पश्चिम क्षेत्रातील राष्ट्र सेविका समितिचे वर्ग -संस्कार, संघटन आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रेरणादायी प्रवास

विवेक मराठी    06-Jul-2026
Total Views |
 
rss
'स्त्रीशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या विचाराला मूर्त रूप देत ’राष्ट्र सेविका समिति’च्या पश्चिम क्षेत्रात 2026 या वर्षात विविध स्तरांवरील प्रशिक्षण वर्गांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ’प्रारंभिक’, ’प्रवेश’, ’प्रबोध’ आणि ’गृहिणी वर्गां’च्या माध्यमांतून हजारो सेविकांनी शाखा जीवनाचा अनुभव घेतला. राष्ट्रभक्तीचे संस्कार आत्मसात केले आणि समाजकार्याची प्रेरणा मिळवली.
यावर्षी पश्चिम क्षेत्रात आयोजित वर्गांमध्ये एकूण 2,436 शिक्षार्थी आणि शिबिरार्थींनी सहभाग घेतला. तर 156 शिक्षिकांनी प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली. वर्गांमधील वैचारिक, शारीरिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यक्रमांमुळे प्रत्येक सेविकेला व्यक्तिमत्त्व विकासासोबतच राष्ट्रकार्याची दिशा मिळाली.
 
प्रारंभिक वर्गांतून संस्कारांचा पाया
 
पश्चिम क्षेत्रात 36 ठिकाणी प्रारंभिक वर्गांचे आयोजन करण्यात आले. या वर्गांमध्ये 2049 शिक्षार्थी आणि 125 शिक्षिका सहभागी झाल्या. ’समितिची ओळख’, ’संघटन जीवनाचे महत्त्व’, ’राष्ट्रभावना’ आणि ’भारतीय संस्कृतीचे मूल्य यांची रुजवण’ या वर्गांतून करण्यात आली.
 
 
प्रांतनिहाय मध्यवर्ती कल्पनांनी वर्गांना विशेष दिशा दिली. ’पश्चिम महाराष्ट्रात तुमी बी घडा ना’, ’विदर्भात बाल है गोपाल है’, ’हम भारत के लाल हैं’, कोकणात ’शाखा मंदिर भारत माँ का’ आणि देवगिरी प्रांतात ’राष्ट्रभक्ति का स्त्रोत बने हम’ या संकल्पनांवर विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
 

rss 
 
’शून्य सावली दिन’, ’प्रभात फेरी’, ’रामजन्म उत्सव’, ’संस्कृत संभाषण’, ’वंशी प्रशिक्षण’ आणि ’ब्रह्ममुहूर्त अनुभव’ यांसारख्या उपक्रमांनी वर्गांना वेगळी उंची प्राप्त करून दिली. विशेषतः ब्रह्ममुहूर्तातील साधना आणि संस्कृत संभाषणामुळे भारतीय जीवनमूल्यांचा अनुभव सेविकांना प्रत्यक्ष मिळाला.
 
 
प्रवेश वर्ग : ध्येयनिष्ठ जीवनाची प्रेरणा
प्रवेश वर्ग स्थान
 
भंडारा, सोलापूर, मीरा रोड (मुंबई) आणि छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी आयोजित प्रवेश वर्गांमध्ये 276 शिबिरार्थी आणि 20 शिक्षिका सहभागी झाल्या. शाखेतील नियमित सहभागांतून अधिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज होणार्‍या सेविकांसाठी हे वर्ग महत्त्वाचे ठरले. ’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती’, ’आव्हान हे हिंदूंना की या...’, ’ध्येय का ध्यान न भूले’ आणि ’जगत जननी का जयकार उठे’ या मध्यवर्ती कल्पनांनी वर्गाचे वातावरण प्रेरणादायी बनविले.
 
 
या वर्गांतील ’माझे घर, हिंदू घर’ या संपर्क अभियानाने विशेष लक्ष वेधून घेतले. घराघरांत जाऊन समाजाशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ’नर सेवा ही नारायण सेवा’ या भावनेने कार्य करणार्‍या सेवाव्रती दाम्पत्याची मुलाखत सेविकांसाठी प्रेरणादायी ठरली.
 
 
rss
 
याशिवाय पितळी भांडी निर्मिती कारखान्याला भेट, पथसंचलन, कौमुदी संचलन, मातृ हस्तेन भोजनम्, अभिलेखागार दिन आणि दिवंगत ज्येष्ठ सेविकांच्या नावाने निवास कक्षांचे नामकरण अशा उपक्रमांमुळे ’परंपरा’, ’सेवा’ आणि ’संघटन’ यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
 
 
प्रबोध वर्गात जागवला राष्ट्रीय अभिमान
 
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित प्रबोध वर्गात 63 सेविका आणि पाच शिक्षिका सहभागी झाल्या. ’जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान’ ही वर्गाची मध्यवर्ती कल्पना होती. वर्ग परिसरात आकर्षक कोपरा सजावट, विविध विषयांवरील प्रदर्शने आणि समाजातील कर्तृत्ववान युवक-युवतींची पोस्टरद्वारे ओळख करून देण्यात आली. ’राष्ट्र सेविका समिती’च्या संस्थापिका वंदनीय लक्ष्मीबाई (मावशी) केळकर आणि वंदनीय ताई आपटे यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले.
 

rss 
 
या उपक्रमांमुळे सेविकांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा देणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा परिचय झाला. तसेच देश, समाज आणि संस्कृतीविषयीचा अभिमान अधिक दृढ झाला.
 
गृहिणी वर्गांतून कुटुंब ते राष्ट्र प्रवास
 
विदर्भ प्रांतातील ’भंडारा’ आणि कोकण प्रांतात ’मुंबई’ या दोन ठिकाणी आयोजित गृहिणी वर्गांमध्ये 48 सेविका आणि सहा शिक्षिका सहभागी झाल्या. गृहिणींच्या माध्यमातून कुटुंब संस्कार आणि समाजपरिवर्तनाचा विचार या वर्गांच्या केंद्रस्थानी होता.
’कृतीने कृतिभारती वाढवावी’ आणि ’शाखा मंदिर भारत माँ का’ या संकल्पनांवर आधारित वर्गांमध्ये विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. ’समान नागरी संहिते’चे मूक अभिनयाद्वारे सादरीकरण हा उपक्रम विशेष गाजला. समाजातील महत्त्वाच्या विषयांवर सर्जनशील आणि प्रभावी पद्धतीने विचार मांडण्याची संधी सेविकांना मिळाली.
 
 
अखिल भारतीय अधिकार्‍यांचे मार्गदर्शन
 
पश्चिम क्षेत्रातील सर्व वर्गांवर मिळून 13 अखिल भारतीय अधिकार्‍यांच्या भेटी झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सेविकांना व्यापक राष्ट्रीय दृष्टी, कार्यपद्धती आणि आगामी कार्याची प्रेरणा मिळाली. विविध संवाद, चर्चा आणि मार्गदर्शन सत्रांमधून कार्य अधिक प्रभावी करण्याचे मार्ग स्पष्ट झाले.
 
 
rss
 
राष्ट्रवैभवाच्या दिशेने उचललेले भक्कम पाऊल
 
पश्चिम क्षेत्रातील हे सर्व वर्ग केवळ प्रशिक्षण शिबिरे नव्हती, तर राष्ट्रभक्त, संस्कारीत आणि कर्तृत्ववान स्त्रीशक्ती घडविण्याची प्रभावी साधना होती. शाखा जीवनातून निर्माण होणारी संघटनशक्ती, संस्कारातून विकसित होणारी व्यक्तिमत्त्वे आणि सेवाभावातून उभी राहणारी समाजनिष्ठा यांचे दर्शन या वर्गांमधून घडले.
 
व्यक्ती घडविण्यापासून राष्ट्र घडविण्यापर्यंतचा प्रवास या वर्गांमधून अनुभवायला मिळाला.
 
राष्ट्र सेविका समितिच्या पश्चिम क्षेत्रातील वर्गांनी 2026मध्ये संघटन, संस्कार आणि राष्ट्रकार्यातील नवे मानदंड निर्माण करत स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा प्रभावी आविष्कार घडवून आणला.
 
’संस्कारित स्त्री, संघटित स्त्री आणि राष्ट्रनिष्ठ स्त्री’ हाच समर्थ, सक्षम आणि वैभवशाली भारताचा पाया आहे.
 
उज्ज्वला श्रीकृष्ण मसलेकर
8669324780
देवगिरी प्रांत बौद्धिक प्रमुख