DRDO
9881253425
1 सप्टेंबर 1958 या दिवशी स्थापन झालेली एआरडीई ही संस्था सध्या पाषाण येथे असणार्या विशाल परिसरात कार्यरत आहे. डीआरडीओ अंतर्गत काम करणार्या या संस्थेच्या कार्याचा शास्त्रज्ञ आणि गन एक्सपर्ट काशिनाथ देवधर यांनी घेतलेला धावता आढावा.
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्र्रिटीश सत्तेच्या कार्यकाळात त्यांचे तज्ज्ञ अधिकारी वेगवेगळ्या दारूगोळा कारखान्यांमध्ये उत्पादन करून घेत असत. त्यांच्या हाताखाली काम करणारा कामगार वर्ग फक्त भारतीय होता. तरीही दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर इसवी सन 1935 ते 1943 या काळात दारूगोळा व शस्त्रास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असे. तेव्हा अशा कारखान्यांमध्ये आयुध निरीक्षणालय (आर्मामेन्ट इन्स्पेक्टरेट) हे ईशापूर, काशीपूर, जबलपूर व खडकी येथील कारखान्यांमध्ये होते व त्यांचे काम असे होते की गुणवत्तापूर्ण उत्पादन होते की नाही हे पाहणे, काही त्रुटी असतील तर त्यावर उपाययोजना करणे आणि आवश्यकतेनुरूप थोडे अभिकल्पनातील (Design) तात्पुरते बदल करून अडलेले काम पुढे चालू करून देणे इतपतच होते. या काळात कारखान्यातील उत्पादनात खूपच वाढ झाली होती व सन 1943-1946 या काळात चीफ इन्स्पेक्टरेट्स (मुख्य निरीक्षणालये) स्थापन केली गेली. त्यात लघुशस्त्रांसाठी-ईशापूर, तोफांसाठी-जबलपूर व दारूगोळ्यासाठी-खडकी, पुणे ही मुख्य निरीक्षणालये या पद्धतीने कार्यरत होती.
1946 ते 1958 या कालावधीत तंत्रज्ञान विकास संस्थापना (Technical Development Establishment-TDE) निर्माण करून त्याअंतर्गत, TDE (शस्त्रास्त्रे)-जबलपूर येथे व TDE (गोलाबारूद)-खडकी, पुणे येथे कार्य सुरू झाले; परंतु 1947 नंतर सर्व ब्रिटीश अधिकारी व चार्जमन पदापर्यंतचा कर्मचारी वर्ग भारत सोडून निघून गेला व तो खरा परीक्षा घेणारा कठीण काळ होता. कारण कर्मचारी वर्ग सोडून गेला होता व तेथे कार्यरत असणार्या भारतीयांवर ती जबाबदारी येऊन पडली होती. त्यामुऴे खूप प्रयोग व कष्ट करुन जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते आत्मसात करुन त्यामध्ये असणार्या उणिवा दूर करणे आणि संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे ही जबाबदारी TDE ला सांभाळावी लागली.
उत्पादनाकडे लक्ष देणारे संशोधन व नवीन निर्माण करणे अवघड वाटू लागल्याने मध्यंतरी तंत्रज्ञान विकास व उत्पादन निदेशालय (Technical Development and Production Directorate) आणि रक्षा विज्ञान संगठन या संस्था कार्यरत होत्या. 1 जानेवारी 1958मध्ये या संस्था/संघटन एकत्र करून ’रक्षा अनुसंधान तथा विकास संगठन’ची (DRDO) स्थापना केली गेली व 1 सप्टेंबर 1958 या दिवशी ’आयुध अनुसंधान तथा विकास संस्थापन’ (ARDE) ही संस्था डीआरडीओ या अंतर्गत केवळ शस्त्रांस्त्राचे संशोधन व विकास यासाठी स्थापन केली गेली. अशी ही पूर्वपरंपरा ARDEच्या स्थापनेमागे आहे. TDEचे काम विभागले गेले, त्याच दिवशी ’मुख्य आयुध निरीक्षणालय’ची (CIA) स्थापना झाली व राहिलेले काम म्हणजे उत्पादकतेशी निगडित काम CIAकडे गेले.
सुरुवातीस तरीही अॅम्युनिशन फॅक्टरी खडकीच्या आवारात एआरडीईचे कामकाज चाले. केवळ 12 अधिकारी, 33 अराजपत्रित अधिकारी व 190 कर्मचारी असे एकूण सव्वादोनशे जणांनी कामाला सुरुवात केली. 78 प्रकल्प (अनुसंधान व विकास) जे TDE (WPN) व TDE (Ammn) यांच्याकडून घेतले गेले. विषय व कामानुरूप विभाग करून त्यात काम सुरू झाले. उदाहरणार्थ: बॅलेस्टिक, लघुशस्त्र, तोफ अभिकल्पन, रॉकेट, दारूगाळा, नौदलीय शस्त्रास्त्रे, वायुदलीय शस्त्रास्त्रे तसेच प्रशासकीय, सुरक्षासाठी सेवा, प्रारूप उत्पादन, भंडार आदी विभागांमध्ये काम चालू झाले. पहिली बारा वर्षे प्रामुख्याने सेवेत असलेली शस्त्रास्त्रे व दारूगोळा या पाठीमागील विज्ञान व तंत्रज्ञान समजावून घेण्यात गेले. नंतरचे दशक हे असलेल्या शस्त्रास्त्रांचे आयुष्यमान वाढविणे, त्यातच सुधारणा करणे व भरपूर प्रमाणात प्रयोग करून अनुभवविश्व वाढवणे यामध्ये गेले.
त्या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.कै. यशवंतराव चव्हाण हे नंतर केंद्रीय संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांच्या प्रयत्नातून ARDE च्या जागेचा प्रश्न सुटला व पाषाण येथील विस्तीर्ण परिसरात आवश्यक ती प्रयोगशाळा, कार्यशाळा, चाचण्यांसाठी लागणारी फायरींग रेंज (Firing Range) अशा विविध सुविधा व मुख्य इमारत तयार झाली. 16 मे 1970 या दिवशी तत्कालीन रक्षा मंत्री मा. स्वर्णसिंग यांचे हस्ते उदघाटन झाले; ARDE चे कार्य अधिक जोमाने पाषाण येथे सुरू झाले.
तिसर्या दशकात (1980-90) आपण प्रामुख्याने उलट अभियांत्रिकीचा(रिवर्स इंजिनियरिंग) उपयोग करून सेवेत असलेल्या शस्त्रास्त्र प्रणाली स्वत: तयार करण्यावर जास्त भर देत होतो. परंतु त्याच काऴात नवनवीन प्रकल्प घेण्यात आले ज्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करून सशस्त्र सेनादलांना आवश्यक ती शस्त्रास्त्रे व दारूगोळा स्वदेशी तंत्रज्ञानासह देण्यासाठी काम सुरू केले गेले.
अशा रितीने प्रामाणिक उद्देशाने कामाला सुरुवात केली. जसा आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला तसाच तो शस्त्रास्त्र व दारूगोळा या क्षेत्रातही स्वयंपूर्ण व्हावा व केवळ उत्पादनच नव्हे तर स्वदेशी तंत्रज्ञानही असायला हवे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून तिसर्या दशकाअखेरीस केवळ प्रकल्प न घेता मोठे कार्यक्रम घेऊन संशोधन सुरू झाले. ‘इन्सास’(INSAS) या लघुशस्त्र प्रणालीचा विकास, ‘पिनाक’ या बहुनलिका रॉकेट प्रक्षेपणप्रणालीचे संशोधन करून विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याचबरोबर अर्जुन रणगाडा याची तोफ व दारूगोळा अर्थात तोफगोळे-तेही रणगाडाविरोधी-अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हाती घेऊन संशोधन कार्य सुरू केले. हे कार्यक्रम सुरू असताना आधीची कामेही चालूच होती. उदाहरणार्थ - विविध तोफ गोळे विकास - यामध्ये मोर्टर बॉम्बचे सर्व प्रकार, विविध तोफांचे अनेक प्रकारचे तोफगोळे अतिविस्फोटक High Explosive) तिमिरनाशक (Illuminating), धूम्रपटल (Smoke) इन्फ्रारेड धूम्रपटल वगैरे प्रकार, त्याच बरोबर नौदलीय शस्त्रास्त्रे व वायुदलीय शस्त्रास्त्रे यामध्येही आधुनिक संशोधन करून, अद्ययावत शस्त्रास्त्रे निर्मिती करून, त्याच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेऊन त्यांची योग्यता, गुणवत्ता सिद्ध करून, ते विकसित केलेले स्वदेशी तंत्रज्ञान दारूगोळे कारखान्यांकडे हस्तांतरित करून त्रुटीविरहीत उत्पादन सुरू करून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी एआरडीईने पार पाडली आहे.
1990च्या दोन दशकांत म्हणजेच इ.स. 2000 दरम्यान प्रारूप शस्त्रे इनसास रायफल व अॅम्युनिशन (1995), पिनाक रॉकेट प्रक्षेपक व रॉकेट (2003), अर्जुन रणगाड्याची तोफ व त्याचे तोफगोळे अशा अनेक गोष्टी या दशकात तयार केल्या व पहिले काही नमुने करून प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या. यांपैकी काही शस्त्रास्त्रे व प्रक्षेपकप्रणाली असलेली वाहने बनवण्यासाठी आयुध निर्माणाबरोबरच सार्वजनिक क्षेत्र तसेच सरकारी, खाजगी कंपन्यांबरोबरही काम केले. नंतरची तब्बल दहा वर्षे सैन्यदलांबरोबर सतत संवाद साधत विविध प्रकारच्या सूचनांनुसार रचनेत बदल करून असंख्य वेळा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन चाचण्या घेतल्या व या अतिशय क्लिष्ट प्रणाली अखेर सैन्यदलांच्या सेवेत दाखल झाल्या. त्याचे आयुध निर्माणीच्या कारखान्यांकडे हस्तांतरण हे 2000-2010 या दरम्यान दहा वर्षांत करण्यात आले. आत्तापर्यंत इन्सासच्या रायफल अॅम्युनिशन, पिनाकचे लाँचर व रॉकेट तसेच अर्जुनच्या तोफा व तोफगोळे उत्पादित केले गेले आहेत. इनसास, 84 मिमी लाइट वेट लाँचर हे शस्त्र 1999च्या कारगील युद्धात वापरण्यात आले.
सुरुवातीस आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्रास्त्रे विकसित करण्याचा अनुभव नव्हता. एवढेच नव्हे तर तशा प्रकारचे संशोधन करण्याचा दृष्टीकोनही नव्हता. मात्र जसजशी गरज भासत गेली, तसतसे त्यात परिश्रमपूर्वक अभ्यास करून स्वदेशी तंत्रज्ञान वापरून शस्त्रास्त्रे निर्मिती केली गेली. अतिशय क्लिष्ट अशा विविध शस्त्रास्त्रप्रणालींबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधन करून मोठमोठे कार्यक्रम हाती घेतले व यशस्वी केले. जसे-सर्व भारतीय क्षेपणास्त्रांची युद्धशीर्ष (Warhead), इन्सास लघुशस्त्र परिवार, 155मिमी 52 कॅलिबर ATAGS-भारतीय मुलुख मैदान तोफ तसेच सुरूंग परिवार, निर्देशित पिनाक (गाइडेड पिनाका) इत्यादी. अद्ययावत व शत्रूच्या तोडीस तोड भारतीय शस्त्रास्त्रे एआऱडीई बनवत आहे; तसे कार्यक्रम सध्या सुरू आहेत.
60 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून एआरडीईने खालील विषयात प्रभुत्व मिळवले.
* गोळाबारूद, सुरंग, हातबॉम्ब वगैरे
* लघुशस्त्रे व अॅम्युनिशन
* रणगाड्याची तोफ व तोफगोळे
* उखळी तोफ व तोफगोळे
* क्षेपणास्त्रांसाठी युद्धशीर्ष
* विमानांद्वारा सोडण्याचे बॉम्ब
* मुलुखमैदान तोफ व तोफगोळे
* बॉम्ब फ्यूज
* शक्ती काडतुसे (विमानांसाठी लागणारी)
अशा सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रप्रणालींसाठी लागणारे खालील तंत्रज्ञान ही एआऱडीईमध्ये विकसित करून त्यावरही प्रभुत्व मिळवले.
* प्रक्षेपणशास्त्र (Ballistics)
* वायुगतिकीय शास्त्र (Aerodynamics)
* संवेदक शास्त्र (Sensors)
* दूरमापी शास्त्रे (Telemetry)
* उच्च ऊर्जा पदार्थ विज्ञान (High Energy Materials)
* अद्ययावत सामग्री विज्ञान (Material Science)
* सूक्ष्मीकरण शास्त्र (Miniaturization)
* अद्ययावत उत्पादन शास्त्र (Modern Production Technology)
एआरडीईने पुढील 30 वर्षांमध्ये कशा प्रकारची शस्त्रास्त्रे लागतील व त्यासाठी आणखी कोणकोणत्या शास्त्रामध्ये व तंत्रज्ञानामध्ये पारंगत होण्याची गरज आहे याचा एक आराखडा विकसित केला व त्यानुसार मार्गक्रमणा सुरू आहे. भविष्यकालीन युद्धांसाठीच्या सशस्त्र सेनादलांच्या गरजा लक्षात घेऊन शस्त्रास्त्रे विकास कार्यक्रम घेण्याचे योजिले आहे. यामध्ये शस्त्रास्त्रांबरोबरच खालील तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रणाली विकसित करण्याला प्राधान्य देण्यात येईल.
*आर्मामेंट इलेक्ट्रॉनिक्स
*मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स
*संगणकीय शास्त्र (Computer Science)
*संवेदक (Sensors)
*कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence)
*नियंत्रण अभियांत्रिकी (Control Engineering )
*निर्देशन व उपकरण अभियांत्रिकी (Guidance and Instrumentation Engg. )
*स्वयंचलित यांत्रिकीकरण(Automation)
अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व अद्ययावत शस्त्रास्त्रे विकसित करून भारतीय सैन्यदलांच्या भविष्यकालीन युद्धासाठीच्या शस्त्रास्त्रांच्या गरजा एआरडीई निश्चितच पूर्ण करेल व भारत देश या क्षेत्रात बलशाली स्वयंपूर्ण होईलच.
एआरडीईचे ब्रीद वाक्य आहे ‘सेवाओं की सेवा में’ (Service to the Services) हे प्रमाण मानूनच गेल्या सात दशकातील प्रचंड काम करून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले त्यामुळे शस्त्रास्त्रे खरेदीसाठी परदेशांत जाणारा पैसा वाचेल. या क्षेत्रात स्वत:च्या ताकदीवर आपण उभे राहू व अशीच देशसेवा एआरडीईकडून होईल यात काहीच दुमत नाही. अशीच परंपरा ठेवून एआरडीई उत्तरोत्तर प्रगती करेल.