मराठीतील आद्य कवयित्री - महदाइसा तथा महदम्बेचे ‘धवळे’

विवेक मराठी    06-Jul-2026   
Total Views |
तेराव्या शतकातील महानुभाव पंथाच्या महदम्बा या मराठी साहित्यातील ’आद्य संतकवयित्री’ म्हणून ओळखल्या जातात. वैयक्तिक दुःखांवर मात करत त्यांनी चक्रधर स्वामींचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळे पंथात मोलाचे स्थान मिळवले. त्यांनी रचलेले ’धवळे’ हे श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहावर आधारित मराठीतील पहिले कथाकाव्य मानले जाते. भक्तिरसाने नटलेली ही रचना यादवकालीन महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि चालीरिती उलगडणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
 
vivek
 
महानुभाव सर्वज्ञ चक्रधरांची शिष्या, कवयित्री महदाइसा तथा ‘महदम्बा’ हिचे मराठीच्या आरंभकाळातील साहित्यामध्ये मोठे योगदान आहे. मराठी वाङ्मयइतिहासकारांनी ‘आद्य संतकवयित्री’ म्हणून तिचा गौरव केलेला आहे. तिने लिहिलेले ‘धवळे’, स्त्रीसुलभ भाव आणि रस याचे सुरेख संगम असलेले, मधुर काव्य आहे. ‘धवळे’ म्हणजे लग्नातील ‘वर गीते’; पुराणातील श्रीकृष्ण-रूक्मिणी स्वयंवराची कथा महदम्बेने ‘धवळे’मधून उत्कटपणे गायलेली आहे. हे कथाकाव्य ‘प्रसंगचित्रण’ आणि ‘व्यक्तिचित्रण’ अशा दोन्ही अंगाने नटलेले आहे. या कथाकाव्यात शृंगारापेक्षा भक्तीला तिने विशेष प्राधान्य दिलेले आहे. ‘जिज्ञासू’, ‘चर्चक’, ‘धर्मरक्षक’ अशा शब्दात नागदेवाचार्यांनी महदम्बेचा गुणगौरव केलेला आहे. महदम्बेच्या काव्याला ते ‘नाथवाणी’, ‘सिद्धवाणी’ म्हणत. त्या काव्याची आध्यात्मिक थोरवी सर्वांना सांगतात. भक्तिरसाचे अधिष्ठान लाभलेले हे ‘धवळे’ मराठी साहित्यातील अभिजात लेणे आहे.
 
 
प्रास्ताविक
 
मध्ययुगीन भक्तिआंदोलन काळात भारतातील विविध राज्यात नवे नवे भक्तिपंथ-संप्रदाय जन्माला आले तशाच ठिकठिकाणी संतकवयित्रींचाही उदय झाला. दक्षिण भारतात आळ्वार भक्तांमध्ये संतकवयित्री ‘आंडाळ’, कर्नाटकात ‘अक्क महादेवी’, काश्मीरमध्ये ‘लल्लेश्वरी’, राजस्थानात ‘मिराबाई’, तशाच महाराष्ट्रभूमीत तेराव्या शतकात ‘महदम्बा’, ‘मुक्ताबाई’, ‘जनाबाई’, ‘सोयराबाई’ या संतकवयित्री झाल्या. या मराठी संतकवयित्रींपैकी महानुभवपंथीय चक्रधरांची शिष्या ‘महदम्बा’ हिला ’आद्य संतकवयित्री’चा मान आहे. या सर्व संतकवयित्रींचे साहित्य मराठी वाङ्मय इतिहासातील अमृतठेवा आहे. त्यामध्ये मुक्ताईचे ‘ताटीचे अभंग’, जसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत तसेच महदम्बेचे ‘धवळे’ हे हृद्य असे भावस्पर्शी कथाकाव्य आहे. ‘श्रीकृष्ण-रूक्मिणी’ विवाह सोहळ्याच्या प्रसंगाने महदम्बेने गायलेली ही ‘वर’गीते आहेत, श्रीकृष्ण गीते आहेत. महानुभव भक्तिपंथाचे भगवान श्रीकृष्ण हे इष्ट व मुख्य दैवत आहे. त्या इष्टदैवताचे स्तुती गान आहे.
 
 
महदम्बेची थोरवी
 
कवयित्री महदम्बेचे स्वतंत्र चरित्र उपलब्ध नाही. पण ‘लिळाचरित्र’ या मुख्य ग्रंथासह महानुभवांच्या पोथ्यांतून-ग्रंथांतून ‘महदम्बा’ हे एक चक्रधरशिष्यांमधील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते, असे आढळते. तिची ’महदाइसा’, ’महादम्बा’ अशी दोन नावे महानुभव साहित्यामध्ये रूढ झालेली असली, तरी तिचे मूळ, खरे नाव ’रूपाइसा’ होते. तिच्या जन्माची नेमकी तारीख, साल उपलब्ध नाही. पण इ.स.1233मध्ये तिचा जन्म झाला असावा, असे अभ्यासक मानतात. देवगिरीच्या महादेवराय यादव राजाचे आध्यात्मिक मार्गदर्शक, थोर पंडित ’वामनाचार्य’ हे ’रूपाइसा’ उर्फ महदम्बेचे पणजोबा होते. तिच्या पणजीचे नाव ’महदाइसा’ होते आणि तीही साक्षात्कारी साध्वी होती. ’देवी म्हाळसा’ची तिच्यावर विशेष कृपा होती. विशेष म्हणजे ही आजी यादवराजांच्या परिवाराचे पौरोहित्य करीत होती. ज्या काळात पौरोहित्य हा सर्वस्वी पुरुषी वर्चस्वाचा विषय असतानाच्या काळात, महदाइसा राजघराण्याचे पौराहित्य करीत होती. अशा धर्मपरायण व पंडित घराण्यात महदम्बेचा जन्म झाला होता.
 

vivek 
 
महदम्बेच्या वडिलांचे नाव ’वायनायक’ होते. तेही व्युत्पन्न पंडित, शास्त्री होते. त्यांना आठ मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये होती. रूपाइसा(महदम्बा) ही त्यांची ज्येष्ठ कन्या होती. एवढेच नव्हे तर वडलांची कुशाग्र बुद्धी, चौकसपणा जिज्ञासू वृत्ती, सत्त्वशील धर्मपरायणता आणि स्वाध्याय अशी सारी गुणसंपदा महदम्बेला निसर्गतःच लाभली होती. यथाकाळी तत्कालीन समाजरितीनुसार महदम्बा हिचा तेराव्या-चौदाव्या वर्षीच विवाह झाला; पण प्रपंच सौख्य तिच्या नशिबात नव्हते. काही वर्षांतच तिच्या पतीचे निधन झाले. पतीचे नाव आदी तपशील मिळत नाहीत; पण तो यादवराजाच्या सैन्यात असावा आणि युद्धात वीरगती प्राप्त झाली असे काही अभ्यासक म्हणतात. महदम्बा विधवा झाली. सासरचा त्याग करून वडलांच्या घरी माहेरी परत आली.
 
 
वैधव्याचे कोणतेही दुःख न करता, न खचून जाता महदम्बा आपल्या जीवनातील विधिलिखितास धैर्याने सामोरी गेली. माहेरी येताच तिने वडलांकडून अनेक विद्यांचे-शास्त्राचे शिक्षण घेतले, स्वाध्यायात हरवून गेली. परिवारातील आठ सख्खी भावंडे आणि तीन चुलत भावंडे अशा एकत्र परिवाराची ती ’आई-पालक’ झाली.अत्यंत जिव्हाळ्याने व ममतेने तिने सर्व लहान भावंडाचे संगोपन केले. संस्कार देऊन संपन्न केले. महानुभव पंथाचा प्रथम आचार्य झालेला ’नागदेवाचार्य’ हा महदम्बेचा चुलत भाऊ होता.
 
 
सर्वज्ञ चक्रधरांचा शिष्य दादोस तथा रामदेव (रामचंद्र) धर्मप्रसार करीत असताना विधवा रूपाइसा (महदम्बा) आणि तिचा चुलत भाऊ नागदेव यांच्या संपर्कात येतात. दोघेही दादोसच्या बोधाने प्रभावित होऊन महानुभाव साधक होतात. दादोसच्या सहवासात महदम्बा व नागदेव यांना सर्वज्ञ चक्रधराची अगाध महती कळली, आता त्यांना चक्रधरांच्या दर्शनाची-भेटीची ओढ लागली. दादोसने फार वेळ न घालवता सर्वज्ञ चक्रधरांच्या भेटीचा योग आणला. सर्वज्ञ चक्रधरांचे दिव्य-तेजस्वी दर्शन करून दोघेही थक्क झाले. चक्रधरांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, त्यांनी सख्यत्वाने केलेला संवाद याने रूपाइसा (महदम्बा) एवढी प्रभावित झाली की तिने प्रथम भेटीतच त्यांना आपले गुरू-सद्गुरू मानून त्यांचा अनुग्रह घेतला. तिची कुशाग्र बुद्धी, जिज्ञासू चौकसपणा आणि सत्त्वशील श्रद्धाभाव पाहून चक्रधरस्वामीही विशेष संतुष्ट झाले. चक्रधरांच्या सहवासात रूपाइसा(महदम्बा)च्या पारमार्थिक वृत्तीला परिणतप्रज्ञता प्राप्त झाली. चक्रधर शिष्यपरिवारात, ’चक्रधरांची पट्टशिष्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली. चक्रधरस्वामींनी तिचे मूळचे नाव ’रूपाइसा’ बदलून तिला तिच्या आध्यात्मिक साक्षात्कारी पणजीचे ’महदाइसा’ हे नाव दिले. पुढे तिचे ’महदाइसा’ हेच नाव सर्वत्र शिष्यपरिवारात रूढ झाले.
 
 
या ’महदाइसा’ला महानुभव पंथाचा पहिला आचार्य नागदेवाचार्य आपल्या एका ग्रंथात ’महदम्बा’ म्हणतो आणि तेथून पुढे तिचे ’महदाइसा’ नाव मागे पडून सर्वजण तिला ’महदम्बा’ म्हणूनच ओळखू लागतात. अशा प्रकारे ’रूपाइसा’, ’महदाइसा’ आणि ’महदम्बा’ ही एकाच महिलेची नावे आहेत. सर्वज्ञ चक्रधरस्वामी यांनी तिचा ’जिज्ञासक’,’चर्चक’,’पृश्चक’अशा विशेषणांनी गुणगौरव केलेला आहे. गुरूच्या मुखातून व्यक्त झालेली गुणविशेषणे हीच महदम्बेची थोरवी आहे. तिने अत्यंत चौकसपणे, बुद्धिमत्तेने आणि स्पष्टपणे चक्रधरस्वामींना विचारलेले प्रश्न आणि त्यावर चक्रधरांनी दिलेली उत्तरे ही सकल महानुभाव श्रद्धावंताच्या ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे महदम्बा-चक्रधरस्वामी संवादाला महानुभवांमध्ये ’प्रश्नोपनिषदा’चे अगाध महत्त्व आहे. महानुभाव पंथीय सर्व भक्ती वाङ्मयाचे मुख्य अधिष्ठान हेच ’प्रश्नोपनिषद’ आहे.
 
’धवळे’-हृद्य कथाकाव्य
 
’धवळे’ ही कवयित्री महदम्बेची साहित्यकृती मराठी भाषेतील आद्य कथाकाव्य आहे. ही ललितकृती, महाराष्ट्राचे साहित्य व सांस्कृतिक संचित आहे. विचारवैभव व साहित्यसौंदर्याची खाण असलेले हे ’धवळे’, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाच्या पौराणिक कथेवरील प्रासंगिक काव्य आहे. ’धवळे’ म्हणजे लग्नातील ’वर गीते’! या पौराणिक विवाह सोहळ्यात श्रीकृष्ण हा ’वर’ आहे म्हणून ही कृष्णगीते आहेत. धवळे हे केवळ पद्य नसून हृद्य कथाकाव्य आहे. त्यात पांडित्याचे प्रदर्शन नाही. स्त्रीसुलभ श्रद्धाशील मनातून उत्स्फूर्तपणे झरलेले ते कृष्ण-रूक्मिणी विवाहाचे शब्दचित्रण आहे.
 
 
’धवळे’ या कथाकाव्याचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. ’पूर्वार्ध’मध्ये 84 कडवी आहेत तर ’उत्तरार्धात’ 64 कडवी आहेत. ’पूर्वार्धा’नंतर अनेक वर्षांनी ’उत्तरार्ध’ लिहिला गेला आहे. त्यामुळे धवळ्याचा उत्तरार्ध स्वयं महदम्बेने लिहिला नसावा असे काही समीक्षकांचे मत आहे. म्हाइमभट आणि लक्ष्येंद्रभट या दोन पंडितकवींनी महदम्बेच्या नावावर ते लिहिले असावेत असा समीक्षकांचा कयास आहे; परंतु महानुभव पंथीय सर्व लोक ’धवळे’ उत्तरार्ध महदम्बेचाच मानतात, हे महत्त्वाचे आहे.
 
 
’धवळे’ या कृष्ण-रूक्मिणी विवाह कथाकाव्याशिवाय कवयित्री महदम्बेच्या नावावर ’मातृकी रूक्मिणी स्वयंवर’, ’ओव्या’ अशा अन्यही साहित्यरचना आहेत. ’मातृकी रूक्मिणी स्वयंवर’ हे 110 कडवी असलेले काव्य असून पुराणातील रूक्मिणी स्वयंवर प्रसंगावरील हे मराठीतील पहिले काव्य आहे. पुढे या ’रूक्मिणी स्वयंवर’ प्रसंगावर कवी नरेंद्र, संत एकनाथ, मुक्तेश्वर आदी अनेकांनी काव्यग्रंथ लिहिलेले आहेत. अशा प्रकारे पुराणातील शेकडो कृष्णलीलांपैकी ’रूक्मिणी स्वयंवर’ प्रसंगातील नाट्य ओळखून त्यावर प्रथम काव्य करण्याचा मान कवयित्री महदम्बेलाच आहे.
 
 
’धवळे’ काव्याची जन्मकथा
 
चक्रधरांच्या निर्वाणानंतर गोविंदप्रभुुंच्या सहवासात महदम्बेसह सर्व शिष्यपरिवार अत्यंत विरक्त वृत्तीने, भिक्षा मागून नामसाधना करीत होता. त्या काळात महदम्बा भिक्षेसाठी बाहेर पडली तेव्हा एक बाशिंग विक्री करणारी बाई तिला दिसली. तिच्याकडून महदम्बेने एक बाशिंग घेतले आणि भक्तिभावाने कृष्णावतारी गोविंदप्रभुच्या कपाळी बांधले. त्यांना हळद लावली आणि गोविंदप्रभुच्या आज्ञेने कृष्ण-रूक्मिणी विवाहासारखा थाट करण्यात आला. तेव्हा अशा भक्तिपूर्ण वातावरणात गोविंदप्रभु महदम्बेला गाणी गायला सांगतात. ’कोणती गाणी गाऊ’ म्हणून महदम्बा प्रश्न करते, तेव्हा श्रीकृष्ण-रूक्मिणी विवाहाची गाणी गा असे गोविंदप्रभु सूचवतात. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून महदम्बा कृष्ण-रूक्मिणी स्वयंवराची कथा उत्स्फूर्त अशा स्वरचित काव्यातून गाते. हीच गीते, ’धवळे’ म्हणून प्रसिद्ध होतात. या कथाकाव्याचा प्रारंभ गुरू चक्रधरांना वंदन करून झालेला आहे. ती ओवी अशी ः-
 
श्री सर्वेश्वराचे शिरी धरूनिया चरण।
मग धवळी गाईन गोविंदुराणा॥
जेणे रूक्मिणी हरियली तेणे।
पवाडे केले अद्भूत।
पाविजे परमगती भक्ती।
आइकतां श्रीकृष्णचरित्र ॥1॥
 
भक्तिकाव्य श्रीकृष्ण कृपेने परमगती प्राप्त करून देणारे आहे, असे महदम्बा म्हणते.’धवळे’ कथाकाव्याची ही जन्मकथा आपणास गोविंदप्रभु चरित्रातील लिळा क्र.224, ’विवावोस्विकारू’ या लिळेत सविस्तर वाचावयास मिळते.
 
सिद्धसाधिकेची वाणी
 
महदम्बा ही केवळ श्रद्धावंत भाविक साधिकाच नाही तर कलासक्त, प्रतिभासंपन्न शीघ्र कवयित्री आहे. तिची वाणी सिद्धसाधिकेची असून त्यातून तिची ’पंथनिष्ठा’, ’अविचल गुरुभक्ती’, ’नीरक्षीरविवेक बुद्धी’ याचेही प्रत्यंतर येते. या काव्यातून तिच्या सार्‍या गुणांचे दर्शन होते. ’धवळे’ ऐकून महानुभव पंथाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांनी ही वाणी सामान्य नसून ’रूपैची सिद्धवाणी, नाथवाणी’ आहे असा गौरव केलेला आहे. एवढेच नव्हे तर तिच्या एकूण कार्याचे ’म्हातारी माझेया धर्मारक्षण गा’ अशा शब्दात श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. श्री. आजगावकर, डॉ. सुहासिनी इर्लेकर आदी मराठी वाङ्मय इतिहासकारांनी महदम्बेच्या काव्याची यथार्थ महती गायलेली आहे.
 
 
श्रीकृष्ण-रूक्मिणीची स्वयंवर कथा एक पौराणिक प्रेमकथा आहे. स्वाभाविकच त्यात शृंगाराला बरेच स्थान आहे. पण महदम्बा कौशल्याने शृंगार रसावर भक्तिरसाने मात करते. कृष्ण-रूक्मिणी प्रेमाला जीवाशिवाच्या आध्यात्मिक ओढीची उंची देऊन आत्म्याचे परमात्याशी, नदीचे सागराशी एकरूप होणे असे उदात्त वर्णन करते. महदम्बेच्या काव्यातील सर्व पात्रे यादवकालीन मराठी बोलीभाषेतून संवाद करतात. त्यातून त्याकाळच्या भाषिक स्वरूपाची ओळख होते. त्या काळचे लग्नविधी, पोषाख, रूखवत, जेवणावळी, आभूषणे, चालीरिती यांचे मनोज्ञ आल्हाददायक शब्दचित्रण घडते. या दृष्टीने यादवकालीन भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक अभ्यासासाठी ‘धवळे’ हा एक विशेष दस्तावेज आहे. ‘भक्ती’ हे या काव्याचे मुख्य अधिष्ठान असून ‘पाविजे परमगती; भक्ती आइकता कृष्णचरित्र।’ हा त्याचा मुख्य उद्देश-हेतू आहे. थोडक्यात ‘धवळे’ हा स्त्री हृदयाचा चैतन्य हुंकार आहे.
 
 
मराठी भाषेतील ही आद्य कवयित्री वृद्धापकाळात पायास व्रण होऊन आजारी पडली. दिवसेंदिवस आजार वाढत जाऊन ती जर्जर झाली. आपल्या निर्वाणाची तिला जाणीव झाली होती म्हणून तिने वैद्याचे औषधोपचारही नाकारले. ’मी औषधोपचार घ्यावेत अशी सर्वज्ञ श्रीगुरु चक्रधरांची इच्छा नाही’, असे तिने बंधू नागदेवाचार्य यास सांगितले आणि गुरू चक्रधरांचे स्मरण करीत देह ठेवला.’ननगावी’ नागदेवाचार्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यविधी केला. एवढीच नोंद महानुभाव साहित्यातून मिळते. तिच्या जन्माप्रमाणेच तिच्या मृत्यूचे साल सप्रमाण मिळत नाही. महानुभवांचे साहित्य प्रामुख्याने गद्य आहे पण त्यामध्ये महदम्बेचे ’धवळे’ हे काव्य श्रीकृष्णाच्या मुकुटावरील मोरपंखासारखे देखणे, मनोज्ञ आहे. असे भावकाव्य मराठीतील आद्य काव्य आहे हे अभिजात मराठीचे भाग्यच आहे.
 
 
या लेखमालेच्या पुढील भागात माहिती घेऊयात ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’विषयी.
 
- लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ‘एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.