तुमको ना भूल पायेंगे

विवेक मराठी    25-Aug-2026   
Total Views |

Copyright
अप्रतिम गाणी एकदा लिहून झाली, स्वरबद्धही करून झाली; पण त्यांच्या अवीट गोडीनं जर ती गाणी चिरंतन होणार असतील, तर गीतकार संगीतकार यांना एकदाच पैसे मिळाले की विषय संपवायचा का? संगीत कंपन्या मात्र वर्षानुवर्षे गाणं वाजवून पैसे मिळवत राहणार, हे पटतं का? वर या संगीत कंपन्या रिमिक्स वगैरे करायचा सोस ठेवणार तो वेगळाच. तर हा लेख रॉयल्टी, कॉपीराईट विषयावरचा शेवटचा लेख.
सुमारे 15 वर्षांपूर्वी ’व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी’ नावाचं गाणं आलं होतं. धनुष नावाच्या अभिनेत्यावर ते चित्रित झालं होतं आणि उभ्या भारतवर्षाला त्यानं वेड लावून ठेवलं होतं. कोलावरी गाण्याची झिंग चढली होती. गाणं तमिळ होतं; पण ऐकण्यात कोणालाही काही फरक नाही पडला. तरीही आजही हे गाणं खरोखरीच चवीनं ऐकलं जाईल का?
 
 
अंताक्षरी खेळायला पस्तिशीतली तरुण मंडळी बसतात तेव्हा ती त्यांच्या पंधरा वर्षांच्या असतानाची गाणी का गात नाहीत? त्यांना जन्माच्या वीस-वीस वर्षं आधीची गाणी का लागतात? 80च्या दशकांत जन्मलेल्यांना अजूनही 1960 आणि 70च्या दशकांतली गाणी कशी काय गाण्यांच्या भेंड्यांत लागतात? आणि एवढंच नाही तर देव आनंदच्या गाण्यांची गोडी प्रत्येकदा ऐकताना वाढत कशी जाते किंवा तेवढीच का राहते? किशोरकुमारचा फॅन बेस दरवर्षी कसा काय वाढतो? आशाताईंच्या गाण्यांना दरवर्षी कॉलेजची मुलं कशी काय नव्यानं ऐकू लागतात? ’लावण्यरेखा’ या कवितेत बा. भ. बोरकर सहज सांगून जातात, ’देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे...’ ही गाण्यांचीच किंवा चित्रपटांची न संपणारी यादी तशाच देखण्या हातांची.
 
 
पण इथे विषय फक्त कलात्मक नाही तर गंभीरही होतो.
 
काही कला घडत असतात. पण त्या घडल्या की ’घडून झाल्या’ हे म्हणणं पाप आहे. त्या पुन्हा-पुन्हा घडत राहतात. सामन्यात: अपघातांबद्दल म्हटलं जातं, तो एकदा होतो आणि कसा घडला हे सांगताना तो पुन्हा पुन्हा होत असतो; पण हे अत्यंत दुर्दैवी वाटणारं उदाहरण या सृजनाच्या निर्मितीच्या बाबतीत तेवढ्याच विरुद्ध पद्धतीने अनुभवास येत नाही का? ही अप्रतिम गाणी एकदा लिहून झाली खरी, स्वरबद्धही करून झाली; पण त्यांच्या अवीट गोडीनं जर ती गाणी चिरंतन होणार असतील, तर गीतकार संगीतकार यांना एकदाच पैसे मिळाले की विषय संपवायचा का? गाणं चालू राहतं, मनाच्या गाभार्‍यात कधी गुदगुल्या करतं, कधीकधी रडवतं, कधी प्रसन्न करतं, तर कधी कधी फक्त आपलं मन रमवतं, (भले त्या वेळेत आपला व्यायाम चालू असेल). ही निर्मिती सहजसोपी नसते. त्याच्याही प्रसूतिकळा असतात, त्याचंही मातृत्व असतं. प्रत्यक्ष आयुष्यात जन्माला घातलेली व्यक्ती आयुष्यभर आपली असते. (आता तर कायद्याने आपण त्यांना आपलं मानू शकतो आणि आपली सेवा करायला लावू शकतो.)
 
 
पण हेच तत्त्व मग गीतकार संगीतकाराला का बरं नाही? म्हणजे ’बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात...’ हे एकदा तयार करून झालं म्हणजे गीतकार वा.रा. कांत, संगीतकार श्रीनिवास खळे आणि गायक वसंतराव देशपांडे यांचं योगदान संपतं? ते गाणं असंख्य ठिकाणी असंख्य वेळा वाजवलं गेलं आणि किमान काही कोटींनी याचा आनंद घेतला, अजूनही घेतील. मग एकदा काय ती काही हजारांची बिदागी मिळाली की या तिघांना दूर लोटायचं? आणि संगीत कंपन्या मात्र वर्षानुवर्षे गाणं वाजवून पैसे मिळवत राहणार, हे पटतं का? वर या संगीत कंपन्या रिमिक्स वगैरे करायचा सोस ठेवणार तो वेगळाच. (रचनाकाराचे नैतिक अधिकार विषय इकडे लागू होतो ज्याचा ऊहापोह आपण मागील एका लेखात केला होता). विषय रॉयल्टीचा आहे हे वाचकांना एव्हाना लक्षात आलं असेलच.
 

Copyright 
प्रगत राष्ट्रांसारखी ’अशी निर्मिती ही आपली बैद्धिक संपदा असते’ ही संकल्पनाच आपल्याकडे रुजायला कित्येक दशकं जावी लागली. त्यापायी चित्रपटसृष्टीची सेवा करणारे कित्येकजण विपन्नावस्थेत इहलोकाचा निरोप घेते झाले. असं नाही की पूर्वी अजिबात रॉयल्टी नसे; पण असायची ती जेमतेम. खेमचंद प्रकाश नावाच्या गीतकाराच्या नावानं काही हजार रुपयांची रॉयल्टी आली तेव्हा ते जगात नव्हते आणि त्यांची पत्नी मालाड स्टेशनवर भीक मागताना आढळली. ओ.पी. नय्यरांसारखा संगीतकार, जो आपल्या अटी शर्तींवर जगला, फोफावला आणि संगीत जगतात राज्यकर्ता झाला; तो ठाण्यात एका चाहतीकडे पेयिंग गेस्ट म्हणून राहत होता आणि त्यांची गाणी मात्र त्याच वेळी ’आसेतु हिमाचल’ दशदिशांमध्ये दुमदुमत होती. शैलेंद्र आणि अशा अनेक गीतकारांनी काही वेगळे भोग नाही सोसले. त्याच वेळी अमेरिकेत बीटल्स संघ 1969-70मध्येच फुटला; पण 27 गाणी लिहिणार्‍या एका गीतकाराला काही दशलक्ष डॉलर्सची बिदागी रॉयल्टी म्हणून मिळाली.
 
 
भारतात याविरुद्ध आवाज उठवला गेला नाही, असं नाही; पण भरात असणार्‍या कलाकारांनी आवाज उठवल्याची उदाहरणं दिसत नाहीत. ज्यांना गरज पडली त्यांचं कर्तृत्व थांबलं होतं. अशा वेळेस यासाठी तिघांनी प्रथम बुलंद आवाज उठवला. भारतरत्न रवी शंकर, ऑस्कर विजेता ए.आर. रेहमान आणि संसदेत जावेद अख्तर. यांचा आवाज तत्कालीन भारत सरकारला ऐकावाच लागला. त्याच वेळी परदेशी कंपन्याही अशा लोकांबरोबर काम करत होत्या आणि देशाचे कायदे सक्षम नसल्याने त्याही सरळ शोषण करू शकत होत्या. यांचं म्हणणं असं की, निर्माता गाण्याचं शूटिंग वगैरे त्या त्या ठिकाणी करायला जातो तेव्हा त्याचं श्रेय पूर्ण आहे; पण असं असेल तर ते गाणं वर्षानुवर्षे केवळ ‘ऐकलं’ जातं, बघितलं जात नाही, त्याचं काय? पुढे चित्रपट क्षेत्रातल्या मोठमोठ्या नावांनी एकत्र येऊन मोठ्या कायद्याची मागणी केली आणि त्यातून डिजिटल युगातील आव्हानं आणि कलाकारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी व्यापक बदल करण्यात आले.
 
 
* गाण्याचे मूळ लेखक आणि संगीतकार यांना चित्रपटातील गाणी किंवा संगीत इतर माध्यमांमध्ये (उदा. एफएम रेडिओ, टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म) वापरल्यास 50% रॉयल्टी मिळण्याचा वैधानिक अधिकार. ...आणि हा रॉयल्टीचा अधिकार उत्पादकांकडे किंवा म्युझिक कंपन्यांकडे पूर्णपणे हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.

* डिजिटल साहित्य चोरीपासून वाचवण्यासाठी लावलेले डिजिटल लॉक (उदा. एनक्रिप्शन) बेकायदेशीरपणे उघडणं हा आता शिक्षापात्र अपराध ठरवण्यात आला.

* तसंच डिजिटल साहित्यावरील प्रताधिकारविषयक माहिती किंवा डिजिटल स्वाक्षरी काढणे किंवा बदलणे बेकायदेशीर ठरवले गेले.

* लेखकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी व्यावसायिक कॉपीराईट सोसायट्यांची पुनर्रचना आणि त्यांचं नियंत्रण लेखकांच्या/संगीतकारांच्या हाती राहील याची खात्री करण्यात आली. शिवाय सोसायट्यांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी नियम कडक करण्यात आले.

* रेडिओ आणि टीव्ही ब्रॉडकास्टर्सना संगीत किंवा ध्वनीमुद्रण प्रसारित करण्यासाठी ’कॉपीराइट बोर्ड’ने ठरवलेल्या दराने परवाना मिळवण्याची सोय करण्यात आली.

* ज्या कलाकृती लोकांपर्यंत सहज पोहोचत नाहीत किंवा ज्यांचे मालक वाजवी कारणाशिवाय परवानगी नाकारतात, त्यांच्यासाठी अनिवार्य परवान्याची तरतूद कडक करण्यात आली.
 
या दुरुस्ती कायद्यांमुळे भारतातील कलाकार, गीतकार आणि संगीतकारांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
 
 
काळाच्या महिम्यात व्हिडिओ कॅसेट्स मागे पडल्या होत्याच. आता डिजिटल प्लॅटफॉर्मही सजग झाले. ’टीसीरीज’सारखी एखादी कंपनी आपल्या चित्रपटातल्या संगीताला किंवा दुसर्‍या एखाद्या भागाला कोणी ’एमपी-4’मध्ये रूपांतरित करून इन्स्टा-फेसबुकवर तर टाकत नाहीये ना याबद्दल सजग झाली. समाजमाध्यमांत कॉपीराईटचा भंग होत नाहीये ना याची काळजीही युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म्स घेऊ लागले. ’एमपी-3’ काळाच्या ओघात संपल्या. असंख्यवेळा वाजणार्‍या कॅसेट्स आणि ऑडियो सीडीज आता दिसत नाहीत. अ‍ॅपल म्युझिक, (अ‍ॅमेझॉन) प्राईम म्युझिक स्वान, स्पॉटीफायच्या महिना ठरावीक रक्कम भरून हवी ती गाणी हवी तेवढ्या वेळा ऐकता येतात. नेटफ्लिक्स असो, जिओ हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राईम, यूट्यूब वा सोनी लिव्ह, सिनेमाही असंख्यवेळा बघता येतो. नव्या काळाचा आनंद लुटणं असो वा जुन्या काळाच्या नावाने उसासे, त्यातून जुन्या निर्मितीच्या हातांना आता पेन्शन मिळतं तर नव्या दमाच्या कलाकारांना प्रोत्साहन. ए.आर. रेहमानने तर एका मृत गायकाचा आवाज एआयवर तयार करून त्याकरवी गाणं गाऊन घेत त्या गायकाच्या घरी बिदागी पाठवली. (नव्या काळाच्या आव्हानांची यानिमित्ताने जाण व्हावी.)
 
 
’तुमको न भूल पायेंगे’ हे नव्या अर्थाने आलं. पूर्वी रसिक श्रोते कलाकारांना म्हणत आता संगीत कंपन्याही कलाकारांना हे म्हणून लागल्यात. पूर्वीची ’एमपी-3’ गाणी, पायरेटेड कॉप्या आता वाईट सवयी मानून विसरायला झालंय.
 
कॉपीराईट विषयावरचा हा शेवटचा लेख हातावेगळा करताना ’रामायण’ सिनेमाच्या निर्मात्यांनी ए.आर. रेहमान आणि हंस झिमरने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे हक्क टीसीरीजला विकले ज्याची सुरुवातीची देवाणघेवाण तब्बल 75 कोटी रुपयांची आहे. अशा प्रकारे धर्मपुरुषाबरोबर अर्थपुरुषाचीही काळजी घेतली गेली... यात आनंद मानायला हवा.

डॉ. अपूर्वा फडके

डॉ. अपूर्वा फडके  या नोंदणीकृत पेटंट एजंट, पीएचडी, एलएलबी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.