दलित काव्याची पहाट - चोखामेळा परिवाराची अभंगसंपदा

विवेक मराठी    29-Aug-2026   
Total Views |
मध्ययुगीन संतसाहित्याकडे केवळ भक्तीचा मार्ग म्हणून न पाहता, सामाजिक क्रांतीची पहिली ठिणगी म्हणून पाहणे गरजेचे आहे. तेराव्या शतकात विषमतेचे चटके सोसत असताना आत्मभानातून एक नवा विचार जन्माला आला. संत चोखामेळा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या अभंगवाणीतून हा वास्तववादी आवाज कसा उमटला आणि तो पुढे दलित साहित्याची पहाट कसा ठरला, याचा वेध घेणारा हा लेख.
 
sant Chokhamela
 
संत ज्ञानदेव-नामदेवांच्या संतमांदियाळीतील एक अग्रणी संत म्हणजे चोखामेळा! त्यांच्या नावावर 350 अभंग असून त्यांचा संपूर्ण परिवार विठ्ठलभक्त व कवी आहे. पत्नी सोयराबाई, बहीण निर्मला, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा यांच्याही अभंगरचना उपलब्ध असून ही अभंगसंपदा तेराव्या शतकातील मराठी वाङ्मयातील अक्षरठेवा आहे. समाजातील गावकुसांबाहेरील उपेक्षित, वंचित श्रमिकांच्या विदारक, दाहक वास्तव्याचे वर्णन चोखोबांच्या अभंगातून घडते. म्हणूनच त्यांची अभंगसंपदा ‘दलित साहित्याची पहाट’वाटते.
 
आरंभिक
 
मराठी साहित्यविश्वात ‘दलित साहित्य’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या लेखनाचा सशक्त प्रवाह म. फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जनजागृतीनंतर निर्माण झालेल्या आत्मभानातून निर्माण झाला. तो काळ विसाव्या शतकातील आहे. पण तत्पूर्वी तेराव्या शतकातील संत चोखामेळा व परिवाराच्या अभंग काव्यात आपणास दलितकाव्याची क्रांतिबीजे दिसून येतात. म्हणून संत चोखामेळा व परिवाराच्या 500 अभंगांना ‘दलित काव्याची पहाट’ म्हणणे सार्थ व समर्पक ठरेल, असे मला वाटते.
 
 
संत चोखामेळा हे संत ज्ञानदेव-नामदेव यांच्या संतमांदियाळीतील एक प्रमुख संत गणले जातात. चोखामेळा यांच्या नावावर, सुमारे 350 अभंग काव्यरचना उपलब्ध असून त्यांची पत्नी सोयराबाईंचे 62 अभंग, त्यांची बहीण निर्मलाचे 24 अभंग, मेहुणा बंका यांचे 39 अभंग आणि मुलगा कर्ममेळा यांचे 27 अभंग अशी सुमारे 500 अभंगांची चोखामेळा व परिवाराची संपदा मराठी अभिजात वाङ्मयातील मौलिक काव्यसंपदा आहे. या काव्यातील भक्तिरसाबरोबरच सामाजिक वास्तवाचे निर्भीड शब्दचित्रण, जाती व्यवस्थेवरील टीका, बंधुभावाचा समता विचार आणि प्रकट आत्मकथन वाचकांच्या मनाचा ठाव घेत त्याला आत्मचिंतनास प्रवृत्त करणारे आहे. त्यामुळेच चोखोबा व परिवाराची कविता मला मराठी साहित्यातील दलित साहित्याची पहाट, मंगल प्रभात वाटते.
 
 
 
sant Chokhamela
 
उत्कट समरसतेचे दर्शन
 
या संदर्भातील आणखी एक अलक्षित गोष्ट, संतप्रणित पारमार्थिक समता, समरसतेचे विलक्षण दर्शन घडविणारी आहे. ती म्हणजे संत चोखामेळा व परिवाराचे हे सारे अभंग काव्य, मंगळवेढा येथे राहणार्‍या बिंदुमाधवाचार्य यांच्या विठ्ठलभक्त वारकरी सुपुत्राने, ‘अनंतभट’ याने लेखक म्हणून लिहून घेतले होते. या गोष्टीचा संत जनाबाई यांनी एका अभंगात स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ज्ञानदेवांची ‘ज्ञानेश्वरी’ सच्चिदानंदबाबांनी लिहिली, संत सावता माळी यांचे अभंग काशिबा गुरव यांनी आणि चोखोबांचे अभंग अनंतभट याने लिहिले असे संत जनाबाई अभंगात वर्णन करतात.
 
‘चोखामेळ्याचा (अभंग लेखकु) अनंतभट्ट अभ्यंग।
म्हणोनी नामयाचे जनीचा (अभंग लिहितो) पांडुरंग॥’
 
लेखकु अनंतभट आणि चोखामेळा कुटुंबाचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते आणि पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती हे समान गोत्र होते. एका ब्राह्मणाने एका दलित परिवारातील संत कवींच्या अभंगाचे भक्तिभावाने लिहून घेण्याचे केलेले कार्य संत ज्ञानदेव-नामदेव प्रणित भक्तिपंथातील समता, समरसतेचे स्तुत्य उदाहरण आहे.
 
‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनांचे।’
या समरसता मंत्राचे कृतिरूप दर्शन आहे, ‘भेदाभेद भ्रम अमंगळ ।’ या विचाराचे आदर्शवत आचरण आहे.
 
काय भुललासी वरलीया रंगा
 
संत चोखामेळा व परिवाराची गाव जन्म, दिनांक, साल, मातापिता याविषयी चरित्रात्मक ठोस ऐतिहासिक माहिती मिळालेली नाही. काही अभ्यासक तो पंढरपूरचाच होता म्हणतात; तर काहीजण मंगळवेढा, विदर्भातील मेहुणपुरा, या गावचा तो रहिवासी होता असे म्हणतात. स्व.राजे बबनराव जाधव यांच्या मते चोखोबांचे पूर्ण नाव-चोखा खंडू गोडे (येसकर) असे होते व ते मेहुणपुरा राजा येथील प्रवेशद्वाराचे राखणदार म्हणून काम करीत होते. पुढे पंढरीचे वारकरी म्हणून पंढरीस गेले व तेथेच रमले. पंढरपुरकर झाले. डॉ. देवीदास इथापे यांच्या मते, 14 जानेवारी 1267 (शके 1190) ही चोखोबा यांच्या जन्मतारखेची नोंद मिळते. महाराष्ट्र शासनगठित एका समितीनेही 14 जानेवारी, संक्रांत चोखोबांचा जन्मदिवस मानला आहे. अर्थात त्यालाही ठोस पुरावा नाही.
 
 
मग जन्मभूमि पंढरीत। कुटुंबासह राहिला तेथ।
हृदय आठवोनि रूक्मिणीकांत।
 
असे वर्णन संतचरित्रकार, महिपती ताहराबादकर यांनी केलेले आहे. चोखोबांबद्दल असेच काही उल्लेख संत नामदेव, संत जनाबाई आणि संत एकनाथ यांच्या अभंग गाथेतून मिळतात. ते आख्यायिका स्वरूपाचे आहेत. त्यातून चोखोबांची एकूण महती कळते. चोखामेळा व त्यांच्या परिवारातील अभंगातून वंचित, उपेक्षित तळागाळातील कष्टकरी समाजमनातील प्रश्न रोखठोक केलेले आहे. हे प्रश्न एक शब्दोद्रेक आहे. त्या अनेक प्रश्नांमधील ‘काय भुललासी वरलिया रंगा?’ हा प्रश्न एक प्रातिनिधिक उद्रेकाचा संयमित स्वर आहे.
 
 
उस डोंगा (वेडावाकडा) परी रस नव्हे डोंगा।
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा॥
 
 
हा चोखाबांचा अभंग मुळातून वाचा. या प्रश्नाने चोखोबांनी संभावित समाजाच्या दांभिकतेवर, भेदाभेदनिष्ठ वर्तणुकीवर प्रहार करून समाजाला आरसा दाखवून अंतर्मुख केलेले आहे. संभावित समाजाला आपण करीत असलेल्या सामाजिक अन्यायाची जाणीव चोखोबा करून देतात. अशा जाणीव जागृतीचे कार्य चोखोबांच्या अभंगवाणीने केलेले आहे.
 
चोखामेळा संत भला । ..जनाबाई
 
संत चोखामेळा हे तेराव्या शतकातील ‘ज्ञानदेव-नामदेव’ प्रणित भक्ती आंदोलनातील एक प्रमुख संत आहेत. राष्ट्रीय कामगिरी करणारे संत नामदेव हे चोखामेळा व परिवाराचे सांप्रदायिक गुरू व मार्गदर्शक आहेत. संत जनाबाई चोखोबांची संत सांगाती व गुरुभगिनी आहे. संत नामदेव आणि जनाबाई यांनी चोखामेळ्याबद्दल आदराने, भक्तीने लिहिले आहे.
 
 
चोखामेळा संत भला। तेणे देव भुलविला।
भक्ती आहे त्याची मोठी। देव पावितो संकटी।
चोखामेळ्याची करणी। तेणे देव केला ऋणी॥
-----
यातीहीन चोखामेळा। त्यासी भक्तिचा कळवळा।
-----
चोखामेळ्यासाठी। ढोरे ओढी जगजेठी॥
अशा शब्दांत जनाबाईंनी चोखामेळ्यांच्या भक्ती सामर्थ्याचे वर्णन केलेले आहे. उत्तरकालिन संत एकनाथांनी चोखामेळ्याच्या भक्तिसामर्थ्याचे माहात्म्य कथारूप अभंगातून गायलेले आहे. ’देवलोकातील दुषित झालेले अमृत चोखोबांच्या अंगणात त्याच्या हरिनाम घोष भक्तीने शुद्ध होते,’ अशी कथा संत एकनाथ सांगतात. जगद्गुरू तुकोबा यांनी चोखोबांचे वर्णन ‘चोखा माझा गणपती।’ अशा अभंगचरणाने करून चोखोबांना अग्रपूजेचा सन्मान दिलेला आहे. हे सारे अभंग वाचकांनी मूळातून वाचून चोखोबांची थोरवी जाणून घ्यावी.
 
 
अभंग गाथेचे अंतरंग स्वरूप
 
संत चोखोबांच्या अभंग गाथेमध्ये असलेल्या 350 अभंगांचे अभ्यास संपादकांनी वेगवेगळ्या 15 ते 16 विषयवार वर्गीकरण केलेले आहे. ‘पंढरीचा महिमा’, ‘नाममहिमा’, ‘अद्वैत पर अभंग’, ‘उपदेशपर अभंग’, ‘कृष्णलीला’,‘भक्ती महिमा’, ‘संत महिमा’, ‘देवाशी संवाद-भांडण’,‘ज्ञानदेव व भावंडांची स्तुती’, ‘नामदेव व परिवार’, ‘नामदेवांशी संवाद’, ‘जनाबाईंची स्तुती’ आणि ‘जोहार’ असे प्रमुख विषय त्यामध्ये आहेत. ’पंढरी महिमा नामहिमा’, ’संत महिमा’ याविषयीच्या अभंगांतून चोखोबांच्या अनुभवसृष्टीचे व भावदृष्टीचे तर ‘देवाशी संवाद’ या अभंगातून त्यांनी प्राप्त केलेल्या परमोच्च पारमार्थिक अधिकाराचे दर्शन होते. ‘ज्ञानदेव स्तुती’, ‘नामदेव स्तुती’, ‘जनाबाई स्तुती’ या अभंगांतून त्यांचा पूज्यभाव व या थोर संतसांगात्यांशी असलेला सख्यभाव प्रकट झालेला आहे. चोखामेळा ज्ञानदेवांना विष्णूचा अवतार - ‘प्राणसखा’ म्हणून गौरवतात तर गुरू नामदेवांची स्तुती ‘धन्य धन्य नामदेवा । केला उपकार जीवा।’ ‘स्वस्थिती’ वर्णनात्मक अभंगात चोखोबांचे सामान्य वारकरी, भक्त साधक, साधन काळातील परीक्षेचा काळ, संतकृपा ओढ आणि बोध, परिवर्तन, सिद्धावस्था अशा विविध अवस्थांचे उत्कट चित्रण आहे. तसाच भेदाभेदाविरूद्धचा उद्रेक आहे. हा रोखठोक उद्रेक केवळ शब्दात्मक असला तरी त्या काळची स्थिती पाहता बंडखोर आहे. म्हणून हा शब्दोद्रेक भावी काळातील ‘दलित साहित्याची पहाट’ अशा स्वरूपाचा वाटतो.
 
 
॥ देवचि देखिला । देहामाजी ॥
 
ज्ञानदेव-नामदेवादी संतांनी दलित समाजातील चोखामेळा यांना पारमार्थिक प्रगतीचा अवकाश दिला आणि आपल्या भक्तिसामर्थ्याने चोखोबा संतपदी आरुढ झाले. तेराव्या शतकातील एकूण स्पृशास्पृश्य, भेदाभेद, सोवळेओवळे, विटाळ या माणुसकीला कलंकित करणार्‍या रूढीग्रस्त, कर्मठ, वर्णवर्चस्ववादी समाजात, संतमंडळाने पारमार्थिक समतेची ध्वजा चंद्रभागेच्या वाळवंटी फडकवली, ही एक पारमार्थिक अंगाने झालेली सामाजिक क्रांतीच होती. चोखामेळा व त्याच्या परिवाराचे अभंग लेखन वाळवंटी कीर्तन-प्रवचनात सहभाग आणि विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात चोखोबांची नामदेवांनी बांधलेल्या समाधीचा मान, या घटना सामाजिक क्रांतीच्या उषःकालाच्याच निदर्शक नव्हेत काय? चोखोबांनी या माणुसकीच्या वागणुकीबद्दल ज्ञानेश्वर-नामदेव संतसांगात्यांबद्दल पूज्य भाव व कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
 
 
चोखोबांच्या अभंगांतील विषयाची विविधता, बहुश्रुत ज्ञान प्राप्त स्थितीचे विदारक सत्य अनेक पौराणिक संदर्भ थक्क करणारे आहेत. एका कष्टकरी श्रमिक उपेक्षित, गावकुसाबाहेरील दलित व्यक्तीचा पारमार्थिक, आध्यात्मिक, अंतरंग अधिकार चोखोबांच्या अभंगगाथेतून ठायी ठायी जाणवतो. त्याकाळी ‘शिवू नको’, ‘दूर हो’, ‘विटाळलेस का?’ अशा तिरस्कारांनी त्रस्त चोखोबा रोखठोकपणे म्हणतात की -
 
* पंचमहाभूताचा एकचि विटाळ।.....
 
* कोण तो सोवळा, कोण तो ओवळा ?
 
* विटाळाचे कारण देह मूळ। आदि अंता अवघा विटाळ।
 
* चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळा परते कोण आहे?।
 
’जेव्हा पुरोहितवर्ग ‘देव विटाळला’ असे म्हणत, तेव्हा चोखोबा त्यांच्या ज्ञानावर मनातून हसत होते,’ असेच या अभंगातून ध्वनीत होते. प्रारंभीच्या काळात ‘दुःखरूप देह दुःखाचा सागर।’ अशी मन:स्थिती ते अभंगातून व्यक्त करतात आणि पुढे ज्ञानदेव-नामदेव-जनाबाईच्या संतसंगतीने त्यांना परमावस्था प्राप्त झाली. मंदिरातील विठ्ठलमूर्ती सर्वच पाहतात; पण मला संत कृपेने देहामध्येच देवाचे दर्शन होते... ‘देवचि देखिला। देहामाजी।’ ही त्यांची पारमार्थिक परमावस्था सर्वांनाच विस्मयचकीत करणारी आहे.
 
 
‘सकल संतगाथा’ यामध्ये व अन्यत्र विखुरलेले चोखोबांचे उपलब्ध अभंग मोठ्या भक्तिप्रेमाने एकत्र करून, संतसाहित्याचे उपासक स.म. कदम यांनी इ.स.1969 साली, ‘संत चोखामेळा अभंग गाथा’ प्रकाशित करून सकल अभ्यासकांचे अलक्षित अशा अभंग ठेव्याकडे लक्ष वेधले. अलीकडे (2011) डॉ. आप्पासाहेब पुजारी यांनीही ‘चोखामेळा अभंगगाथा व चरित्र’ नव्याने लोकांपुढे आणले. अगदी अलीकडेच ’चोखामेळा अध्यासन केंद्र व विवेक व्यासपीठ, पुणे’ यांनीही ‘संत चोखामेळा व परिवाराची सार्थ अभंगगाथा’ प्रकाशित करून अभ्यासक, उपासक यांचे नव्याने या अभंगसंपदेकडे लक्ष वेधण्याचे स्तुत्य कार्य केलेले आहे. या परिचयवजा छोट्याशा लेखात चोखोबांच्या समग्र गाथेचे साद्यंत विवेचन शक्य नाही. वाचकांनी वरील अभंगगाथा मुळातून वाचून संत चोखामेळ्याचे भावविश्व व विचारविश्व समजून घ्यावे, ही विनंती.
 
 
- लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ’साईलीला’ आणि ’एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.