अराजकतेच्या व्याकरणातील व्याकरणाचार्य

विवेक मराठी    21-Aug-2026   
Total Views |
राहुल गांधी यांनी संसदेत अशा मागण्या केल्या की, ज्या कधीच पूर्ण होणार नाहीत. पण यातून त्यांना एक संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा आहे की, देश चालविण्यास संसद अपात्र आहे, मंत्री अपात्र आहे, सर्वोच्च न्यायालय कमजोर आहे, निवडणूक आयोग कुचकामी आहे आणि पोलीसदल निर्दयी झालेलेेे आहे. म्हणून नवीन व्यवस्था उभी केली पाहिजे. दुसर्‍या भाषेत संविधानाने दिलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून असंवैधानिक मार्गाने हे संविधान गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द ‘अराजकतेचे व्याकरण’ असे आहे. या अराजकतेच्या व्याकरणातील व्याकरणाचार्य राहुल गांधी आणि त्यांचा कंपू आहे.

rahul gandhi
 
राहुल गांधी यांना अनेकजण ‘पप्पू‘ म्हणतात. पप्पू राहुल गांधी म्हणून त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक राजकीय विश्लेषकही राहुल गांधी यांना कमी लेखतात. त्यांच्याकडे राजकीय परिपक्वतेचा अभाव आहे, या भाषेत त्यांचे मूल्यमापन करतात. भारतात भाजपाभक्त आणि मोदीभक्तांची संख्या खूप मोठी आहे. राहुल गांधीसंबंधी असे काही ऐकले की त्यांना आनंद होतो आणि मनोमन बरे वाटते. परंतु एक धोक्याचा इशारा येथे देेणे फार गरजेचे आहे. जो आपल्या विरोधकाला कमी लेखतो आणि त्याच्या शक्तीचा अंदाज घेत नाही, तो कधीतरी अशी थप्पड खातो, ‘ज्याचे नाव ते’.
 
 
राहुल गांधी यांच्या सर्व व्यवहारात खूपसा वेडेपणा दिसत असला तरी इंग्रजीत एक वाक्य आहे, ‘मेथड इन मॅडनेस’ राहुल गांधी यांच्या तथाकथित खुळचटपणात, अरेरावीत, घमेंडीत आणि कोर्टात जाऊन दिलगिरी व्यक्त करण्यात ’एक लंबी सोच है’, ती कोणती?
 
 
त्यांना हे प्रस्थापित करायचे आहे की, नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्याशी टक्कर देणारा मीच एकमेव नेता आहे. वारंवार कोर्टात जावे लागते, याचा त्यांना खेद नाही. कारण यामुळे त्यांना ‘व्हिक्टीम कार्ड’ म्हणजे ’पाहा मी कसा पिडला जात आहे’, असे सहानुभूतीचे कार्ड वापरता येते. ते निर्माण करण्याच्या मागे ते लागलेले आहेत. विचारशून्य भक्त बनून असे कार्ड आपण त्यांच्या हातात द्यायचे का, याचा विचार केला पाहजे.
 
 
संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलैपासून सुरू झाले, ऑगस्टला ते तहकूब झाले. या महिन्या-दीड महिन्याच्या अधिवेशनात ‘आम्ही संसदेचे गोंधळी’ म्हणून राहुल गांधी आणि त्यांच्या कंपूनी जो गोंधळ घातला त्याचे वेगळे वर्णन करण्याची गरज नाही. सभापतींना किती वेळा कामकाज तहकूब करावे लागले, हे आपण पाहिले. त्यांनी मागण्या अशा केल्या की, ज्या कधीच पूर्ण होणार नाहीत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. ही मागणी बालिश आहे असे जरी अनेकांना वाटत असले तरी त्यामागे एक अंहकार आहे. ‘मीच संसदेत या दोघांना आव्हान देऊ शकतो, अन्य कुणात ती हिम्मत नाही’, याला प्रतिमा निर्मितीचा (इमेज बिल्डिंग) कार्यक्रम म्हणतात.
 
 
अयोध्येतील दानचोरीचा विषय संसदेत उपस्थित केला गेला. इंडीच्या खासदारांनी जेवढा गोंधळ घालता येईल तेवढा घातला. इंडीच्या खासदारांनी अयोध्येला भेट देण्याचे धाडस केलेले नाही, मग दानचोरीचा विषय त्यांनी का उपस्थित केला? ’मेथेड इन मॅडनेस’चा पुढचा भाग असा की, रामनामावर भाजपा केंद्रात निवडून आली, खासदारांची संख्या वाढत गेली आणि 2014 साली भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेवर आली. त्या रामाचे अधिष्ठान जर डळमळीत करता आले तर पुढील निवडणूक जिंकता येईल, हा इंडीचा डाव आहे. राहुल गांधींना हसण्यावारी नेण्याऐवजी त्यांच्या कंपूच्या या डावाचा जनमानसावर परिणाम कसा होणार नाही, याची काळजी केली पाहिजे. आपले सर्व पत्ते मोकळे केले पाहिजे आणि दानचोरीच्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा केल्या पाहिजेत.
 
 
जंंतर मंतरला नीट पेपरफुटीचे आंदोलन झाले. संसदेवर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी त्यावर लाठीहल्ला केला. या विद्यार्थी आंदोलनात असंख्य गुंड आणि माफिया गँगचे लोक घुसले होते. विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रामाणिक असल्या तरी या गुंड मंडळींचे तेथे काय काम, त्यांना जेवू घालणार्‍या मोहम्मद जुनैदची चौकशी चालू आहे. अशा समाजविघातक मंडळींना संसदेवर विद्यार्थ्यांच्या आडोशाने चालून जाण्याचे स्वातंत्र्य कसे देता येईल. या वस्तुस्थितीचा जोरदार प्रचार भाजपावर प्रेम करणार्‍यांनी गावोगावी आणि घरोघरी जाऊन केला पाहिजे.
लाल किल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षलवादी’ असा शब्दप्रयोग केला. तो ज्यांना झोंबणे आवश्यक होते, त्या सर्वांना तो चांगलाच झोंबलेला आहे. केजरीवाल, पी.चिंदबरम, मेहबुबा मुफ्ती, इ. मंडळींनी ‘होय आम्ही नक्षलवादी आहोत’, असे वेगवेगळ्या माध्यमांतून घोषित केले. केजरीवाल, मेहबूबा, चिंदबरम आणि सर्व गँग यांचे नक्षलप्रेम, दहशतवादीप्रेम, यापूर्वी देशाने बघितलेले आहे, म्हणून त्यांनी अशा प्रकारे वक्तव्ये करणे हे त्यांच्या मूळ प्रवृत्तीला धरून झाले आहे. प्रामाणिकपणे त्यांनी त्याचे प्रकटीकरण केले, म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजे.
 
 
देशात अराजक निर्माण करणे हा देशातील अनेक लोकांचा डाव आहे. म्हणून ते अत्यंत कुशलतेने आणि विचारपूर्वक सर्व प्रकारच्या संवैधानिक संस्थावर हल्ले करीत असतात. संसद ही संवैधानिक संस्था आहे, तिचे कामकाज सुरळीतपणे चालू द्यायचे नाही. सर्वोच्च न्यायालय संवैधानिक संस्था आहे, न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे झाडायचे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग या संसदीय संस्था आहेत, त्यांची खिल्ली उडवायची. पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्याविषयी अनुद्गार काढायचे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍यांना लक्ष्य करायचे. याचेच नाव ‘मेथेड इन मॅडनेस’ हे आहे.
 
यातून एक संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा आहे की, देश चालविण्यास संसद अपात्र आहे, मंत्री अपात्र आहे, सर्वोच्च न्यायालय कमजोर आहे, निवडणूक आयोग कुचकामी आहे आणि पोलीसदल निर्दयी झालेलेेे आहे. म्हणून नवीन व्यवस्था उभी केली पाहिजे. दुसर्‍या भाषेत संविधानाने दिलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून असंवैधानिक मार्गाने हे संविधान गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द ‘अराजकतेचे व्याकरण’ असे आहे. या अराजकतेच्या व्याकरणातील व्याकरणाचार्य राहुल गांधी आणि त्यांचा कंपू आहे. हे आपण व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. दुसर्‍याला हसताना आनंद होतो, पण त्यातून आपले अज्ञानही प्रकट होते.
 
 
हे अराजकतेचे व्याकरण करणार्‍यांना परदेशातून भरपूर साहाय्य मिळत असते. राहुल गांधी जितका काळ देशात असतात, तेवढा काळ ते परदेशात असतात, कशासाठी? हे विचारण्याचा अधिकार सर्व भारतीय नागरिकांना आहे. तो अधिकार आपण वापरतो का?
 
 
संघाचे सरसंघचालक कै. सुदर्शनजी हे आपल्या भाषणात ‘युगप्रवर्तनाचा संधिकाल’ असा विषय मांडीत असत. आणि युगप्रवर्तनाचा कालखंड 2011पासून सुरू होणार असे ते सांगत. आणि इशारा देत की, भारत विश्वगुरूच्या पदावर जाण्यासाठी वाटचाल करील; परंतु त्याला रोखण्यासाठी देशविदेशातील सर्व आसुरी शक्ती एकत्र येतील आणि प्रंचड संघर्ष करतील.
या संघर्षाच्या कालखंडातून आपण आता जात आहोत. राहुलला ’पप्पू’ म्हणू नका, तो या आसुरीसेनेचा सेनापती आहे, मायावी आहे. त्याचे प्रतिस्पर्धी केजरीवाल, ममता बॅनर्जी, स्टॅलिन इ. आपल्या ‘पुण्य’कर्मामुळे अधोगतीला गेले. आता राहुल गांधींना विरोधी चेहरा म्हणून कोणी आव्हान देईल असा एकही नेता आज तरी राजकीय पटलावर दिसत नाही. अशा कालखंडात भारताला विश्वगुरुपदावर नेण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे आणि ज्यांची मनोमन ही इच्छा आहे, देशातील अशा सर्व देशभक्तांपुढे अराजकतेच्या व्याकरणाचे जबरदस्त आव्हान उभे आहे. त्याचे विविध पदर आहेत, ते जाणून सर्वांनी हे आव्हान पेलण्यासाठी सिद्ध राहाणे अत्यंत आवश्यक आहे. प्रजातंत्र, संविधान आणि आपली जीवनमूल्ये यांच्या विरुद्धचा हा संघर्ष लवकरच एका निर्णायक वळणावर जाईल. तेव्हा आपण कोठे असणार?

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.