एक कर्मयोगी केशवराव नांदेडकर

विवेक मराठी    28-Aug-2026
Total Views |
vivek
सेवाभारतीच्या माध्यमातून केशवरावांनी आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग पूर्वांचलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात सुरू केली होती. समर्पण हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. संघकार्य हीच त्यांची ऊर्जा आणि समाजसेवा हाच त्यांचा श्वास होता. त्यांचे जीवन हे खर्‍या अर्थाने सेवा, संघटन, राष्ट्रभक्ती, शिस्त, समर्पण आणि निःस्वार्थ कर्मयोगाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
आपल्या निवृत्तीच्या पश्चात पूर्वांचल क्षेत्रात सेवाकार्यार्थ स्वत:ला झोकून देण्याचा कर्मयोग सहजपणे अंगीकारणारे केशवराव नांदेडकर ज्यांना आम्ही प्रेमाने काका म्हणत असू - हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. National Medicos Organisation (NMO) आणि सेवाभारतीच्या माध्यमातून केशवरावांनी आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग पूर्वांचलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात सुरू केली होती. समर्पण हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता.
 
 
वर्ष 2002पासूनच National Medicos Organisation (एन.एम.ओ.)च्या पूर्वांचल धन्वंतरी यात्रा या प्रकल्पाचे संचालक म्हणून त्यांनी ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये अत्यंत दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याचे मोठे काम केले. या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आरोग्य-शिबिरांचे आयोजन केले गेले. मात्र हे कार्य केवळ आरोग्य-शिबिरे घेण्यापुरते मर्यादित नव्हते; तर तेथील समाजाशी आत्मीयतेने जोडले जाणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि आपण सर्व एकाच भारतमातेची संतती आहोत हा भाव निर्माण करणे, हा या कार्याचा मूलाधार होता. हा भाव जसाच्या तसा पोहोचविण्यात केशवरावांनी मोलाची भूमिका बजावली.
 
 
या कार्यात त्यांच्या सौभाग्यवतींचीही तितकीच मोलाची साथ लाभली. नांदेडकर दांपत्याने पूर्वांचलातील दुर्गम भागांमध्ये फिरून व्यापक जनसंपर्काच्या आधारे अनेक आरोग्य शिबिरे आयोजित केली, गरजू रुग्णांची सेवा केली. यासोबतच तेथील मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी योजना आखल्या, त्या तडीस नेल्या आणि हे करत असताना स्थानिक समाजाच्या जीवनाशी व संस्कृतीशी स्वत:ला जोडून घेतले. त्यामुळे ते अल्पावधीतच आपलेसे वाटू लागले.
 
 
पूर्वांचलातील जनतेच्या मनात उर्वरित भारताबद्दल असलेल्या गैरसमजूती दूर करण्यासाठी केशवकाकांनी आत्मीयतेचा व्यवहार जगून दाखविण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी कधीही कुणाला मोठमोठे उपदेश केले नाहीत. मात्र आपल्या छोट्या-छोट्या कृतींतून राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती त्यांनी आपल्या संपर्क वर्तुळातील स्थानिकांना दिली. स्थानिक संस्कृतीचा आदर करत, त्यांच्या उत्सवांमध्ये सहभागी होत, त्यांच्यात मिसळून आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी पूर्वांचल आणि भारताच्या अन्य भागांमधील भावनिक अंतर कमी करण्याचे फार मोठे काम केले.
 
 
आज आपण पूर्वांचलमध्ये राष्ट्रभावना, भारतीयत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा झालेला विस्तार पाहतो. त्यामागे अशा असंख्य ज्ञात-अज्ञात कर्मयोग्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आहेत. केशवराव हे सुद्धा असेच एक श्रेष्ठ कर्मयोगी होते. सेवा हीच संघटनाची भाषा या भावनेने त्यांनी त्या काळात केलेल्या कार्याचे उत्तम परिणाम आज दिसू लागले आहेत.
 
 
एन.एम.ओ.च्या संघटन विस्तारासाठीही त्यांचे योगदान लक्षणीय होते. भारतभरातील सुमारे 85 वैद्यकीय महाविद्यालयांना भेटी देऊन एन.एम.ओ.चा परिचय, वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद आणि संघटन विस्ताराचे कार्य त्यांनी अथकपणे केले. वय, अंतर किंवा शारीरिक कष्ट या गोष्टींचा त्यांनी कधीही विचार केला नाही. संघकार्य हीच त्यांची ऊर्जा आणि समाजसेवा हाच त्यांचा श्वास होता.
 
 
वर्ष 2015पासून काकांच्या सहवासात आणि संपर्कात राहण्याचे सौभाग्य मला लाभले. त्यांच्यासोबत रोजची प्रभात शाखासुद्धा खूप काही शिकवून जात असे. कार्यातील प्रचंड ऊर्जा, शिस्त, सातत्य आणि संघटनेप्रति असलेले समर्पण मी अगदी जवळून अनुभवले आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी स्वतःला दैनंदिन संघकामापासून कधीही बाजूला केले नाही. उलट, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देत पुणे, मुंबई आणि परिसरातील विविध आरोग्य शिबिरे व सेवाकार्यांच्या आयोजनात त्यांनी सक्रिय मदत केली.
 
 
स्वतःच्या आरोग्याबाबतही ते अत्यंत जागरूक होते. नियमित व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैली आणि आहाराबाबत ते नेहमी सजग आणि आग्रही असत. दररोज संतुलित आहार घेण्यावर त्यांचा कटाक्ष असे. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीमागे ते कधीही गेले नाहीत; मात्र त्यांच्या सामाजिक व्यवहारांचा प्रभाव मात्र असंख्य जीवनांवर उमटला. त्यांचे जीवन हे खर्‍या अर्थाने सेवा, संघटन, राष्ट्रभक्ती, शिस्त, समर्पण आणि निःस्वार्थ कर्मयोगाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
 
 
आज केशवकाका देहरूपाने आपल्यात नसले तरी त्यांनी रुजवलेली सेवा, संघटन आणि राष्ट्रभक्तीची बीजे सदैव अस्तित्वात राहतील. या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढ्यांनी त्यांच्यासमान होण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.
 
- प्रशांत चौधरी
- लेखक नॅशनल मेडिकोज ऑर्गनाइजेेशन
येथे कार्यरत आहेत.