भारतीय हळदीचे जागतिक बाजारपेठेतील वर्चस्व हे केवळ उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणावर नव्हे, तर शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीच्या क्षमतेवरही अवलंबून आहे. निर्यातक्षम गुणवत्ता, भौगोलिक मानांकन, मूल्यवर्धन, प्रक्रिया सुविधा आणि बाजारपेठेशी थेट जोडणी यांचा प्रभावी मेळ घातल्यास हळद उत्पादकांना जागतिक मागणीचा अधिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे हळद निर्यात ही शेतकर्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची महत्त्वपूर्ण संधी ठरू शकते.

हळद हा भारतीय मसाल्यांमधील सर्वांत महत्त्वाचा आणि बहुउपयोगी जिन्नस. हिचा उगम भारतातच झाला. भारतातून चीनच्या किनार्यापर्यंत आणि पुढे पूर्व आफ्रिकेपर्यंत हळदीचा प्रवास झाला. आजच्या आधुनिक काळात हळदीचा वापर प्रामुख्याने चूर्णाच्या स्वरूपात, म्हणजेच हळद पावडर म्हणून केला जातो. पदार्थांना नैसर्गिक चव, सुवास आणि आकर्षक सोनेरी-पिवळा रंग देण्यासाठी भारतीय पाककलेत हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मात्र हळदीचे महत्त्व केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाही. असंख्य औषधी गुणधर्मांमुळे प्राचीन काळापासून आयुर्वेद आणि पारंपरिक औषधपद्धतींमध्ये हळदीचा वापर केला जात आहे. हळदीमध्ये जिवाणूविरोधी, विषाणूविरोधी, दाहशामक, गाठीविरोधी, ऑक्सिडीकरणविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म आढळतात. याशिवाय हृदय व रक्तवाहिन्यांचे, यकृताचे आणि मूत्रपिंडांचे संरक्षण करणारे तसेच किरणोत्सर्गापासून संरक्षण करणारे गुणधर्मही हळदीत असल्याचे मानले जाते. आयुर्वेदिक औषधनिर्मितीपासून ते अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत, सौंदर्यप्रसाधनांपासून ते कापड उद्योगापर्यंत हळदीची उपयुक्तता वाढत आहे. अन्नपदार्थांना नैसर्गिक रंग आणि सुवास देण्यासाठी हळदीचा वापर होतो. त्यामुळे हळदीचा वापर दिवसेंदिवस विविध क्षेत्रांत विस्तारत आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. जगातील हळदीचे वार्षिक उत्पादन सुमारे 11 लाख टन असून, त्यापैकी भारताचा वाटा तब्बल 9.46 लाख मेट्रिक टनांपर्यंत आहे. त्यामुळे जागतिक हळद बाजारपेठेत भारताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. देशांतर्गत उत्पादनातही महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. तेलंगणानंतर महाराष्ट्र हळद उत्पादनात देशात दुसर्या क्रमांकावर असून, राज्यात सुमारे 1.90 लाख मेट्रिक टन हळदीचे उत्पादन होते. सांगली, हिंगोली, नांदेड, वाशिम, चंद्रपूर आदी भागांमध्ये हळद उत्पादनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, वायगाव (वर्धा), वसमत (हिंगोली आणि सांगलीच्या)हळदीला भौगोलिक मानांकनाची (GI) मान्यता मिळाल्याने त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेला जागतिक ओळख मिळाली असून, त्यातून हळद व्यापाराला नवी चालना मिळत मोठ्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.

भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसार हळदीच्या विविध वाणांची लागवड केली जाते. त्यामध्ये केरळमधील ‘अॅलेप्पी फिंगर’, महाराष्ट्रातील ‘राजापूर’ आणि ‘सांगली हळद’ यांसारख्या प्रमुख वाणांचा समावेश होतो. केरळमध्ये लागवड होणार्या अॅलेप्पी फिंगर हळदीमध्ये कर्क्युमीनचे प्रमाण अधिक असल्याने मसाल्यांच्या आयातदार देशांमध्ये या वाणाला विशेष पसंती मिळते. दुसरीकडे, महाराष्ट्रातील सांगली हळदीनेही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली असून तिच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.
मध्यपूर्वेतील देशांसह ब्रिटन, अमेरिका आणि जपानच्या बाजारपेठांमध्ये भारतीय हळदीच्या विविध वाणांना चांगली मागणी आहे. विशेषतः ‘अॅलेप्पी फिंगर’, ‘इरोड हळद’, ‘राजापूर’, ‘सांगली हळद’ आणि ‘निजामाबाद बल्ब’ हे प्रकार जागतिक बाजारपेठेत लोकप्रिय ठरत आहेत.
भारतीय हळदीला जागतिक बाजारपेठेत मिळणारी वाढती मागणी, नैसर्गिक रंगद्रव्यांचा वाढता वापर आणि आरोग्यदायी अन्नपदार्थांकडे ग्राहकांचा वाढता कल यांमुळे हळदीच्या निर्यातीसमोर मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र, या जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी निर्यातदारांनी आवश्यक नियम व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. हळद निर्यात करण्यासाठी निर्यातदाराची ’स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडिया’ येथे आवश्यक नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.
भारताची पिवळी मक्तेदारी
जगाच्या हळद बाजारपेठेत भारताचे स्थान अत्यंत भक्कम आहे. जगातील सुमारे 80 टक्के हळदीचे उत्पादन भारतात होते आणि जागतिक हळद व्यापारात भारताचा वाटा सुमारे 60 टक्के आहे. उत्पादनाची मुबलकता, वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता आणि विविध वाणांमुळे भारत जागतिक हळद पुरवठा साखळीतील प्रमुख केंद्र बनला आहे.
भारतातून हळदीची केवळ कच्च्या स्वरूपातच नव्हे, तर विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या स्वरूपातही निर्यात केली जाते. ओली हळद, वाळलेली हळद, हळद पावडर, हळद ओलिओरेझिन, हळदीचे तेल आणि कर्क्युमिन अशा विविध स्वरूपांत भारतीय हळद जगभरातील बाजारपेठेत पोहोचते. हळदीच्या प्रमुख आयातदारांमध्ये अमेरिका, इराण आणि जर्मनी यांचा समावेश होतो. भारतीय हळदीची उत्पादनक्षमता आणि गुणवत्ता यामुळे जागतिक बाजारपेठेतील पुरवठा आणि दरांवर भारताचा मोठा प्रभाव आहे. विशेषतः गुणवत्तापूर्ण हळदीच्या सातत्यपूर्ण पुरवठ्यामुळे भारतीय हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विश्वासार्ह स्थान मिळाले आहे.
मात्र, जागतिक बाजारपेठेतील ही आघाडी कायम ठेवताना काही आव्हानांनाही सामोरे जावे लागते. वाहतूक खर्चातील वाढ, वेळेवर मालाचा पुरवठा न होणे आणि काही वेळा गुणवत्तेबाबत निर्माण होणार्या तक्रारी यांमुळे विशेषतः युरोपीय बाजारपेठेत भारतीय हळदीच्या निर्यातीसमोर अडथळे निर्माण होतात. या बाजारपेठेत उच्च गुणवत्तेच्या, सुरक्षित आणि निर्धारित मानकांची पूर्तता करणार्या हळदीला मोठी मागणी आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, थायलंडसह संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेश हा हळदीचा मोठा ग्राहक बाजार आहे. याशिवाय रशिया, चीन, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही भारतीय हळदीला मागणी आहे.
अमेरिका हा भारतीय हळदीचा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आहे. गेल्या वर्षी भारताच्या एकूण हळद निर्यात मूल्यापैकी तब्बल 22% वाटा अमेरिकेचा होता. त्यानंतर बांगलादेश (18%), इराण (6%) आणि संयुक्त अरब अमिराती (5%) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय मलेशिया, इंग्लंड, मोरोक्को, जर्मनी आणि जपान या देशांमध्येही भारतीय हळदीला चांगली मागणी आहे. ’कोविड-19’ महामारीनंतर हळदीच्या मागणीला विशेष चालना मिळाली. आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याने ताजी आणि वाळलेली हळद तसेच हळदीपासून तयार होणार्या उत्पादनांचा वापर वाढला. भारतीयांच्या दैनंदिन आहारातील हळद-दुधासारख्या पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक आरोग्यदायी पेय आणि खाद्यपदार्थांपर्यंत हळदीचा वापर विस्तारत आहे.
याचा परिणाम हळदीच्या निर्यात मूल्यातही स्पष्टपणे दिसून येतो. 2016-20 या कालावधीत सुमारे 6% वाढीच्या तुलनेत गेल्या वर्षी हळदीच्या निर्यात मूल्यात तब्बल 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ही वाढ भारतीय हळदीसाठी जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या नव्या संधींचे द्योतक आहे.
या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी केवळ कच्ची हळद निर्यात करण्याऐवजी हळद-आधारित नावीन्यपूर्ण उत्पादने, आरोग्यदायी पेये, रेडी-टू-यूज मिश्रणे, आधुनिक पाककृती आणि मूल्यवर्धित खाद्यपदार्थ विकसित करण्याची मोठी संधी आहे.
’स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडिया’च्या आकडेवारीनुसार, भारतीय हळदीच्या निर्यातीने गेल्या तीन वर्षांत मात्रात्मक वाढीपेक्षा मूल्याच्या बाबतीत अधिक दमदार झेप घेतली आहे. 2023-24मध्ये भारतातून 1,62,019 मे. टन हळद निर्यात झाली होती. तिचे निर्यातमूल्य 1,875.87 कोटी होते. 2024-25मध्ये निर्यातीचे प्रमाण वाढून 1,76,325 मे. टन, तर निर्यातमूल्य तब्बल 2,885.39 कोटी झाले. 2025-26मध्ये निर्यातीचे प्रमाण 1,75,896 मे. टन असून, निर्यातमूल्य 2,887.18 कोटी इतके नोंदले गेले आहे.
विशेष म्हणजे, 2023-24च्या तुलनेत 2025-26मध्ये हळदीच्या निर्यातीचे प्रमाण सुमारे 8.6 टक्क्यांनी, तर निर्यातमूल्य तब्बल 53.9 टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजेच भारतीय हळदीला केवळ परदेशी बाजारपेठेत मागणी वाढत नाही, तर उच्च मूल्य मिळवून देणार्या बाजारपेठांमध्येही तिची पकड मजबूत होत आहे.
बांगलादेश हा भारतीय हळदीचा सर्वात मोठा बाजार असून, 2023-24मध्ये तेथे 37,577 मे. टन हळद निर्यात झाली होती. मात्र, 2025-26मध्ये हे प्रमाण 25,217 मे. टनांवर आले. तरीही निर्यातमूल्य 287.11 कोटी इतके राहिले आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीने भारतीय हळदीची वाढती मागणी कायम ठेवली असून, 2025-26मध्ये तेथे 20,740 मे. टन हळद निर्यात झाली आणि त्याचे मूल्य 296.86 कोटी राहिले.
अमेरिकेची बाजारपेठ मात्र विशेष लक्षवेधी ठरते. 2023-24मधील 8,603 मे. टन निर्यातीपासून 2025-26मध्ये प्रमाण 9,091 मे. टनांपर्यंत वाढले असताना, निर्यातमूल्य 161.13 कोटींवरून तब्बल 321.91 कोटींवर पोहोचले आहे. यावरून अमेरिकेसारख्या बाजारपेठेत भारतीय हळदीला मिळणार्या उच्च मूल्याची आणि गुणवत्तापूर्ण हळदीच्या वाढत्या मागणीची कल्पना येते.
मलेशिया, मोरोक्को, इराण, जर्मनी, सौदी अरेबिया, ब्रिटन, इंडोनेशिया आणि जपान हेही भारतीय हळदीचे महत्त्वाचे बाजार आहेत. विशेषतः इंडोनेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांसारख्या बाजारपेठांमध्ये अलीकडच्या काळात निर्यातीत चांगली वाढ दिसून येते. जपानमध्येही प्रमाण तुलनेने कमी असले तरी निर्यातमूल्यात सातत्याने वाढ झाली आहे.
हळद निर्यातीसाठी संधी
भारतीय हळदीला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असून, निर्यातदारांसमोर विविध देशांच्या रूपाने मोठ्या आणि आशादायी संधींचे दालन खुले आहे. प्रत्येक बाजारपेठेचे स्वरूप, ग्राहकांची पसंती आणि मागणी वेगळी असल्याने योग्य बाजारपेठेची निवड आणि गुणवत्तापूर्ण मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा हे निर्यातीच्या यशाचे महत्त्वाचे घटक ठरतात.
अमेरिका भारतीय हळदीसाठी आकर्षक बाजारपेठ आहे. गुणवत्तापूर्ण हळदीला चांगला दर मिळण्याबरोबरच नैसर्गिक रंगद्रव्ये, आरोग्यविषयक उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या हळद उत्पादनांची मागणी येथे वाढत आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी अमेरिका ही उच्च मूल्य मिळवून देणारी दीर्घकालीन बाजारपेठ ठरू शकते. युरोप आणि इंग्लंडमध्ये हळदीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः युरोपमध्ये वापरल्या जाणार्या एकूण हळदीपैकी सुमारे 60 ते 70% हळद अन्न उद्योगात वापरली जाते. युरोपियन मसाला उत्पादक, खाद्यप्रक्रिया कंपन्या, मांस प्रक्रिया उद्योग तसेच सॉस आणि मसाला उत्पादक हे हळदीचे प्रमुख व्यावसायिक वापरकर्ते आहेत.
याशिवाय रिटेल चेन, स्वतंत्र किराणा दुकाने, स्ट्रीट मार्केट्स आणि ऑनलाईन किरकोळ विक्रेते यांच्यामार्फतही हळदीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, कॅटरिंग आणि फूड-सर्व्हिस उद्योगातही हळदीचा वापर वाढत आहे. यामागे युरोपीय ग्राहकांमध्ये भारतीय, आशियाई आणि इतर वांशिक पाककृतींची वाढती लोकप्रियता हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पारंपरिक हळद पावडरीसोबतच रेडी-टू-यूज मसाला मिश्रणे, सॉस, पेये आणि अन्य मूल्यवर्धित उत्पादनांसाठीही येथे मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे.
युरोपियन बाजारपेठेत अन्नपदार्थ म्हणून हळद निर्यात करायची असेल, तर गुणवत्तेसोबतच अन्नसुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. युरोपियन युनियनमध्ये खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतीय निर्यातदारांनी हळद पाठवताना संबंधित नियम व मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वप्रथम EU Food Supplement Legislation म्हणजेच अन्नपूरक उत्पादनांसाठी लागू असलेल्या युरोपीय नियमांचे पालन करावे लागते. त्याचबरोबर European General Food Law अंतर्गत खाद्यपदार्थांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण यासंबंधीच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
हळदीतील कीटकनाशकांच्या अवशेषांची कमाल मर्यादा (Maximum Residue Levels - MRLs) निश्चित केलेल्या मानकांमध्ये असणे महत्त्वाचे आहे. तसेच अन्नातील प्रदूषक घटक (Contaminants) आणि सूक्ष्मजीवजन्य दूषितता (Microbiological Contamination) याबाबतही निर्धारित मर्यादांचे पालन करावे लागते. याशिवाय उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक आणि पॅकेजिंगच्या प्रत्येक टप्प्यावर अन्न स्वच्छतेचे (Food Hygiene) काटेकोर व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यासाठी Hazard Analysis and Critical Control Points (HACCP) या अन्नसुरक्षा प्रणालीच्या तत्त्वांनुसार संभाव्य धोके ओळखून त्यांचे नियंत्रण करणे अपेक्षित आहे.
भारतीय हळदीपुढे नवी आव्हाने
जगभरात हळदीची लागवड करणारे देश तुलनेने कमी असले, तरी भारतीय हळदीची गुणवत्ता, विविधता आणि मोठ्या उत्पादनक्षमतेशी स्पर्धा करणारे काही देश आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेगाने पुढे येत आहेत. विशेषतः अमेरिका आणि युरोपसारख्या उच्च-मूल्याच्या बाजारपेठांमध्ये या देशांची हळद निर्यात वाढत असल्याने भारतीय निर्यातदारांसमोर नव्या स्पर्धेचे आव्हान उभे राहिले आहे.
पेरूमध्ये हळद उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी शासनाचा वाढता सहभाग दिसून येत आहे. पायाभूत सुविधा, प्रक्रिया आणि निर्यात व्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्नांमुळे पेरूची हळद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मादागास्करची हळद आपल्या तुलनेने अधिक कर्क्युमीनचे प्रमाण, तीव्र सुगंध आणि वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ओळखली जाते. या गुणवैशिष्ट्यांमुळे विशिष्ट दर्जाची हळद शोधणार्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी मादागास्कर हा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. थायलंडमध्ये हळदीचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती लागवड, उत्पादनक्षमता आणि आशियाई बाजारपेठेशी असलेली जवळीक यामुळे थायलंडची निर्यात क्षमता सातत्याने बळकट होत आहे.
या स्पर्धेत भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, विविध वाण, दीर्घ अनुभव आणि जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली विश्वासार्हता. मात्र, ही आघाडी कायम ठेवण्यासाठी भारतीय हळद निर्यातदारांनी गुणवत्तेतील सातत्य, कर्क्युमीनचे प्रमाण, स्वच्छता, आंतरराष्ट्रीय मानके, मूल्यवर्धित प्रक्रिया आणि वेळेवर पुरवठा यावर अधिक भर देणे आवश्यक आहे.
हळद निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे
जागतिक बाजारपेठेत हळद निर्यात करताना उत्पादनाची गुणवत्ता जितकी महत्त्वाची, तितकीच कागदपत्रांची पूर्तता आणि नियमांचे पालनही आवश्यक असते. निर्यात प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निर्यातदाराने पुढील प्रमुख कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे.
1. आयात-निर्यात परवाना (IEC) : आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असलेला Import Export Code (IEC) निर्यातदाराकडे असणे आवश्यक आहे.
2. स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाची नोंदणी : हळद ही मसाला वर्गातील प्रमुख निर्यात वस्तू असल्याने निर्यातदाराने Spices Board of India येथे आवश्यक नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे.
3. एफएसएसएआय प्रमाणपत्र ः प्रक्रियायुक्त हळद, हळद पावडर किंवा इतर खाद्यपदार्थांच्या स्वरूपात निर्यात करताना संबंधित FSSAI (Food Safety and Standards Authority of India) नियम व प्रमाणीकरणाची पूर्तता करावी लागते.
4. फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र (Phytosanitary Certificate) : कृषी उत्पादन म्हणून हळद निर्यात करताना आयातदार देशाच्या वनस्पती आरोग्यविषयक अटींची पूर्तता करण्यासाठी Phytosanitary Certificate आवश्यक असते.
5. ट्रेडमार्क प्रमाणपत्र : निर्यातदाराने स्वतःचा ब्रँड विकसित केला असल्यास, त्या ब्रँडच्या संरक्षणासाठी ट्रेडमार्क नोंदणी व संबंधित प्रमाणपत्र घेणे उपयुक्त ठरते.
थोडक्यात, दर्जेदार हळद, योग्य पॅकेजिंग आणि आवश्यक कागदपत्रांची अचूक पूर्तता ही यशस्वी हळद निर्यातीची त्रिसूत्री आहे.
हळद निर्यातीपूर्वी तपासणी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हळद निर्यात करताना केवळ उत्पादनाची गुणवत्ता पुरेशी नसते; आयातदार देशांच्या अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि गुणवत्ता मानकांची पूर्तता करणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे निर्यातीपूर्वी हळदीची आवश्यक प्रयोगशाळा तपासणी करून घेणे ही निर्यातदाराची महत्त्वाची जबाबदारी ठरते.
निर्यातीपूर्वी प्रामुख्याने पुढील घटकांची तपासणी केली जाते.
मायकोटॉक्सिन्स - विशेषतः अफ्लाटॉक्सिनची उपस्थिती व निर्धारित मर्यादा.
अॅझो डाईज / कृत्रिम रंग - विशेषतः Sudan Dyes सारख्या प्रतिबंधित कृत्रिम रंगांची तपासणी.
कीटकनाशकांचे अवशेष (Pesticide Residues) - संबंधित आयातदार देशाने निर्धारित केलेल्या MRL (Maximum Residue Limits) मर्यादांनुसार.
जड धातू (Heavy Metals) - विशेषतः शिसे (Lead) तसेच इतर निर्धारित धातू.
सूक्ष्मजीवजन्य घटक (Microbiological Parameters) - Salmonella, E. coli आदींची तपासणी.
याशिवाय आयातदार देशाने निश्चित केलेले इतर गुणवत्ता व अन्नसुरक्षा निकषही पूर्ण करणे आवश्यक असते.
विशेष म्हणजे, प्रत्येक देशाचे नियम, कमाल अनुज्ञेय मर्यादा (MRL/Maximum Limits)) आणि तपासणीचे निकष वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे निर्यातदाराने ज्या देशात हळद पाठवायची आहे, त्या देशाच्या अद्ययावत अन्नसुरक्षा नियमांची माहिती घेऊन त्यानुसार तपासणी करणे आवश्यक आहे.
या तपासण्यांसाठी स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या देशभरातील प्रयोगशाळा सुविधांचा उपयोग करता येतो. महाराष्ट्रातील निर्यातदारांसाठी तुर्भे, नवी मुंबई येथे अद्ययावत प्रादेशिक गुणवत्ता मूल्यमापन प्रयोगशाळा उपलब्ध आहे.
कृषी पणन मंडळाचे विकिरण प्रक्रिया केंद्र
युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित बाजारपेठांमध्ये हळदीची निर्यात करताना अन्नसुरक्षा व गुणवत्तेच्या कठोर निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते. त्यासाठी हळद पावडरवर आवश्यकतेनुसार विकिरण प्रक्रिया (Irradiation) करावी लागते.
ही महत्त्वाची सुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत वाशी, नवी मुंबई येथे उभारण्यात आली आहे. या केंद्रामुळे निर्यातदारांना हळदीवर आवश्यक विकिरण प्रक्रिया करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गुणवत्ता व अन्नसुरक्षा निकषांची पूर्तता करणे सुलभ झाले आहे.
आज विविध निर्यातदार या सुविधेचा लाभ घेत विकिरण प्रक्रिया केलेली हळद परदेशातील बाजारपेठांमध्ये निर्यात करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील हळदीला जागतिक बाजारपेठेत अधिक विश्वासार्हता मिळवून देण्याच्या प्रक्रियेत या केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.
भौगोलिक मानांकनाची ताकद
वायगाव, वसमत आणि सांगलीच्या हळदीला भौगोलिक चिन्हांकन (GI) मानांकन प्राप्त झाले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण हळदीची ओळख अधिक व्यापक व्हावी, उत्पादकांची नोंदणी वाढावी, बाजारपेठ विकसित व्हावी आणि या उत्पादनांना देश-विदेशातील बाजारपेठेत योग्य स्थान मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचा प्रचार-प्रसार, उत्पादकांची नोंदणी आणि सक्षम बाजारसाखळी उभारणी यांना चालना देण्यासाठी राज्यात चार स्वतंत्र अर्थसहाय्य योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ हळद उत्पादक शेतकरी तसेच भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असलेल्या संस्थांना घेता येतो.
1. प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण अनुदान ः भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करता येते. त्यासाठी प्रति प्रशिक्षण कमाल रु. 10,000पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.
2. भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन ः शेतकर्यांनी आपल्या उत्पादनाची भौगोलिक मानांकन नोंदणी करून घ्यावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून नोंदणीच्या खर्चापोटी प्रति लाभार्थी रु. 200 अनुदान देण्यात येते.
3. मूल्यसाखळी आणि बाजारविकासासाठी भक्कम पाठबळ : ॠख मानांकन प्राप्त उत्पादनांची बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी सुयोग्य पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडिंग, बारकोड, वेबसाइट विकास आदी बाबींवर होणार्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम, कमाल रु. 3 लाखांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे पारंपरिक उत्पादनाला आधुनिक बाजारपेठेची ओळख मिळण्यास मदत होते.
4. महोत्सवातील स्टॉलसाठी अर्थसाहाय्य : कृषी पणन मंडळाच्या ’फळे व कृषिमाल महोत्सव’ या उपक्रमांतर्गत भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचे स्टॉल उभारण्यासाठी प्रति स्टॉल रु. 3,000 अर्थसाहाय्य दिले जाते.
अशा प्रकारे GI मानांकन, उत्पादकांची नोंदणी, आकर्षक ब्रँडिंग आणि बाजारपेठेची जोड यांचा संगम घडवून वायगाव, वसमत, सांगली हळदीला अधिक सक्षम बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून केला जात आहे.
एकूणच हळदीची जागतिक मागणी ही केवळ निर्यातीची संधी नसून, शेतमालाला जागतिक मूल्य मिळवून देण्याची दिशा आहे. शेतकर्यांच्या शेतापासून निर्यातीच्या बाजारपेठेपर्यंत गुणवत्तेची साखळी मजबूत झाली, तर भारतीय हळद उत्पादनापासून मूल्यनिर्मितीकडे आणि स्थानिक शेतीपासून जागतिक व्यापाराकडे निर्णायक झेप घेऊ शकते.
लेखक ’महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे’चे व्यवस्थापक (निर्यात) आहेत.