@ डॉ. संजीव सावजी
कुटुंबव्यवस्था ही सक्षम समाजाचा भक्कम पाया असते. मात्र गेल्या काही वर्षांत या व्यवस्थेलाच तडे जात आहेत. विभक्त कुटुंबपद्धती, एकल पालकत्व, खाजगी आयुष्याचा ताबा घेतलेली समाजमाध्यमे, त्यातून संपलेला संवाद, शैक्षणिक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा आणि ताणतणाव, संस्काराचा अभाव अशी अनेक कारणे या व्यवस्थेस छेद देण्यास कारणीभूत आहेत. त्याच्या परिणामांचे दृश्यरूप म्हणजे समाजात होणार्या दुर्दैवी घटना होत.
’सिया गोयल आणि केतन अग्रवाल’, ’लोहगड’ हे शब्द सध्या सर्वत्र व सर्वदूर ऐकू येतात. त्याबद्दलची हळहळ, दु:ख, विस्मय तसेच विनोदसुद्धा चर्चेत आहेत.
त्यामागची कथा सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख येथे टाळतो. त्याबरोबरच इतरही काही बातम्या आहेत. लोकल ट्रेनमध्ये क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून मारणे, मित्रानेच मित्राचा गळा कापून खून करणे, अंगावर कार घालून मित्राला चिरडून मारणे, मोबाईल द्यायला नाही म्हटले म्हणून आईचा जीव घेणे, मद्यपान करून महागड्या अलिशान गाड्या बेफाम चालवणे, त्याखाली लोक चिरडले जाणे-अशा घटनांची साखळीच आहे. अगदी बालकापासून ते युवापर्यंत सर्व वयोगटातील मुले (आणि मुली) यात आहेत. चार वर्षांच्या मुलाने अडीच वर्षे वयाच्या मुलाचे चावे घेणे हीपण एक बातमी वाचनात आली.
काही मनासारखे झाले नाही किंवा होणार नाही या कल्पनेनेही आत्महत्या करण्याचेही दाखले बरेच आहेत. कोटा शहरात झालेल्या आत्महत्यांबद्दल तर चौकशी आयोग नेमावा लागला होता. रोज वर्तमानपत्रात एक तरी अशी घटना असतेच. त्यांनी समाजमन ढवळून जाते, अस्वस्थ होते, त्यावर खूप चर्चा होते. हळूहळू ती चर्चा विरते आणि चार दिवसांत ती स्मरणातून जाते. समाज परत आपल्या कामाला लागतो.
पुस्तक खरेदी करण्यासाठी..
या तुरळक, अपवादात्मक होणार्या घटना असे समजून त्याकडे कानाडोळा करण्याची ही वेळ नाही. आता ही तुरळक उदाहरणे राहिलेली नाहीत. त्याचे प्रमाण लक्षणीय असे वाढलेले दिसते आहे. त्यावर गंभीर विचार होणे गरजेचे आहे. एक समाज म्हणून आपण पुढारलेले आहोत, सुशिक्षित-सुसंस्कृत आहोत-तरी मग हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचे काय कारण असावे. त्यावर काही करता येण्यासारखे असेल का? हे प्रश्न सतत मनात फिरत राहतात.
काय बरे कारणे असू शकतील? एकूणच समाजाचे नैतिक अध:पतन तर झाले नाही ना? का आपण संस्कारविहीन पिढी निर्माण करतोय. जाणीवपूर्वक तर नक्कीच नाही. पण मग अजाणतेपणाने असे होते आहे का? आपले कुठे आणि काय चुकत असावे?
पालकत्वात काही चुकते आहे का? पालक पाल्यांबद्दल फार हळवे झालेले दिसतात. त्यांनी काही मागायचा अवकाश की ते लगेच हजर. (कधी कधी तर मागण्याच्या अगोदरच सर्व गोष्टींचा पाऊस असतो.) माझ्या मुलाला काही कमी पडायला नको, तो कुठेही मागे पडायला नको. यातून त्या मुलाला नाही(नकार) ऐकण्याची सवयच राहत नाही. नकार ऐकणे व तो पचवणे हा संस्कार निर्माणच होत नाही. खरे तर नकार सकारात्मक पद्धतीने स्वीकारणे हे जीवनात अतिशय महत्त्वाचे आहे. याला मानसशास्त्रात Frustration tolerance म्हणतात. जीवनात सतत येणारे चढउतार, प्रतिकूल परिस्थिती यांना समर्थपणे सामोरी जाण्याची शक्ती त्यातून मिळत असते. उलटपक्षी frustration tolerance नसेल तर फुटकळ आव्हानेसुद्धा पहाडाएवढी वाटायला लागतात. मग त्यांच्यासमोर लगेच कोलमडायला होते.
परिस्थितीशी जुळवून घेणे, आवडत नसले तरी समजून घेणे, नकार ऐकणे-अवघड होते-त्याची मानसिकताच नसते. जेव्हा अशा परिस्थितीचा सामना करायची वेळ येते तेव्हा प्रतिक्रिया एकतर खचून जाण्याची, नाउमेद होण्याची असते किंवा अतिशय आक्रमक, आक्रस्ताळी, बेफाम अशी असू शकते. पालकांना त्यावर काय करावे हेच समजत नाही, ते अजूनच गोंधळून जातात. त्याच्या मनाप्रमाणे वाकतात, पडते घेतात. यातून तो त्याचा स्वभावाच बनत जातो. कुठल्याही प्रतिकूलतेत ते असेच वागतात, त्यांची प्रतिक्रिया अशीच व्हायला लागते. यावर त्या व्यक्तीला स्वतःलाही नियंत्रण राखता येत नाही. (automatic behavior) आपण बोलतो आहोत त्या घटनांच्या संदर्भात हेच तर होत नसावे ना?
पालकत्वाचीच अजून एक गोष्ट आहे. पालकत्व खूप बदललेले दिसते आहे. कुटुंबव्यवस्था बदलत चालली आहे. विभक्त कुटुंबपद्धती आलेली आहे. त्यात आई-बाबा व दोन किंवा एकच अपत्य हे आजचे सर्वसामान्य चित्र आहे. आई-वडील दोघेही काम करणारे त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ कमी असतो. वेळ कमी मग त्याची भरपाई म्हणून वस्तू, पैसे यांनी मुलांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मुले त्या सवयी लगेच शिकतात. मागण्या करू लागतात. आई-बाबा घरी नसल्यामुळे मुले तेव्हा काय करतात यावर पालकांचे नियंत्रण राहत नाही. त्यातून टी.व्ही., मोबाईलच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढते. मुलांवर चांगले संस्कार पालकांनी करायचे त्याऐवजी टी.व्ही., मोबाईल यातून संस्कार व्हायला लागतात. ते कुठल्या प्रकारचे असतात याचीही माहिती पालकांना होत नाही.
मोबाईल गेम-ज्यांचे मुलांना फार वेड असते, ते पाहिले तर त्यात प्रचंड आक्रमकता व हिंसा असते. त्याचाच पगडा मुलांच्या कोवळ्या मनावर तयार होतो. एक प्रकारे स्क्रीनचे व्यसन तयार होते. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, झोपेवर होतो. ती वाईट संगतीच्या प्रभावाखाली येऊ शकतात. बंडखोरी, उर्मटपणा, आक्रमकता, निर्ढावलेपणा असे दुर्गुण तयार होतात. हेच तर आपण चर्चित असलेल्या घटनांमधून प्रकट होताना दिसते आहे - असे तर नाही ना ?
बदललेला शिक्षणविषयक दृष्टीकोन
मुलांच्या आयुष्यातील वयाच्या सुरुवातीच्या सहा वर्षांपर्यंतचा काळ हा जीवनाचा सर्वात मौल्यवान काळ. मेंदू विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा. या काळात शिक्षण कसे असावे याबद्दल जगभरातल्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अनौपचारिक शिक्षणच असायला हवे. औपचारिक शिक्षण असताच कामा नये. अनौपचारिक म्हणजे मुक्त, हसतखेळत, खेळाद्वारे, अनुभवजन्य शिक्षण; पण आजची वस्तुस्थिती काय आहे?
आज पालकांना मुलाला शहाणे करून सोडण्याची अतिशय घाई झालेली आहे. मूल दोन ते तीन वर्षांचे होत नाही तर त्याला A,B,C,D, one, two, three, four सर्व आणि पूर्ण यायलाच पाहिजे. येत नसेल तर त्यासाठी वेगळे कोचिंग लावले जाते. मूल मानसिकदृष्ट्या तयार नसताना आणि हे अशा प्रकारचे शिक्षण पूर्णपणे अशास्त्रीय असताना त्याच्यावर लेखन-वाचन लादले जाते. बालवाडीतच त्याला फाड-फाड इंग्रजी यायला हवे असा आटापिटा असतो. मोठी, भरमसाठ फी असणारी शाळा म्हणजे चांगली शाळा असा समज दृढ झाला आहे. तिथे ते मूल काय शिकते यापेक्षा मार्क किती मिळतात यावर सगळा भर असतो. क्षमता आहे की नाही हे लक्षात न घेता त्याला या मार्कांच्या स्पर्धेत लोटले जाते.
पैकीच्या पैकी मार्क मिळवणे एवढा एकमेव ध्यास असतो. मार्कांशिवाय (बौद्धिक विकास) इतर काही विकासाचे टप्पे असतच नाहीत किंवा ते फार महत्त्वाचे नाहीत असे वाटावे असे चित्र बघायला मिळते. भावनिक विकास, मानसिक विकास, सामाजिक विकास, शारीरिक विकास याकडे दुर्लक्ष होते. व्यक्तिमत्त्वाची ही अंगे मग कमजोर राहतात. भावनांक म्हणजे Emotional intelligence सशक्तपणे तयार होऊ शकत नाही. आपल्या भावना, इतरांच्या भावना कशा समजून घ्यायच्या, प्रतिसाद कसा द्यायचा याची क्षमता कमजोर राहते. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. क्षुल्लक बाबींवर भावनातिरेकाची प्रतिक्रिया असे समीकरण तयार होते. दु:ख, नकारात्मक भावना, अपयश कसे हाताळायचे जमत नाही. असंवेदनशील मनोवृत्ती तयार होते. या सर्वांचा शेवट मग अशा घटनांमध्ये होणे स्वाभाविकच आहे. यासाठी केवळ मार्कांची स्पर्धा नाही तर तो एक उत्तम व्यक्ती, उत्तम नागरिक, जबाबदार माणूस कसा होईल हे बघणे जास्त महत्वाचे असायला हवे-नाही का?
समाज माध्यमे : सध्या समाजमाध्यमांचा खूप बोलबाला आहे, त्यांचा पगडाही समाजावर खूप आहे. त्यामुळे जग खूप जवळ आले आहे; पण व्यक्ती मात्र एकमेकांपासून अलिप्त होत आहेत. आत्मकेंद्रीपणा वाढत चालला आहे. जेवणाच्या टेबलवर घरातले चार जण बसलेले असले तरी प्रत्येकजण आपल्या आपल्या विश्वात मग्न असतो. आपल्या मोबाईलमध्ये हरवलेला असतो.
आजूबाजूला काय सुरू आहे याचे जरासुद्धा भान नसते. हे चित्र बहुतांशी घरात आज बघायला मिळते. हेच रस्त्यावर चालताना, वाहन चालवताना पण दिसू लागले आहे. रील हे एक मोठे गारुड पण आले आहे. त्यामुळे भान जाग्यावर नसल्यामुळे किंवा अति उत्साहाच्या भरात अपघात घडल्याच्या बातम्याही आपण ऐकतो. प्रसारमाध्यमे, चित्रपट, मालिका यात नकारात्मता ठासून भरलेली असते. कमालीचा हिंसाचार, व्यसनाधीनता हा त्यांचा स्थायीभाव झालेला आहे. खूप वेळा त्यांचे उदात्तीकरण केलेले दिसते. समज पूर्णपणे विकसित झालेली नसलेल्या कोवळ्या बालमनावर, कुमारावस्थेत, नवनव्या युवावस्थेत याचा प्रभाव लगेच पडत असतो. आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्वांवर कोणाचेच लक्ष नाही, ते नियंत्रित करण्याची काही यंत्रणाही नाही. या जोडीलाच असंवेदनशीलता एवढी वाढलेली की एखादा अपघात झाला असेल, कोणी पाण्यात बुडत असेल तर त्यात मदत करायची सोडून त्याचे व्हिडिओ बनवण्यात सर्व गुंग असतात. ‘मला काय त्याचे’ हा माणुसकीशून्य भाव वाढीस लागलेला दिसतो. मग प्रश्न असा पडतो की याला जबाबदार कोण?
सामाजिक दुरावा : झपाट्याने होणारे शहरीकरण, उद्योगीकरण, तंत्रज्ञानाची प्रगती ह्यामुळे सामाजिक देवाणघेवाण कमी झालेली दिसते. शेजारी शेजारी राहणारेही एकमेकांना भेटत नाहीत. आपल्या शेजारी कोण राहतो हेही बर्याचदा माहीत नसते. यामुळे कोणाला कोणाशी घेणेदेणे नाही. अशा वातावरणात प्रत्येकजण जीवनात धावतोय-ह्या भ्रमात की त्याची प्रगती होतेय. पण त्याची किंमत मोजावी लागत असते, जी लगेच लक्षात येत नाही. गर्दीत असूनही प्रत्येकजण एकटा आहे. यातून मानसिक कोंडमारा होतो, ताणतणाव वाढतात. त्याचे परिणाम शारीरिक आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर नंतर दिसायला लागतात. व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणजे मला कसेही वागण्याचे स्वातंत्र्य आहे; असा चुकीचा समाज जोपासला जातोय. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी असते, कर्तव्यबोध असतो याचा विसर पडत चाललाय असे वाटते. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट भर घालते. ती म्हणजे-आजच्या जगात पैशांनी काहीही करता येते हा विश्वास. मी काहीही करू शकतो व त्यातून सहीसलामत सुटूही शकतो. कोणी माझे काही वाकडे करू शकत नाही ही घमेंडखोर वृत्ती आज मोठ्या प्रमाणात दिसते. आणि तसाच अनुभवही येतोय. कितीही मोठा गुन्हा केलेला असला तरी त्याला काहीही शिक्षा होत नाही, लोक दोन ते चार दिवस मोठ्याने कावकाव करतात, नंतर विसरून जातात. ही मग्रुरी मग गुन्हेगारीला खतपाणी घालणार नाही काय?
मुख्यत्वेकरून वरीलसारख्या घटनांना जन्म देणारी आणि त्यांचे वरचेवर वाढणारे प्रमाण याच्या मुळाशी असणारी ही कारणे आहेत. इतरही काही प्रासंगिक, वैयक्तिक कारणे असू शकतात. अशा घटना घडणे योग्य नाही. त्यांना अटकाव करण्याचे उपाय करायला हवेत; पण असे नुसते वाटून-चघळून आणि नंतर विसरून जाऊन परिस्थिती बदलणे शक्य नाही. प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी सर्व स्तरावर समाजप्रबोधन, लोकजागरण मोठ्या प्रमाणावर करणे अत्यंत गरजेचे आहे. काही जण, काही संघटना हे करतही आहेत पण त्यांची संख्या व व्याप्ती अजून पुरेशी नाही. त्यांना सर्वशक्तिनिशी पाठिंबा द्यायला तरी प्रत्येकाने पुढे यायला हवे.
व्यक्ती-व्यक्तीमधील, कुटुंबातील संपर्क वाढवणे, विचारांचे, भावनांचे मोकळे आदानप्रदान हे आनंदी, निरामय कौटुंबिक व सामाजिक जीवनासाठी आवश्यक घटक आहेत. परस्पर संवेदनशीलता, सद्भाव, बंधुभाव ही आपल्या संस्कृतीची, सभ्यतेची ओळख आहे. त्यांचे संवर्धन व्हायला हवे. जीवनाच्या स्पर्धेत नुसते धावत राहिल्याने माणसाचे सुख, समाधान हरवत चालले आहे हे लक्षात घेऊन वेळीच सावध व्हायला हवे. मुलांचे पालनपोषण, संवर्धन, शिक्षण याचा शास्त्रशुद्ध दृष्टीकोन लक्षात घेऊन मुलांवर होणारा अन्याय दूर करायला हवा. ते उत्तम चारित्र्याचे व उत्तम व्यक्तिमत्त्वाचे नागरिक बनतील याकडे लक्ष द्यायला हवे. मार्कांपेक्षा ते जास्त उपयुक्त आहे. नाहीतर नंतर पश्चाताप करून उपयोग नसतो.
व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, त्याबरोबर जबाबदारीची जाणीवही हवी. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे बेफाम, बेताल वागणे नव्हे तर इतरांच्या विचारांचा, भावनांचा आदर करणे. ‘मी नव्हे, आम्ही’, हा भाव निकोप, आनंदी कुटुंबजीवनाचा, समाजजीवनाचा भक्कम पाया आहे. तोच पोखरला जात असेल तर ते आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे होईल, अराजकतेला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
लेखक ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ असून बालशिक्षण, बाल संवर्धन, बालविकास, विवेकी पालकत्व यात विशेष काम आहे.