@ज्योती पोकळे
शिक्षणविवेकच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित काव्य अभिवाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यामध्ये साहित्यिक, साहित्यावर प्रेम करणारी छोटी, शिस्तबद्ध मुलं आणि विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. याचा थोडक्यात आढावा घेणारा वृत्तांत...
शिक्षणविवेक वर्धापनदिनानिमित्त आयोजित काव्य अभिवाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या देखण्या आणि आश्वासक कार्यक्रमाचा एक भाग होता आलं, याचा आनंद आहे. म्हणूनच हा कार्यक्रम नुसता पाहिला नाही, तर अनुभवला आणि मनात रुजला.
मी या कार्यक्रमाला आश्वासक अशासाठी म्हणाले की, सध्या समाजात आणि समाजमाध्यमांवर एकच चर्चा आहे, ती म्हणजे ‘भाषा संपत चालली आहे. मुलं वाचत नाहीत, आपली संस्कृती लोप पावत चालली आहे.’ असं काही ऐकलं की, भीती वाटते. काही अंशी असं चित्र दिसत असल्याने ही भीती खरी होते की काय, असं वाटायला लागतं; परंतु या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने एक आशादायी चित्र समोर उभं राहिलं.
फर्ग्युसन कॉलेजचा ऐतिहासिक, शैक्षणिक वारसा लाभलेला परिसर आणि तिथल्या अॅम्फीथिएटरमध्ये सारस्वतांच्या भरलेल्या मांदियाळीचे चित्र फारच भारावून टाकणारे होते. 545 बक्षीसपात्र विद्यार्थी, शिक्षक, पालक, युवा असे सगळे यात सहभागी होते; तर व्यासपीठावरील साहित्यिक आणि मान्यवरांची उपस्थिती फारच महत्त्वपूर्ण होती. खचाखच भरलेलं सभागृह, वय वर्ष 3 ते 81 या वयोगटातील कवितेवर, साहित्यावर मनापासून प्रेम करणारे रसिक, सर्वच उत्साही होते. साहित्यावर मनापासून प्रेम करणारे, आपलं बक्षीस घेण्यासाठी आलेले, बक्षीस घेणार्यांचे कौतुक करायला आलेले पालक आणि कौतुकाबरोबर शाबासकीची थाप देणारे दिग्गज आणि या सगळ्यांना एकत्र आणणारे शिक्षणविवेकचे सर्व संयोजक. सर्वच उत्साही आणि आनंदी. या आनंदाची कारणं वेगवेगळी होती, पण उद्देश मात्र एकच, ‘वाचन संस्कृती जिवंत ठेवणे.’ आणि ही संस्कृती जिवंत ठेवल्याचं एकच शाश्वत चित्र या कार्यक्रमात दिसत होतं. मंचावर जितकी साहित्यश्रीमंती होती, तेवढीच समोर होती. तीन वर्षांपासूनच्या मुलांना बक्षीस घ्यायचं होतं. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सभागृह, गॅलरी, सभागृहाबाहेरचे आवार सगळीकडे मुलंच मुलं आणि त्यांचे पालक. शब्दशः मुंगी शिरायला वाव नव्हता, असं एकूणच चित्र होतं. एवढी अमाप गर्दी असूनही शांततेत चाललेला कार्यक्रम हे चित्रही एकदम भारावून टाकणारं होतं. मंचावर असलेली मोठी माणसं आपल्यासाठी आली आहेत, ते आपल्याला काही तरी सांगत आहेत, ही समज एवढ्या लहान वयातल्या मुलांमध्येही दिसली.
शिक्षणविवेक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. अंक आणि स्पर्धा-उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणविवेक एक चळवळ झालेली आहे. या चळवळीचा मुकुटमणी म्हणजे काव्य अभिवाचन स्पर्धा. दर वर्षी वेगवेगळ्या कवींच्या कविता सादर करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक-पालकांना स्पर्धेच्या रूपाने आव्हान दिले जाते. शिक्षणविवेकचे हे आव्हान विद्यार्थीसुद्धा लीलया पेलतात आणि म्हणूनच दर वर्षीचा त्यांचा वाढता सहभाग उल्लेखनीय आहे. खरं तर, एक सुंदर देखणा कार्यक्रम, साहित्यिक, साहित्यावर प्रेम करणारी छोटी, शिस्तबद्ध मुलं आणि विद्यार्थ्यांनी केलेले उत्तम सादरीकरण म्हणजे शिक्षणविवेकचा हा बक्षीस वितरण समारंभ आणि वर्धापनदिन कार्यक्रम.
शिक्षणविवेकने यावर्षी 15व्या वर्षात पदार्पण केलं आहे. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी काव्य अभिवाचन स्पर्धा संपन्न झाली आणि त्यात पुण्यामध्ये 854 गटांनी नोंदणी केली, तर पुण्याबाहेरच्या शाळांमधून 452 नोंदणी झाली. मुलांनी वाचावं, समृद्ध व्हावं आणि ते होत असताना सुजाण व्हावं, हा उद्देश या स्पर्धेच्या निमित्ताने सफल होताना दिसतो आहे.
या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित कार्यकारिणीतील योगेश सोमण (अध्यक्ष), डॉ. स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर, सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, माधव राजगुरू, डॉ. नितिन संगमनेरकर, आशुतोष जावडेकर यांचा सत्कारही करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ विचारवंत, संविधान अभ्यासक रमेश पतंगे, पुरुषोत्तम लोहिया, रवींद्र देव, सुधीर काळकर, डॉ. आनंद काटीकर, धनंजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते.