मराठी भाषेची निस्सीम उपासक - वैयायोगिनी यास्मिन शेख

विवेक मराठी    27-Aug-2026
Total Views |
आरती देवगांवकर
वैयायोगिनी यास्मिन शेख म्हणजे व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ मराठी शुद्धलेखनाच्या आग्रही. त्यांनी व्याकरणाचे नियम सुलभ करून शुद्ध मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आयुष्यभर योगदान दिले. केवळ शाळा-महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांपुरते हे मर्यादित न राहता त्यांनी प्रकाशने, वृत्तपत्रे आणि नवोदित लेखकांसाठी मुद्रितशोधनाच्या शेकडो कार्यशाळा घेतल्या. त्यांनी तयार केलेला ‘मराठी शब्दलेखनकोश’ आणि ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ ही पुस्तके आजही मुद्रितशोधक, संपादक आणि लेखकांसाठी अधिकृत तरी सुलभ मार्गदर्शक मानली जातात. अशा या वैयायोगिनी यास्मिन शेख यांचे 24 ऑगस्ट 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख.

vivek
 
व्याकरण हा विषय ऐकला, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. नियमांचे जंजाळ, पाठांतराचा कंटाळा आणि चुका होण्याची भीती यामुळे अनेक जण शुद्धलेखनापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात; पण याच रुक्ष आणि कठीण समजल्या जाणार्‍या व्याकरणाला ज्यांनी अथांग प्रेमाने, मायेने आणि अत्यंत सोप्या भाषेत मराठी माणसाच्या घराघरांत पोहोचवले, त्या आदरणीय वैयायोगिनी प्रा. यास्मिन शेख बाई आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने मराठी भाषासृष्टीने एक अत्यंत दक्ष, अभ्यासू, आग्रही आणि तितकाच आपुलकीचा मार्गदर्शक गमावला आहे.
 
 
जन्माने ज्यू (बेने इस्रायल) असलेल्या जेरुश रूबेन विवाहानंतर यास्मिन शेख बनल्या. मूळची भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न असूनही त्यांनी मराठी भाषेला केवळ स्वीकारले नाही, तर तिला आपले मानून तिच्या समृद्धीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. मराठी माझी मातृभाषा आहे, असेच त्या म्हणत. व्याकरण म्हणजे केवळ नियमांची रुक्ष चौकट नव्हे, तर ते भाषेचे सौंदर्य वाढवणारे आणि अर्थ सुस्पष्ट करणारे गमक आहे, हा विचार त्यांनी आयुष्यभर रुजवला. त्यांची मराठी भाषेवरील भक्ती थक्क करणारी होती.
 
 
यास्मिनबाईंची संपूर्ण कारकिर्द ही मराठी भाषेच्या संवर्धनाला समर्पित होती. मुंबईतील ‘एस.आय.इ.एस.’ या महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका आणि पुढे विभाग प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ भाषेचे धडे दिले नाहीत, तर त्यांच्या मनात भाषेबद्दलची आवड निर्माण केली. शिक्षिका म्हणून काम करतानाच ’महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळा’च्या (बालभारती) मराठी भाषा अभ्यास गटाच्या सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी सोपे, सुटसुटीत आणि व्याकरणदृष्ट्या अचूक पाठ्यपुस्तक कसे तयार करावे, हे ठरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. केवळ शाळा-महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता त्यांनी प्रकाशने, वृत्तपत्रे आणि नवोदित लेखकांसाठी मुद्रितशोधनाच्या शेकडो कार्यशाळा घेतल्या. त्यांनी तयार केलेला ‘मराठी शब्दलेखनकोश’ आणि ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ ही पुस्तके आजही मुद्रितशोधक, संपादक आणि लेखकांसाठी अधिकृत तरी सुलभ मार्गदर्शक मानली जातात.
बाईंना 100 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा एक विशेष गौरवग्रंथ काढण्यात आला. त्यात अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांच्या आठवणी कृतज्ञतेने जागवल्या आहेत. अनेक मुद्रितशोधक बाईंचा उल्लेख ‘व्याकरणाची चालती-बोलती पाठशाळा’ असाच करतात. त्यांनी ज्यांना शिकवले असे तर कित्येक आहेतच; परंतु त्यांना न भेटता, न पाहता देखील अनेकांनी त्यांना गुरुस्थानी मानत त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे.
 
 
अनेकदा लोकांना वाटते, की व्याकरणाचे नियम पाठ करणे म्हणजेच भाषेचा अभ्यास; पण शेखबाई नेहमी सांगत आल्या होत्या की, भाषा ही साचलेले पाणी नसून वाहती नदी असते; ती जिवंत असते. नियम हे भाषेला अडवण्यासाठी नसून अर्थाची स्पष्टता जपण्यासाठी असतात, हे त्यांनी साध्या उदाहरणांतून पटवून दिले. उदा. ‘दिन’ (दिवस) आणि ‘दीन’ (गरीब) किंवा ‘पाणि’ (हात) आणि ‘पाणी’ (जल) यांमधील केवळ एका वेलांटीच्या फरकाने वाक्याचा अर्थ कसा बदलतो, हे त्या सोप्या रीतीने समजावून सांगायच्या. ‘ऐतिहासिक’, ‘भौगोलिक’ यांसारखा वाटला तरी ‘ठरावीक’ शब्द वेगळा का, याचे स्पष्टीकरण द्यायच्या. तसेच, विरामचिन्हांच्या एका चुकीने वाक्याचा सूर कसा बदलतो, हे सांगताना त्या व्यवहारातील उदाहरणे देत. इंग्रजीतून किंवा इतर भाषांतून मराठीत सहज रुळलेले शब्द स्वीकारणे हा भाषेचा जिवंतपणा आहे, असे त्यांचे उदार मत होते.
 
 
बाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांत मोठा विशेष म्हणजे त्यांची भाषेविषयीची अविचल निष्ठा आणि विलक्षण शिस्त. वय हा त्यांच्यासाठी केवळ एक आकडा होता. वयाच्या शंभरीतही त्यांचा भाषेच्या अचूकतेविषयीचा ध्यास जराही कमी झाला नव्हता. या वयातही स्वतःच्या छापील पुस्तकांची पुनर्रचना करताना किंवा नवीन आवृत्ती निघताना, त्या स्वतः अत्यंत सूक्ष्मपणे मुद्रितशोधन करत असत. भाषेतील एकही वेलांटी किंवा उकारच नव्हे तर अगदी एखादे विरामचिन्हही चुकीचे छापले जाऊ नये, असा त्यांचा अट्टाहास असायचा.
 

vivek 
 
वर्तमानपत्र वाचण्याची त्यांची दैनंदिन पद्धत तर भाषाप्रेमींसाठी एक वस्तुपाठ ठरावा अशीच होती. सकाळी हातात वर्तमानपत्र घेतानाच सोबत ‘लाल शाईचे पेन’ असायचेच. बातम्या वाचत असतानाच जिथे कुठे वेलांटी, उकार किंवा वाक्यरचनेत चूक आढळेल, तिथे त्या तत्काळ लाल पेनाने गोल करत असत. ‘मी वाचतेय तर भाषा शुद्धच वाचणार आणि चूक दिसली तर ती दुरुस्त करणार’ हा त्यांचा नेम शेवटपर्यंत कायम राहिला.
 
आजच्या संगणक आणि सोशल मीडियाच्या युगात जेव्हा भाषेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, अशा काळात बाईंचे विचार अधिकच मार्गदर्शक ठरतात. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी भाषेची मूळ शिस्त आणि आकृतिबंध बिघडता कामा नये, यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असे. देश-विदेशात राहणार्‍या प्रत्येक मराठी भाषकाने आपल्या रोजच्या व्यवहारात थोडी जरी भाषिक शुद्धता आणली, तरी बाईंनी आयुष्यभर केलेल्या या भाषिक यज्ञसाधनेचे खर्‍या अर्थाने चीज होईल.
 
वयाच्या नव्वदीनिमित्त झालेल्या एका सत्कार समारंभात त्या म्हणाल्या होत्या की, ‘माझ्या प्रदीर्घ आयुष्यात जवळच्या आप्तेष्टांचे मृत्यू पाहण्याचे, क्लेशाचे अनेक प्रसंग आले; पण त्यामुळे स्वतः हताश न होता, मनात नकारात्मक विचारांना स्थान न देता सतत कार्यमग्न राहण्याचा मी निश्चय केला. मराठी भाषा व साहित्य यांच्या उपासनेला वाहून घेतलं. ‘रिकामा मधुघट’ या आपल्या प्रसिद्ध कवितेत भा. रा. तांबे म्हणतात, ‘संध्याछाया भिवविती हृदया’ त्यात थोडा बदल करून मी ‘संध्याछाया सुखविती हृदया’ असे म्हणू शकते, ते या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच!’ स्वतःचे यजमान रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात असताना बाहेर बसून शांतपणे मुद्रितशोधनाचे काम करणार्‍या शेखबाई लोकांनी पाहिल्या आहेत. कामाप्रति असलेल्या या निष्ठेपुढे केवळ नतमस्तक!
माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. ही एक पर्वणी होती. त्यांचे वय लक्षात घेता फार काळ थांबून त्यांना त्रास होऊ नये, अशीच इच्छा होती. मात्र घरी गेल्यागेल्या त्यांनी ज्या आपुलकीने हातात हात घेतला, ती आपुलकी आणि तो सायीसारखा स्निग्ध, मायाळू स्पर्श कधीच विसरता येणार नाही. माझे पुस्तक दिल्यावर ते चाळून त्याबद्दल बोलणे आणि मग त्यांच्या आवडत्या मराठी भाषेविषयी, मुद्रितशोधनाविषयी बोलताना दोन अडीच तास कसे गेले ते समजले देखील नाही. ही आठवण आता माझ्या स्मृतिमंजूषेत चिरंतन कोरली गेली आहे.
 
वैयायोगिनी यास्मिन शेख बाईंच्या पावन स्मृतीस आणि त्यांच्या अखंड भाषासेवेस विनम्र अभिवादन!
8380015450