अमेरिका-इराण युद्धाचा भडका दोन्हीकडच्या दुराग्रही नेतृत्वांच्यामुळे आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे झालेला आहे. तहाचा महिना संपत नाही तोच मोडकळीस आला. जुलैच्या तिसर्या आठवड्यात इराणने तह तुटल्याचे जाहीर केले आहे. युद्धाशिवाय पर्याय नाही या कठोर निर्णयावर इराण आला. खाडीयुद्ध पुन्हा भडकण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
सा. विवेकच्या 28 जूनच्या अंकातील माझ्या लेखात मी खाडीयुद्धात दि. 15 जूनला झालेल्या अमेरिका-इराण तहाला ‘अधांतरीचा तह’ असेच म्हटले होते. कारण त्या तहातून महत्त्वाचा पक्ष इस्रायलला वगळले गेले होते. इस्रायलने तहाची कलमे स्वीकारली नव्हती. त्यामुळे त्या तहाचा पाया ठिसूळ होता. अपेक्षेप्रमाणे तेच झाले. दोन महिन्याच्या मुदतीत फिरून वाटाघाटी होऊन तहाला दूरगामी करणार आहोत हे ट्रम्पबाबा सांगत सुटला होता, इराणीही भरघोस डॉरलची मदत झोळीत पडेल याची वाट पहात होते, त्याच वेळी इस्रायल बेमुर्वतपणे लेबनॉनवर हल्ले करत होते. त्यातून हिजबुल्ला जेरीस येऊन हल्ले करण्याच्या स्थितीत राहू शकणार नाही असे दिसत होते. त्यामुळे इस्रायलची डोकेदुखी चालू ठेवण्याचे इराणचे मनसुबे धुळीस मिळण्याची लक्षणे होती. त्यातच ट्रम्पबाबाने अमेरिकेतील कंपन्यांना इराणमधील बांधकामांची कंत्राटे दिली जातील असे वक्तव्य केले. त्यातून इराणला म्हणण्यापेक्षा इराणी क्रांतीकारी (IRGC)संघटनेला प्रत्यक्ष फायदा मिळण्याची शक्यता धूसर झाली. त्याच दरम्यान एका जहाजावर फारसे काही कारण नसताना इराणने हल्ला केला. ट्रम्पबाबाला तेच कारण पुरेसे होते. त्याने जुलैच्या दुसर्या आठवड्यात पुन्हा इराणवर जबरदस्त मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले. ते सुरू होताच इराणनेही आपले पंजे बाहेर काढले. त्यानेही खाडी देशांतील अमेरिकेच्या सैनिकी स्थळांवर हल्ले सुरू केले.
या वेळच्या हल्ल्यांमध्ये बराच फरक करता येईल. मागच्या वेळी ज्या खाडीतील देशांनी अमेरिकेला सैनिकी तळ उभारण्यास परवानगी दिली होती, त्यांना शत्रूदेश मानून त्यांच्या सैनिकी तसेच नागरी आस्थापनांवर इराणने हल्ले केले होते. कुवेतच्या जनतेसाठी महत्त्वाचा असलेला समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करणार्या सर्वात मोठ्या जलशुद्धीकरण आस्थापनावर हवाई हल्ले केले होते. खाडी देशांतील तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हवाई आणि ड्रोन हल्ले केले होते. तसे यावेळी पहिल्या प्रथम हल्ल्यांमध्ये दिसले नाही. यावेळी इराणचे हल्ले फक्त अमेरिकी सैनिक स्थळांवर होत होते. पण ही स्थिती जेमतेम आठवडाभर टिकली. दि. 17 जुलैच्या बातम्यांप्रमाणे इराणने खाडी देशांतील नागरी ठिकाणांवरही हल्ले सुरू केले आहेत. आता जुलैच्या तिसर्या आठवड्यात पुन्हा इराणने कुवेतमधील जलशुद्धीकरण आस्थापनावर हवाई हल्ले सुरू केल्याची बातमी आली.
दुसरा महत्त्वाचा फरक असा आहे की यावेळी इस्रायल अमेरिकेच्या बरोबरीने इराणमध्ये घुसून हल्ले करताना दिसत नाही. त्याने आपले लक्ष्य फक्त लेबनॉन आणि तुरळक वेळी गाझापट्टीवरील हल्ल्यांपुरते मर्यादित ठेवलेले दिसते. मार्च-एप्रिल दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलने इराणचे अणुऊर्जा प्रकल्प आणि क्षेपणास्त्र, ड्रोन साठे लक्ष्य केले होते. यावेळी इस्रायल इराणमध्ये सक्रिय दिसत नाही; युद्ध फक्त अमेरिका आणि इराण यांच्यातच भडकलेले दिसते.
दुराग्रही नेतृत्व
यावेळचा युद्धाचा भडका दोन्हीकडच्या दुराग्रही नेतृत्वांच्यामुळे आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे झालेला आहे. ट्रम्पला त्याचे साध्य पूर्ण करता आले नाही. इराणवर ट्रम्पला म्हणावे तसे वर्चस्व प्रस्थपित करता आले नाही. भरभक्कम हानी होऊनही इराण नमला नाही. तो अमेरिकेला अनुकूल अशा अटी मानायला तयार झाला नाही. तसे पाहिले तर इराणची युद्धक्षमता तसूभरही कमी झाल्यासारखी दिसत नाही. तसेच होर्मुझ खाडीवर त्याला आपली सत्ता काहीही झाले तरी गमवायची नाही. पुढे जाऊन समुद्री वाहतुकीवर सरसकट 15 टक्के कर आकारणी करून युद्धहानी भरून काढायचे त्याचे मनसुबे आहेत. गेली वीस वर्षे इराण जणू याच प्रकारच्या भीषण युद्धाची तयारी करत होता असे दिसते. इराणी नेतृत्वाच्या तीन पातळ्या मारल्या गेल्या तरी त्यांचे चौथ्या पिढीतील नेतृत्व तेवढ्याच त्वेषाने अमेरिकेविरूद्ध लढण्याच्या मानसिक तयारीत आहे. आता पुन्हा युद्ध भडकले तर ट्रम्पबाबा इराणची अपरिमित हानी करेल याची त्यांनी कल्पना केली नसेल असे नाही. पण ती हानी सोसण्याची त्यांनी अतिरेकी मानसिकता आणि तयारी ठेवली आहे असे दिसते. सर्वसामान्य इराणी जनता त्यात अधिकच होरपळली जाईल; पुढील कितीतरी दशके विकास मागे ढकलला जाईल, याचे भान त्यांना नाही.
ट्रम्पचा हेकेखोर स्वभावही त्याला कारणीभूत आहे. सर्वच क्षेत्रात ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या अमेरिकन जनतेला भुरळ घातल्या गेलेल्या घोषणेमागे दडून त्याला अमेरिकेतील सर्वात श्रेष्ठ नेता हे पद भविष्यात मिळवण्याची आणि येणार्या पिढ्यांमध्ये आपले नाव जणू अजरामर करण्याची लालसा आहे. ती पूर्ण होताना दिसत नाही. उलट अमेरिकेच्या जनतेत खालावत चाललेली लोकप्रियता त्याला भेडसावते आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या सिनेटच्या निवडणुकांमध्ये त्याच्या रिपब्लिकन पक्षाचा टिकाव तर लागणार नाहीच पण भरघोस संख्येने जर डेमॉक्रेटिक सदस्य निवडून आले तर ट्रम्पच्या विरोधात गैरवागणुकीचा महाभियोग (ळाशिरलहाशपीं)सुरू होऊ शकतो. त्यासाठी त्याला कसेही करून इराणला नमवायचे आहे. तोही कुठलीही किंमत मोजायला तयार दिसतो आहे.
तह मोडीत निघाला
एका मुत्सद्द्याने नजरेस आणून दिल्याप्रमाणे आजवर कोणताही तह काही कुरबुरी, काही उल्लंघने झाल्याशिवाय पार पडल्याचा इतिहास नाही. ज्यांना याची माहिती असते ते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, कारण पुढल्या वाटाघाटींमधून अधिक फलदायी भविष्य निघण्याची शक्यता असते. पण उतवळ्या आणि दुराग्रही ट्रम्पबाबाला अमेरिकेच्या संरक्षणाखाली पुढे निघू पाहणार्या जहाजावरील इराणचा हल्ला हा त्याच्या व्यक्तिगत अधिकारांचे उल्लंघन वाटले. त्याने लगेच इराणवर जोरदार हल्ल्यांचे सत्र सुरू केले. तहाचा महिना संपत नाही तोच मोडकळीस आला. जुलैच्या तिसर्या आठवड्यात इराणने तह तुटल्याचे जाहीर केले आहे. इराण आधीपासूनच डिवचला गेलेला होता. त्याच्या जवळ अजूनही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा साठा आहे. त्याने प्रतिहल्ले सुरू केले. दोन्हीकडून अजूनही हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. दुसर्यांदा युद्ध भडकण्याची सुरुवात आहे.
होर्मुझ खाडीवर वर्चस्व
सार्या जगाची दुखरी नस ठरलेल्या होर्मुझ खाडीतून होणारे दळणवळण आता परत ठप्प पडले आहे. पूर्वी इराणने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिने खाडीतून वाहतूक करणार्या नावडत्या देशांच्या जहाजांवर 15 टक्के कर लादण्याचे धोरण ठेवले होते. त्याच्या स्पर्धेत आता व्यापारी वृत्तीचा ट्रम्प उतरला आहे. त्याने 20 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. त्याच्या बदल्यात अमेरिकेचे नौदल कर भरणार्या जहाजांना इराणी हल्ल्यांपासून लष्करी संरक्षण देणार आहे. त्याचाही एक किस्सा बाहेर आला. ट्रम्पच्या या घोषणेनंतर अमेरिकेच्या नौदलाच्या मोठ्या चाकरमान्या अधिकार्यांनी होर्मुझ खाडीत अडकलेल्या जहाजांवरील अधिकार्यांना रेडिओवरून संपर्क करून अमेरिकी जहाजांच्या संरक्षणाखाली जहाजे खाडी पार करण्यासाठी आग्रह करण्यास सुरुवात केली. पण महिन्यांपासून अडकलेल्या त्या जहाजांवरील प्रमुख अधिकार्यांना अमेरिकेचे नौदल खरोखरीच कितपत संरक्षण देऊ शकेल या विषयी शंका होती. त्यांनी जहाजे पुढे काढण्यास चालढकल करायला सुरवात केली. जेव्हा अमेरिकेच्या अधिकार्यांचा आग्रह फारच वाढला तेव्हा आधीच महिनोन्महिने अडकून पडलेल्या आणि चिंताग्रस्त अधिकार्यांचा धीर सुटला. अत्यंत बलशाली अमेरिकेच्या अधिकार्यांची त्यांनी अक्षरशः गलिच्छ शिव्या देत बोलती बंद केली. एक वेळेस खडतर दिवस काढावे लागले, विम्याचे हप्ते वाढले, तरी चालेल, पण अमेरिकच्या नौदलाच्या आग्रहाला बळी पडून आपला आणि सहकार्यांचा जीव धोक्यात घालण्याचा वेडेपणा ते लोक करणार नाहीत. तसेही पाहिले तर आतापर्यंतच्या खाडीत अडकलेल्या जहाजांवर इराण आणि अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे 15 भारतीयांनी आपले जीव गमावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने राजनैतिक निषेध नोंदविले असले तरी ज्यांचे जीव गेलेत त्यांच्या कुटुंबियांना काही फरक पडणार नाही, ना त्यांचे नुकसान भरून येईल. हीच गत इतर देशांतील खलाशांची आहे.
या दरम्यान ट्रम्पने एक सनसनाटी घोषणा करून आपल्याविषयी थोडी सहानुभूती सावडण्याचा प्रयत्न केला. त्याने जाहीर केले की इराण त्याला मारण्याच्या प्रयत्नात आहे. इराण तसे करणारच. ते धर्माज्ञेनुसार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांच्या सर्वोच्च धर्मगुरूची हत्या झाली. त्याचा बदला इराण घेणारच. कारण पवित्र कुराणातच दिले आहे की प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्यासाठी डोळा इ. हीच न्यायाची पद्धत आहे (प. कु. 5.45) तशीच ती पवित्र बायबलमध्येही आहे. जर मेलेल्याचे नातेवाईक धनाचा मोबदला स्वीकारण्यास तयार असतील तर त्यातून सूट मिळू शकते. हे ट्रम्पला माहिती असणारच. त्याने ती देण्याची, युद्धोत्तर मदत करण्याची तयारी दर्शविली असली तरी त्याची व्यापारी वृत्ती आडवी आली. ती मदत अमेरिकाच्या कंपन्या हडपणार होत्या. त्यामुळे इराणची भूमिका बदलली. आता युद्धाशिवाय पर्याय नाही या कठोर निर्णयावर इराण आला. खाडी युद्ध पुन्हा भडकण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
पुढे काय घडू शकते
ज्याप्रमाणे जानेवारीत इराणी जनता राज्यकर्त्यांविरोधात खुलेआम उतरली होती, आताच्या परिस्थितीत त्याची अजिबात शक्यता नाही. परधर्मीयांविषयी आत्यंतिक द्वेषाने भारलेल्या क्रांतिकारी नेतृत्वाच्या हातात जोवर इराणची सूत्रे राहतील तोवर किंवा स्वतः ट्रम्पने एकतर्फी माघार घेईपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार आहे. आता तर इराण खाडीतील देशांवर हवाई हल्ल्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन सैनिकी आक्रमण होऊ शकते. तसे झालेच तर इराण क्षेपणास्त्रांच्या आघातांनी पुरते होरपळून निघेल, जगापुढे खनिज तेलाच्या अपुर्या पुरवठ्याचे संकट घोंगावत राहील. आता अमेरिकेला इराणमध्ये प्रत्यक्ष सैनिकी कारवाई करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याच दरम्यान इराणने वायव्य दिशेला असलेल्या कुर्दीस्थान स्वायत्त प्रदेशावर हल्ले केले. त्यामुळे कुर्दिस्थानची जनता इराण विरोधात उतरून अमेरिकेच्या सहकार्याने इराणवर सैनिकी हल्ले करण्यास तयार होऊ शकते. मागच्या वेळी हे घडू शकले नव्हते. होर्मुझ खाडीवर प्रभुत्व करायचे तर खाडीच्या उत्तरेस असलेल्या डोंगराळ भूप्रदेशावर अमेरिकेला सैनिकी वर्चस्व प्रस्थापित करावे लागेल. त्यासाठीची मनुष्यहानी सोसायला ट्रम्पबाबा तयार होईल का?
या युद्धामुळे एक गोष्ट भविष्यात चांगली घडू शकते. खनिज तेलावरील अवलंबन कमी करण्यासाठी जगात अनेक देश पर्यायी इंधनाच्या शोधात राहतील. भारतात रेल्वे इंजिन हायड्रोजनवर चालू लागले आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर खनिज तेलाची आयात कमी होऊन आपण त्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.