गोवा मुक्तिसंग्रामाला उजाळा देणारा संग्राह्य अंक

विवेक मराठी    03-Aug-2026
Total Views |
@जयंत कुलकर्णी
 
 
vivek
हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रकाशित होणार्‍या पंचधारा या त्रैमासिकाने गोमंतकाने दिलेला हा लढा, त्याचे समकालीन आणि नंतरच्याही साहित्यात पडलेले प्रतिबिंब हा विषय केंद्रस्थानी ठेवून विशेषाकांची रचना केली आहे. त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देणारा लेख.
गोवा हा छोटासा प्रदेश पण पोर्तुगीजांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी याच छोट्या भूभागाने, तेथील जनसमूहाने थोडीथोडकी नाही तर तीन-चारशे वर्षांचा प्रखर लढा दिला आहे. भारत स्वतंत्र झाला तो 1947 मध्ये पण गोव्यामध्ये स्वातंत्र्याची हीच पहाट उगवायला मात्र 1961 साल उजाडावे लागले. या 14 वर्षांच्या काळात आपल्या गोव्यातील बांधवांनी काय वेदना भोगल्या असतील याची कल्पनाच केलेली बरी!
 
स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांची कमालीची उदासीनता, पोर्तुगीजांच्या अत्याचाराची तीव्रता वाढत चाललेली, लढण्यासाठी अपुरी साधने अशा परिस्थितीत खचून न जाता गोव्यातील जनतेने नव्याने आपला लढा उभारला आणि तो यशस्वी केला!
 
या कालखंडात अस्वस्थ असलेल्या जनतेच्या मन:स्थितीचे साहित्यात उमटलेले नेमके प्रतिबिंब या अंकात अनुभवायला मिळते.
कुंकळ्ळी आणि सत्तरी हे गोव्यातील दोन तालुके या दीर्घ संघर्षांत आपल्या लढाऊ बाण्याने उजळून निघाले. पोर्तुगीज राज्यकर्ते आणि धर्मांतर करणारे परदेशी पाद्री यांच्या विरोधात झालेला कुंकळ्ळी मधील देसायांचा आणि सत्तरीमधील राणेंचा उठाव हा या विशेषांकातील लेखांमधून मुळातूनच वाचायला हवा.
 
 
18 जून 1946 रोजी डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या मडगाव येथील भाषणाने गोवा मुक्ती लढ्याचे अंतिम पर्व सुरू झाले. ते व्यासपीठावर जात असताना त्यांच्यावरच पिस्तूल रोखून उभ्या असलेल्या पोलीस ऑफिसरचा हात त्यांनी अक्षरशः झटकून टाकला आणि निर्भीडपणे ते सभास्थानी गेले. ही घटना पाहणार्‍या बाकीबाब बोरकरांच्या मनावर या प्रसंगाने जो परिणाम झाला तो परेश प्रभू यांच्या लेखातून खूप प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. त्या दिवशी मंगळवार होता. बोरकर तेव्हा कवी म्हणून उदयाला येत होते. या मंगळवाराचे त्यांनी ’मंगल-वार’ केले आणि या दिवसाला त्रिवार वंदन करणारी कविताही लिहिली.
 
 
मोहन रानडे हे तर गोवा स्वातंत्र्य संग्रामातील एक झळाळते पर्व आहे! ’सतीचे वाण’ या त्यांच्या आत्मचरित्राचा परिचय डॉ.विनय बापट यांनी करून दिला आहे तर पां.पु.शिरोडकर आणि प्रभाकर सिनारी यांच्या आत्मचरित्रांचा परिचय रसिका जोशी आणि डॉ.चिन्मय घैसास यांनी करून दिला आहे. यातून उलगडणारी माहिती ही पूर्णपणे विस्मृतीत गेलेली इतिहासाची सोनेरी पाने आहेत!
 
 
कथा, कादंबरी, नाटके, कविता अशा साहित्याच्या विविध स्वरूपातून गोवा स्वातंत्र्य संग्राम उत्कटपणे डोकावतो. त्याचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक असे विविध पैलू प्रथमच इतक्या सलगपणे आपल्या समोर येतात.
 
 
महिला, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक आणि मंदिरांचे पुजारी अशा समाजातील सगळ्याच घटकांनी या संग्रामात स्वतःला झोकून दिले होते. हा सगळा पट या विशेषांकात मांडण्यात आला आहे.
 
 
मधुकरराव महाजन, एस.एम.जोशी यांच्यासारख्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या नेत्यांनी या लढ्याला खूप मोठे बळ दिले. आजच्या काळात पक्ष आणि विचारधारा यांच्या पलीकडे जाऊन एखाद्या धगधगत्या प्रश्नासाठी राजकीय नेत्यांचे एकत्र येणे दुर्मीळ झालेले असताना गोव्यातील लढ्याचे हे सर्वस्पर्शी स्वरूप पुन्हा एकदा समाजासमोर येणे गरजेचे होतेच.
 
 
आपल्याच स्वातंत्र्यसमराचा हा देदीप्यमान आणि बहुआयामी इतिहास आपण पुन्हा पुन्हा सांगितला नाही, त्या संबंधातील साहित्य समाजासमोर आणले नाही तर हा लढा आणि ते लढवय्ये कायमचेच विस्मृतीत जातील.
 
 
इतिहासाचे स्मरण फेसबुक पोस्ट आणि रिल्स यांच्या खूप पलीकडे जाणारे आहे. गोवा स्वातंत्र्य संग्रामाचा परिचय त्यातील सखोलता आणि विविधता यांच्यासह पंचधारा या विशेषांकातून आपल्याला करून दिला आहे. या अंकाच्या रचनेत सहभागी असणार्‍या लेखकांचे आणि अभ्यासकांचे मन:पूर्वक अभिनंदन!