भरकटलेल्या तरुणाईला स्वाभिमानाची वाट दाखविणारे दादाजी

विवेक मराठी    22-Aug-2026
Total Views |
 - मंजुषा रेडगांवकर
अलीकडेच पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यावर आधारित व त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती देणारे ‘देह झाला चंदनाचा‘ पुस्तक वाचण्यात आले, त्याबद्दल लिहावेसे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
 
swadhay parivar
 
स्वातंत्र्यानंतर तरुणांविषयी जे तीन महत्त्वाचे बदल आणि प्रश्न निर्माण झाले त्यात पहिला म्हणजे आजची तरुण पिढी उन्नतीच्या वाटेवर आहे की ती अवनतीच्या वाटेने जात आहे?
 
हा प्रश्न इथे उपस्थित होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे समाजात स्वातंत्र्यानंतर एकूणच वैचारिक स्थित्यंतर आलं म्हणजे स्वातंत्र्य काळात जन्मलेली आणि त्यानंतरची पिढी खरंतर सुवर्णस्पर्श झालेली होती.
 
गांधी, टिळक, सावरकर, भगतसिंग यांच्यासारखे आदर्श त्यांनी पाहिले होते, अनुभवले होते, एकूणच समाजात देशहित प्रथम, बाकी सगळे नंतर अशी भावना होती; पण मग त्या-त्या काळातल्या नेत्यांनी जो काही एका अर्थी भ्रष्टाचार, विश्वासघात केला त्यामुळे जनमानसावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम झाला. हळूहळू स्वतःचं बघा, देशाचं नंतर पाहता येईल अशी भावना व्हायला लागली.
 
पुढच्या पिढ्या तर याहून अधिक गंभीर परिस्थितीत सापडल्या. गरिबी, बेकारी, उपासमारी ह्या सगळ्या गोष्टींनी जणू त्या-त्या काळातला तरुण अपंग झाला, त्यांचा भ्रमनिरास झाला.
 
अशा अतिशय विलक्षण कठीण काळात येऊन परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी तरुण पिढीत एक नवा आशावाद जागवला.
 
स्वतःची उन्नती व्हावी असं जर एकूणच वाटत असेल तर संपूर्ण समाज उन्नत व्हायला हवा, सुसंस्कृत व्हायला हवा. त्याला हाताला काम आणि पोटाला घास मिळायला हवा ही शिकवण पू. दादांनी दिली. या भरकटलेल्या पिढीला जर सन्मार्गावर आणायचे असेल तर राज्य सत्तेकडून त्यांचा होणारा दुरुपयोग टाळावा लागेल, ज्या राज्य सत्तेने त्यांना देव धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधात उभं केलं आणि त्यामुळेच ते व्यसनाधीन झाले, त्यातच पाश्चिमात्यांची भोगवादी विचारधारा त्यांच्यात प्रबळ झाली.
 
त्यातूनच मग विद्रोह करण्याची वृत्ती बळावली. त्यामुळे ही पिढी सुकाणू विना नावेसारखी भर सागरात वाहवत गेली.
 
या तरुण पिढीला पू. दादांनी संस्कृतीच आदर्श दर्शन घडवलं, आपली परंपरा समजावून सांगितली. या परंपरेला जोपासण्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं आणि ते संरक्षण का करायचं हेही त्यांना सांगितलं.
 
त्यानंतर मात्र चमत्कार झाल्याप्रमाणे तरुण पिढीच्या उत्साहाला उधाण आलं. त्या उत्साहाला पू. दादांनी जोपासलं, वाढवलं, संगोपन केलं आणि त्यातूनच, त्यांनी स्वाध्याय परिवार उभा केला.त्यांनी संस्कार आणि अध्यात्म या नवीन संकल्पनेतून नवीन प्रयोग जन मानसांत रुजवला. त्यातून त्यांनी अनेक प्रयोग राबविले या सगळ्या प्रयोगांमध्ये मुख्यतः तरुण पिढीला त्यांनी मूळ रूढींचा लौकिक अर्थ आणि प्रयोजन शिकवले. मग तो तरुण शेतकरी असो, मासेमारी करणारा असो किंवा साधा मजुरीवर राबणारा असो, त्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान रुजवला.
 
त्यांना आपापल्या कार्याचं महत्त्व पटवून दिलं आणि प्रत्येक कार्यात देव आपल्या सोबतच आहे आणि म्हणूनच जे जे कार्य आपण करतो; त्यात देवाचाही सहभाग असल्यामुळे देवाला पंधरवड्यात आपल्या एका दिवसाची कमाई अर्पित करा, अशी शिकवण त्यांनी दिली आणि मग तो ईश्वरी वाटा गरीब, आजारी, उपाशी बांधवा करता उपयोगात आणावा.
 
स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांची मुलाखत
यंदा या पाठशाळेने शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले आहे. पाठशाळेची शंभर वर्षे आणि दादांच्या जीवनाचा आधारस्तंभ दादांची पत्नी पूजनीय निर्मलाताईंचे जन्मशताब्दी वर्ष एकत्र यावे, हा जगभरात विखुरलेल्या स्वाध्यायींसाठी एक दुर्मीळ आणि भाग्याचा योग आहे. त्यानिमित्ताने पांडुरंगशास्त्री आठवले आणि निर्मलाताई यांच्या सुपुत्री तसेच स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
 
 
या संकल्पनेतून त्यांनी ’वृक्षमंदिर’ आणि ’मत्स्यगंधा’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले.
 
’वृक्षमंदिर’ ही संकल्पना, खरंतर चमत्कार म्हणावा लागेल अशीच. अत्यंत खडकाळ जागेत, अनेक वृक्ष लावून आणि त्याची प्रत्येकानं आपापल्या परीनं देखरेख करून त्या जागेला अतिशय सुरेख असं हिरवगार रूप देण्यात तेथील तरुण शेतकरी बांधव यशस्वी झाले. ज्या जागी पाणीही नाही अतिशय कठीण जमीन, जिथे कुठलेही पीक घेणे अशक्य असे सगळ्यांना वाटत होते त्याजागी अतिशय परिश्रमपूर्वक रोपे लावली गेली आणि त्याला ’वृक्षमंदिर’ हे त्यांच्या भावनांशी साजेल असे नाव देऊन त्यांच्यातील ऊर्जेला योग्य आणि सम्मानीय दिशा दिली.
 
 
सर्व तरुण, आपण एक पुजारी आहोत या भावनेनं तेथे सेवा करू लागले. कुणीही तेथे मालक नव्हता आणि कुणीही मजूर नव्हता; जो पुढे येत होता तो फक्त त्या मंदिराचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. जो त्याच्या सोयीचा असलेला वार तिथे पूजेकरता देत होता अशाप्रकारे हजारो एकर जमीन जी कधीकाळी खडकाळ आणि नापीक होती तिथे घनदाट अरण्य निर्माण करण्यात या तरुण पिढीने महत्त्वाचे योगदान दिले.
 
दादाजी आणि मत्स्यगंधा प्रकल्प मत्स्यगंधा
 
पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी अनेक उपक्रम राबवले. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाज जागरणाच महत्त्वपूर्ण काम केलं.
 
swadhay parivar 
 
वडलांकडून, पूजनीय लक्ष्मणशास्त्री आठवलेंकडून दादाजींना भागवत गीता आणि उपनिषद अशा ग्रंथांचा वारसा मिळाला. त्यामुळे त्यांची एक वैचारिक बैठक तयार झाली. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींना ते गीतेच्या तत्त्वज्ञानाशी ताडून पाहात. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटना/दुर्घटना यांचा कार्यकारण भाव ते गीतेत शोधू पाहत. आजूबाजूला पसरलेल्या दैन्य दारिद्य्र दुःखाची उत्तरं गीतेत शोधू पाहत आणि इथेच दादाजींना एक सुंदरसा राजमार्ग सापडला, ’योगेश्वर कृष्ण’!
 
 
दादाजींच्या वडलांनी त्यांना प्राचीन वैदिक धर्माच्या धरतीवर ’तपोवन’ पद्धतीचे शिक्षण सुरू केलं होतं. त्या शिक्षण पद्धतीतून ते अतिशय तावून सुलाखून निघाले. त्यांनी वैदिक धर्माची मूलतत्त्व विश्वातील विद्वान, तत्त्वशील माणसांच्या समोर प्रतिपादित केली. त्यांना अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त संस्थांनी आणि त्यांच्या कर्त्याधरता लोकांनी त्यांच्या भूमीवर येऊन काम करण्याची संधी दिली; पण दादाजींना या गोष्टींची अतिशय जाणीव होती की आपल्या ज्ञानाची सर्वाधिक गरज आपल्या मातृभूमीला आहे आणि योगेश्वर कृष्ण स्वतः आपलं बोट धरून आपल्याला त्या मार्गावर घेऊन जात आहेत.
 
अशीच अनेक वर्षे उलटली दादाजींच्या अथक परिश्रमाचे फळ असेल किंवा साक्षात श्रींची इच्छा असेल दादाजींच्या हस्ते स्वाध्याय परिवाराची स्थापना झाली.
 
महाराष्ट्र आणि गुजरात ही प्रामुख्याने स्वाध्याय परिवाराची कर्मभूमी आहे. परम श्रद्धेय दादाजींचा सारा भर ’योगेश्वर’ अर्थात कृष्णाने सांगितलेल्या कर्म योग सिद्धांतावर असे. ’कर्म कर , फळाची चिंता करू नकोस’ असा उपदेश दादाजी करत असत. ’श्रीमद्गवतगीता’, ’उपनिषद’ आणि ’पतंजली’ने सांगितलेल्या योगसूत्राचा उपदेश सामान्य माणसाला कळेल, अशा साध्या सोप्या भाषेत दादाजी करत.
 
 
swadhay parivar
 
दानधर्माकडे दादाजींचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. ते दानधर्माच्या विचारसरणीवर कडाडून टीका करीत असत. त्यांचा युक्तिवाद असा होता की, ’दानधर्म’ हा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी बुजवायला असमर्थ आहेत. ’गरिबांना दान दिलं गेलं पाहिजे’, या विचाराला त्यांनी नेहमीच विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की, यातून गरीब नेहमी कुणा ना कुणावर अवलंबून राहील; तो स्वतःची भाकरी स्वतः कमावून खाण्यासाठी समर्थ होणार नाही. यामुळे त्याच्यातला स्वाभिमान संपूर्णपणे नष्ट तर होईलच; पण त्याला स्वतःची खरी किंमत कधीच कळणार नाही. समाजातले धनदांडगे, पुढारी नेहमी या गरजू वर्गाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतील. त्यासाठीच या गरिबांची अशी चळवळ उभी केली पाहिजे जी त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करेल, त्यांचं आर्थिक, पारमार्थिक आणि सामाजिक या सर्व स्तरांवर उत्थान करेल. ह्या विचारसरणीतूनच त्यांनी मासेमारी करणार्‍या कोळी बांधवांसाठी ’मत्स्यगंधा’ हा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी कोळी बांधवांना आत्मनिर्भरतेचा महत्त्वपूर्ण धडा दिला. कोळी बांधवांच्या मनात एक न्यूनगंड होता की, ’आम्हाला शिक्षण नाही, आमच्याजवळ कुठलीही संस्कृती नाही. आमच्या लोकांना अनेक व्यसनं आहेत. आम्ही खालच्या जातीचे आहोत; तर आमची भक्ती देवाला कशी मान्य होईल?’
 
त्याला अतिशय सुरेख उत्तर पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी दिलं. ते म्हणाले, ”अरे वाल्या कोळी तुमचाच ना? त्यानं रामायण लिहिलं. कोळी कन्यकेचा मुलगा व्यास त्यांनी महाभारत लिहलं. तुम्ही स्वतःला निकृष्ट समजू नका. आपण श्रेष्ठ आहोत अशी अस्मिता उराशी बाळगा.” ...आणि मग त्यानंतर या सागरपुत्रांमध्ये एकदम आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी आपलं कौशल्य ’योगेश्वर कृष्णा’च्या पायी वाहिलं आणि त्यातून आपलं कसब, आपली निपुणता बोट बांधण्यात लावली.
 
 
हे सगळे चमत्कार मात्र एका रात्रीत घडले नाही. त्याकरिता दादाजींना त्यांच्या कोळीवाड्यात जाऊन, त्यांच्या घरी मुक्काम करून, हे कार्य मार्गी लावावं लागलं. त्यांनी त्यांच्या वाईट सवयी सोडवण्याचा हळूहळू प्रयत्न केला. जे कोळी बांधव सतत दारू, जुगार, हाणामारी आणि घरात कलह करीत होते; त्यांना त्यांनी सन्मार्ग दाखवला. त्यांच्याकडून योगेश्वर कृष्णाला निमित्त काम करवून घेतलं. आपल्याबरोबर आपला भगवंत सतत कार्यरत असतो तेव्हा त्याला स्मरून चुकीचा मार्ग प्रत्येकानं सोडून एक दुसर्‍याची साहाय्यता करण्याचा सन्मार्ग निवडला पाहिजे.
 
 
हळूहळू त्या कोळी बांधवांमध्ये परिवर्तन घडत गेलं. त्यांनी पंधरवड्यातली एका दिवसाची आपली कमाई दादाजींना आणून सुपूर्द केली. दादाजींनी कोळी बांधवांना असे सांगितले की, ’त्याच कमाईतून तुम्ही नवीन बोटी बांधा आणि त्या बोटींतून होणारी कमाई ही योगेश्वराची कमाई आहे; हे समजून त्यातून आपल्या समाजातील गरजू, आजारी, अशिक्षित बांधवांची मदत करा.
 
हळूहळू त्यांच्या शिकवणीचा व्यापक प्रभाव दिसू लागला. ज्या गावात सतत लोक मारामार्‍या करीत असत; ते गाव ’तंटामुक्त’ हे बिरुद मिरवू लागले. कोणीही त्या गावात उपाशी किंवा कष्टानं पिचलेला असा राहिला नाही.
 
अनेक बोटी आणि त्या बोटींवर आलटून पालटून कामं करणारे लोेेक आपल्या कमाईतून प्रकल्प राबवत होते. अनेक गावांचा हळूहळू कायापालट होत गेला.
 
 
अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्य पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी कोळी बांधवांकडून करून घेतले. त्यात्या गावातील समुद्रकिनारी बांधवांचं जीवनमान त्यामुळे उंचावलं. त्यांच्यात आपणही मोठ्या लोकांसारखं दान करू शकतो ही भावना बळावत गेली. ...आणि त्यांनी खरोखरंच श्रमदानातून अनेक कार्य केलं. या सगळ्याचं श्रेय पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचं आहे, हे निःसंशय!
 
- मंजुषा रेडगांवकर