‘मृद्गंध फार्म’ - शहरातून शेताकडे आणि शेतातून समाजाकडे

विवेक मराठी    31-Jul-2026
Total Views |
 @उत्तरा मोने 
krushivivek
कल्याणी मुरदारे यांचा मृद्गंध फार्म हा केवळ एक शेती प्रकल्प नाही, तर जिद्द, अभ्यास, निसर्गावरील विश्वास आणि शाश्वत शेतीचा एक प्रेरणादायी आदर्श बनला आहे. शेतीमध्ये शाश्वततेचा महत्त्वाचा धडा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे; ती माती, निसर्ग आणि माणूस यांच्यातील विश्वासाचं नातं आहे. हा विश्वास जपला, तर जमीन तुम्हाला अन्नाबरोबरच समाधानही देते, असे सांगणार्‍या कल्याणी कैलास मुरदारे यांनी आपल्या कृतीतून या विचाराला अर्थ दिला आहे.
 
 
आज शेवगाव तालुक्यातील भगूर येथे उभा असलेला ’मृद्गंध फार्म’. हा केवळ 27 एकरांचा सेंद्रिय शेती प्रकल्प नाही, तर एका शहरात वाढलेल्या महिलेने जिद्द, अभ्यास आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर उभं केलेलं स्वप्न आहे. आधुनिक जीवनशैली, सुखसोयी आणि व्यवसायाची सुरक्षित वाट सोडून निसर्गाच्या सान्निध्यात नवं आयुष्य घडवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि आज त्याच निर्णयामुळे त्या राज्यातील प्रगत आणि प्रयोगशील महिला शेतकरी म्हणून ओळखल्या जातात.
 
 
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेलं मुरदारे कुटुंब ऑटोमोबाईल उद्योगाशी संबंधित व्यवसायात कार्यरत होतं. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच कोरोनाच्या काळात त्यांच्या मनात एक प्रश्न सतत घोळत राहिला-आपण जे अन्न खातो ते खरंच शुद्ध आहे का? घरपोच येणार्‍या भाजीपाल्याकडे पाहताना त्यांना जाणवलं की, समाजाला निरोगी अन्न द्यायचं असेल, तर त्याची सुरुवात शेतीपासूनच व्हायला हवी या विचाराने त्यांच्या आयुष्याला नवं वळण दिलं.
 
 
शेतीचा निर्णय हा भावनेतून घेतलेला नव्हता; त्यामागे अभ्यास होता. कल्याणी मुरदारे यांनी देशभरातील सेंद्रिय शेती करणार्‍या अनेक प्रगत शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या शेतांवर जाऊन काम पाहिलं, कृषी विद्यापीठातून विविध प्रशिक्षणं आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले, अनुभवी शेतकर्‍यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक आणि नैसर्गिक शेतीच्या पद्धती समजून घेतल्या. या अभ्यासादरम्यान त्यांना ’फॉरेस्ट फार्म’ अर्थात वनशेतीची संकल्पना भावली. झाडं, माती, गाई, सूक्ष्मजीव, पिकं आणि माणूस यांचं निसर्गाशी एकरूप असलेलं चक्रच भविष्यातील शेतीचा पाया ठरू शकतं, यावर त्यांचा विश्वास बसला.
 
 
त्यानंतर त्यांनी शेवगाव तालुक्यातील भगूर येथे अनेक वर्षे पडीक पडलेली जमीन निवडली. अनेकांना हा निर्णय धाडसापेक्षा वेडेपणा वाटला. कोरडी, नापीक आणि उजाड झालेली जमीन पाहून अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या; पण कल्याणी मुरदारे यांनी त्या जमिनीत उजाडपणा नाही, तर अमर्याद शक्यता पाहिल्या.
 
 
आज त्याच जमिनीवर हिरवागार ’मृदगंध फार्म’ उभा आहे.
 
साडेपाच वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर हा फार्म एकात्मिक सेंद्रिय शेतीचा आदर्श म्हणून विकसित झाला आहे. येथे वर्षभर 27 ते 28 प्रकारची फळं घेतली जातात. केशर आंबा, नारळ, जांभूळाच्या विविध जाती, पेरू, लिची, रामफळ, सीताफळ आणि अनेक फळझाडांनी हा परिसर बहरलेला आहे. सध्या फार्मवर 350 पेक्षा अधिक नारळाची झाडं असून त्यापैकी दीडशेहून अधिक झाडांना नियमित नारळ येऊ लागले आहेत. 70 ते 80 आंब्याची झाडं, विविध प्रकारची जांभळाची झाडं आणि असंख्य फळझाडांनी हा परिसर पक्ष्यांसाठीही नैसर्गिक अधिवास बनला आहे.
 
 
याबाबत त्या म्हणतात,‘माझ्या शेतात पक्ष्यांनाही आणि माणसांनाही बाराही महिने फळं मिळाली पाहिजेत. शेती तेव्हाच समृद्ध म्हणता येते.’
 
फळबागांबरोबरच मृद्गंध फार्मवर वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद आणि इतर धान्य-कडधान्ये नैसर्गिक पद्धतीने घेतली जातात. त्यांनी मिश्रपीक पद्धतीचा स्वीकार केला आहे. त्यामुळे एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी वर्षभर विविध पिकांमधून उत्पन्न मिळत राहते. हवामानातील बदल किंवा बाजारातील चढ-उतार यांचा परिणाम कमी होतो. शेतीमध्ये शाश्वततेचा हा महत्त्वाचा धडा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे.
 
 
सेंद्रिय शेती म्हणजे फक्त रासायनिक खतांचा वापर टाळणं नव्हे, तर संपूर्ण शेती स्वयंपूर्ण करणं, असा त्यांचा दृष्टीकोन आहे. म्हणूनच त्यांच्या फार्मवर गाईचं शेण, गोमूत्र, गूळ आणि शेतातील वनस्पतींच्या अवशेषांपासून जीवामृत, सेंद्रिय द्रवखते, गांडूळखत आणि कंपोस्ट खत तयार केलं जातं. हिरवळीच्या खतांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि शेतीवरील खर्चातही मोठी बचत होते.
 


krushivivek 
 
मृद्गंध फार्मची आणखी एक मोठी ताकद म्हणजे गोपालन. आज या फार्मवर 45 पेक्षा अधिक गीर गाई आहेत. या गाईंकडून मिळणारं दूध, तूप, ताक, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. गोपालन आणि शेती यांचं परस्परपूरक नातं त्यांनी यशस्वीपणे उभं केलं आहे. गाईंपासून मिळणारं शेण आणि गोमूत्र शेतीसाठी उपयोगी पडतं, तर शेतातील चारा गाईंसाठी. त्यामुळे संपूर्ण फार्म एकात्मिक शेतीच्या संकल्पनेचं जिवंत उदाहरण ठरला आहे.
 
त्यांनी केवळ शेती केली नाही, तर उत्पादनाच्या विक्रीचाही स्वतंत्र विचार केला. ’शेतातून थाळीपर्यंत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत त्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था उभी केली. शेतात पिकणारा भाजीपाला, धान्य, फळं आणि दुग्धजन्य पदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी निर्माण केली. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 
 
कल्याणी मुरदारे यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्या शेतापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांच्या प्रयोगशील शेतीची दखल कृषी विभागानेही घेतली आहे. जिल्हा कृषी विभागाने विविध चर्चासत्रे, अभ्यासदौरे आणि शेतभेटी मृद्गंध फार्मवर आयोजित केल्या. अनेक कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्रगत शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतीची पाहणी करून सेंद्रिय शेतीचे विविध प्रयोग प्रत्यक्ष अनुभवले. त्यांच्या फार्मचा अभ्यास इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरावा, असे आवाहनही कृषी अधिकार्‍यांनी केले.
 

krushivivek 
 
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार, ’अ‍ॅग्रिकल्चर एक्सलन्स’ पुरस्कार तसेच सेंद्रिय शेती, देशी गीर गाई संवर्धन आणि नाविन्यपूर्ण कृषी प्रयोगांसाठी विविध संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. मात्र या पुरस्कारांपेक्षा समाजाचा वाढता विश्वास हीच त्यांची खरी कमाई असल्याचं त्या नम्रपणे सांगतात.
 
 
या संपूर्ण प्रवासात त्यांच्या कुटुंबाची साथही तितकीच महत्त्वाची ठरली. पतीचा प्रत्येक टप्प्यावर भक्कम पाठिंबा मिळाला, तर त्यांचा मुलगा उच्च शिक्षण पूर्ण करून आज फार्मच्या मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे शेती आणि बाजारपेठ यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाला आहे.
 
 
भविष्यातील त्यांची स्वप्नंही तितकीच मोठी आहेत. 200 गीर गाईंचा आधुनिक आणि पर्यावरणपूरक गोपालन प्रकल्प उभारणे, फॉरेस्ट फार्मची व्याप्ती वाढवणे, सेंद्रिय खतनिर्मितीचे मोठे केंद्र विकसित करणे, अधिकाधिक शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीकडे वळवणे आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे, या दिशेने त्या सातत्याने काम करत आहेत.
 
 
आज मृद्गंध फार्म हा केवळ एक शेती प्रकल्प नाही, तर जिद्द, अभ्यास, निसर्गावरील विश्वास आणि शाश्वत शेतीचा एक प्रेरणादायी आदर्श बनला आहे. शहरातील सुरक्षित आणि सुखसोयीचं आयुष्य मागे सोडून एका महिलेने केवळ स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं नाही, तर सेंद्रिय शेतीकडे पाहण्याची नवी दृष्टी अनेक शेतकरी, युवक आणि महिलांना दिली आहे. त्यांचा प्रवास सांगतो की, शेती ही केवळ मातीशी जोडलेली नसते; ती माणसाच्या विचारांशी, समाजाच्या आरोग्याशी आणि भविष्याशीही जोडलेली असते.