मराठीच्या आरंभकाळातील अद्भूत भावकाव्य -माय मराठीतील नामदेवांची अभंगगाथा

विवेक मराठी    14-Aug-2026   
Total Views |
sant Namdev
नामदेव हे साहित्यिकदृष्ट्या साक्षात्कारी अभंग रचनाकार कवी आहेत. तसेच ते मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्रकार आहेत. ‘नामदेव अभंगाथा’ ही नामदेवांसह त्यांचे गुरू विसोबा, शिष्य जनाबाई, परिसा भागवत आणि त्यांच्या कुटुंबातील 14 जणांचे काव्य नामदेव गाथेमध्ये समाविष्ट आहे. हीच नामदेव गाथेची अपूर्वता आहे. भारतीय लोकजीवनात पारमार्थिक समता व एकोप्याचा विचार नामदेवांनी प्रस्थापित केला. असा समरसतेचा सामाजिक मंत्र देऊन त्यांनी समाजातील सज्जनांची, प्रबोधकारांची मांदियाळी निर्माण केली. त्यामुळे ‘संतशिरोमणी’ हे विशेषण नामदेवांना सार्थ व समर्पक ठरते.
मराठी माणसाने स्वाभिमानाने गर्व आणि गौरव करावा अशा थोर मराठी सुपुत्रांपैकी एक अग्रणी राष्ट्रीय प्रबोधनकार-भावकवी म्हणजे संत नामदेव होय! 750 वर्षांपूर्वी ते लोकजागरण-प्रबोधन करण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरमधून थेट पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी उत्तर भारतातील भक्तिचळवळीचा पाया घातला. संत कबीर, रविदास, पीपा, दादुदयाल, मीराबाई, गुरू नानक अशा सकल संतांनी नामदेवांना गुरुस्थानी मानून त्यांच्या कार्याचा परम आदराने आपल्या भक्तिकाव्यात गौरव केलेला आहे. नामदेवांची शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’मध्ये 61 पदे समाविष्ट आहेत. हा नामदेवांचा उत्तर दिग्विजय आहे. त्यांच्या नावावर 2500 मराठी अभंग आणि 250 हिंदी पदे आहेत. त्यांची ‘अभंगगाथा’ मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील एक अपूर्व अक्षरलेणे आहे. ‘ज्ञानदीप लावू जगी।’ हे त्यांचे ब्रीद होते. त्यांच्या कार्याचा अवकाश-पैस ‘जग’ होता.
 
भक्त भागवत बहुसाल ऐकिले।
 
बहु होऊनि गेले, होतील पुढे।
 
परि नामयाचे बोलणे नव्हे कवित्व।
 
हा रस अद्भूत निरूपम॥
 
 
थोर तत्त्वज्ञ-कवी ज्ञानदेवांनी संत नामदेवांच्या अभंगवाणीबद्दल काढलेले हे उद्गार, नामदेव आणि त्यांची अभंगसंपदा यांची वाङ्मयीन थोरवी कथन करणारे आहेत. नामदेवांच्या नावावर मराठीत 2500 पेक्षा अधिक अभंग आणि अडीचशे ते तीनशेपेक्षा अधिक हिंदी काव्यरचना आहेत. मराठी भाषेच्या उषःकालातील या अभिजात काव्यग्रंथाचे, अभंगगाथेचे मराठी साहित्यातील अनन्यसाधारण मौलिक स्थान लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाने नामदेव सप्तजन्म शताब्दीचा योग साधून 1970 साली नामदेव अभंग गाथेची सुंदर आवृत्ती प्रकाशित केली होती.
 
sant Namdev 
 
पहिले ‘राष्ट्रसंत’
 
लोकजागरणासाठी, धर्मरक्षणासाठी महाराष्ट्रातील पंढरपूरमधून थेट पंजाबमध्ये पारमार्थिक विचाराची भक्ती पताका घेऊन जाणारे पहिले संत नामदेव आहेत. भारतावर होणारे धर्मांध आक्रमकांचे हल्ले प्रथम पंजाब परिसरावर होतात. त्यामुळे त्या भागात भक्तीद्वारे स्वत्त्व, स्वधर्माचे जनजागरण करण्याच्या हेतूने नामदेवांनी केलेली पंजाबपर्यंतची पदयात्रा, त्यांच्या राष्ट्रीय विचारांची द्योतक आहे. संत नामदेवांचा हा ‘उत्तर दिग्विजय’ संतांनी देशासाठी काय केले? या प्रश्नाचे कृतिशील उत्तर आहे. केवळ पदयात्रा करून ते परत आले नाहीत तर सलग 20 ते 22 वर्षे त्या प्रांतात वास्तव्य केले. तेथील भाषा आत्मसात करून हिंदी काव्यरचना केली. 250 पदे लिहिली. अभिमानाची गोष्ट म्हणजे नामदेवांच्या या हिंदी पदांपैकी 61 कविता शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या परमपवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत. नामदेवांच्या या अपूर्व कार्यामुळेच त्यांना पहिले राष्ट्रसंत म्हणणे सार्थ ठरते. त्यापूर्वी आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी केरळ ते काश्मीर धर्मजागरण पदयात्रा केलेली प्रसिद्ध आहे.
 
 
एवढेच नव्हे तर संत नामदेवांना उत्तर भारतातील भक्तिमताचे आद्य प्रवर्तक म्हणून थोर संत रविदास, कबीर, गुरू नानक, मीराबाई, दादु, पीपा हे सारे संत गुरुस्थानी मानतात. ’सगुण-निर्गुण परमात्मा एकच आहे,’ म्हणत महाराष्ट्रातील सगुण भक्त नामदेवांनी उत्तरेतील निर्गुण भक्तीचा पाया घातला. हे नामदेवांचे अभूतपूर्व कार्य आहे. हिंदी साहित्यातील नामवंत डॉ.भगिरथ मिश्र, डॉ.सत्यनारायण मौर्य, डॉ.विनय मोहन शर्मा यांनी संत नामदेवांचा ‘हिंदी संतमत-भक्ती परंपरेचे प्रवर्तक’ म्हणून गौरव केलेला आहे.अनेक अभ्यासकांचे त्यावर ग्रंंथ आणि पीएच.डी. प्रबंध आहेत.
 
 
पंजाबमधील घुमान येथे ‘भक्त नामदेवबाबा गुरुद्वारा’ आहे, हे संत नामदेवांच्या कार्याचे चिरंतन स्मारक आहे. अशी अनेक ‘नामदेव स्मृृती’ स्थळे पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेशमध्ये आहेत. संत नामदेवांची फार मोठी शिष्यपरंपरा आजही त्या भागात विद्यमान आहे. कार्यरत आहे. नामदेवांचे हे कार्य लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘घुमान’ येथे आयोजन करण्यात आले होते. संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ) हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
sant Namdev 
 
अद्भूत भावकाव्य
 
‘नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥’ हे संत नामदेवांच्या कार्याचे ब्रीद होते. या ओवीतील ‘ज्ञान’, ‘दीप’ आणि ‘जग’ हे तीन शब्द त्यांचे भक्तिकाव्य (अभंगगाथा) मराठी सारस्वताला अनेक अंगाने, अनेक प्रकाराने सुसंपन्न करणारे काव्य आहे. मराठी भाषेच्या आरंभीक काळात इतक्या विविध प्रकारची, एवढी भावपूर्ण कविता, नामदेवांनी लिहिली आहे की ज्ञानदेव म्हणतात, ”तसे हा रस अद्भूत आहे. अनेक आधुनिक काव्य समीक्षकांनीही नामदेवांच्या काव्यातील सौंदर्याची आस्वादक समीक्षा केलेली आहे.”
नामदेव अभंगगाथेच्या वेगवेगळ्या संपादकांनी संपादन केलेल्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामध्ये श्रीजोग महाराज, आवटे, गोंधळेकर, तुकाराम तात्या आणि श्रीसुबंध यांनी संपादन केलेल्या आवृृत्या प्रमुख आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे शिक्षणमंत्री मधुकर चौधरी यांनी संत नामदेव जन्म सप्तशताब्दीनिमित्त 1970 साली ‘नामदेवांची अभंगगाथा’ प्रकाशित केलेली आहे. वारकरी संप्रदायाचे थोर तत्त्वज्ञ, कीर्तनकार प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली खास समिती तयार करून महाराष्ट्र शासनाने ही गाथा मोठ्या परिश्रमपूर्वक तयार केली. त्यासाठी अनेक ठिकाणची अनेक हस्तलिखिते जमा केली गेली होती. सरकारने केवळ 10 रुपये अल्प किंमतीत 1150 पानांची सचित्र अभंगगाथा भाविकांना देऊन मराठी भाषा ग्रंथ व्यवहारास मौलिक मदत केली होती. ’मराठी काव्यात ‘अभंग’ या छंदाचे संत नामदेव हे पहिले उद्गाते आहेत,’ असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.
 
 
नामदेव गाथेचे स्वरूप
 
संत नामदेव अभंगगाथेच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यातील अभंगाची संख्याही एकसारखी नाही. महाराष्ट्र शासन प्रकाशित गाथेमध्ये नामदेवांचे 2107 मराठी अभंग आणि 224 हिंदी रचना अशी एकूण 2331 कविता आहेत. तर साखरेमहाराज संपादित आवृत्तीत 2373 म्हणजे सुमारे 42 अभंग अधिक आहेत. गुलाबाला पाकळ्या किती? यापेक्षा त्याचा सुगंध कसा आहे हे जसे महत्त्वाचे असते तसे कवीच्या काव्य संख्येला महत्त्व नसून आशय व रसात्मकता महत्त्वाची आहे. ‘शत कोटी तुशे करीन अभंग।’ असा नामदेवांचा संकल्प एका अभंगातून व्यक्त झालेला आहे. पण या ओळीतील ‘कोटी’ शब्दाचा अर्थ संख्यात्मक नसून विविध प्रकार-वर्ग या अर्थी आहे. नामदेव अभंगगाथेत वेगवेगळ्या विषयवार 30 प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणातील अभंगाची संख्याही वेगवेगळी म्हणजे कमी-अधिक आहे. अर्थात हे वर्गीकरण संपादकांनी केलेले असावे.
 
‘गंगामाहात्म्य’ नावाच्या प्रकरणात केवळ एकच अभंग रचना आहे तर ‘आत्मसुखप्राप्ती-आर्तोद्गार’ या प्रकरणात सर्वाधिक 274 अभंग रचना आहेत. नामदेव गाथेचा प्रारंभ ‘मंगलाचरण’ प्रकरणाने होतो. या प्रकरणात एकूण पाच अभंग आहेत. पाचही अभंग गणेश वंदनेचे आहेत. ‘प्रथम नमन करू गणनाथा।’, ‘प्रथम नमू गजवदन।’ हे अभंग गणेशभक्तांमध्ये परिचित आहेत.
श्रीकृष्णाच्या बाललीला सर्व संतांच्या अभंगाचा मोहक विषय आहे. नामदेव गाथेतही ‘बाळक्रीडा’ नावाचे प्रकरण असून 208 अभंगामधून कृष्णाच्या लडिवाळ लीलांचे वर्णन नामदेव करतात. ‘श्रीमद् भागवत’ या संस्कृत ग्रंथातील दशम स्कंधातील बाळकृष्णाचे चरित्र या अभंगातून शब्दमूर्त होते. त्याशिवाय कृष्णलीला पर 79 अभंग नामदेवांनी लिहिलेले आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे आपले परमवंदनीय राष्ट्रपुरुष, दैवते आहेत. त्यामुळे ‘राम कृष्ण हरी’ हाच ज्या वारकरी संप्रदायाचा मुख्य नाममंत्र घोष आहे. नामदेवांच्या गाथेत ‘रामकथा माहात्म्य’ कथन करणारे 27 अभंग आहेत. त्याशिवाय विठ्ठल माहात्म्य-72 अभंग, पंढरी क्षेत्र माहात्म्य-49 अभंग, विठ्ठलभक्तवत्सलता-103 अभंग, तुलसी माहात्म्य-6 अभंग, नाममहिमा-194 अभंग, संत महिमा-44 अभंग, तीर्थावळीचे - 62 अभंग, आत्मनिवेदन-120 अभंग, अशी अनेक विषयांवरील काव्यरचना हे नामदेव गाथेचे वैशिष्ट्य आहे.
 
 
नामदेव आणि ज्ञानेश्वरादी चार भावंडे यांचे विशेष जिव्हाळ्याचे सख्यत्व आहे. नामदेवांचे गुरू विसोबा खेचर आहेत. तरीपण नामदेवांना संतसखा ज्ञानदेव, निवृत्ती, मुक्ताई, सोपानदेव ही चारी भावंडे गुरुस्थानी आहेत. त्यामुळे ‘ज्ञानदेवांची आदि’-31 अभंग, ‘ज्ञानदेवांची समाधी’-39 अभंग, ‘मुक्ताई समाधी’-19 अभंग, ‘निवृत्तीनाथ समाधी’-51 अभंग असे सुमारे 250 ते 300 अभंग नामदेवांनी ज्ञानदेवादी चार भावंडांवर लिहिलेले आहेत. या सर्व समाधी प्रसंगी स्वतः नामदेव उपस्थित आहेत, त्यांनी जे पाहिले त्याचे प्रत्यक्ष वर्णन अभंगातून केलेले आहे. आजच्या पत्रकारितेच्या भाषेत ‘आँखो देखा’ वर्णन आहे. प्रत्यक्षदर्शी काव्य आहे. ज्ञानदेवांचे चरित्र आपणास ज्ञानदेवांच्या साहित्यात सापडत नाही तर ते साद्यंतपणे नामदेव गाथेतून मिळते. हे नामदेव गाथेचे ऐतिहासिक महत्त्व आहे.‘तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे’ अशा शब्दात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव यांचे वर्णन, नामदेव करतात आणि मुक्ताईला ‘आदिशक्ती’ म्हणतात.
 
 
नामदेव हे साहित्यिकदृष्ट्या साक्षात्कारी अभंग रचनाकार कवी आहेत. तसेच ते मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्रकार आहेत. त्यांनी 152 अभंगातून स्वतःची जीवनगाथा कथन केलेली आहे. त्यांनी ‘नामा म्हणे संत आहेत कृपासिंधु।’ म्हणत अनेक समकालिन सांगाती संतांची चरित्रे लिहिलेली आहेत. त्यामुळे नामदेव हे मराठी साहित्यातले अग्रणी ‘चरित्रकार’सुद्धा आहेत.
नामदेव पहिले दलितसखा संत आहेत. संत चोखामेळा यांची विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात स्वहस्ते समाधी बांधून, गावकुसाबाहेर जीवन जगलेल्या भक्तभागवत चोखामेळ्याला त्यांनी देवाच्या महाद्वारात मानाचे अढळ स्थान दिले. आपल्या घरातील पडेल ते काम करणार्‍या कष्टकरी महिलेस-जनाबाईस नामदेवांनी शिष्यत्व देऊन तिचा ‘संत जनाबाई’ असा, ‘दासी जनी ते संत जनी’ व्यक्तिविकास केला. गुरू नामदेवांच्या संतसंगतीने जनाबाई संतकवयित्री झाली. तिचे 485 अभंग, नामदेवगाथेचाच एक अभिन्न भाग आहे. नामदेवांचे भाग्य थोर की त्यांना जनाबाईंसारखी समर्थ शिष्या लाभली.‘नामदेव अभंगाथा’ही नामदेवांसह त्यांचे गुरू विसोबा, शिष्य जनाबाई, परिसा भागवत आणि त्यांच्या कुटुंबातील चार पुत्र, सुना, बहीण अशा सर्वांचा एकत्रित काव्यसंग्रह आहे. नामदेव परिवारतील 14 जणांचे काव्य नामदेव गाथेमध्ये समाविष्ट आहे. हीच नामदेव गाथेची अपूर्वता आहे.
 
 
संत नामदेवांचा जन्म, जन्मस्थळ, समाधीस्थान, पूर्वायुष्य या विषयी अनेक प्रकारचे वाद व मतमतांतरे आहेत. त्या वादविवादापेक्षा नामदेवांची वाङ्मयमूर्ती असलेली ‘अभंगगाथा’ आपणास उपलब्ध आहे. त्याचे चिंतन-मनन-आचरण हेच समाजहिताचे आहे. भारतीय लोकजीवनात पारमार्थिक समता व एकोप्याचा विचार नामदेवांनी प्रस्थापित केला. ‘अवघे संतजन आमुचे सांगाती।जेवू एका पंक्ती सरिसे आम्ही।’ असा समरसतेचा सामाजिक मंत्र देऊन त्यांनी समाजातील सज्जनांची, प्रबोधकारांची मांदियाळी निर्माण केली.त्यामुळे ‘संतशिरोमणी’ हे विशेषण नामदेवांना सार्थ व समर्पक ठरते.
 
 
ज्ञानदेव माउलींच्या ’पसायदाना’सारखेच संत नामदेवांचेही एक पसायदान आहे. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। त्यामध्ये त्यांनी सकल संतजनांना म्हणजे समाजातील सज्जनशक्तीला आकल्प आयुष्य लाभावे अशी मागणी केलेली आहे. ‘आमुचा स्वदेश । भुवनत्रयामाजी वास।’, ‘हे विश्वचि माझे घर।’ अशी भव्य-उदात्त विश्वात्मक दृष्टी बाळगणार्‍या मराठी संतमंडळींमध्ये ‘अभंगकार’ नामदेवांचे स्थान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतवर्षामध्ये अजरामर आहे. आपण त्यांची ‘अभंगगाथा’ वाचून त्यांची थोरवी समजून घ्यावी ही प्रार्थना.
 
- लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ’साईलीला’ आणि ’एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.