परीक्षा नव्हे - शिक्षण बदलण्याची वेळ

विवेक मराठी    22-Aug-2026
Total Views |
NEET
डॉ. मिलिंद नाईक
9422002180
 
 
NEET
NEET पेपरफुटीच्या घटनेने देशाला धक्का दिला. पण हा धक्का केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा नाही; तो आपल्या संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. परीक्षा- प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्या पाहिजेत, यात दुमत नक्कीच नाही. मात्र एवढ्यावरच समाधान मानणे म्हणजे मूळ रोगावर उपचार न करता केवळ लक्षणांवर औषध देण्यासारखे होईल. भारतीय ज्ञानपरंपरेने पंचकोश विकसन प्रणालीव्दारे सर्वांगीण शिक्षणाची दिशा दिली आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ने त्या दिशेने वाटचाल करण्याचा आराखडा दिला आहे. खरे तर आता शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज आहे.
NEET परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेनंतर देशभरात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे परिश्रम घेतले, कुटुंबांनी वेळ, पैसा आणि आशा यांची मोठी गुंतवणूक केली; परंतु या एका घटनेने त्यांच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित व्हावी, ही अपेक्षा रास्तच आहे. त्यासाठी नवे कायदे येतील, यंत्रणा अधिक सक्षम होईल; पण एवढ्यानेच हा प्रश्न सुटणार आहे का? या घटनेने आपल्यासमोर एक अधिक मूलभूत प्रश्न उभा केला आहे - ’आपण केवळ परीक्षा व्यवस्थेचे रक्षण करणार आहोत की संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचाच पुनर्विचार करणार आहोत?’ अलीकडच्या काळात अमुक परीक्षेचा पेपर फुटला ही बातमी नवी राहिलेली नाही. काही दिवस संताप व्यक्त होतो, चौकशीच्या घोषणा होतात आणि नंतर विषय विस्मरणात जातो; परंतु अशा घटना वारंवार घडत असतील, तर त्यामागे केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून शिक्षणव्यवस्थेतील काही मूलभूत दोषही दडलेले आहेत. त्यांचा गांभीर्याने विचार करण्याची हीच वेळ आहे.
 
 
उपलब्ध जागा - इच्छुक उमेदवारांची संख्या
 
नीट 2026च्या परीक्षेला सुमारे वीस लाख विद्यार्थी बसले होते आणि एमबीबीएससाठी उपलब्ध जागा एक लक्ष 30 हजार आहेत म्हणजेच सुमारे पाच टक्के विद्यार्थीच यात यशस्वी होणार आहेत त्याशिवाय यातील अनुदानित जागा या केवळ 50 टक्केच आहेत. म्हणजेच अडीच टक्के विद्यार्थ्यांनाच अनुदानित जागा मिळणार आहेत. बाकीच्या जागा खाजगी महाविद्यालयातील आहेत. खाजगी महाविद्यालयातील शुल्क 10 ते 20 पट अधिक आहे! या व्यस्त प्रमाणामुळे प्रचंड स्पर्धा आहे. त्याने ताण येतो. त्यामुळे गरजेप्रमाणे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्याचाही विचार व्हावा.
 
 
एका परीक्षेवर भविष्याचा निर्णय
 
आज आपल्या शिक्षणव्यवस्थेतील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे विद्यार्थ्याच्या 12 ते 15 वर्षांच्या शिक्षणापेक्षा एका दिवसाच्या, तीन तासांच्या परीक्षेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्याची जिज्ञासा, नेतृत्वगुण, संशोधनाची वृत्ती, सामाजिक बांधिलकी, सर्जनशीलता, प्रामाणिकपणा, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यांपेक्षा प्रवेशपरीक्षेतील गुण निर्णायक ठरतात. यामुळे शिक्षणाचे लक्ष्य ज्ञानाऐवजी परीक्षा होते. शिकण्याचा आनंद हरवतो आणि प्रत्येक गोष्ट गुणांच्या चौकटीत मोजली जाते. अपयश म्हणजे क्षमता नसणे, अशी चुकीची समजूत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. याच मानसिकतेतून ताण, नैराश्य आणि काही वेळा टोकाची पावले उचलण्याच्या घटना घडतात.
 
 
वरील दोन कारणांनी NEETचा पेपर फुटला नसता तरीही अनेक विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली असतातच. कारण मुख्य समस्या केवळ पेपरफुटीची नाही; तर उपलब्ध जागा, संधींची संख्या आणि संपूर्णपणे परीक्षाकेंद्री शिक्षणपद्धतीची आहे.
 
NEET 
 
औपनिवेशिक शिक्षणाचा वारसा
 
भारतातील आधुनिक शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी ब्रिटिश राजवटीत झाली. 1835मध्ये थॉमस बॅबिंग्टन मेकॉलेने मांडलेल्या शिक्षणधोरणाचा उद्देश हा स्वतंत्र विचार करणारे संशोधक, उद्योजक किंवा समाजनेते घडवणे हा नव्हता. ब्रिटिश प्रशासनासाठी कारकून, दुभाषे आणि कार्यालयीन कर्मचारी तयार करणे हा त्यामागील प्रमुख हेतू होता. या व्यवस्थेत पाठांतर, ठरावीक अभ्यासक्रम, लेखी परीक्षा आणि प्रमाणपत्र यांना मध्यवर्ती स्थान मिळाले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही आपण ही चौकट मोठ्या प्रमाणावर कायम ठेवली. शाळा बदलल्या, विद्यापीठे वाढली, अभ्यासक्रम बदलले; पण शिक्षणाचा मूलभूत दृष्टीकोन फारसा बदलला नाही.
 
आजही प्रश्न विचारणारा विद्यार्थी अनेकदा ’त्रासदायक’, तर पाठांतर करून अचूक उत्तर लिहिणारा विद्यार्थी ’हुशार’ समजला जातो. माहिती लक्षात ठेवण्याला महत्त्व आहे; पण माहितीचा उपयोग करून नवे विचार मांडण्याची क्षमता त्याहून अधिक महत्त्वाची आहे. दुर्दैवाने हे आपण विसरलो आहोत.
 
अध्ययन-अध्यापनातील मूलभूत त्रुटी
 
आजची पाठांतरावर आधारित शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण निर्माण करते. समजून घेण्यापेक्षा माहिती पाठ करण्यावर भर दिला जातो. धक्कादायक म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोग करण्यापेक्षा प्रयोगाची पद्धत पाठ करण्यावर अधिक वेळ दिला जातो. अशा प्रकारे मिळालेले ज्ञान परीक्षेनंतर लवकर विसरले जाते.
 
 
याउलट, अनुभवाधिष्ठित शिक्षणात ज्ञान दीर्घकाळ टिकते. विद्यार्थी स्वतः प्रयोग करतो, निरीक्षण करतो, चुका करतो, त्यातून शिकतो. अशा शिक्षणात पाठांतराची गरज कमी होते आणि यात ’शिकणे’ ही नैसर्गिक प्रक्रिया होते.
 
 
NEETसारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही केवळ पाठांतर पुरेसे नसते. संकल्पना सखोल समजल्या असतील, त्यांचा विविध परिस्थितीत उपयोग करता येत असेल आणि समस्यांचे विश्लेषण करता येत असेल तरच विद्यार्थी यशस्वी होतो. शालेय शिक्षणातही संकल्पनात्मक आकलन, प्रयोगशीलता आणि चिकित्सक विचार यांवर भर देणे अपरिहार्य आहे.
 
उच्चस्तरीय विचारकौशल्ये : स्पर्धा परीक्षांची खरी कसोटी
 
NEET, JEE किंवा इतर राष्ट्रीय स्तरावरील प्रवेशपरीक्षा या केवळ माहितीची उजळणी करणार्‍या परीक्षा नसतात. त्या विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेची कसोटी पाहतात. स्मरण (Remembering) आणि आकलन (Understanding) याबरोबरच ज्ञानाचा उपयोग (Application), विश्लेषण (Analysis), चिकित्सक विचार (Critical Thinking), तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांची ती परीक्षा असते. मात्र आपल्या शालेय शिक्षणात अजूनही स्मरणशक्ती आणि पाठांतर यांनाच अधिक महत्त्व दिले जाते. वर्गात शिक्षक शिकवतात, विद्यार्थी नोंदी घेतात, घरी त्याचे पाठांतर करतात आणि परीक्षेत तेच लिहितात. का?, कसे?, याचा दुसरा मार्ग कोणता? किंवा ही संकल्पना प्रत्यक्ष जीवनात कुठे उपयोगी पडते? असे प्रश्न विचारण्याची संधी विद्यार्थ्यांना फारच कमी मिळते. परिणामी, शालेय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या अपेक्षा यांच्यात मोठी दरी निर्माण होते. ही दरी भरून काढण्यासाठी विद्यार्थी कोचिंग क्लासकडे वळतो.
 
कोचिंग संस्कृतीचा वाढता निरुपयोगी प्रभाव
 
गेल्या दोन दशकांत भारतात कोचिंग उद्योग झपाट्याने वाढला आहे. काही शहरे तर ’कोचिंग हब’ म्हणूनच ओळखली जाऊ लागली आहेत. अनेक विद्यार्थ्यांसाठी शाळा ही केवळ औपचारिक बाब राहिली असून, प्रत्यक्ष तयारी कोचिंग संस्थांमध्ये केली जाते. यात विद्यार्थ्यांची चूक नाही. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक विचारप्रक्रिया, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि प्रश्न सोडवण्याच्या पद्धती पुरेशा प्रमाणात विकसित होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कोचिंग हा अपरिहार्य पर्याय वाटू लागतो.
 
 
परंतु कोंचिग क्लासमधेही या अपेक्षांची पूतर्ता क्वचितच होते. कारण तिथेही विचार करायला शिकवण्याऐवजी तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवून सराव करून घेण्यावरच भर असतो. तेथील बहुतेक अध्यापकही जुन्याच शिक्षण पद्धतीतून तयार झालेले असतात. त्यामुळे रीत बदलतच नाही! अपेक्षांची पूर्तता होतच नाही
 
 
यातून आणखी एक गंभीर समस्या निर्माण होते. विद्यार्थी दिवसभर शाळा, त्यानंतर कोचिंग आणि उरलेल्या वेळेत गृहपाठ अशा चक्रात अडकतो. स्वयंअध्ययन, खेळ, वाचन, कला, छंद, कुटुंबीयांशी संवाद आणि विश्रांती यासाठी वेळच उरत नाही. शिक्षण म्हणजे ’आनंदाची प्रक्रिया’ न राहता ’अखंड धावपळ’ होते.
 
 
याशिवाय शिक्षणातील विषमताही वाढते. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबे महागडी कोचिंग घेऊ शकतात; पण ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा अधिक कठीण होते. प्रश्नपत्रिका सर्वांसाठी समान असली तरी गुणवत्तापूर्ण तयारीची संधी मात्र समान नसते. खरी शैक्षणिक समता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणे; केवळ समान परीक्षा घेणे नव्हे.
 
निपुणताधारित शिक्षणाची गरज
 
आज जगभर शिक्षणाचा भर ’विद्यार्थ्याला किती माहिती आहे?’ यापेक्षा ’तो त्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो?’ यावर दिला जात आहे. यालाच निपुणताधारित शिक्षण (Competency-Based Education) म्हणतात. निपुणता म्हणजे केवळ माहिती नव्हे; तर ज्ञान, कौशल्य, योग्य वृत्ती आणि मूल्ये यांचा समन्वय होय. डॉक्टर होणार्‍या विद्यार्थ्याला जीवशास्त्राचे ज्ञान आवश्यकच आहे; पण त्याचबरोबर संवादकौशल्य, निर्णयक्षमता, संवेदनशीलता आणि नैतिक मूल्येही तितकीच आवश्यक आहेत. अभियंत्याला गणित येणे पुरेसे नाही; तर समस्या सोडवण्याची क्षमता, संघभावना आणि नवोपक्रमाची वृत्तीही आवश्यक आहे.
 
 
म्हणूनच शिक्षणाने विद्यार्थ्याला केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे, तर जीवन जगण्यासाठी तयार केले पाहिजे. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची वृत्ती निर्माण केली पाहिजे. शिक्षणाचा खरा उद्देश हाच आहे.
 
मी खरोखर कोण आहे, कसा आहे? - स्वधर्माचा शोध
 
आपल्या शिक्षणव्यवस्थेतील आणखी एक मोठी उणीव म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःला ओळखण्याची संधी फारच कमी मिळते. शालेय शिक्षण सरधोपट झाल्याने मला काय जमते किंवा जमत नाही, माझ्याकडे कोणती विशेष कौशल्ये आहेत आदि गोष्टींचा शोध घ्यायला संधीच मिळत नाही. उपक्रमांचे वैविध्य शाळेमध्ये नसल्याने, केवळ वर्गातील चार भिंतीत ‘घोका व ओका’ पद्धतीचे शिक्षण सुरू असल्याने, प्रत्यक्ष कामे करून, अनुभव घेऊन हे सर्व ताडून बघायला जागाच नसते. त्यामुळे विद्यार्थी काही निवडक प्रकारच्या अभ्यासक्रमांनाच संधी आहे असे समजून ठरावीक प्रकारच्या करिअर निवडण्याच्या मागे लागतात. मग त्यामध्ये लागणारे कौशल्ये त्यांच्याकडे असतातच असे नाही. यातून ताण निर्माण होतो. विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी ते केवळ दबावामुळे तयार होतात.
 
 
प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येकाची आवड, क्षमता, शिकण्याची पद्धत, व्यक्तिमत्त्व आणि जीवनध्येय वेगळे असते. काहींना संशोधनात आनंद मिळतो, काहींना नेतृत्वात, काहींना संगीत, कला किंवा क्रीडा आवडते, तर काही विद्यार्थी उद्योजकतेत किंवा समाजकार्यात उत्कृष्ट काम करू शकतात. परंतु आजच्या शिक्षणव्यवस्थेत सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापाने मोजले जाते. वर्गातील गुण आणि प्रवेशपरीक्षेतील क्रमांक यावरच विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरवली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्वतःच्या क्षमतांचा विचार न करता समाजाच्या अपेक्षांनुसार करिअर निवडतात.
 
 
भारतीय तत्त्वज्ञानात यालाच स्वधर्म ओळखणे असे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या नैसर्गिक गुणांना अनुरूप शिक्षण आणि कार्य निवडणे, हीच खरी प्रगतीची दिशा आहे. शिक्षणाने विद्यार्थ्याला इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःची क्षमता शोधण्यास मदत केली पाहिजे.
 
 
प्रवेश परीक्षांच्या पद्धतींचा पुनर्विचार आवश्यक
 
NEET, JEE  किंवा इतर राष्ट्रीय प्रवेशपरीक्षा पूर्णपणे बंद करणे व्यवहार्य नाही. भारतासारख्या विशाल देशात गुणवत्तेचे काही प्रमाणित निकष आवश्यकच आहेत. परंतु त्यांची रचना अधिक न्याय्य आणि विद्यार्थिकेंद्री असली पाहिजे. सर्वात मोठी समस्या म्हणजे या परीक्षा वर्षातून केवळ एकदाच होतात. अनेक वर्षांच्या मेहनतीचे मूल्यमापन केवळ तीन तासांत होते. त्या दिवशी आरोग्य, मानसिक ताण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, तर विद्यार्थ्याला पुन्हा संपूर्ण वर्ष वाट पाहावी लागते. ही व्यवस्था विद्यार्थ्यांवर अनावश्यक मानसिक दबाव निर्माण करते. यासाठी वर्षातून किमान दोन किंवा तीन वेळा परीक्षा घेण्याचा विचार व्हायला हवा. विद्यार्थ्यांची सर्वोत्तम कामगिरी प्रवेशासाठी ग्राह्य धरली, तर एका दिवसावरील अवलंबित्व कमी होईल आणि मानसिक तणावही लक्षणीयरीत्या घटेल.
 
प्रश्न विचारण्याची पद्धतही बदलली पाहिजे
 
आज बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामागे उत्तरपत्रिका जलद आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासण्याचा हेतू आहे. मात्र बहुपर्यायी प्रश्न म्हणजे केवळ पाठांतर असे अजिबात नाही. योग्य पद्धतीने तयार केलेले प्रश्न विद्यार्थ्याची संकल्पनात्मक समज, विश्लेषण क्षमता आणि निर्णयक्षमता प्रभावीपणे तपासू शकतात. बहुपर्यायी प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्याने तो पर्याय का निवडला हे समजून घेण्यासाठी प्रत्येक उत्तराला पुढे आणखी बहुपर्यायी उत्तरे देता येतात आणि विद्यार्थ्याने प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक दिले आहे की नाही हे तपासता येते. MKCLने या प्रकारची एक सुंदर प्रणाली विकसित केली आहे. त्याचा उपयोग केला पाहिजे. हा एक मार्ग झाला. पण बहुपर्यायी प्रश्नांची याशिवायही खूप वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करता येते आणि विद्यार्थ्यांचे मूलभूत विचार कौशल्य तपासता येते. आवश्यक माहिती प्रश्नपत्रिकेतच देऊन त्या माहितीचे विश्लेषण करण्यास सांगितले, तर विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेचे अधिक अचूक मूल्यमापन करता येते. यामुळे माहिती पाठ करण्यापेक्षा तिचा योग्य वापर करण्याला महत्त्व मिळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील PISAअसारख्या चाचण्या याच तत्त्वावर आधारित आहेत. काही आंतरराष्ट्रीय परीक्षा संगणकाधारित अनुकूलित (Adaptive) पद्धतीचाही वापर करतात. विद्यार्थ्याच्या उत्तरांनुसार पुढील प्रश्नांची काठिण्य पातळी बदलत जाते. त्यामुळे विद्यार्थ्याची खरी क्षमता अधिक अचूकपणे मोजता येते आणि परीक्षेतील अनावश्यक ताणही कमी होतो. आणि एकच एक ठरावीक अशी प्रश्नपत्रिकाच नसल्याने ती फुटण्याचा प्रश्नच येत नाही!
 
परीक्षेपलीकडील शिक्षण
 
प्रवेशपरीक्षा आवश्यक असल्या तरी त्या शिक्षणाचे अंतिम ध्येय असू शकत नाहीत. डॉक्टर, अभियंता किंवा इतर कोणत्याही व्यावसायिकाने केवळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवण्याची क्षमताच नव्हे, तर संवेदनशीलता, संवादकौशल्य, नैतिकता, नेतृत्व, संघभावना आणि सतत शिकण्याची वृत्तीही विकसित केलेली असावी. म्हणूनच शिक्षणव्यवस्थेने विद्यार्थ्याला केवळ प्रवेशपरीक्षेसाठी नव्हे, तर आयुष्यासाठी तयार केले पाहिजे. परीक्षा हा शिक्षणाचा एक भाग असू शकतो; परंतु शिक्षणाचा उद्देश कधीच असू नये.
 
 
भारतीय ज्ञानपरंपरा : सर्वांगीण शिक्षणाची दिशा
 
शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे, तर माणूस घडवणे, सर्वांगीण विकास अशी भारतीय शिक्षणपरंपरेची भूमिका होती. गुरुकुल पद्धतीत विद्यार्थ्याच्या स्वभाव, क्षमता आणि आवडीनुसार शिक्षण दिले जाई. गुरू हा केवळ विषय शिकवणारा शिक्षक नव्हता; तो विद्यार्थ्याचा मार्गदर्शक, संस्कारकर्ता आणि जीवनदृष्टी देणाराही होता. भारतीय ज्ञानपरंपरेतील पाणिनींचे व्याकरण, आर्यभट्टांचे गणित, सुश्रुतांचे वैद्यकशास्त्र, कौटिल्यांचे अर्थशास्त्र किंवा आग्नेय आशियापर्यंत पोहोचलेली भारतीय व्यापारी परंपरा ही केवळ माहितीची उदाहरणे नव्हेत; तर ती ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी असलेला संबंध दर्शवतात. या शिक्षणपद्धतीत ज्ञान, कौशल्य, मूल्ये, श्रम, समाजसेवा आणि नेतृत्व यांचा सुंदर समन्वय दिसून येतो. आज आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान स्वीकारताना या सर्वांगीण दृष्टीकोनाची पुनर्स्थापना करणे तितकेच आवश्यक आहे.
 
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : परिवर्तनाची संधी
 
भारतीय शिक्षणव्यवस्थेतील या मर्यादा लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यात आले. हे धोरण केवळ अभ्यासक्रम बदलण्याचा दस्तऐवज नाही; तर शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचा प्रयत्न आहे. या धोरणाचा केंद्रबिंदू म्हणजे निपुणताधारित शिक्षण (Competency-Based Education). विद्यार्थ्याने किती माहिती पाठ केली यापेक्षा तो त्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो, चिकित्सक विचार कसा करतो, वास्तव जीवनातील समस्यांचे निराकरण कसे करतो आणि नवोपक्रमाची क्षमता कशी विकसित करतो, याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी अनुभवाधारित शिक्षण, प्रकल्पाधारित अध्ययन, प्रयोग, चर्चा, सहयोगी अध्ययन, स्थानिक संदर्भांवर आधारित शिक्षण, कला-एकात्मिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण आणि बहुविषयक दृष्टीकोन यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. मात्र धोरणाची केवळ घोषणा करून परिवर्तन घडत नाही. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षकांचे प्रशिक्षण, पालकांची मानसिकता आणि समाजाचा दृष्टीकोन यातही बदल होणे आवश्यक आहे.
 
मूल्यांकनाचा बदलता दृष्टीकोन
 
भारतीय शिक्षणव्यवस्थेत सर्वाधिक बदल आवश्यक आहे तो मूल्यांकनात. आजही अनेकांसाठी मूल्यांकन म्हणजे परीक्षा, गुण आणि क्रमांक. परंतु शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्याला क्रमांक देणे नसून त्याच्या प्रगतीला दिशा देणे हा आहे. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 'Assessment of Learning'  ऐवजी 'Assessment for Learning' आणि 'Assessment as Learning' या संकल्पना मांडल्या आहेत. म्हणजेच मूल्यांकन ही केवळ शिकण्याची चाचणी नसून, शिकण्याला चालना देणारी आणि विद्यार्थ्याला स्वतःचे शिक्षण समजून घेण्यास मदत करणारी प्रक्रिया आहे. प्रकल्प, प्रयोग, सादरीकरण, पोर्टफोलिओ, निरीक्षण, स्वमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन आणि सातत्यपूर्ण अभिप्राय या माध्यमातून विद्यार्थ्याची प्रगती अधिक परिणामकारकपणे मोजता येते. याच विचारातून सर्वंकष प्रगतीपत्रक ( Holistic Progress Card) ही संकल्पना पुढे आली आहे. हे केवळ गुणपत्रक नसून विद्यार्थ्याच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक, कलात्मक, शारीरिक आणि नैतिक विकासाचे प्रतिबिंब आहे.
 
 
बहुतांश पाश्चात्य विद्यापीठात प्रवेश परीक्षेबरोबरच विद्यार्थ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी तपासली जाते. त्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत केलेले कार्य लक्षात घेतले जाते. त्याला शिकवायला असणार्‍या अध्यापकांकडून पाठ्यक्रमेतर गुणांविषयी माहिती करून घेतली जाते आणि मगच प्रवेश अंतिम होतो. भारतातही असे करणे आवश्यक आहे. त्यासाठी नुकत्याच सुरू केलेल्या ‘क्रेडिट बँक’चा आधार घेता येईल.
 
शिक्षकाची बदलती भूमिका
 
शिक्षणातील कोणतेही परिवर्तन शिक्षकांशिवाय शक्य नाही. भविष्यातील शिक्षक हा केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारा नसून विद्यार्थ्याचा मार्गदर्शक, प्रेरक, संशोधनाचा सहप्रवासी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा शिल्पकार असला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्याला माहिती देऊ शकते; परंतु जिज्ञासा जागवणे, मूल्यांची जपणूक करणे, संवेदनशीलता विकसित करणे आणि विद्यार्थ्याला योग्य दिशा देणे हे कार्य केवळ शिक्षकच करू शकतो. म्हणूनच शिक्षक प्रशिक्षण, व्यावसायिक विकास, शैक्षणिक स्वायत्तता आणि संशोधनाभिमुख अध्यापन यांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे. कितीही जरी ऑनलाईन वर्ग सुरू झाले, तरी त्यांची सर्वसाधारण यशस्वीता केवळ 15% इतकीच आहे. शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तर हे प्रमाण त्याहूनही कमी असते; कारण या वयोगटातील विद्यार्थ्यांची प्रेरणा टिकून राहण्यासाठी बाहेरील मदत लागतेच लागते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही उपयोग करून शिक्षण व्यक्तीसापेक्ष केले तरी प्रेरणा कशी टिकवणार हा प्रश्न उरतोच.
 
भविष्यातील शाळा कशा असतील?
 
भविष्यातील शाळा म्हणजे केवळ वर्गखोल्या किंवा परीक्षा केंद्रे नसतील. त्या कार्यानुभव, नवोपक्रम, संशोधन, प्रयोग, उद्योजकता, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजसेवा यांची केंद्रे असतील. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार वैयक्तिक शिक्षणरचना उपलब्ध असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल साधनांच्या साहाय्याने प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकेल. व्यवसाय शिक्षण हा दुय्यम पर्याय न राहता मुख्य प्रवाहाचा भाग होईल. प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय शिक्षण पूर्ण करताना किमान एक कौशल्य आत्मसात केले असेल. आर्थिक साक्षरता, उद्योजकता, पर्यावरण-जाणीव, सामाजिक उत्तरदायित्व आणि नेतृत्व ही शिक्षणाची अविभाज्य अंगे असतील.
 
समाजाचाही दृष्टीकोन बदलला पाहिजे
 
शिक्षणव्यवस्था बदलण्याइतकेच समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आजही अनेक पालक यशाचे मोजमाप केवळ गुण, प्रवेशपरीक्षा आणि प्रतिष्ठित नोकरी यांवर करतात. डॉक्टर, अभियंता किंवा प्रशासकीय अधिकारी होणे हीच यशाची व्याख्या मानली जाते. परंतु विकसित भारत घडवण्यासाठी उत्कृष्ट संशोधक, वैज्ञानिक, शिक्षक, उद्योजक, कलाकार, कृषी-तंत्रज्ञ, सामाजिक उद्यमी आणि कुशल कारागीर यांचीही तितकीच आवश्यकता आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते. सर्वांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न हा शिक्षणाचा उद्देश असू शकत नाही. शिक्षण हे प्रत्येकाला स्वतःचा मार्ग शोधण्याची संधी असते, हा विचार पोहोचवला पाहिजे.
 
परीक्षा नव्हे, तर शिक्षण बदलण्याची वेळ
 
NEET पेपरफुटीच्या घटनेने देशाला धक्का दिला. पण हा धक्का केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा नाही; तो आपल्या संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. परीक्षा- प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्या पाहिजेत, यात दुमत नक्कीच नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मात्र एवढ्यावरच समाधान मानणे म्हणजे मूळ रोगावर उपचार न करता केवळ लक्षणांवर औषध देण्यासारखे होईल. भारतीय ज्ञानपरंपरेने पंचकोश विकसन प्रणालीव्दारे सर्वांगीण शिक्षणाची दिशा दिली आहे. ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ने त्या दिशेने वाटचाल करण्याचा आराखडा दिला आहे. आपल्याला अशी शिक्षणव्यवस्था उभी करायची आहे जी विद्यार्थ्याला केवळ गुण नाही तर ज्ञान देईल; स्पर्धेपेक्षा सहकार्य शिकवेल; पाठांतरापेक्षा विचार करायला प्रवृत्त करेल; प्रमाणपत्रापेक्षा निपुणतेला महत्त्व देईल आणि करिअरबरोबरच चारित्र्य घडवेल आणि हो स्वधर्म शोधायलाही मदत करेल! तेव्हाच भारत खर्‍या अर्थाने ज्ञानमहाशक्ती होण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करेल.
 
लेखक ज्ञान प्रबोधिनी प्रशालाचे प्राचार्य आणि ’महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण’चे सुकाणू समिती सदस्य आहेत.