रसायनमुक्त भाजीपाला अन् निसर्गरम्य किचन गार्डन!

विवेक मराठी    01-Aug-2026
Total Views |
@ अनुराधा चंद्रशेखर भडसावळे
सगुणा बाग, नेरळ
 

vivek 
जुनी कॅरीबॅग वापरणं, पाणी जपणं आणि स्वतःची परसबाग फुलवणं... पर्यावरण रक्षण म्हणजे आपल्या रोजच्या लहानशा सवयी आहेत. निसर्गाचा कोलमडणारा सेतू सावरण्यासाठी आज प्रत्येकाने ‘खार’ बनण्याची गरज आहे. एका गृहिणीने आपल्या कृतीतून हा सुंदर सेतू कसा उभा केला? याचा हा एक प्रेरणादायी अनुभव...
खिडकीतून कोवळं ऊन झिरपू लागलं की माझी पावलं आपोआप परसबागेकडे वळतात. बागेत शिरताच मोगरा, मदनबाण आणि गुलाबाचा मंद सुगंध मनाला उभारी देतो. मांडवावरची लालचुटूक फुलं जणू स्वागतासाठीच तयार असतात. एका बाजूला बुलबुल, वटवट्या, मॅगपाय रॉबिन आणि सनबर्ड असे विविध पक्षी कीटक शोधण्यात रमलेले दिसतात, तर दुसर्‍या बाजूला लहानगा शिंपी पक्षी आपले घरटं विणण्यात गुंतलेला असतो. एखादा चुकार सरडा झाडावरून मान वळवून कौतुकाने पाहत असतो आणि फुलांवर मधमाशांचा गुंजारव सुरू असतो. दिवसभराची ऊर्जा देणारे अत्यंत प्रसन्न क्षण असतात ते!
 
 
रामसेतू उभारताना श्रीरामांनी छोट्या खारीचाही वाटा तितकाच मोलाचा मानला होता. आज आपल्या अवतीभोवतीचा पर्यावरणाचा पूल ढासळतो आहे. तो सावरण्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ हे सत्य मानून मी ’विषमुक्त’ अन्न स्वतः पिकवण्याचा निश्चय केला आणि यातूनच माझी परसबाग आकाराला आली. अतिवृष्टीत धूप होऊ नये म्हणून वाफ्यांना जुनी कौले घातली. ड्रिपमुळे पाण्याची बचत झाली. शून्य मशागतीमुळे पाणी जमिनीत मुरू लागलं. कमी खर्चात, कमी श्रमात सुपीक जमीन हाती आली आणि बाग बहरली.
 
 
ह्या परसबागेत फुलझाडे, लेटस, बेझलपासून अनेक पालेभाज्या; वांगी ते ब्रोकोलीपर्यंत फळभाज्या; तोंडली ते डांगर अशी वेलवर्गीय पिकं आहेत. पपई, अननस, पॅशन फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, पपनस अशी फळझाडंही ऋतूनुसार बहरलेली असतात. ‘अस्परागस कोंब’ (shoots) ही आमची खासियत आहे.
 
 
पर्यावरण रक्षण हे रोजच्या लहान सवयींमध्ये दडलेलं आहे. जसे कचरा वेगळा करणं, पाणी जपणं, एखादं झाड लावणं, मातीवर प्रेम करणं. प्रत्येकाने खार बनून पुढे आलं, तर पर्यावरण रक्षणाचा सेतू नक्कीच उभा राहील. किचन गार्डन हाच माझा खारीचा वाटा आहे!