संकेश्वरीला लाभला विश्वास

विवेक मराठी    21-Aug-2026   
Total Views |
Sankeshwari chili
 
 
कर्नाटकातील संकेश्वर आणि गडहिंग्लजची मक्तेदारी मानल्या जाणार्‍या संकेश्वरी मिरचीने आता करवीर तालुक्यातही आपला ठसा उमटविला आहे. हालसवडे येथील एम.ए. (अर्थशास्त्र) शिक्षित शेतकरी विश्वास भोसले यांनी सेंद्रिय पद्धतीने या मिरचीचे यशस्वी उत्पादन घेत थेट ग्राहकांपर्यंत विक्रीचे मॉडेल उभे केले. दर्जा, गुणवत्ता आणि बाजारपेठेचे नवे समीकरण त्यांनी घडवून दाखविले.
भारतात हवामान, माती आणि चवीच्या वैविध्यामुळे अनेक प्रकारच्या मिरचींची लागवड केली जाते. त्यामध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर, कर्नाटकातील ब्याडगी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील संकेश्वरी, गुजरातची ज्वाला, काश्मिरी मिरची तसेच ईशान्य भारतातील धानी (बर्ड्स आय) मिरची हे प्रमुख प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये संकेश्वरी मिरचीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील ’संकेश्वर’ गावाच्या नावाने ओळख मिळालेली ही मिरची आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेतकर्‍यांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार बनली आहे. आकर्षक गडद लाल रंग, मध्यम ते तीव्र तिखटपणा, कमी बिया आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता ही तिची खास ओळख. त्यामुळे मसाला उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि घरगुती स्वयंपाकघरापासून ते निर्यात बाजारपेठेपर्यंत संकेश्वरी मिरचीला मोठी मागणी आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ, कसबा नूल, औरनाळ, बसर्गे, हलकर्णी, खणदाळ, शेंद्री, हनिमनाळ, निलजी, हेब्बाळ तसेच आजरा तालुक्यातील बहिरेवाडी, आर्दाळ, सुळे, लाकूडवाडी आणि मुमेवाडी या गावांमध्ये सुमारे 300 एकर क्षेत्रावर संकेश्वरी (जवारी/गावरान) मिरचीची लागवड केली जाते.
 
गडहिंग्लजची बाजारपेठ ही संकेश्वरी मिरचीच्या व्यापारासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील हुकमी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणावर मिरचीचे सौदे होतात. यंदा एप्रिल महिन्यात या मिरचीला प्रतिकिलो तब्बल 1,900 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्याने तिच्या आर्थिक मूल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
 
 
संपर्क
 
विश्वास भोसले, संकेश्वरी मिरची उत्पादक
हालसवडे, ता. करवीर जि.कोल्हापूर
भ्रमणध्वनी : 9175540457
 
 
याच वाढत्या मागणीचा आणि खात्रीशीर बाजारपेठेचा वेध घेत करवीर तालुक्यातील हालसवडे येथील विश्वास भोसले यांनी गेल्या सहा वर्षांपासून संकेश्वरी मिरचीची यशस्वी लागवड सुरू केली आहे. केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता त्यांनी या मिरचीवर प्रक्रिया करून मिरची पावडर निर्मिती सुरू केली आहे. दर्जेदार आणि सेंद्रिय उत्पादनामुळे त्यांनी बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
 
शेतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यामागची कहाणी सांगताना विश्वास म्हणतात, ”आमची अवघी 12 गुंठे जमीन. त्यामुळे शेतीत काही मोठे करता येईल, असा विचारही कधी मनात आला नव्हता. बी.कॉम. पदवी पूर्ण केल्यानंतर अर्थशास्त्र विषयात एम.ए. केले आणि देशातील प्रतिष्ठित यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मोठी स्वप्ने होती; पण अथक परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. त्या अपयशाने क्षणभर निराशा आली खरी, पण त्याने मला थांबवले नाही. उलट आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवण्याची प्रेरणा दिली.“
 
 
मिरची लागवडीपासून व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास उलगडताना विश्वास सांगतात, “संकेश्वरी मिरचीच्या यशस्वी लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची असते. साधारण मे महिन्यात शेताची नांगरणी करून मशागत करतो. त्यानंतर देशी गायीचे शेणखत, निमपेंड, करंजी पेंड आणि गांडूळ खत एकत्र करून संपूर्ण शेतात पसरवतो. रोटर मारून जमीन समतल केल्यानंतर वळीव पाऊस झाल्यावर सर्‍या सोडतो. सरींवर ठिबक सिंचन व्यवस्था बसवून मल्चिंग अंथरतो. त्यानंतर चारही बाजूंनी चिवे (बांबू) रोवून कीड नियंत्रणासाठी कीटकरोधक जाळी लावतो.“
 
 
Sankeshwari chili
 
“साधारण जुलैच्या मध्यावर पावसाचा आणि हवामानाचा अंदाज घेऊन मल्चिंगला छिंद्रे पाडली जातात आणि त्यामध्ये संकेश्वरी मिरचीची रोपे लावली जातात. लागवडीनंतर तिसर्‍याच दिवसापासून पिकाच्या निगेची खरी सुरुवात होते. मिरचीवर येणारे चुरडा-मुरडा, बुरशी, मावा यांसारखे रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मी पाचपत्ती काढा, जीवामृत, पंचगव्य, गांडूळ अर्क, नीम ऑईल, करंजी तेल, देशी गायीचे तूप, ताक, गोमूत्र आणि सेंद्रिय गूळ यांसारख्या विविध सेंद्रिय घटकांचा नियमित वापर करतो. यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते,“ असे विश्वास सांगतात.
 
 
ते पुढे म्हणाले, “मग मी हालसवडे येथील आमच्या अल्पशा शेतीत सेंद्रिय संकेश्वरी मिरची लागवडीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. अभ्यास, सातत्य आणि मेहनतीच्या बळावर हा प्रयोग यशस्वी झाला. आज अवघ्या 12 गुंठ्यांतून दरवर्षी 80 ते 100 किलो दर्जेदार सेंद्रिय संकेश्वरी मिरचीचे उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे या मिरचीला आतापर्यंत प्रति किलो 2,600 ते 4,000 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांनाही कमी क्षेत्रात दर्जेदार उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवता येते, हा माझा विश्वास अधिक दृढ झाला.“
 
 
‘मिरचीच्या काढणीपासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर दर्जाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते,‘ असे सांगताना विश्वास म्हणाले, ”लागवडीनंतर साधारण 110 दिवसांनी मिरचीचा पहिला तोडा सुरू होतो. एका हंगामात सहा ते आठ तोडे होतात. प्रत्येक तोड्यानंतर मिरची सलग तेरा दिवस नैसर्गिक पद्धतीने वाळवली जाते. त्यानंतर अत्यंत बारकाईने प्रतवारी करूनच विक्रीसाठी तयार केली जाते.”
 
ते पुढे म्हणाले, “आमची सेंद्रिय संकेश्वरी मिरची शक्यतो थेट ग्राहकांनाच विकण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार उत्पादन मिळते, तर आम्हालाही योग्य मोबदला मिळतो.“
 
 
उत्पादनातील सातत्य हे त्यांच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 2022मध्ये 40किलो, 2023मध्ये 60 किलो, 2024मध्ये 70 किलो आणि 2025मध्ये 80 किलो सेंद्रिय संकेश्वरी मिरचीचे उत्पादन त्यांनी घेतले. ’यंदाच्या 2026 हंगामात तब्बल 100 किलो उत्पादन होईल,’ असा त्यांचा विश्वास आहे.
 
 
मात्र, हवामानाचा परिणाम मिरची उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही ते नमूद करतात. “ज्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असते, त्या वर्षी उत्पादन घटते. वातावरण मिरचीसाठी अनुकूल असले, तरी अचानक होणारे हवामानातील बदल उत्पादनावर विपरीत परिणाम करतात. हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे,” असेही विश्वास सांगतात.
 
 
कच्च्या मिरचीपेक्षा मूल्यवर्धनाला प्राधान्य
 
शेतीतून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल, तर केवळ उत्पादन घेऊन भागत नाही; त्या उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देणे तितकेच महत्त्वाचे असते. विश्वास यांनी हा मंत्र प्रत्यक्षात उतरवला आहे. त्यांनी सेंद्रिय संकेश्वरी मिरचीची केवळ लागवडच केली नाही, तर तिचे मूल्यवर्धन करून स्वतःचा स्वतंत्र ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.
 
”आम्ही आमची सेंद्रिय संकेश्वरी मिरची कच्च्या स्वरूपात बाजारात विकत नाही. तिच्या अस्सल चवीला आणि गुणवत्तेला न्याय मिळावा म्हणून आम्ही तिचा बुक्का अर्थात लाल तिखट पावडर तयार करूनच ग्राहकांपर्यंत पोहोचवतो,” असे विश्वास अभिमानाने सांगतात.
 
 
त्यांच्या मिरचीचा बुक्का आजही पारंपरिक तीनपारीच्या डंकामध्ये दळला जातो. आधुनिक यंत्रसामुग्रीच्या युगातही त्यांनी पारंपरिक पद्धतीवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मिरचीचा नैसर्गिक रंग, झणझणीतपणा आणि वैशिष्ट्यपूर्ण सुगंध अबाधित राहतो. विशेष म्हणजे या तिखटामध्ये कोणतेही कृत्रिम रंग, संरक्षक रसायने किंवा अगदी मिठाचा खडादेखील मिसळला जात नाही. शंभर टक्के शुद्ध आणि सेंद्रिय उत्पादन हीच त्यांच्या व्यवसायाची खरी ओळख बनली आहे.
 
गुणवत्तेच्या जोरावर विश्वास यांच्या सेंद्रिय संकेश्वरी मिरचीच्या बुक्क्याने आज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, सोलापूर, धाराशिव आणि बीडसह कर्नाटक, केरळ व गुजरातमधील अनेक शहरांमध्ये त्यांचे तिखट नियमितपणे पोहोचते. एकदा या तिखटाची चव चाखलेले ग्राहक पुन्हा त्यांच्याकडेच मागणी नोंदवतात, हीच त्यांच्या गुणवत्तेची खरी पावती आहे.
 
Sankeshwari chili 
 
मूल्यवर्धनाचा प्रवास इथेच थांबत नाही. ग्राहकांच्या आग्रहास्तव त्यांनी कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी तयार करण्यासही सुरुवात केली आहे. सेंद्रिय संकेश्वरी मिरची, अन्नेगिरी अथवा हावेरी ब्याडगी मिरची, सेंद्रिय कोथिंबीर, आले, पांढरा कांदा, देशी लाल लसूण, काळे मीठ आणि तब्बल 24 प्रकारच्या निवडक मसाल्यांचा समतोल मिलाफ या मसाल्याला वेगळी ओळख देतो. यामध्ये भुईमुगाच्या शेंगदाण्यांपासून काढलेले लाकडी घाण्यावरील तेल वापरले जात असल्याने मसाल्याची चव अधिक खुलते. 250 ग्रॅमपासून उपलब्ध असलेला हा मसाला पारंपरिक पद्धतीने, अत्यंत निगुतीने तयार केला जातो. विश्वास यांच्या सेंद्रिय संकेश्वरी मिरचीच्या बुक्क्याला आज प्रति किलो सुमारे 3,000 रुपयांचा दर मिळतो. विश्वास, गुणवत्ता आणि पारंपरिक चवीच्या जोरावर भोसले यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांनी स्वत:ची वेगळी बाजारपेठ निर्माण केली असून, सेंद्रिय शेतीही अधिक नफ्याची ठरू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
 
 
विश्वास यांची दृष्टी केवळ उत्पादनावर नाही, तर संपूर्ण परिसंस्था उभारण्यावर आहे. संकेश्वरी मिरची उत्पादकांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी मूल्यसाखळी उभी करणे आणि या वैशिष्ट्यपूर्ण मिरचीला जीआय मानांकन मिळवून तिच्या नावाला जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देणे, हेच विश्वास भोसले यांचे पुढचे लक्ष्य आहे.
 
 
एकूणच अवघ्या 12 गुंठ्यांतून सुरू झालेला विश्वास भोसले यांचा प्रवास आज सेंद्रिय शेती, मूल्यवर्धन आणि उद्योजकतेचा आदर्श ठरला आहे. संकेश्वरी मिरचीला जागतिक ओळख मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास अनेक अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नवी प्रेरणा आणि आशेची दिशा ठरत आहे.

विकास पांढरे

सध्या 'कृषी विवेक' (विवेक समूह) चे कार्यकारी संपादक. एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारी याठिकाणी वार्ताहर व उपसंपादक म्हणून अनुभव. कृषी, समाज, साहित्य व वंचित समाजाविषयी लिखाण.