राहिला होता.
 
टोळधाडीचा दुटप्पीपणा
 
सीजेपीच्या या भाकडपणाची व्याप्ती समजून घेण्यासाठी, ते नेमक्या कशासाठी लढत असल्याचा दावा करतात आणि प्रत्यक्षात काय मागण्या करत आहेत, यातील तफावत पाहणे गरजेचेे आहे. भारतातील तरुणांची मुख्य समस्या जर नीट (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि अत्यंत जीवघेणी स्पर्धा ही असेल - जिथे वैद्यकीय शाखेच्या एका जागेसाठी तब्बल 22 विद्यार्थ्यांना एकमेकांशी लढावे लागते. तर त्यांच्या मागण्या या केवळ शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेवर केंद्रित असणे अपेक्षित होते.
 
 
मात्र, त्याऐवजी सीजेपीच्या मूळ पाच मुद्द्यांच्या जाहीरनाम्याकडे ( manifesto) नजर टाका. एकीकडे NEETच्या भयानक पेपरफुटीमुळे आणि विद्यापीठांमधील जागांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थी त्रस्त असताना, सीजेपीच्या प्रमुख राजकीय मागण्यांमध्ये संसदेतील महिला आरक्षण लोकसभेची पटसंख्या न वाढवता थेट 50% करणे, कॅबिनेटमध्ये महिलांसाठी 50% कोटा अनिवार्य करणे आणि कॉर्पोरेट मीडिया हाऊसेसचे ब्रॉडकास्टिंग लायसन्स रद्द करणे या गोष्टींचा समावेश आहे.
 
 
संसदीय मंत्रीमंडळातील लिंग गुणोत्तर (gender ratio) बदलल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) मूळ सडलेल्या व्यवस्थेत कशी काय सुधारणा होणार आहे? मुळीच नाही. सीजेपी ही तळागाळातील पायाभूत समस्यांवर कोणतीही संरचनात्मक उकल न देता, केवळ वरिष्ठ पातळीवरील राजकीय सत्तेचा एक मोठा, गणिताने तयार केलेला तुकडा मागत आहे. ते शैक्षणिक समानतेसाठी लढत नसून, छएएढ परीक्षार्थींच्या खर्‍याखुर्‍या निराशेशी खेळत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना ’मानवी ढाल’ म्हणून वापरत नेहमीचे पठडीतील संधीसाधू राजकारण करत आहेत.
 
आंदोलनाचे अपहरण
 
खर्‍याखुर्‍या समस्यांचे संधीसाधूंनी अपहरण करण्याची इतिहासात एक दुर्दैवी परंपरा राहिलेली आहे. जेव्हा सोनम वांगचुक यांनी उत्तरदायित्वाची मागणी करत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर उपोषण सुरू केले, तेव्हा ते एका मूलभूत न्यायाच्या भावनेवर आधारित होते. पण फ्रेंच क्रांतीप्रमाणे ज्याची सुरुवात अन्नाच्या किमतींवरील वाजवी वादातून झाली होती आणि नंतर रोबेस्पिएरसारख्या प्रसिद्धीच्या भुकेल्या कट्टरवाद्यांनी तिचे अपहरण करून ’दहशतीच्या राजवटीत’ (Reign of Terror) रूपांतर केले. वांगचुक यांच्या उपोषणाचेही तितक्याच वेगाने अपहरण झाले.
 
 
वांगचुक यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर, सीजेपीच्या नेतृत्वाने तातडीने माईकचा ताबा घेतला. दिपकेने वांगचुक यांच्या समर्थनार्थ स्वतःचे आमरण उपोषण सुरू केल्याची मोठी घोषणा केली. सहनशक्तीची ही तथाकथित परीक्षा अवघ्या 48 तासांत संपली; जेव्हा दिपके ज्यूसचा ग्लास पिताना दिसला आणि त्याने दावा केला की वांगचुक यांनीच त्याला रुग्णालयातून उपोषण सोडण्याची विनंती केली होती! दुसरीकडे, 60 वर्षांचे वांगचुक मात्र रुग्णालयात उपोषण सुरूच ठेवून होते.
 
 
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेले हे आंदोलन एका रात्रीत जातीय सर्कसमध्ये बदलले. ‘नाम रहेगा अल्लाह का‘ आणि ब्राह्मण तसेच हिंदूंच्या विरोधात विषारी घोषणा या आंदोलनात घुमू लागल्या. स्वतःला पीआर रणनीतीकार (PR strategists) म्हणवून घेणार्‍या सीजेपीच्या नेत्यांना आता एकच प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे हिंदूविरोधी आणि जातीय घोषणांचा सीबीएसई (CBSE) किंवा कॉम्प्युटरवर होणार्‍या बहुपर्यायी परीक्षांशी (MCQ) काय संबंध आहे?
 
स्वतःचेच उपहासचित्र
कॉक्रोच जनता पार्टी ही ऑनलाइन राहणार्‍या आणि राजकीयदृष्ट्या वैतागलेल्या तरुणांचे व्यासपीठ असल्याचा दावा करते. प्रत्यक्षात मात्र हा एक अत्यंत कुशलतेने तयार केलेला आभास आहे. या पार्टीने भारतीय विद्यार्थ्यांच्या खर्‍या निराशेला बोस्टन युनिव्हर्सिटीच्या पीआर स्ट्रॅटेजीमध्ये गुंडाळले आणि संसदेतील आरक्षणे तसेच जातीय तक्रारींवरून गदारोळ करण्यासाठी एका उपोषणाचा राजकीय वापर केला. सीजेपीने क्रांतीची मागणी केली होती; पण त्यांना खरंतर आधी एका ’पाठीच्या कण्याची’ गरज आहे.