गोधनाच्या सेवेतले ‘रत्न’ शोधण्याची वेळ

विवेक मराठी    25-Aug-2026
Total Views |

cow
 
 
देशातील देशी गोवंशीय जातींचे संवर्धन, त्यांचा शास्त्रीय पद्धतीने विकास आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या शेतकरी, दुग्ध उत्पादक संस्था आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ’राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2026’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांसाठी 10 ऑगस्ट 2026पासून ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, 10 सप्टेंबर 2026पर्यंत इच्छुक पात्र व्यक्ती व संस्थांना अर्ज करता येणार आहेत.
 
 
देशातील देशी गोवंशीय जातींचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि विकास करण्यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर 2014मध्ये ’राष्ट्रीय गोकुळ मिशन’ सुरू केले. या मिशनअंतर्गत 2021पासून दरवर्षी ’राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कार प्रदान केले जात आहेत. यंदा पुढील तीन प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. पात्र शेतकरी, दुग्ध उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना आपल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल मिळवून देण्यासाठी ‘गोपाल रत्न’ पुरस्कारासाठी नामांकन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
 
 
ईशान्य भारतातील राज्ये तसेच हिमालयीन राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी विशेष पुरस्काराची तरतूद करण्यात आली आहे. या भागांतील दुग्ध व्यवसायाच्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीचा विचार करून स्थानिक पातळीवरील उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन देणे हा त्यामागील उद्देश आहे.
 
 
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 2 लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात येईल.
 
 
याशिवाय ईशान्य क्षेत्र तसेच हिमालयीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी 2 लाख रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. मात्र, ’सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ या श्रेणीतील विजेत्याला प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. या श्रेणीसाठी रोख पुरस्काराची तरतूद करण्यात आलेली नाही.
 
 
’राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2026’साठी पात्र व्यक्ती आणि संस्थांना ऑनलाईन नामांकन करता येणार आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झालेली नामांकन प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 रोजी समाप्त होईल. त्यामुळे पात्र शेतकरी, दुग्ध उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी अंतिम मुदतीपूर्वी आपले नामांकन साद करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नामांकनासाठी awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. याशिवाय पुरस्काराची पात्रता, निवड निकष आणि सविस्तर मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या पुरस्कारांचे वितरण 26 नोव्हेंबर 2026 रोजी राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त करण्यात येणार आहे. आपल्या कार्याची दखल देशपातळीवर घ्यावी, अशी क्षमता असलेल्या शेतकरी, संस्था आणि तंत्रज्ञांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
 
 
- प्रतिनिधी