@अनघा लवळेकर
गेल्या दहा-बारा दिवसांपासून सगळीकडे जी गोष्ट चर्चिली जात आहे ती म्हणजे ‘केवळ स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी आपल्याच जवळच्या व्यक्तींच्या जीवावर उठलेल्या सिया गोयल, सोनम रघुवंशी आणि असे अनेक तरुण-तरुणी...!!

ही गोष्ट फक्त एखाद-दुसर्या व्यक्तीपुरती मर्यादित आहे असे म्हणून चालणार नाही. अशा वृत्तीची पाळेमुळे मनात खूप आधीपासून रुजत असतात आणि आयुष्यातल्या निर्णायक वळणावर अविवेकी कृती घडण्यासाठी कारणीभूत ठरतात असे नक्कीच वाटते. ज्या पद्धतीने या सर्व घटनांमध्ये योजनापूर्वक, खूप बारकाव्याचा विचार करून आपल्याच जवळच्या व्यक्तीचा जगण्याचा हक्क अत्यंत थंडपणे हिरावून घेतला गेला ते पाहिल्यावर समाजातल्या एका मोठ्या घटकाच्या मानसिक स्वस्थतेवर खूपच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असे नोंदवावेसे वाटते. गीतेतील सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपत्तीचा झगडा वर्णन केला आहे. प्रत्येकाच्याच मनात कुठेतरी दैवी संपत्ती म्हणजेच सद्गुण आणि आसुरी संपत्ती म्हणजेच दुर्गुणांचे उगमस्थान असते. गीता सांगते की,”सदगुणांचा सेनापती’ म्हणजे ‘अभय वृत्ती’! म्हणजेच अशी मानसिकता जी स्वतःला निर्भय बनवतेच; पण आपल्या अवतीभवतीच्या लोकांनाही भयमुक्त ठेवते.’ याउलट दुर्गुणांचा सेनापती म्हणजे ‘दंभ’. जेव्हा दाखवायचे आणि मनातले विचार वेगवेगळे होतात; तेव्हा दंभ प्रकट होतो. त्यातून आसुरी वृत्तीला खतपाणी मिळते. आसुरी वृत्ती ही ’सत्ता’,’अभिलाषा’ यांच्या पायावर बळकट होत जाते. या सर्व घटनांमध्येही असेच दिसते की, कमालीची आत्मकेंद्रितता आणि त्यामुळे दुसर्यांच्या भावभावनांविषयी किंबहुना जगण्याविषयीच असलेली बधिरता या सर्व गुन्हा करणार्यांच्या मनात निर्माण झालेली आहे.
परिणामांची ‘जाणीव’ असली तरी त्याची ‘फिकीर’ नाही! एखाद्याचा जीव घेणे म्हणजे काय याचे गांभीर्य रसातळाला पोहोचले आहे...‘मला जे हवे ते मी काहीही करून मिळवणारच’ अशा अट्टाहासापोटी-साधे, व्यावहारिक पण कदाचित थोडे दीर्घकाळ अवलंबावे लागणारे मार्ग (म्हणजेच पालकांशी संवाद, नात्याला विचारपूर्वक नकार इत्यादी) न घेता दुसर्याचे अस्तित्वच नाकारण्याचा शॉर्टकट सहजपणे घेतलेला दिसतो.
कोणत्या दुनियेत वावरत आहेत ही मंडळी? कोणत्या आभासी जगात ‘आपल्याला हवे तसेच घडले पाहिजे’ म्हणून राहात आहेत हे लोक? सदसद्विवेकबुद्धी पूर्णपणे झाकून जाईल असे वागताना ‘माझेच’,‘मलाच’, ‘मीच’,‘माझ्यासाठीच’ असा ‘मी’ चा पाढा का बरं जपत आहेत?
या सगळ्याची सुरुवात वर म्हटल्याप्रमाणे मोठे होत असताना किशोरवयातच स्वार्थाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे होते असे नक्की वाटते. ‘आपल्या स्वार्थापुढे दुसर्याचे अस्तित्व नगण्य आहे’ असे केव्हा वाटू लागते? तर ‘बस मै ही मै हूँ या वृत्तीला अवतीभवतीच्या वातावरणातून खतपाणी मिळाल्यामुळे आणि कोणत्याही संघर्षाला अडचणीला व्यवहारिक तोडगे असू शकतात- संवादातून ते हळूहळू पुढे येऊ शकतात’ याची कधी दखलच न घेतल्यामुळे!! जेव्हा आपण असा एखादा टोकाचा विचार किंवा कृती करतो आणि जे देण्याची क्षमता/ कुवत/ शक्ती आपल्यात नाही ते घेण्याचा अधिकार बिनदिक्कत वापरतो; तेव्हा आपल्यातल्याच एका शुद्ध अंशाला आपण मारून टाकत असतो हे लक्षात कसे येत नाही? मनाच्या कुरुक्षेत्रात आपण कोणाला जिंकू देतो यावर कधी विचार करावा की नाही? समाजाचा दबाव असेल, पालकांच्या नाराजीचा धाक असेल, तरीसुद्धा एखाद्याने केवळ स्वार्थापोटी अत्यंत क्रूरपणे, एका निष्पाप आणि तिच्यावर विश्वास ठेवणार्या व्यक्तीला अशा पद्धतीने संपवावे हे सर्व समाजाचेच एका अर्थाने अपयश म्हणावे लागेल.
पण हे घडते तर आहे. आपल्या अवतीभवती घडणार्या अशा अनेक घटना आपल्याला दिसत आहेत. मग आपण काय करायचे? ‘अरे, अरे, वाईट झाले..’,‘बापरे! हे कसे घडले?’ ‘आमच्याकडे असे काही होत नाही’,‘निषेध निषेध..! चला मोर्चे काढूया’... यापलीकडे आपण काही करू शकतो का? नक्कीच करू शकतो!! जिथे जिथे आपल्या अवतीभवती जडणघडणीच्या वयात असलेली मुले आहेत; त्यांच्याबरोबर उत्तम संवाद साधू शकतो.. विवेकाचा वापर का करायचा??..कधी करायचा आणि त्याचा आपल्या आणि इतरांच्या आयुष्याला काय उपयोग आहे... हे त्यांच्याशी बोलू शकतो!! संयमाचे बीज त्यांच्या मनात पेरू शकतो!! जिथे-जिथे, ज्यांनी-ज्यांनी घरात/समाजात असे बीज पेरण्याचा प्रयत्न केला तिथे आसुरी वृत्तीला लगाम घालण्याचे काही न काही काम होते हे अनेक प्रयोगांमध्ये/अनुभवांमध्ये प्रतीत झालेले आहे. तेव्हा हळहळ वाटणे स्वाभाविक असले तरीही तिथे थांबून चालणार नाही. सर्व प्रकारच्या अनावश्यक, अवाजवी, स्वार्थमूलक हिंसेला मुलांच्या मनात कणभरही थारा मिळू नये यासाठी संघटित प्रयत्न करूया... काय वाटते?
लेखिका ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि मानसतज्ज्ञ आहेत.