डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी

विवेक मराठी    17-Aug-2026   
Total Views |
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा दलितांसाठी केवळ पाण्याच्या हक्काचा नव्हता; तर ती शतकानुशतकांची गुलामगिरी मोडून काढणारी वैचारिक क्रांती होती. बाबासाहेबांच्या या मुक्तिसंग्रामात फक्त शोषितच नव्हे, तर पुरोगामी विचारांचे अनेक शिलेदार खांद्याला खांदा लावून उभे राहिले. या शिलेदारांच्या कार्याचा आढावा.
 
vivek
 
महाडच्या संगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विविध जाती-जमातींमधल्या पुरोगामी विचारांच्या प्रभृतींचे सहकार्य लाभले, सहयोग मिळाला, साथसोबत मिळाली. महाड शहराने फार पूर्वीपासूनच पुरोगामी विचारांना आपल्यामध्ये मोठ्या आत्मीयतेने सामावून घेतलेले होते; त्याचाच हा जणू पुरावा होता. या सर्व पुरोगामी विचारांच्या प्रभृतींना या गोष्टीची निश्चित जाणीव होती की, महाडचा संगर हा बाबासाहेबांचा एकट्याचा नाही, तर तो संपूर्ण मानवजातीचा आहे. शतकांपूर्वी जगासमोर आदर्श ठेवून गेलेल्या ज्या भारतीय सभ्यतेत कोणतेही भेदाभेद पाळले जात नव्हते, त्या जुन्या भारतीय सभ्यतेचा आहे. हा लढा मानवतेचा आहे. समाजात अस्पृश्यतेचा भाव संपून बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठीचा आहे आणि महाड शहर तर पुरोगामी विचारांच्या लढ्यात कायमच एक पाऊल पुढे राहिलेले होते.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडची निवड मानवतेच्या या मुक्तिसंग्रामासाठी याच जाणिवेतून तर केली होती; पण याची जाणीव कुणालाही नव्हती की, या चवदार तळ्याच्या संगराने अस्पृश्योद्धाराच्या कार्याला ’दलित चळवळीचे रूप’ प्राप्त होणार आहे. बाबासाहेबांनी मात्र वास्तवातल्या परिस्थितीचा अभ्यास करत या सत्याग्रहाद्वारे भारतातल्या दलित चळवळीची अधुनिक जीवनमूल्यांवर आणि राजकीय तत्त्वप्रणालीच्या आधारावर एक नवी मांडणी केली होती. या मांडणीच्या आधारावर एका नव्या संवैधानिक लोकशाहीयुक्त वैचारिक समाज निर्मितीची सुरुवात करायला घेतली होती.
 
 
बाबासाहेबांच्या या आधुनिक क्रांतिकारी चळवळीच्या समुद्रमंथनातून अनेक रत्ने बाहेर येणार होती. ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांची या मुक्तिसंग्रामात साथसोबत केली, त्या सर्व शिलेदारांचे नाव चवदार तळ्याच्या संगराच्या इतिहासात कायमस्वरूपी सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाणार होते. या शिलेदारांमध्ये पुरोगामी विचारांच्या सवर्णांसह विविध जातीजमातींच्या मंडळींचा समावेश होता.
 
 
ही सगळी मंडळी जशी बाबासाहेबांवर प्रेम करणारी होती; तशीच मानवतेच्या उत्थानासाठी लढण्याची इच्छा बाळगणारीही होती. समाजातील भेदभाव नष्ट व्हावा, समाजात बंधुभाव रूजला जावा यासाठी जीव पणाला लावणार्‍यातील होती. अन्याय सहन न करता त्याला पूर्ण ताकदिनिशी विरोध करायला हवा या विचारांची पाईक असणारी होती. हे सगळे मानवतेचा सूर्य पहायला निघालेल्या एकाच वाटेवरचे प्रवासी होते.
 
 
पुरोगामी विचारांचा वारसा
 
महाडच्या संगरासाठी कुरुक्षेत्राचे मैदान तयार करण्याचे काम आगरकरी विचारांनी फार पूर्वीच सुरू केले होते. यात महाडमधल्या तत्कालीन पुरोगामी विचाराच्या घराण्यांचे मोठेच योगदान होते. या तत्कालीन पुरोगामी विचारांच्या पिढीकडे ज्यांच्याकडून मुख्यत्वेकरून पुरोगामी विचारांचा वारसा आला त्यात प्रमुख नाव होते प्रा. गोविंदराव टिपणीस यांचे.
 
प्रा.गोविंदराव टिपणीस
 
टिपणीस घराणे हे पूर्वापार पुरोगामी विचारांचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या संदर्भात महाडात एक फार प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे इंदूरच्या सातपुते घराण्यात एका विधवा स्त्रीला मूल झाले. त्यामुळे या घराण्याला वाळीत टाकण्यात आले. कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवायला, त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करायला तयार होईनात. आपल्याला पुन्हा जातीत समाविष्ट करून घ्यावे म्हणून सातपुते घराण्याने खूप प्रयत्न केले; पण काहीच उपयोग झाला नाही.
 
 
 
शेवटी टिपणीस घराण्यातले प्रा.गोविंदराव टिपणीसांचे वडील गोपाळमामा टिपणीस यांनी पुढाकार घेतला आणि प्रयासांती इंदूरकरांचा म्हणजे सातपुते घराण्याचा गोपाळमामांच्या पुढाकाराने जातीत समावेश करून घेतला गेला. इंदूरकरांनी त्यांची बहीण महाडच्या कुळकर्णी घराण्यात अण्णा मोपीरकरांना दिली आणि या बदल्यात कुळकर्णी घराण्याने गोपाळरावांना तुमच्या घराण्यातली मुलगी आमच्या घराण्यात द्यायला हवी अशी अट घातली. गोपाळरावांनी ती अट तत्काळ मान्य करत नारायण बाळकृष्ण टिपणीसांची मुलगी म्हणजे आपली पुतणी कुळकर्णी घराण्यात श्रीधर नीळकंठला दिली. टिपणीसांनी आणि परिणामी महाडकरांनी केलेले हे सामाजिक न्यायदानाचे कार्य म्हणजे त्यावेळी केलेले खूप मोठे धाडस मानले जाते. त्यामुळे टिपणीस घराण्याकडे महाडात नेहमी आदराने बघितले जायचे. या पुरोगामी वारशाच्या पुण्याईने प्रा. गोविंदराव टिपणीसांकडे महाडातल्या आणि महाडबाहेरच्याही विचारवंतांची नेहमीच वर्दळ असायची.
 
 
गोविंदराव टिपणीस हे आगरकरांच्या ’सुधारक’मध्ये लिखाण करीत असल्यामुळे त्यांचे विचार पुरोगामी वळणाचे होते हे सहाजिकच आहे. त्यांच्यातल्या याच पुरोगामी विचारांमुळे त्यांच्याकडून अनायासेच अनेक सामाजिक एकोपा वाढवणार्‍या घटना घडून जात. त्यातलीच एक घटना फार बोलकी आहे. गोविंदराव टिपणीस आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा 1909मध्ये भरलेल्या कुलाबा जिल्हा परिषदेत परिचय झाला. ही परिषद महाडातील चांभारवाड्यात भरवण्यात आली होती; जिचे अध्यक्षपद प्रा.गोविंदराव टिपणीस यांनी भूषविले होते.
 
 
 
vivek
 
यावेळी पांडू नावाच्या चांभाराकडून महर्षी शिंदे आणि गोविंदराव टिपणीस हे दोघेही पाणी प्याले होते. ही घटना त्यावेळी जनसामान्यात एक प्रकारची फार मोठी सकारात्मक छाप सोडून गेली होती. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात गोविंदराव काळाच्या बरेच पुढे होते. ’सुधारक’मध्ये लिखाण करीत असल्यामुळे गोविंदरावांवर आगरकरी विचारांचा जो प्रभाव होता, त्याचेच पडसाद त्यांच्या विविध कृतीतून महाडात उमटत होते. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेक वेळा त्यांच्यावर समाजातून बहिष्कृत होण्याइतपतही परिस्थिती निर्माण झाल्या होत्या. पुरोगामी विचारांचा हाच वारसा त्यांच्याकडून त्यांच्या घराण्यातल्या पुढच्या पिढीकडे गेला.
 
 
नानासाहेब टिपणीस
 
 
घराण्यातून पूर्वापार चालत आलेला पुरोगामी विचारांचा वारसा त्यात फुले आगरकरांच्या विचारांचा मनावर असलेला पगडा आणि मुळातच असलेली बंडखोर वृत्ती यांमुळे नानासाहेब उर्फ सुरेन्द्रनाथ टिपणीस यांचे व्यक्तिमत्त्व पुरोगामी विचारांची एक चालतीबोलती प्रतिमा म्हणून महाडात प्रसिद्ध होते. सुरेन्द्रनाथ टिपणीस हे जन्मजात खोत होते. 12 जुलै 1894ला शाहू महाराजांनी दिलेल्या सनदेप्रमाणे त्यांच्या घराण्याला गोंडाळे गावचे खोती वतन मिळालेले होते; पण आश्चर्य म्हणजे स्वत: खोत असूनही नानासाहेब हे खोतीविरुद्ध चळवळ करणारे आणि त्यासाठी तुरुंगवास भोगणारे म्हणून महाडात ख्याती पावले होते.
 
 
त्यांच्या शालेय जीवनातली एक घटना आहे. महाडमध्ये म्युनिसिपालिटीकडून स्कॉटिश मिशनने ताब्यात घेतलेल्या आणि या मिशनतर्फे चालवल्या जाणार्‍या एका शैक्षणिक संस्थेत मुलांचे स्नेहसंमेलन साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना चहा-फराळ वाटण्याची कल्पना पुढे आली; पण तो वाटत असताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना या फराळाचे वाटप एकत्रित न होता वेगवेगळे व्हावे, असे म्हणणे काही विद्यार्थ्यांनी मांडले. त्यात भागवत या विद्यार्थ्याचा मुख्य पुढाकार होता. हाच भागवत पुढे जाऊन ‘आचार्य भागवत’ म्हणून ख्याती पावला. मात्र या प्रथेला विरोध झाला आणि विरोध करणार्‍या विद्यार्थ्याचे नाव होते सुरेन्द्रनाथ टिपणीस.
 
 
यामुळे संस्थेत उघडउघड दोन विरोधी गट पडले. त्याने संघर्षाला तोंड फुटले. वेगवेगळे फराळ वाटप आणि चहासाठी दोन वेगळ्या किटल्या असा आग्रह भागवत गटाने धरला; ’तर असे करणे चुकीचे आहे आणि ते आम्ही होऊन देणार नाही,’ अशी भूमिका सुरेन्द्रनाथांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेला काही ब्राह्मण विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आणि त्यांच्या बाजूने येऊन उभे राहिले. यामध्ये विष्णुपंत चांदे, गोपाळ चक्रदेव, वाकरुळकर, बाबू यादे अशी काही नावे प्रामुख्याने सांगता येतील. या लढ्यात शेवटी मागासलेल्या विचारांचा पराभव होऊन सुरेन्द्रनाथांच्या लढाईला यश मिळाले आणि पुरोगामी विचारांचा विजय झाला.
 
 
सुरेन्द्रनाथांची हीच वृत्ती पुढे काळाच्या भट्टीत तापत अजून धारधार होत गेली. सुरेन्द्रनाथांबरोबर याच शाळेत एक अस्पृश्य विद्यार्थी शिकत होता; ज्याचे नाव होते रामचंद्र मोरे, ज्याने पुढे जाऊन कॉ.आर.बी. मोरे म्हणून नाव कमावत चवदार तळ्याच्या सत्याग्रहात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 
 
सुरेन्द्रनाथ टिपणीस यांच्या या शालेय जीवनातल्या धाडसाचे त्यावेळी खूप कौतुक झाले. पुण्याच्या ’ज्ञानप्रकाश’च्या ’महाडचे बातमीपत्र’ या सदरातूनही या घटनेचे पडसाद उमटले आणि ही घटना पुढे अनेक दिवस महाडात चर्चेचा विषय बनून राहिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही सुरबानानांच्या या स्वभावाचे आणि त्यांच्या पुरोगामी विचारांचे खूप कौतुक आणि अभिमान वाटायचा. त्यामुळे जेव्हा कोणी अन्याय अत्याचाराच्या तक्रारी घेऊन बाबासाहेबांकडे यायचा, त्यावेळी बाबासाहेब त्याला सुरबानानांकडे जाण्याचा सल्ला देत. सुरबानानांनी पुढे अनेक प्रसंगात बाबासाहेबांच्या बरोबर उभे राहत बाबासाहेबांना शेवटपर्यंत साथ दिली. शेतकर्‍यांच्या चळवळीचे नेतृत्व केले. सावकारशाहीविरोधात बंड उभे केले आणि आपल्या मित्रत्वाची आठवण म्हणून महाडात ‘आंबेडकर कॉलेज’चे निर्माण केले.
 
कॉ. रामचंद्र बी. मोरे
 
कॉ.रामचंद्र बाबाजी मोरे हे कॉ.आर.बी. मोरे म्हणून प्रसिद्ध आहेत. बाबासाहेबांच्या अत्यंत विश्वासू आणि समर्पित सहकार्‍यांपैकी ते एक होते. महाडच्या दोन्ही परिषदा यशस्वी करण्यासाठी कॉ.आर.बी. मोरे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. मोरे हे मुळातच झुंजार वृत्तीचे. शालेय जीवनातच शाळा प्रवेशासाठी शाळेविरुद्ध बंड करून व्यवस्थेला धडा शिकवणारा हा विद्यार्थी पुढे आयुष्यभर लोककल्याणासाठी आणि समाजासाठी व्यवस्थेशी झुंज देण्याचे काम करत राहिला. अत्यंत साधी राहाणी; पण तितकेच झुंजार विचार आणि जीवनभर परिवर्तनाचा वसा डोक्यात घेऊन वावरत राहिलेला हा कार्यकर्ता शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच जगला.
 
 
यांच्या संदर्भातला एक किस्सा माझ्या वाचनात आला होता. बाबासाहेबांच्या अत्यंत जवळचे असूनही एकदा कामगार मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा भरली असताना, कॉ. मोरे सभास्थानापासून 100 फुट लांब फूटपाथवर एक जागा शोधून चूपचाप बाबासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी उभे राहिलेले होते. बाबासाहेब भाषण करायला उभे राहिले आणि सवयीप्रमाणे त्यांनी स्टेजसमोरून चौफेर नजर फिरवली; तर त्यांना लांब एका बाजूला कॉ. आर. बी. मोरे उभे असलेले दिसले. त्यांनी लगेच मोठ्याने आवाज दिला, ”अहो मोरेसाहेब, तुमची जागा फुटपाथवर नाही, तुम्ही येथे या!” मोर्‍यांनी उभ्याउभ्याच नमस्कार करून, ’माझा मी इथेच बरा’, अशी खूण केली; पण तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. खर्‍या आणि बिनीच्या कार्यकर्त्याला असे मागे कसे राहू देतील? बाबासाहेब आपल्या हुकमी आवाजात म्हणाले, ”जा त्या मोर्‍यांना स्टेजवर घेऊन या.” कार्यकर्ते धावत जाऊन त्यांना स्टेजवर घेऊन आले.
 
 
ते व्यासपीठावर येताच बाबासाहेब समोर बसलेल्या जनसमुदायाला म्हणाले, ”हे आर.बी. मोरे...फार मोठा माणूस. ज्या थोड्या व्यक्तींच्या प्रयत्नांमुळे मी राजकारणात प्रवेश केला; त्यातील एक मोरे, माणूस फार मोठा.” बाबासाहेबांच्या या कृतीमुळे समोर बसलेल्या प्रत्येकाला गहिवरून आल्यावाचून राहिले असेल काय?
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला भरणार्‍या ऐतिहासिक कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार करण्यात आर.बी. मोरे यांचाच सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेबांचे मन वळविण्याशिवाय चवदार तळ्याच्या लढ्याला अनुकूल लोकमत तयार करणे, लोकांना संघटित करणे. सभेचा प्रचार प्रसार करणे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आर.बी. मोरे यांनी पायाला भिंगरी लावून तहान भूक विसरून केल्या. समाजसेवा संघाने परिषदेचा प्रचार करण्यासाठी मुंबई आणि कोकण अशी विभागणी केली होती. त्यात कोकणातील जबाबदारी श्री. केशव आडरेकर आणि आर.बी. मोरे यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार या दोघांनीही डिसेंबर 1926पासूनच स्वखर्चाने प्रचारकार्यासाठी कोकणातच आपला मुक्काम ठोकला आणि रत्नागिरी, दाभोळ, दापोली, महाड, मानगाव, रोहा, पेण हा भाग पिंजून काढत परिषदेचा जोरदार प्रचार केला.
 
रघुनाथ गोविंद देशपांडे
 
राजकरणात आणि समाजकारणात दोन्ही ठिकाणी आपला दरारा असलेले, व्यवसायाने शिक्षक आणि बरोबरच सुरेन्द्रनाथ टिपणीसांचा सहवास लाभलेले रघुनाथ गोविंद देशपांडे हेही महाडच्या संगराचा भाग होते. अतिशय बुद्धिमान, उत्तम पोवाडेकार आणि पद रचनाकार म्हणून रघुनाथ मास्तर अशा नावाने रघुनाथ गोविंद देशपांडे हे पंचक्रोशीत ख्याती पावले होते. सुरबानानांवर मास्तरांची विशेष श्रद्धा होती. नानांनी सांगायचे आणि मास्तरांनी करायचे हे एक सूत्रच बनले होते. रघुनाथ गोविंद देशपांडेंनी स्वातंत्र्य चळवळीत आपल्या स्वरचित मेळ्यांच्या पदातून मोठीच जनजागृती केली. यशवंतराव घाडगे यांचा पोवाडा रचल्याबद्दल त्यांना पदकसुद्धा मिळाले होते.
 
भाई अनंतराव चित्रे
 
बुद्धिकौशल्य आणि बंडखोरी याचा पूर्वापार वारसा असलेल्या आणि इतिहासाची मोठी पार्श्वभूमी असलेल्या पोलादपूरच्या चित्रे घराण्यात भाई अनंतराव चित्रे यांचा जन्म 1 मे 1894ला दापोली येथे झाला. घराण्याचा वारसा सोबत घेऊनच भाई चित्रेंनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुरू केली. वडील महसूल खात्यात असल्यामुळे गरीब शेतकरी, शेतमजूर यांच्याशी भाई चित्रेंचा बराच संबंध आला. त्यामुळे शेतकर्‍यांचे दैन्य, त्यांचा खोत-सावकाराकडून होत असलेला छळ याचे चांगलेच आकलन भाईंना झाले होते. त्याबरोबरच सरकारही शेतकर्‍यांच्या बाजूने उभे नसल्याचे त्यांना कळून येत होते. या सगळ्यावर आपण काहीच भरीव करू शकत नसल्याची खंत भाईंना मनातून छळत असायची. त्यामुळे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाविषयी एक वेगळेच प्रेम, आस्था आणि सहानुभूती त्यांच्या मनात निर्माण झाली. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून त्यांनी 1918साली बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या काळातच त्यांचा पुरोगामी विचारांच्या समाजसुधारकांशी थेट संबंध आला. 11 मार्च 1911ला होलिकोत्सव साजरा करणार्‍या तरुणांच्या कृतीला संघटित स्वरूप प्राप्त व्हावे या हेतूने एक संमेलन भरवण्यात आले. ज्याचे अध्यक्षस्थान न्या. नारायणराव चंदावरकर यांनी भूषवले. याच संमेलनात ’सोशल सर्व्हिस लीग’ची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासूनच भाई चित्रेंनी समाजसेवा संघात काम करायला सुरुवात केली.
 
 
रामचंद्र मोरे या मुलाला शाळेत प्रवेश मिळत नसताना त्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचा योग्य तो सल्ला देऊन अस्पृश्य निवारण चळवळीच्या लढ्याला पुढे नेण्यातील आपल्या योगदानाची मशाल पेटवली. स्वत:च्याच लग्नात जुन्या खुळचट रुढींविरुद्ध बंड पुकारले आणि आपल्या मतानुसार आपला विवाह घडवून आणला. पुरोगामी विचारांचे सरदार गोविंद गोपाळ टिपणीस यांच्या मुलीशीच भाई चित्रेंचा विवाह झाला. गोविंदराव व अनंतराव अशा दोन्ही सुधारकांचा योगायोगाने अद्वितीय असा संगम घडून आला. पुढे 1920च्या मुंबईच्या गिरणी कामगारांच्या संपात समाजसेवा संघाचे प्रतिनिधी म्हणून अनंतराव चित्रे उर्फ भाई सहभागी झाले होते. 2 फेब्रुवारी 1920ला कामगारांचा विजय होऊन संप समाप्त झाला.
 
 
20 मार्च 1927च्या महाडच्या परिषदेत आभार प्रदर्शनाच्या भाषणात भाईंनीच टाकलेल्या ठिणगीमुळे चवदार तळ्याचे पाणी पेटले. पुढे डिसेंबरमध्ये झालेल्या परिषदेतही भाईंनी त्यांना मिळालेली भूमिका अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. या दोन्ही परिषदा यशस्वी झाल्या. याचे मोठे श्रेय भाई अनंतराव चित्रे यांना दिले पाहिजे असे मला वाटते.
 
भाईशेट वडके
 
गजानन उर्फ भाईशेट वडके यांचा जन्म त्वष्टा समाजाच्या सुधारक घराण्यात झाला. त्यामुळे सुधारकाचे बाळकडू त्यांना जन्मापासूनच मिळालेले होते. सीतारामभाऊ, वामनभाऊ, रघुनाथभाऊ, कृष्णाजीभाऊ यांच्यासह गजानन उर्फ भाईशेट वडके यांचे पस्तीस माणसांचे एकत्र कुटुंब होते; परंतु फक्त गजाननालाच या घराण्यात चित्रकला आणि शिल्पकलेचे देणे प्राप्त झालेले होते. आपल्या कलेचे प्रदर्शन मुंबईत भरवण्याची तयारी करत असतानाच प्रचंड पाऊस आला आणि त्यातून 16 जुलै 1923ला आलेल्या महापुरात सगळे काही नष्ट झाले.
 
 
पण भाईशेट खचले नाहीत. त्यांनी परत उभारी घेतली आणि आपले काम पुन्हा शून्यातून सुरू केले. भाईशेट यांचे स्नेही भिकोबा टिपणीस उर्फ तात्या हे व्यवसायाने काँट्रॅक्टर होते. यांच्यामुळेच भाईशेट यांचा सुरबानाना टिपणीस यांच्याशी स्नेह जुळला आणि भाईशेट त्यांच्या विचारधारेकडे आणि व्यक्तित्त्वाकडे ओढले गेले. वारंवार होणार्‍या बैठकीतून समाजप्रबोधनावरच्या चर्चा झडत असतानाच भाईशेट यांचा अनंतराव चित्रे याच्याशी आणि त्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी स्नेह जुळून आला.
 
 
एकदा भिकोबा टिपणीस उर्फ तात्यांचे रस्त्याचे काम सुरू असताना कातळ फोडण्यासाठी लावलेल्या एका सुरुंगाच्या स्फोटात भाईशेट वडके यांचा उजवा हात निकामी झाला. एका कलावंताच्या उजव्या हाताचे महत्त्व काय असते हे तुम्हा-आम्हाला सांगण्याची गरज नाही; पण त्यातूनही उभे राहत डाव्या हाताने भाईशेट वडके यांनी आपली कलेची साधना सुरू ठेवली. 1926साली शिवछत्रपतींचा पुतळा निर्माण करायला घेतला. या कामात त्यांना छत्रपतींच्या राज्याचे कारभारी असणारे पोतनीस यांच्या वंशातील सरदार पोतनीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुतळा निर्मितीच्या कामी मोलाचे मार्गदर्शन केले. हाच पुतळा 3 एप्रिल 1926 रोजी किल्ले रायगड येथे उत्सव प्रसंगी शिवछत्रपतींच्या सिंहासनावर स्थानापन्न झालेला पाहून उत्सवाला आलेले प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव भोसले नागपूरकर यांनी गजानन वडके यांचा सुवर्णपदक देऊन गौरव केला होता.
 
 
1927साली भरलेल्या त्वष्टा समाजाच्या एका परिषदेत भाईशेट वडके यांनी बनवलेला शिवछत्रपतींचा अर्धपुतळा प्रदर्शनात ठेवला गेला. डाव्या बाजूला आत्मविश्वासपूर्वक पाहणारी हीच प्रतिमा आज सगळीकडे प्रसिद्ध आहे; पण फक्त कलाकार म्हणून न राहता भाईशेट वडके हे सुरबानानांच्या सगळ्याच चळवळीत त्यांच्या बरोबर राहिले. जेव्हा-जेव्हा बाबासाहेब महाडात सुरबानानांकडे त्यांच्या घरी येत त्या-त्या प्रत्येक वेळी भाईशेट वडके तेथे हजर असत. महाडच्या संपूर्ण सत्याग्रहात ते सर्वार्थाने सहभागी झाले आणि मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर सावलीप्रमाणे वावरले.
 
कर्मवीर दादासाहेब गायकवाड
महाड सत्याग्रहाच्या समुद्रमंथनातून निघालेल्या अनेक रत्नांपैकी एक म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड ऊर्फ भाऊराव कृष्णराव गायकवाड. 15 ऑक्टोबर 1902रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबे नावाच्या छोट्याशा गावातील अस्पृश्य कुटुंबात जन्मलेले भाऊराव कृष्णराव गायकवाड, पुढे एक मुत्सद्दी भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी अशा रूपात जनसामान्यास परिचित झाले.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय जातीसंस्थेच्या विरोधात दादासाहेबांच्या बरोबर दलित चळवळीने जे काही अभूतपूर्व सत्याग्रह केले, त्यात सर्वात महत्त्वाचा होता ’महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह’. दुसरा ’नाशिकचा कळाराम मंदिर सत्याग्रह’ आणि तिसरा ’मुखेडचा सत्याग्रह’. हे तीनही सत्याग्रह दलित चळवळीसाठी महत्त्वाचे आणि निर्णायक मानले जातात. या तीनही सत्याग्रहाचे नियोजन व जनसंघटन याची संपूर्ण जबाबदारी दादासाहेबांनी सांभाळलेली होती.
 
सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर
 
1926साली मुंबईत ‘कोकणस्थ महार सेवा संघ’ स्थापन करण्यात पुढाकार घेतलेले सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर हे 1927ची परिषद यशस्वी करण्यासाठी सरकारी नोकरीत असतांनाही एक महिन्याची सुट्टी टाकून कोकणात आपल्या वीर या गावी येऊन तळ ठोकून राहिले. गावागावांत, वस्त्यावस्त्यांत बैठका घेतल्या. घरोघरी फिरून परिषदेचा प्रचार-प्रसार केला. बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची जनासामान्यात ओळख होती. वरून अतिशय संयमी शांत दिसणारा हा कार्यकर्ता आतून मात्र विषमतेच्या आगीत होरपळत होता. म्हणूनच महाडची परिषद कोणत्याही परिस्थितीत इतिहासातील सर्वात यशस्वी म्हणून ओळखली गेली पाहिजे अशा भावनेने प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वात पुढे होते ते सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर.
 
 
या व्यतिरिक्त गणेश नारायण टिपणीस, यशवंत नारायण टिपणीस, बापूराव जोशी, चिंतामण देशपांडे, दगडूशेट भिलारे, भानुदास कांबळे, खोडके वकील, रामचंद्र कांबळे, द.ग. साळुंखे, भिकोबा मालुसरे, गडकरी वकील, सरदार गोपीनाथराव पोतनीस आणि अजून कितीतरी ज्ञात-अज्ञात कार्यकर्ते या क्रांतियज्ञात आपल्या योगदानाची आहुती टाकण्यासाठी तन, मन, धनाने सहभागी होणार होते. प्रत्येकाला या क्रांतिकारी समाजयज्ञातला आपला वाटा अभिमानाने उचलायचा होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे सगळे ज्ञात आणि इतिहासाला कदाचित माहीत नसणारेही अनेक अज्ञात सहकारी महाडच्या त्या ऐतिहासिक क्रांतियज्ञाची तेजस्वी किरणे होऊन जगाच्या अवकाशात पसरायला तयार होऊन बसलेली होती.