भारतीयत्वाची प्रखर जाणीव करून देणारे ज्ञानमंदिर - आयआयएम (IIM) नागपूर

विवेक मराठी    06-Jul-2026
Total Views |
Indian Institute of Management (IIM), Nagpur
 
@ श्रीकांत भास्कर तिजारे
 9423383966
एखादी व्यावसायिक संस्था विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि व्यवस्थापनाचे अचूक संस्कार कशी रुजवू शकते? जागतिक दर्जाच्या ‘आयआयएम (IIM) नागपूर’मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीचा जो अद्भुत संगम साधला आहे, त्याविषयी सांगणारा तसेच; स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनदृष्टीतून व्यवस्थापनाचे धडे देणारे हे केंद्र कसे उभे राहिले, यावर भाष्य करणारा हा लेख!
 
IIM
 
शिक्षण म्हणजे केवळ पदवी प्राप्त करण्याचे साधन नसते; ते व्यक्तिमत्त्व घडविण्याचे, नेतृत्व निर्माण करण्याचे आणि राष्ट्राला दिशा देण्याचे माध्यम असते. अशा शिक्षणाचा प्रत्यय जेव्हा एखाद्या संस्थेच्या प्रत्येक विटेत, प्रत्येक कलाकृतीत आणि प्रत्येक विचारात दिसतो, तेव्हा ती संस्था केवळ शैक्षणिक केंद्र राहत नाही, तर ती एक प्रेरणास्थान बनते.
 
अलीकडेच एका CSRविषयक कार्यशाळेनिमित्त ’भारतीय प्रबंध संस्थान, नागपूर (IIM Nagpur)’ येथे जाण्याची संधी मिळाली. कार्यशाळा भव्य वातानुकूलित सभागृहात संपन्न झाली; मात्र त्यानंतर संस्थेचा परिसर पाहण्याची संधी मिळाली आणि तेव्हाच या संस्थेचे खरे वैशिष्ट्य लक्षात आले.
 
आधुनिक भारताचे ज्ञानमंदिर
 
नागपूरच्या मिहान परिसरात सुमारे 132 एकर क्षेत्रात उभारलेले हे अत्याधुनिक कॅम्पस प्रथमदर्शनीच प्रभावित करते. प्रशस्त रस्ते, नियोजनबद्ध वास्तुरचना, हिरवाईने नटलेला परिसर, अत्याधुनिक सुविधा आणि सर्वत्र जाणवणारी शिस्त पाहून मन भारावून जाते.
2015मध्ये शैक्षणिक कार्य सुरू झालेल्या या संस्थेच्या स्वतंत्र कॅम्पसचे भूमिपूजन 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुढे 2022मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या भव्य कॅम्पसचे उद्घाटन झाले. आज ही संस्था देशातील अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्थांपैकी एक म्हणून झपाट्याने पुढे जात आहे.
 
 
एके काळी अशा नामांकित संस्थेत शिक्षण घेण्याचे स्वप्न मनात होते. जीवनाच्या प्रवासात ते शक्य झाले नाही; पण अशा संस्थेच्या परिसरात फिरण्याचा, तिची कार्यसंस्कृती जवळून पाहण्याचा योग आला, हेही कमी भाग्याचे नव्हते.
 
 
भारतीयत्वाचा जाणीवपूर्वक स्वीकार
 
आज जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभ्या राहत आहेत; मात्र त्यांच्यात भारतीय संस्कृतीचा आत्मा क्वचितच दिसतो. ’IIM नागपूर’ येथे मात्र वेगळेच चित्र अनुभवायला मिळते.
 
संस्थेच्या नावातच ’भारतीय’ हा शब्द आहे आणि त्या शब्दाला साजेशी मांडणी सर्वत्र दिसून येते. येथे आधुनिक व्यवस्थापन शिकवले जाते; परंतु त्याचा पाया भारतीय मूल्यांवर आधारित असल्याचे जाणवते.
 
 
कॅम्पसमधील विविध भित्तिचित्रे, तैलचित्रे, सांस्कृतिक प्रतीके, शिल्पे आणि वास्तुरचना विद्यार्थ्यांना सतत सांगत असतात की, ’जागतिक होण्याचा मार्ग आपल्या मुळांमधूनच जातो.’
 

IIM 
 
स्वामी विवेकानंदांचे अद्भुत दर्शन मला इथे घडले
 
या भेटीत सर्वाधिक प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे ग्रंथालयातील स्वामी विवेकानंदांचे भव्य चित्र. पुस्तकांच्या कपाटांमध्ये कल्पकतेने साकारलेली ही प्रतिमा पाहून काही क्षण आपण स्तब्ध होतो. ज्ञान, आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि युवकशक्ती यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले स्वामी विवेकानंद जणू विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत उभे आहेत, अशी अनुभूती येते.
 
ग्रंथालयासारख्या ज्ञानकेंद्रात विवेकानंदांची उपस्थिती अत्यंत अर्थपूर्ण वाटते. आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे चित्र केवळ कलाकृती नसून जीवनदृष्टी देणारे प्रेरणास्थान आहे.
 
शिवरायांच्या अष्टप्रधानांची प्रेरणादायी उपस्थिती
 
व्यवस्थापन संस्थेत पाहायला मिळालेली आणखी एक आगळीवेगळी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची प्रभावी मांडणी.
 
आजच्या काळात व्यवस्थापनाचे अनेक सिद्धांत शिकवले जातात; परंतु लोकाभिमुख प्रशासन, जबाबदारीचे विकेंद्रीकरण, निर्णयक्षमता आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्व यांचे सर्वोत्तम उदाहरण शिवरायांच्या प्रशासनात आढळते.
 
अष्टप्रधान मंडळाचे दर्शन घेताना आधुनिक व्यवस्थापनाच्या अनेक संकल्पना आपल्या परंपरेत किती प्रभावीपणे रुजलेल्या होत्या, याची जाणीव होते.
 
संस्थेच्या संचालकांच्या ’स्ट्रॅटेजी प्लॅनिंग रूम’मध्ये दोन महान राष्ट्रनायकांची अधिकृत तैलचित्रे प्रतिष्ठित करण्यात आली आहेत.
पहिले चित्र आहे महाराणा प्रतापसिंह यांचे, जे त्यांच्या वंशपरंपरेतील वारसदार लक्षराजसिंह मेवाड यांनी संस्थेला प्रदान केले आहे. स्वाभिमान, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि संघर्षशीलता यांचे प्रतीक असलेले महाराणा प्रताप भारतीय इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे.
 
 
दुसरे चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे, जे सातार्‍याच्या राजघराण्यातील शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट दिले आहे. सुशासन, लोककल्याण, संघटनकौशल्य आणि दूरदृष्टी यांचे प्रतीक असलेले शिवराय आधुनिक व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी आजही प्रेरणास्रोत आहेत.
 
 
या दोन्ही प्रतिमा केवळ सजावटीच्या वस्तू नसून नेतृत्वाचे जिवंत धडे देणार्‍या आहेत. अतिथी भोजन कक्षाकडे जाणार्‍या कॉरिडॉरमध्ये आर्य चाणक्यांचे भव्य तैलचित्र पाहायला मिळते. चाणक्य म्हणजे भारतीय राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विचारांचा मूळ स्रोत. त्यांचे चित्र पाहताना त्यांच्या दूरदृष्टीची, राष्ट्रहितासाठीच्या बांधिलकीची आणि रणनीतिपूर्ण विचारशैलीची आठवण होते.
 
 
आज जगभरात व्यवस्थापनाचे आधुनिक सिद्धांत शिकवले जात असताना, दोन हजार वर्षांपूर्वी भारताने चाणक्यांच्या रूपाने व्यवस्थापन आणि प्रशासनाची जी शास्त्रशुद्ध मांडणी केली होती, त्याची जाणीव हे चित्र करून देते. IIM नागपूरची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक सांस्कृतिक वारशाला दिलेले महत्त्व.
 

IIM 
 
रामटेक आणि कालिदासाच्या ‘मेघदूत’शी संबंधित सांस्कृतिक वारसा अत्यंत आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आला आहे. विदर्भाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण संदर्भांना संस्थेच्या सांस्कृतिक मांडणीत स्थान दिले गेले आहे. जागतिक व्यवस्थापन शिक्षण देणारी संस्था आपल्या परिसराच्या सांस्कृतिक मुळांना विसरत नाही, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव इथे बघायला मिळतो.
 
 
IIM नागपूरची वास्तुरचना केवळ सौंदर्यपूर्ण नाही तर पर्यावरणस्नेहीही आहे. ’जलसंधारण’, ’हरित परिसर’, ’ऊर्जा बचत’, ’सौरऊर्जेचा वापर’ आणि ’शाश्वत विकासाच्या तत्त्वांचा प्रभावी अवलंब’ येथे करण्यात आला आहे. आजच्या काळात व्यवस्थापन म्हणजे केवळ नफा नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीदेखील आहे, हा संदेश संस्था आपल्या रचनेतूनच देते.
IIMनागपूरचे एक वैशिष्ट्य विशेष भावले. येथे सर्वत्र Global Vision with Indian Rootsही संकल्पना जिवंत दिसते.
विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षम बनवताना त्यांना भारतीय संस्कृती, इतिहास आणि मूल्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न येथे दिसतो. त्यामुळे येथे शिकणारा विद्यार्थी केवळ व्यवस्थापक होत नाही, तर एक संवेदनशील आणि जबाबदार नागरिक म्हणून घडतो. ’लोकल टू ग्लोबल’चा खरा अर्थ इथे जाणवतो.
 
 
आजच्या शिक्षणव्यवस्थेत ’संस्कार’, ’संस्कृती’ आणि ’राष्ट्रभान’ यांचा अभाव असल्याची तक्रार अनेकदा ऐकायला मिळते. अशा काळात IIM नागपूरसारखी संस्था आधुनिकता आणि भारतीयत्व यांचा सुंदर समन्वय घडवताना दिसते. स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी दर्शन, शिवरायांच्या अष्टप्रधानांची मांडणी, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांच्या अधिकृत प्रतिमा, आर्य चाणक्यांचे विचार, रामटेक-मेघदूताचा सांस्कृतिक संदर्भ आणि पर्यावरणपूरक भव्य परिसर, हे सर्व अनुभवताना मनात एकच भावना निर्माण होते.
 
 
हे शैक्षणिक व्यवस्थापन केंद्र, भारताच्या आत्म्याला स्पर्श करणारे एक प्रेरणादायी ज्ञानमंदिर आहे. विदर्भातील प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजजीवनात कार्य करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी या संस्थेला भेट द्यावी. कारण येथे केवळ इमारती दिसत नाहीत, तर भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आकार घेताना दिसतात.
 
ज्ञानातून ’परिवर्तन’, नेतृत्वातून ’राष्ट्रनिर्माण’ - या विचाराचा जिवंत अनुभव म्हणजे IIM नागपूर.