विद्यार्थी आंदोलनाचे स्वरूप आणि मानसशास्त्रीय वास्तव - हताशेचे राजकीय भांडवलीकरण

विवेक मराठी    17-Aug-2026
Total Views |
@प्रशांत सोमवंशी 9637555888
 
 
NEET
आंदोलनाची वैचारिक परिपक्वता गर्दीच्या आकारात नसून त्याच्या विवेकनिष्ठेत असते, हे ओळखून विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न बनता केवळ पारदर्शक परीक्षा आणि कायदेशीर सुधारणा यांसारख्या मूळ मागण्यांवरच ठाम व संयमी राहिले पाहिजे. प्रशासनासोबत संवादाचे दरवाजे उघडे ठेवून, न्यायालयीन मार्ग आणि सनदशीर मार्गाने लढा उभारणे अधिक प्रभावी ठरते. अन्यायाविरुद्धचा लढा हा स्वतःच्या भविष्याची राखरांगोळी करून किंवा कोणाच्या हातातील बाहुले बनून नव्हे, तर संयम, कायदेशीर मार्ग आणि प्रगल्भ विचारांच्या बळावरच जिंकता येतो.
अन्यायाविरुद्ध पेटून उठणे हा तरुणाईचा स्वभावधर्म आहे; परंतु जेव्हा तोच संताप स्वतःच्या ध्येयाचा मार्ग भरकटवणारा ठरतो, तेव्हा तिथे क्रांती नव्हे, तर विनाशाची सुरुवात होते. पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चिततेमुळे परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनात ’प्रक्रियात्मक न्याय’ (Procedural Justice) आणि ’आकलनात्मक विसंगती’ (Cognitive Dissonance) यांसारखे मानसिक वादळ निर्माण होणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. वर्षानुवर्षे घाम गाळून केलेल्या अभ्यासावर जेव्हा एका गैरव्यवहाराची काजळी धरते, तेव्हा प्रशासनावरील विश्वास ढळतो आणि त्यातून राग, असहायता व चिंतेचा उद्रेक होतो. परंतु, सध्याच्या विद्यार्थी आंदोलनांकडे मानसशास्त्रीय आणि सामाजिक-राजकीय दृष्टीकोनातून पाहिले तर एक अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब समोर येते. विद्यार्थ्यांच्या या स्वाभाविक मानसिक असंतोषाचा, उद्वेगाचा आणि हताशेचा काही बाह्य घटकांकडून स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी अत्यंत चलाखीने वापर केला जात आहे.
 
 
NEET 
 @प्रशांत सोमवंशी
 
भारतातील विद्यार्थी आणि युवा आंदोलनांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक कालखंडात आंदोलनांचे स्वरूप भिन्न राहिले आहे. जयप्रकाश नारायण (JP) यांच्या नेतृत्वाखालील 1970च्या दशकातील ’संपूर्ण क्रांती’ आंदोलन असो, 90च्या दशकातील मंडल आयोगाविरोधातील ’आरक्षण विरोधी आंदोलन’ असो किंवा 2011मधील अण्णा हजारे यांचे ’इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलन असो...या सर्व चळवळींमध्ये तरुणांचा सहभाग अभूतपूर्व होता. मानसशास्त्रीयदृष्ट्या, या ऐतिहासिक आंदोलनांमध्ये तरुणाईचा आदर्शवाद आणि व्यवस्थेतील बदलाची तीव्र इच्छा हे मुख्य इंधन होते. मात्र, काळाच्या ओघात या आंदोलनांचा उत्तरार्ध अभ्यासला तर लक्षात येते की, सुरुवातीला मूळ आणि रास्त मुद्द्यांवर आधारलेली ही आंदोलने हळूहळू राजकीय समीकरणांमध्ये अडकत गेली. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने देशाला राजकीय दिशा दिली असली तरी, पुढे जाऊन त्यातील विद्यार्थ्यांच्या मूळ शैक्षणिक समस्या बाजूला पडल्या. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पुढे आलेल्या राजकीय पर्यायांनी मूळ आंदोलनाचा चेहराच बदलून टाकला. आजच्या आंदोलनातही याच ऐतिहासिक चुकांची पुनरावृत्ती होताना दिसते; जिथे विद्यार्थ्यांच्या ’प्रक्रियात्मक न्यायाची’ मागणी राजकीय समीकरणांच्या पटावर प्यादे म्हणून वापरली जात आहे.
 
 
मानसशास्त्रीय आणि सामाजिक विश्लेषणात ’सांस्कृतिक मार्क्सवाद’ (Cultural Marxism) आणि ’नव-मार्क्सवाद’ (Neo-Marxism) या संकल्पना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पारंपरिक मार्क्सवादाने आर्थिक वर्गांवर (श्रीमंत विरुद्ध गरीब) लक्ष केंद्रित केले होते; तर नव-मार्क्सवादाने समाजशास्त्रीय बदलाचा वापर करून संस्कृती, जात, धर्म, लिंग आणि अस्मिता यांच्या आधारे समाजात ’शोषक विरुद्ध शोषित’ असा कायमस्वरूपी संघर्ष उभा करण्याचे तंत्र विकसित केले. अमेरिकेतील ’ब्लॅक लाईव्हस् मॅटर’ (BLM) आंदोलन असो, पाश्चात्त्य देशांतील आक्रमक फेमिनिझम असो किंवा भारतात जात आणि धर्माच्या नावाने उभे केले जाणारे नरेटिव्ह असो, या सर्वांच्या मागे एक विशिष्ट मानसशास्त्र काम करते. याला ’अस्मितांचे राजकीय उद्दीपन’ (Identity Politics Activation) म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जेव्हा मूळ प्रशासकीय मागण्या मागे पडून अचानक जात, धर्म आणि राज्यव्यवस्थेविरोधातील विचारसरणीचा शिरकाव होतो; तेव्हा ते सांस्कृतिक मार्क्सवादाच्या रणनीतीचे फलित असते. या प्रक्रियेत तरुणांच्या मनात व्यवस्थेबद्दल आत्यंतिक द्वेष भरून, ’रक्तरंजित क्रांती’ किंवा ’अराजकता’ (Anarchy) हाच एकमेव मार्ग आहे असा आभास निर्माण केला जातो.
 
 
मानसशास्त्रात ’जनमानस’ (Public Psyche) घडवण्यासाठी काही विशिष्ट प्रयोगांचा वापर केला जातो. जेव्हा एखाद्या समाजात किंवा युवावर्गात प्रचंड असंतोष असतो, तेव्हा राजकीय पटलावरील बाह्य घटक अत्यंत जाणीवपूर्वक खोटी आणि अतिरंजित परिस्थिती (Manufactured Crisis) निर्माण करतात. देशाच्या सर्वोच्च नेत्याला किंवा संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींना सार्वजनिक व्यासपीठांवरून शिवीगाळ करणे, आक्षेपार्ह भाषा वापरणे ही केवळ रागाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती नसते, तर तो एका मानसशास्त्रीय रणनीतीचा भाग असतो. या तंत्राला ’ओव्हरटन विंडो’ (Overton Window) म्हणतात. सार्वजनिक संवादाची पातळी इतकी खालच्या स्तरावर न्यायची की, व्यवस्थेबद्दलचा अनादर सामान्य वाटू लागावा. राजकीय असंतोष प्रत्यक्षात जितका आहे, त्यापेक्षा शंभर पट जास्त आहे हे दाखवण्यासाठी कृत्रिम वातावरण निर्मिती केली जाते. जेव्हा सामान्य नागरिक किंवा विद्यार्थी सर्वोच्च नेतृत्वावर होणारे टोकाचे हल्ले पाहतात, तेव्हा त्यांच्यातील कायदेपालन आणि शिस्तीची भावना शिथिल होते, ज्याचा थेट राजकीय फायदा विरोधक किंवा हितसंबंधी गट उकळतात.
 
 
मानसशास्त्रीय आणि सामाजिक विश्लेषणात ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ आणि ‘नव-मार्क्सवाद’ या संकल्पना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पारंपरिक मार्क्सवादाने आर्थिक वर्गांवर (श्रीमंत विरुद्ध गरीब) लक्ष केंद्रित केले होते; तर नव-मार्क्सवादाने समाजशास्त्रीय बदलाचा वापर करून संस्कृती, जात, धर्म, लिंग आणि अस्मिता यांच्या आधारे समाजात ‘शोषक विरुद्ध शोषित’ असा कायमस्वरूपी संघर्ष उभा करण्याचे तंत्र विकसित केले. अमेरिकेतील ‘ब्लॅक लाईव्हस् मॅटर’ आंदोलन असो, पाश्चात्त्य देशांतील आक्रमक फेमिनिझम असो किंवा भारतात जात आणि धर्माच्या नावाने उभे केले जाणारे नरेटिव्ह असो, या सर्वांच्या मागे एक विशिष्ट मानसशास्त्र काम करते. याला ‘अस्मितांचे राजकीय उद्दीपन’ म्हटले जाते. 
 
हिंदीतील प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांची अजरामर ओळ आहे : ”सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।” आजच्या आंदोलनांमध्ये या कवितेच्या मूळ तत्त्वज्ञानाचाच दुर्दैवाने नेमका विपर्यास केला जात आहे. दुष्यंत कुमार यांना व्यवस्थेत गुणात्मक आणि सकारात्मक बदल अपेक्षित होता; त्यांना ’हंगामा’ किंवा गोंधळ अभिप्रेत नव्हता. मात्र, आजच्या विद्यार्थी आंदोलनात ’सूरत बदलने’ (व्यवस्था सुधारणे) हा उद्देश बाजूला पडून केवळ ’हंगामा खडा करना’ (अव्यवस्था माजवणे) हेच मुख्य ध्येय बनवले जात आहे. जेव्हा एखादे आंदोलन परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पारदर्शकता यांसारख्या ठोस मागण्यांवरून भरकटून रस्ते अडवणे, पोलिसांशी हिंसक चकमकी करणे आणि घोषणाबाजीपुरते मर्यादित राहते, तेव्हा तिथे दुष्यंत कुमारांच्या विचारांचा पराभव होतो. भावनिक उद्रेकाच्या भरात विद्यार्थी हे विसरतात की, गोंधळाने केवळ बातम्या बनतात, उकल (डेर्श्रीींळेप) निघत नाही.
 
 
सध्याच्या डिजिटल युगात ’माहितीचा विपर्यास’ (nformation Distortion) आणि ’इको चेंबर इफेक्ट’ (Echo Chamber Effect) या आंदोलनांना अधिक ज्वालाग्राही बनवत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की, जे उद्दीपक, आक्रमक आणि भावनिक कंटेंटला जास्त व्ह्यूज आणि रिच देतात. याला मानसशास्त्रात ’अल्गोरिदम सायकी ड्राईव्ह’ (Algorithm-driven Psyche) म्हटले जाऊ शकते. या प्रक्रियेत प्रथमतः जाणीवपूर्वक अर्ध्याकच्च्या बातम्या पसरवून विद्यार्थ्यांमध्ये भयगंड निर्माण करून अव्यवस्था निर्माण केली जाते. त्यानंतर एखादी छोटी घटना किंवा विधान पकडून त्याभोवती वादाचे मोहोळ उठवून कृत्रिम वाद (Manufactured Controversy) निर्माण केला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावरून पूर्णपणे उडेल. डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या REBT (Rational Emotive Behaviour Therapy) सिद्धांतानुसार, जेव्हा व्यक्तीच्या मनात ’सगळेच संपले आहे, व्यवस्था कधीच सुधारणार नाही’, अशा टोकाच्या आणि अतार्किक विचारांचे (Irrational Beliefs) डोस सतत पाजले जातात, तेव्हा तिची तर्कसंगत विचार करण्याची क्षमता (Rational Thinking)पूर्णपणे गळून पडते. शेवटी एआय-जनरेटेड किंवा जुने संदर्भरहित व्हिडिओ पसरवून विद्यार्थ्यांच्या रागाला सतत खतपाणी घातले जाते, ज्यामुळे सुशिक्षित तरुणही फेक न्यूजचे बळी ठरून हिंसक पावले उचलण्यास प्रवृत्त होतात.
 
 
गुस्ताव ले बॉन (Gustave Le Bon) यांच्या ’टोळीचे मानसशास्त्र’ (Psychology of the Crowd) या सिद्धांतानुसार, टोळीचा भाग बनल्यावर व्यक्तीची स्व-विवेकबुद्धी (Self-identity and Critical Thinking) नष्ट होते आणि ती ’समूहाच्या मानसिकतेच्या’ (Group Mind) प्रभावाखाली येते. या आंदोलनांमध्ये मानसशास्त्रीय हत्यारे म्हणून अनेक क्लृप्त्यांचा वापर केला जातो. यात अफवांचा वापर करून सरकार आणि विशिष्ट व्यवस्थेबद्दल अत्यंत नकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी असत्य पसरवले जाते. शाब्दिक किंवा भौतिक हिंसेद्वारे प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो; हिंसेमुळे आंदोलनाची बातमी बनते, पण त्याचे गांभीर्य नष्ट होते. तसेच, जे विद्यार्थी किंवा तज्ज्ञ विवेकवादी भूमिका मांडतात, त्यांना ’गद्दार’ किंवा ’व्यवस्थाधार्जिणे’ ठरवून त्यांचा मानसिक छळ करत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार (Cancel Culture) टाकला जातो. याशिवाय विद्यार्थ्यांच्या मनात मी अभ्यास का करतोय जर सगळंच विकले गेले आहे? अशी तीव्र ’आकलनात्मक विसंगती’ (Cognitive Dissonance)निर्माण केली जाते, ज्यामुळे तो मुख्य उद्देशापासून दुरावतो आणि आंदोलनाचा कायमस्वरूपी भाग बनतो. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा आणि दुर्दैवी फटका हा प्रामाणिक विद्यार्थ्यालाच बसतो. आंदोलनाचे रूपांतर जेव्हा राजकीय कुरघोडीत होते, तेव्हा मूळ शैक्षणिक सुधारणांवर होणारा गंभीर संवाद मंदावतो आणि विद्यार्थी ’बर्नआउट’ (Burnout)च्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतात.
 
 
या मानसिक आणि सामाजिक दलदलीतून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी काही ठोस विवेकवादी उपाययोजना अमलात आणणे काळाची गरज आहे. सर्वप्रथम, आंदोलनाची वैचारिक परिपक्वता गर्दीच्या आकारात नसून त्याच्या विवेकनिष्ठेत असते, हे ओळखून विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा न बनता केवळ पारदर्शक परीक्षा आणि कायदेशीर सुधारणा यांसारख्या मूळ मागण्यांवरच ठाम व संयमी राहिले पाहिजे. प्रशासनाशी संवादाचे दरवाजे उघडे ठेवून, न्यायालयीन मार्ग आणि सनदशीर मार्गाने लढा उभारणे अधिक प्रभावी ठरते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील ’इको चेंबर’मधून बाहेर पडून तथ्यांची खात्री केली पाहिजे आणि ’फेक न्यूज’ व चिथावणीखोर व्हिडिओंचे मानसशास्त्रीय जाळे ओळखले पाहिजे. REBT सिद्धांतानुसार अतार्किक विचारांना बळी न पडता, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आणि ’बर्नआउट’ टाळण्यासाठी अभ्यासाचा व विश्रांतीचा समतोल राखणे गरजेचे आहे. यशाची व्याख्या केवळ परीक्षेचा निकाल नसून वैयक्तिक आनंद, मानसिक शांतता आणि सामाजिक योगदान हे आहे, त्यामुळे भारताचा हॅप्पीनेस इंडेक्स सुधारण्यासाठी युवा वर्गाने मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन जीवनमूल्यांवर (Quality of Life) भर दिला पाहिजे. सरतेशेवटी, समाजाला जोडणारा, विधायक आणि सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारून संवाद आणि जोडण्याचे समाजकारण केले पाहिजे; कारण अन्यायाविरुद्धचा लढा हा स्वत:च्या भविष्याची राखरांगोळी करून किंवा कोणाच्या हातातील बाहुले बनून नव्हे, तर संयम, कायदेशीर मार्ग आणि प्रगल्भ विचारांच्या बळावरच जिंकता येतो. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आज हे वेळेत ओळखणे गरजेचे आहे की, आपल्या प्रामाणिक हताशेचे आणि रागाचे कोणी ’भांडवलीकरण’ तर करत नाही ना? स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आणि विवेकाची मशाल हाती धरूनच तरुण पिढी स्वतःचे आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते.
 
- लेखक मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक आणि पीएच.डी. संशोधक आहेत.