‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ या संघटनेच्या 15व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वांद्रे-कुर्ला संकुल येथील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. भागवत यांनी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक अशा विविध रूपांत संवाद साधला. तरुण पिढी सहसा विचारत असलेल्या प्रश्नांची त्यांनी सहज उत्तरे दिली. संवाद हा लोकशाहीचा आत्मा असतो. सर्व मते ऐकणे, त्यांचा स्वीकार करणे आणि त्यांचा आदर करण्याची तयारी असणे ही कोणत्याही संवादाची मूलभूत पूर्वअट असते. त्या भावनेला जागत सरसंघचालकांनी फुकाचा उपदेश करण्याची, मी सांगतो म्हणून ऐका अशी भूमिका न घेता अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र त्याकडे उमदेपणाने पाहणे विरोधकांना जमले नाही. या संवादातील प्रामाणिकपणाकडे कानाडोळा करत स्वतःच्या मनातील भाजपाद्वेषाचे शमन करण्यासाठी व्यवस्था कामाला लागली.

योगायोगाने काही गोष्टी एकत्र घडून येतात आणि त्यांचा नसलेला संबंध जोडला जातो. मग या अशा नसलेल्या संबंधाच्या आधारे स्वतःच्या मनाप्रमाणे निष्कर्ष काढणारी एक व्यवस्था कामाला लागते. ही व्यवस्था ज्यांचा कायमस्वरूपी दुस्वास करते, त्यांच्या संदर्भात तर असे निष्कर्ष काढायची कोण घाई आणि कोण उत्साह असतो!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मुंबईत नुकत्याच युवकांशी झालेल्या जाहीर संवादावर उडालेला धुरळा या अशा घाई आणि उत्साहाचा उत्तम नमुना आहे. ‘मला जर कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असेल तर मी जेन-झीवर ठेवेन,’ या सरसंघचालकांच्या वक्तव्याला वारेमाप प्रसिद्धी देण्यात आली. जेन-झीच्या नावाने झालेल्या एका खर्या-खोट्या आंदोलनाने नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्षांमध्ये प्रथमच एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. त्याच जेन-झीचे सरसंघचालकांनी गोडवे गायले म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला, असा निष्कर्ष काढून डावी, लिबरल आणि हितसंबंधी मंडळी मोकळी झाली. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या नामुष्कीमुळे तथाकथित जनरल-झेडपर्यंत पोहोचण्यासाठी संघाने घेतलेला पुढाकार, असे त्याचे चित्रण करण्यात आले.
जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधला. येथे स्वयंसेवी संस्थेचा उल्लेख मुद्दाम यासाठी, की, स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली परधार्जिणेपणा करणार्या टोळक्यांनी घातलेल्या हैदोसाची पार्श्वभूमी या संवादाला होती. सामान्यतः परंपरावादी, त्यामुळेच की काय जुनाट, मानल्या जाणार्या संघाचे प्रमुख असलेले डॉ. भागवत हे साहजिकच मागील पिढीचे प्रतिनिधी. झुरळांच्या नावाखाली अराजकाचा धुरळा उडविणार्यांशी या पिढीची नाळ तुटलेली, ही गृहितके घेऊनच काही जणांनी त्यांचे चष्मे या संवादाकडे रोखले होते. अन्यथा ’सरसंघचालक साधणार जेन-झीशी संवाद’ असे मथळे नाचलेच नसते.
वास्तविक दिल्लीत दिसलेल्या उन्मत्तपणावर उतारा म्हणून काही या संवादाचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. गेले सुमारे दशकभर सरसंघचालकांच्या अशा प्रकट संवादाचे नियमितपणे आयोजन करण्यात येत आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात 2018 मध्ये झालेल्या संवादापासून काही महिन्यांपूर्वी मुंबईतच झालेल्या संवादापर्यंत अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालकांच्या अशा कार्यक्रमाचे नियोजन कित्येक महिने (क्वचित वर्षे) आधी करण्यात येते. तेव्हा भारतीय जनता पक्ष व जेन झी, जेन अल्फा यांच्यातील तथाकथित विसंवाद आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाचे तथाकथित यश यावर उपाय म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या दाव्यातील हवा निघून जाते.
संघ हा काही म्हातार्यांनी चालविलेला क्लब नाही (चिरफळ्या उडालेल्या डाव्यांच्या अनेक पक्षांचा सता क्लब झालेला आहे). रा. स्व. संघाच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया सतत सुरू असते. यंदाच्या 95 व्या संघ शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात 15 ते 40 वयोगटातील 70टक्क्यांहून अधिक नवे स्वयंसेवक सहभागी झाले. राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी स्वत:ला सज्ज करणे हे संघाचे मूळ कार्य. देशभक्ती ही संघाची मूळ भावना. त्यात गेल्या शंभर वर्षांत कुठेही कमीपणा न आणता पिढ्यापिढ्यांमधील संवाद प्रस्थापित करण्यासाठी आणि नवीन प्रशिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी संघाची स्वतःची यंत्रणा आहे. त्यामुळे भाजपा सरकारला धक्का बसला म्हणून संघाने तरुणांशी संवाद सुरू केला, हे अत्यंत वरपांगी विश्लेषण आहे.
’इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ या संघटनेच्या 15व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वांद्रे-कुर्ला संकुल येथील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील 100हून अधिक शहरांमधील 15 ते 19 वयोगटातील तब्बल 2,000 पेक्षा जास्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले. ही परिषद जगातील सर्वात मोठ्या युवा-नेतृत्वाखालील संमेलनांपैकी एक मानली जाते. ही संघटना म्हणजे ’भारत’ या संकल्पनेचा जागतिक पातळीवर प्रसार करणारे व्यासपीठ असून गेल्या 15 वर्षांपासून 15 ते 24 वयोगटातील तरुणच ही संस्था चालवत आहेत. या व्यासपीठावरून घडलेले अनेक तरुण पुढे लोकप्रतिनिधी, आयएएस, आयपीएस अधिकारी, वकील, लेखक आणि उद्योगपती बनले आहेत.
प्रत्यक्ष कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. भागवत यांनी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक अशा विविध रूपांत संवाद साधला. तरुण पिढी सहसा विचारत असलेल्या प्रश्नांची त्यांनी सहज उत्तरे दिली. जेन-झीचे कौतुक करताना सरसंघचालकांनी सांगितले की, ही पिढी केवळ आदेशांचे पालन करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीमागील तर्क आणि कारण जाणून घेण्यास इच्छुक असते. तरुणांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे ही समाज तसेच व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
जेन-झी म्हणजे सीजेपी नाही
तसे पाहिले तर जेन-झी हा शब्द त्याचा अर्थच लक्षात न घेता चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे. नेपाळमध्ये भ्रष्ट व निष्क्रिय सरकारच्या विरोधात तेथील तरुण आधी पेटून उठले. या तरुणांना जेन-झी असे नाव दिले गेले. जंतरमंतरवर जमलेल्या टोळभैरवांपुढे भारताचा नेपाळ करण्याचेच उद्दिष्ट होते. त्यासाठी मुद्दाम जेन-झी हा शब्द वापरला गेला, तो परवलीचा शब्द बनवला गेला. त्यात अर्वाच्य भाषा वापरली गेली, असभ्य व्यवहार करण्यात आला, अगोचरपणाचाही अवलंब करण्यात आला. संविधानाचे नाव घेत लोकशाहीची थट्टा करण्यात आली.
मात्र जेन-झी काही एवढ्यापुरती मर्यादित नाही. जंतरमंतरवर ताळतंत्र सोडलेल्या आंदोलनात न जाता झारखंड किंवा पंजाबमध्ये, आशयदृष्ट्या त्याच मागणीसाठी, सभ्यपणे आंदोलन करणारेही जेन-झीच आहेत. सीजेपीचा तमाशा सुरू असतानाच्या सुमारासच ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके जिंकणारीही जेन-झीच आहे. या आंदोलनाच्या काळातच देशातील पहिल्या खासगी रॉकेटचे अंतराळात प्रक्षेपण करणारेही जेन-झीच होते. इतकेच काय, ज्या मागणीसाठी हा सगळा गोंधळ सुरू होता त्या नीटची पुनर्परीक्षा देऊन त्यात यश मिळविणारेही जेन-झीच होते.
सीजेपी हा जेन-झीच्या नावाखाली राबविण्यात आलेला एक राजकीय प्रयोग. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्यात हवा भरली गेली. अमेरिकेतून उगवलेला सीजेपीसारख्या उथळ किंवा कुटील हेतूने, वोकिझमच्या विध्वंसक अजेंड्यासह, आलेला तो जत्था होता. गेली 12 वर्षे सततच्या पराभवाने नैराश्यग्रस्त झालेल्या राजकीय झुरळांनी त्यात सहभाग घेतला. मात्र हे असे आंदोलन करण्याऐवजी वास्तविक उपाय शोधण्यात गुंतलेलेही तरुणच आहेत. देशभक्ती ही त्यांच्या दृष्टीने शिवी नाही (व शिवी ही बुद्धिमत्तेची निशाणी नाही) आणि इतिहास म्हणजे काही ओझे नाही. सरसंघचालकांच्या उत्तरातील जेन-झी म्हणजे ही मंडळी होती.
भारतीय परंपरेतील संवाद आणि शास्त्रार्थ संस्कृतीचा उल्लेख करत त्यांनी मतभेद झाल्यास सर्वप्रथम चर्चेचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे सांगितले. आंदोलन हे कोणत्याही व्यक्ती किंवा समूहाविरोधात नसून व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. संवादाला निषेधाचे वावडे नसते, कारण ती ही संवादाची एक पद्धतच असते. परंतु निषेध आणि द्वेष यात अंतर असते. त्यामुळेच सीजेपीच्या अराजकवादी पद्धतीचे समर्थन केले नसले तरी त्यांनी सर्व आंदोलकांना देशद्रोही म्हणून लेबल लावण्याचे टाळले. शिक्षणाचे व्यापारीकरण आणि समाजाने विधायक जबाबदारी न घेता सरकारने सर्व काही करावे अशी अपेक्षा करणे हे तरुणांच्या या असंतोषाचे मूळ कारण होय, हे त्यांनी नेमके निदान केले. समाजातील सर्व घटकांच्या सहयोगाने शिक्षण परवडणारे आणि सुलभ करणे, हा त्यावरचा उपायही त्यांनी सुचविला.
प्रागतिक विचारसरणीचा हक्काचा मुद्दा बनलेल्या एलजीबीटी समुदायाविषयी बोलताना त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्याच वेळेस विवाह संस्थेचे पारंपरिक स्वरूप आणि त्यातील सामाजिक जबाबदारीचे महत्त्वही अधोरेखित केले. आपल्याला एक समाज म्हणून पुन्हा जोडले जाणे आवश्यक आहे आणि कुटुंब हा त्याचा प्रारंभ बिंदू आहे. महिला आणि पुरुषांची भूमिका समान तसेच एकमेकांना पूरक असल्याचे सांगत त्यांनी महिलांचा समाज आणि निर्णयप्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
जेन-झी आणि जेन-अल्फा या पिढ्या वर्तमान पिढीच्या तुलनेत अधिक प्रामाणिक व देशभक्त आहेत. आजचे युवक प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात आणि त्यांना त्यांची तार्किक व ठोस उत्तरे पाहिजेत. ते कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत. माझा या नव्या पिढीवर संपूर्ण विश्वास आहे आणि तेच या देशाचे भविष्य आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी पारंपरिक पद्धतीने टाळ्या वाजविण्याऐवजी जेन-झी पद्धतीने टाळ्या (फिंगर क्लॅप) वाजविल्या. त्यावर पुन्हा ही अभिव्यक्ती आजच मी तुम्हा मुलांकडून शिकली, अशी प्रांजळ मिश्किलीही केली.
संवाद हा लोकशाहीचा आत्मा असतो. सर्व मते ऐकणे, त्यांचा स्वीकार करणे आणि त्यांचा आदर करण्याची तयारी असणे ही कोणत्याही संवादाची मूलभूत पूर्वअट असते. त्या भावनेला जागत सरसंघचालकांनी फुकाचा उपदेश करण्याची, मी सांगतो म्हणून ऐका अशी भूमिका न घेता अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र त्याकडे उमदेपणाने पाहणे विरोधकांना जमले नाही. या संवादातील प्रामाणिकपणाकडे कानाडोळा करत स्वतःच्या मनातील भाजपाद्वेषाचे शमन करण्यासाठी व्यवस्था कामाला लागली. सरसंघचालक भागवत हे बोलले म्हणजे भाजपाची जिरली, असे मनातले मांडे खाण्यासाठी वावदुकांची फौज कामाला लागली. पण सरसंघचालकांचा संवाद या अशा वावदुकांसाठी नव्हताच, तसाही तो नसतोच. भवभूतीने म्हटल्याप्रमाणे,‘जे लोक आमच्याविषयी वाईटसाईट बोलतात, निंदा करतात त्यांना त्यातले काही तरी कळते का? हा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीच. तो ज्याच्यासाठी आहे तो एखादा समानधर्मा (समानवृत्तीची व्यक्ती) कुठे तरी उत्पन्न होईलच, कारण काळ अनंत आहे आणि पृथ्वी अफाट आहे.’
हा समानधर्मा शोधण्यासाठी, आधीपासून अस्तित्वात असलेल्या समानधर्मांचा शोध घेणे हेच शताब्दी पूर्ण केलेल्या संघाचे जीवनकार्य होय. संवादाचा संकल्प त्याचसाठी सोडण्यात आला होता. डोळे उघडून पाहिले तर या संवादातील संदेशही तोच आहे.