उद्धव यांनी फक्त राऊत, आदित्य, अंधारे आणि कंपनी यांच्यासमोर मोठमोठी भाषणे करावीत. वल्गना कराव्यात, जमतील तेवढे टोमणे मारावेत; पण त्याचवेळी आपल्या अंगावर असलेल्या राजकीय वस्त्रांची चिंता करावी. एकापाठोपाठ त्याचे वस्त्रहरण होते आहे.
उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी भलतेच प्रेम ऊतू गेलेले दिसते. हे प्रेम पुतनामावशीचे मायावी प्रेम आहे. योगायोगाने विमानात दोघे एकत्र आले. दोघांच्या बसण्याच्या जागा एकमेकांपासून दूर होत्या. त्यामुळे संवाद होण्याची शक्यता नव्हती; परंतु ’उद्धवभक्त मराठी मिडीया’ने घरात बसून करमणूकप्रधान बातम्या तयार केल्या. वाहिन्यांच्या विचार करता याबाबतीत TV9 आघाडीवर आहे. TV9 आणि उद्धवसेनेचा काही करार झालेला असावा. त्यामुळे महाराष्ट्रात घडणार्या असंख्य घटनांना स्थान न देता उद्धव ठाकरेंची आरती करण्याचे काम TV9 इमानेइतबारे करत असते.
उद्धव ठाकरे यांचा दौरा, फुटून निघालेल्या खासदाराच्या मतदारसंघात जाऊन खास उद्धव शैलीत भाषण करण्याचा होता. उद्धवशैलीचे पहिले वैशिष्ट्य रडगाणे गाण्याचे आहे. ’पक्ष पळवला’, ’बाप पळवला’, ’चिन्ह पळवले’, ‘आमदार पळवले’ आणि आता ’खासदार पळवले’. यावेळी त्यांनी एक नवीन शोध लावला. ’फडणवीस यांचे पंख कापण्यासाठी अमित शहा यांनी शिवसेनेचे खासदार फोडले.’ देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाजूला करण्याचा हा डाव आहे.
खासदाराच्या मतदारसंघात खासदार का फुटले? याविषयी बोलणे प्रसंगोचित होते; पण त्याऐवजी उद्धवजींना देवेंद्रजींची भलतीच चिंता वाटली. इतिहास विसरता येत नाही. 2019 साली भाजपा आणि शिवसेना युती भंग करण्याची स्थिती आली असता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना 20 वेळा फोन केले. एकही फोन त्यांनी उचलला नाही. उद्धव ठाकरेंचे हे वाक्य प्रसिद्ध आहे की, (देवेंद्रना उद्देशून) ‘एक तर तू राहशील किंवा मी राहीन’ हे उद्धव ठाकरे यांचे राजकारणी रूप आहे. ज्यांच्या बोलण्यावर कवडीचा विश्वास ठेवू नये असे दोन राजकारणी महाराष्ट्रात आहेत. उद्धव ठाकरे यांचे ’नवगुरू’ शरद पवार हे पहिले आणि ’शिष्योत्तम’ उद्धव ठाकरे दुसरे. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपाशी युती उद्धव ठाकरे यांनी तोडली. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगले आणि नंतर त्या पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. कारण सर्वांना माहीत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचे मार्मिक उत्तर
हिंदीमध्ये एक गाणं आहे, ‘माना के तेरे जहाँ में ये नहीं की, प्यार नहीं मिलता।, लेकिन जब चाहिये तब नहीं मिलता।’हे सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झालेला आहे, आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला. पुन्हा आमच्या त्या लग्नाचे वाढदिवस झाले, आता काय राहिलं?
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रची चिंता अजिबात करू नये. आपली चिंता करण्यास ते समर्थ आहेत आणि ते ज्या विचारधारेचे आहेत ती विचारधारा त्याहून अधिक समर्थ आहे. देवेंद्र फडणवीस एका विचारधोरेचे राजनेते आहेत. वसुली, दमदाटी, शिवराळपणा, विश्वासघात यांचे प्रतिनिधित्व ते करीत नाहीत. राजकीय नीतिमत्ता कशी जपायची असते याचा महाराष्ट्रातील ते आदर्श आहेत. याच्या विरुद्ध ज्यांची प्रतिमा आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये.
सध्याचा काळ असा आहे की, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे काय होईल याची चिंता करण्याऐवजी पुढील चार-पाच वर्षांत आपले काय होईल याची चिंता केली पाहिजे. त्यांच्या पक्षाचा जनाधार पालापाचोळ्याप्रमाणे उडत चालला आहे. ज्या मतदार संघात त्यांनी सभा घेतल्या तेथील लोकमत काय आहे’ हे TV9च्या पत्रकारांनी आणि मराठी माध्यमांतील उद्धवभक्तांनी शोधले पाहिजे. जमिनीस्तरावर काय चालले आहे, याचा त्यांना अंदाज येईल.
ही वेळ उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने पक्षातील आमदारांना सांभाळण्याची आहे. पुढील एक-दोन महिन्यांत किती आमदार उद्धव ठाकरेंबरोबर राहणार आहेत याचा निकाल लागेल. सचिन आहिर यांनी वाट मोकळी करून दिली आहे. लोकप्रतिनिधीला लोकभावना चांगल्या समजतात. उद्या आमदार सोडून गेले की, त्यांना कोणत्या आणि किती शिव्या घालायच्या याचा अभ्यास उद्धव ठाकरेंनी करून ठेवावा. या कामात संजय राऊत यांची त्यांना मदत होईल.
’इसापनीती’त एक कथा आहे. एक शिकारी असतो. वाघाची शिकार करण्याची त्याची हिंमत नसते; पण तो बढायाखोर असतो. कपोलकल्पित कथा रचून वाघाच्या शिकारीच्या कथा तो सांगत असे. अशाच एका गप्पांत तो म्हणतो, “मी आता जंगलात जातो आणि वाघाला मारून आणतो.” तिथे त्याला एक लाकूडतोड्याला भेटतो आणि त्याला तो म्हणतो. “मी वाघाचा माग काढत निघालो आहे. वाघ इथून जाताना तू पाहिलास का?”
तो लाकूडतोड्या म्हणतो, “हो पाहिला. तो कुठल्या घळीत गेला हे मी तुम्हाला दाखवतो चला.” हे त्याचे शब्द ऐकताच, शिकार्याला कापरे भरते. आणि तो म्हणतो, “राहू दे, राहू दे, मला फक्त वाघाचा ठावठिकाणा पाहिजे होता. मी नंतर येईन.” असे म्हणून तो निघून जातो.
देवेंद्र फडणवीस काय किंवा अमित शहा काय हे दोघेही ’वाघ’ आहेत. उद्धव ठाकरे यांना दोघांची शिकार करायची आहे, पण उद्वव ठाकरे इसापाच्या कथेतील शिकारी आहेत, ‘ये उन के बस की बात नही’ हेच खरे.
’इसापनीती’त वाघाचे कातडे पांघरलेल्या गाढवाची कथा आहे. वाघाचे कातडे पांघरून गाढव शेतात शिरत असे. त्यालाच वाघ समजून लोक पळून जात असत. परंतु एका चांदण्या रात्री त्याला गाण्याची लहर येते आणि तो खिंकाळू लागतो. लोकांना समजतं की, हे वाघाचे कातडे पांघरलेले गाढव आहे. ज्यांना हे समजलं ते खर्या वाघाकडे जाऊ लागले.
उद्धव यांनी फक्त राऊत, आदित्य, अंधारे आणि कंपनी यांच्यासमोर मोठमोठी भाषणे करावीत. वल्गना कराव्यात, जमतील तेवढे टोमणे मारावेत; पण त्याचवेळी आपल्या अंगावर असलेल्या राजकीय वस्त्रांची चिंता करावी. एकापाठोपाठ त्याचे वस्त्रहरण होते आहे. वस्त्रहीन राजाची कथा फार प्रसिद्ध आहे. लबाड विणकराने त्याला गंडविले आणि सांगितले की, “जो पापी आहे आणि तुमच्याविषयी वाईट भावना बाळगणारा आहे त्याला हे वस्त्र दिसणार नाही.” जेव्हा नसलेले वस्त्र घालून ’वस्त्रहिन राजा’ दरबारात आला तेव्हा एक मुलगा म्हणाला, “राजा नागडा आहे.”
असे बनावट वस्त्र प्रदान करणार्या चेल्यांपासून उद्धव आपला कसा बचाव करणार आहेत? याची चिंता बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणार्यांना आहे.