शरयूताई हेबाळकर - मातृत्व, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी प्रवास

विवेक मराठी    01-Aug-2026
Total Views |
@शरद जाधव
9422761699

vivek 
एखाद्या व्यक्तीचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरते, तेव्हा त्या जीवनाचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी असते. अशाच एका कर्तृत्ववान, समर्पित आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करण्याचा आनंद आम्ही अनुभवला. त्या व्यक्ती म्हणजे शरयूताई शरदराव हेबाळकर.
शरयूताईंचे बालपण संघाच्या संस्कारमय वातावरणात गेले. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समितीच्या कार्याचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. समाजकार्य, राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव हे संस्कार त्यांना घरातूनच लाभले. त्यामुळे अगदी लहान वयातच त्या राष्ट्र सेविका समितीच्या कार्यात सहभागी झाल्या.
 
डी.एड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. नोकरी सांभाळत त्यांनी पुढील शिक्षणही पूर्ण केले. शिक्षण आणि समाजकार्य यांचा सुंदर समतोल त्यांनी कायम राखला. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचा विवाह. त्यांना जीवनसाथी म्हणून संघसंस्कारात वाढलेले, प्राध्यापक आणि स्वयंसेवक असलेले शरदराव हेबाळकर लाभले. एका प्राध्यापकाची आणि एका शिक्षिकेची ही जोडी समान विचारांच्या आणि समान ध्येयांच्या बळावर संसाराला सुरुवात करणारी ठरली.
 
मात्र संसाराचा प्रवास सुरू असतानाच देशावर आणीबाणीचे संकट आले. शरदरावांना ‘मिसा’ कायद्याखाली अटक झाली आणि त्यांना कारागृहात जावे लागले. जवळपास दोन वर्षे ते तुरुंगात होते. या कठीण काळात संपूर्ण संसाराची जबाबदारी शरयूताईंवर आली. अनेक अडचणी, संकटे आणि संघर्ष यांना सामोरे जात त्यांनी धैर्याने संसाराचा गाडा ओढला. पती कारागृहात असतानाही त्या डगमगल्या नाहीत. उलट त्यांनी आपल्या पतीला खंबीर साथ दिली आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. या काळात त्यांच्या शिक्षणाकडे काहीसे दुर्लक्ष झाले, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही.
 
आणीबाणी संपल्यानंतर शरदराव परत आले आणि संसाराची नव्याने सुरुवात झाली. परंतु या दाम्पत्याचे जीवन केवळ स्वत:पुरते मर्यादित नव्हते. राष्ट्रकार्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देणारी नव्हती. दोघांनीही आपल्या नोकरीतून रजा घेऊन नैरोबी येथे संघकार्य करण्याचा निर्णय घेतला. शरदरावांनी तेथे हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू केले, तर शरयूताईंनी इतिहास घडविला. त्यांनी नैरोबीमध्ये राष्ट्र सेविका समितीचे कार्य सुरू केले आणि भारताबाहेरील समितीच्या कार्याची पहिली शाखा उभारण्याचे श्रेय मिळविले. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद क्षण ठरला.
 
दोन वर्षांच्या नैरोबी प्रवासानंतर हे दाम्पत्य पुन्हा आंबेजोगाई येथे परतले. संसार, समाजकार्य आणि शिक्षण यांचा समतोल साधत शरयूताईंनी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण केले आणि पदवीधर झाल्या. त्यांच्या संसारवेलीवर कल्याणी, अदिती आणि विवस्वान ही तीन सुंदर फुले उमलली. आई-वडिलांच्या संस्कारांचा प्रभाव मुलांवरही पडला. कन्या कल्याणी यांनी शिक्षणानंतर राष्ट्र सेविका समितीचे पूर्णवेळ कार्य केले, तर पुत्र विवस्वान आजही पूर्णवेळ संघकार्य करत आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ हे त्याचे केंद्र आहे. तो विज्ञान भारतीचे पूर्ण वेळ काम करीत आहे.
 
राष्ट्र सेविका समितीच्या कार्यातून शरयूताईंचा संपर्क समाजाच्या विविध स्तरांशी आला. आंबेजोगाईपासून संपूर्ण मराठवाड्यात त्यांनी व्यापक प्रवास केला. असंख्य कुटुंबांशी नाते जोडले, महिलांना मार्गदर्शन केले आणि समाजात राष्ट्रप्रेम, संस्कार आणि जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले. अनेक महिलांना संघटनात्मक कार्यात सहभागी करून घेत त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
 
समाजकार्याच्या या व्यस्त प्रवासात त्या आपल्या शिक्षक धर्मालाही कधी विसरल्या नाहीत. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, चांगले संस्कार आणि जीवनमूल्ये देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. एक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत आणि उच्च पदांवर कार्यरत आहेत.
 
त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत आंबेजोगाई येथील दीनदयाळ बँकेच्या संचालिका म्हणून त्यांची निवड झाली. सहकार क्षेत्राचा पूर्वानुभव नसतानाही त्यांनी या क्षेत्राचा सखोल अभ्यास केला. आपल्या अभ्यासू वृत्ती, मेहनत आणि नेतृत्वगुणांच्या बळावर त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी अनेक सकारात्मक प्रयत्न झाले.
 
सहकार क्षेत्रात सक्रिय झाल्यानंतर त्यांच्याकडे सहकार भारतीचे दायित्व आले. आंबेजोगाईपासून सुरुवात करत त्यांनी मराठवाडा स्तरापर्यंत विविध जबाबदार्‍या सांभाळल्या. मराठवाडा प्रांताच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी नेतृत्व दिले. पदाची लालसा न बाळगता जे दायित्व मिळेल ते पूर्ण समर्पणाने पार पाडणे, हीच त्यांची कार्यपद्धती राहिली. त्यांनी नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार केली, त्यांना मार्गदर्शन केले आणि सहकार भारतीचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आजही त्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
 
वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा समाजसेवेचा प्रवास आज सुमारे सात दशकांचा झाला आहे. राष्ट्र सेविका समिती, सहकार भारती आणि संघ परिवाराच्या विविध आयामांमध्ये त्यांनी विविध जबाबदार्‍या सांभाळल्या. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे मातृत्व, नेतृत्व, कार्यकर्तृत्व आणि स्नेहभाव असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहिले आहेत.
 
त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करताना कृतज्ञतेची भावना मनात दाटून येते. संघर्ष, समर्पण, सेवा, नेतृत्व आणि संस्कार यांचा सुंदर संगम असलेले त्यांचे जीवन अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले आहे.
त्यांचे पुढील आयुष्य निरामय, निरोगी, आनंदमय आणि अखंड समाजसेवेत व्यतीत होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहो, हीच सदिच्छा आणि कृतज्ञ अभिवादन.
- लेखक सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटनप्रमुख आहेत.