@अॅड. प्रबोधन निकाळजे
9422936767
महाडच्या ऐतिहासिक भूमीत दिवसभर झालेल्या ‘सामाजिक न्याय परिषद’च्या या विचारमंथनातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्टपणे समोर आला ‘सामाजिक न्याय ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक सजग नागरिक, प्रत्येक सामाजिक संस्था आणि प्रत्येक कार्यकर्त्याची सामूहिक जबाबदारी आहे. संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांची अंमलबजावणी समाजाच्या प्रत्यक्ष व्यवहारात झाली, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल,’ असा दृढ विश्वास या परिषदेतून व्यक्त करण्यात आला.
महाड ही भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक क्रांतिभूमी आहे. याच भूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून समानतेचा ऐतिहासिक उद्घोष केला आणि भारतीय समाजव्यवस्थेला समतेचा नवा मार्ग दाखवला. या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्र शासनाने ’2026-27’ हे वर्ष ’सामाजिक समता व समरसता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. संत रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीचे वर्ष, महात्मा जोतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचे वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीचे वर्ष आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचा ऐतिहासिक संगम अशा प्रेरणादायी पार्श्वभूमीवर 28 जून 2026 रोजी रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे ’सहावी राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद -2026’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
’विवेक विचार मंच महाराष्ट्र’, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’, ’अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे’ आणि महाराष्ट्रातील 50 सहयोगी संस्था-संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही परिषद आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर वंचित, उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणार्या राज्यातील सर्वात महत्त्वाच्या वैचारिक आणि सामाजिक व्यासपीठांपैकी एक म्हणून विकसित झाली आहे. ’सामाजिक न्याय’, ’समता’, ’बंधुता’ आणि ’संविधानिक मूल्यांवर’आधारित सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणार्या विविध संस्था-संघटनांना एकत्र आणणे, सामाजिक प्रश्नांवर विधायक चर्चा घडवून आणणे, अन्याय-अत्याचारांविरुद्ध प्रभावी भूमिका तयार करणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तनासाठी सामूहिक दिशा निश्चित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

दरवर्षी आयोजित होणार्या या परिषदेची आता सामाजिक परिवर्तनासाठी झटणार्या कार्यकर्त्यांचा विचारमेळावा, अनुभवांची देवाणघेवाण करणारे व्यासपीठ आणि सामाजिक न्यायासाठी कृती आराखडा तयार करणारी परिषद म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून आलेल्या 400पेक्षा अधिक संस्था-संघटनांचे एक हजाराहून अधिक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, विविध चळवळीतील कार्यकर्ते आणि युवा या परिषदेत सहभागी झाले होते. सभागृहात युवकांचा उत्साह, महिलांचा लक्षणीय सहभाग आणि विविध समाजघटकांची एकत्रित उपस्थिती दिसली.
चवदार तळ्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अल्पसंख्याक व्यवहार व संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले व कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानास अभिवादन करून भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले.
उद्घाटन सत्राला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री दादा इदाते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनिश कामत, ’अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील कांबळे, ’विवेक विचार मंचा’चे राज्य कार्यवाह महेश पोहनेरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘समतेचा सत्याग्रह आणि बंधुतेचा जागर’ या विशेष पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
उद्घाटक म्हणून बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी महाडच्या ऐतिहासिक भूमीला वंदन करत सांगितले की, ’महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक न्यायासाठी केलेला ऐतिहासिक संघर्ष होता. तथागत गौतम बुद्धांनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आपण बाबासाहेबांकडून घेतली आहे. महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महाड येथे सामाजिक न्याय परिषद होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे.’ अशा शब्दांत त्यांनी सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या या वैचारिक चळवळीचे त्यांनी विशेष कौतुक केले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सामाजिक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ’आंबेडकरी समाजाने स्वतःपुरता मर्यादित न राहता सर्व समाजाशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक समाजघटकापर्यंत, प्रत्येक संघटनेपर्यंत आणि प्रत्येक राजकीय प्रवाहापर्यंत पोहोचले पाहिजेत,’ असे सांगताना त्यांनी ’आता आपण सर्वत्र जाऊया, सर्वांची भाषा बोलूया आणि सर्वत्र बाबासाहेबांचा जयघोष करूया असे प्रेरणादायी आवाहन केले.’ त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या नूतनीकरण व विकासकामाची माहिती देताना सांगितले की, ’पुढील 20 मार्च रोजी महाड सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते या विकासकामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’
परिषदेच्या समारोपावेळी पद्मश्री दादा इदाते यांनी समाजजोडणीचा अत्यंत मर्मस्पर्शी संदेश दिला. ’दलित समाजाचे प्रश्न हे केवळ दलितांचे नसून संपूर्ण समाजाचे प्रश्न आहेत,’ असे सांगत त्यांनी ’जातींच्या भिंती मोडून सर्व समाजाने एकत्रितपणे सामाजिक प्रश्न सोडविण्याची’, गरज व्यक्त केली. त्यांनी महापुरुषांना संकुचित चौकटीत न पाहता त्यांच्या समग्र विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. ’बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भाषणाचा विषय नाहीत; ते कृतीचा विषय आहेत,’ हे त्यांचे विधान संपूर्ण परिषदेचा आत्माच ठरले. ”विवेक विचार मंचा’चे कार्यकर्ते समाजदुःखाशी एकरूप होऊन कार्य करणारे देवदुर्लभ कार्यकर्ते असल्याचे’ गौरवोद्गार त्यांनी काढले. पुढे ते म्हणाले की, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश ‘मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे.’ हा प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या जीवनात उतरवला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलेल्या कोणत्या मूल्याची अंमलबजावणी मी माझ्या आयुष्यात करीत आहे. अशी कृतीशील कार्यकर्त्यांची साखळी निर्माण झाली, तर सामाजिक परिवर्तनाची गती भूमितीय प्रमाणात वाढेल आणि देशातील अनेक प्रश्न सोडविण्याचा मार्ग प्रशस्त होईल,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक करताना ’विवेक विचार मंचा’चे राज्य कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी ’गेल्या सात वर्षांपासून ’विवेक विचार मंच’ तीन प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने कार्यरत असल्याचे’ स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, ’अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित समाजघटकांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात वैधानिक, सामाजिक व लोकशाही मार्गाने संघर्ष करून पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हा ’विवेक विचार मंचा’चा पहिला उद्देश आहे. भारतीय संविधान सर्वोपरी मानून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांविषयी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे व संविधानावरील विश्वास दृढ करणे हा संस्थेचा दुसरा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे संविधानविरोधी व फुटीरतावादी प्रवृत्तींना वैचारिक आणि लोकशाही मार्गाने उत्तर देत राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे समाजप्रबोधन करणे हा विवेक विचार मंचाचा तिसरा महत्त्वाचा उद्देश असल्याचे’ त्यांनी अधोरेखित केले.
या परिषदेत ’समतेचा सत्याग्रह आणि बंधुतेचा जागर’ या विशेष पुस्तिकेचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, डॉ. शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री दादा इदाते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाडच्या सत्याग्रहाचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक सामाजिक न्यायाच्या चळवळीचे दस्तावेजीकरण करणारी ही पुस्तिका आहे.
दिवसभर चाललेल्या विविध परिसंवादांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर वंचित घटकांसमोरील विविध प्रश्नांवर गंभीर चर्चा झाली. ’संविधानिक हक्क’, ’आरक्षण’, ’महिला सक्षमीकरण’, ’सामाजिक समता’, ’अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी’, ’शासकीय योजना आणि त्यांची अंमलबजावणी’, ’सामाजिक संघटनांची भूमिका’ अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली.
राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या भागातील सामाजिक वास्तव मांडले. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या सकारात्मक उपक्रमांची माहिती दिली आणि काही ठिकाणी सुरू असलेल्या अन्याय-अत्याचारांविषयी चिंता व्यक्त केली. समस्यांबरोबरच त्यावरील विधायक उपाययोजनाही मांडण्यात आल्या. त्यामुळे परिषद केवळ तक्रारी मांडण्यापुरती मर्यादित न राहता उपाय सुचविणारे आणि कृतीची दिशा देणारे व्यासपीठ ठरली.
’विवेक विचार मंच’चे प्रांत संयोजक आप्पासाहेब पारधे यांनी मागील वर्षभरात राज्यात घडलेल्या अनुसूचित जातीवरील अन्याय-अत्याचारांच्या गंभीर घटनांचे सादरीकरण केले.
’बीड जिल्ह्यात जुन्या वादातून वाल्मिकी समाजातील युवक यश ढाका यांची झालेली हत्या’, ’नांदेड येथे आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध म्हणून बौद्ध युवक सक्षम ताटे यांची निर्घृण हत्या’, ’छत्रपती संभाजीनगर येथे रंग लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून बौद्ध कुटुंबावर झालेला जमावाचा हल्ला’, तसेच ’बीडमध्ये कोचिंग क्लास चालकाकडून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा’ त्यांनी विशेष उल्लेख केला.
परिषदेत सहभागी झालेल्या विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनीही आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. काहींनी गावपातळीवरील समता अभियानांची माहिती दिली, काहींनी शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील यशस्वी प्रयोग मांडले, तर काहींनी महिला सक्षमीकरण, युवक संघटन, संविधान जागर अभियान आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
महाडच्या ऐतिहासिक भूमीत दिवसभर झालेल्या या विचारमंथनातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्टपणे समोर आला की, ’सामाजिक न्याय ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक सजग नागरिक, प्रत्येक सामाजिक संस्था आणि प्रत्येक कार्यकर्त्याची सामूहिक जबाबदारी आहे. संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांची अंमलबजावणी समाजाच्या प्रत्यक्ष व्यवहारात झाली, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल,’ असा दृढ विश्वास सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.
दिवसभराच्या चर्चासत्रांमध्ये वातावरण अत्यंत सकारात्मक, शिस्तबद्ध आणि विचारप्रधान राहिले. विविध मतप्रवाहांतील कार्यकर्ते एकाच सभागृहात बसून विधायक संवाद साधत असल्याचे चित्र सामाजिक लोकशाहीच्या दृष्टीने आशादायी होते. संविधान, सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या समान धाग्यांनी सर्वांना जोडले असल्याची भावना संपूर्ण परिषदेत प्रकर्षाने जाणवत होती.
सामाजिक न्यायासाठी कार्य करणार्यांचा गौरव
सामाजिक न्याय आणि समतेसाठी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करणे ही या परिषदेची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी या उद्देशाने ’विवेक विचार मंच’तर्फे दरवर्षी राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान केला जातो.
यंदा ’राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार-2026’ केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अकरा मान्यवरांना प्रदान करण्यात आला. सभागृहातील प्रतिनिधींच्या टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या वर्षी विजय लक्ष्मण गव्हाळे-बारामती, मिलिंद मधुकर जाधव-पिंपरी-चिंचवड, नागेश मोहन कंडारे-धुळे, प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे-छत्रपती संभाजीनगर, नागसेन शामराव पुंडगे- परभणी, डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे-बीड, प्रभाकर मनोहर शिंदे -नागपूर, शाम वसंत माळवंदे-खामगाव,जि.बुलढाणा, स्मिता सुशांत कवडे-मुंबई, विजय अंबुजी जाधव-अंधेरी, मुंबई, महादेव कृष्णाजी गोठणकर-राजापूर, जि. रत्नागिरी या मान्यवरांना राज्यस्तरीय सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बीड जिल्ह्यातील राजू वंजारे आणि अभिजीत वैद्य या दोन सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
परिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव
परिषदेत तीन महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. ’एक गाव-एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी’ या ठरावाद्वारे प्रत्येक गावात सर्व समाजघटकांना समान प्रवेश मिळावा, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांवर आधारित एकसंघ भारत निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच संविधान, लोकशाही आणि शांततामय सामाजिक परिवर्तनाच्या मार्गावर विश्वास व्यक्त करत नक्षलमुक्त भारत अभियानाचे अभिनंदन करणारा ठरावही मंजूर करण्यात आला. या सर्व ठरावांना उपस्थित प्रतिनिधींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी या परिषदेबद्दल अत्यंत सकारात्मक भावना व्यक्त केल्या. अनेकांनी ही परिषद केवळ कार्यक्रम नसून सामाजिक परिवर्तनाची कार्यशाळा असल्याचे सांगितले. महाडच्या ऐतिहासिक भूमीत आयोजित परिषदेमुळे चवदार तळे सत्याग्रहाचा संदेश नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
प्रतिनिधींनी ’विवेक विचार मंचा’चे विशेष अभिनंदन करत, ’संवैधानिक मूल्यांचे जतन, सामाजिक न्यायासाठी सातत्याने संघर्ष, अन्याय-अत्याचारांविरोधातील भूमिका आणि समाज जोडण्याच्या’ प्रयत्नांचे कौतुक केले. परिषदेने समाजात मंगल मैत्रीचा संदेश दिला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे.’ या विचाराचे पुनर्जागरण घडविण्यात ही परिषद यशस्वी ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर राज्यभर विविध जनजागृती कार्यक्रम आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा निर्धार परिषदेत व्यक्त करण्यात आला. समाजात अजूनही अस्तित्वात असलेली ’जातीयता’, ’अस्पृश्यतेची मानसिकता’ आणि ’सामाजिक विषमता’ कायमची नष्ट करण्यासाठी व्यापक लोकसहभागातून चळवळ उभारण्याचे आवाहन करण्यात आले.
महाडच्या ऐतिहासिक भूमीत संपन्न झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत ’संविधानावरील निष्ठा’, ’सामाजिक समतेचा आग्रह’, ’बंधुभावाचा संदेश’, अन्यायाविरुद्ध संघर्षाची तयारी आणि समाज जोडण्याचा दृढ संकल्प यांचा संगम अनुभवायला मिळाला.
महाडच्या चवदार तळ्यावरून शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेला समतेचा सत्याग्रह आजही तितकाच जिवंत आहे. बदलत्या काळात त्याची अभिव्यक्ती बदलत असली, तरी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही त्यामागील मूलभूत मूल्ये आहेत. ही मूल्ये समाजजीवनात अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी, अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष अधिक संघटित करण्यासाठी आणि संविधानाधिष्ठित, समरस व एकसंघ भारत घडविण्यासाठी ही परिषद पुढील वाटचालीचा दृढ संकल्प ठरली. या परिषदेत शाहीर शिर्के यांचा ’शाहिरी जलसा’ कार्यक्रमदेखील अत्यंत उत्साहात संपन्न झाला. निलेश धायरकर यांनी या परिषदेचे सुंदर असे सूत्रसंचलन केले व राष्ट्रगीताने या परिषदेचा समारोप झाला.