swadhyay parivar

स्वाध्याय.. स्वतःमधील ‘स्व’चा अभ्यास करून अंतर्बाह्य विकास साधण्याचा, समाजात दैवी प्रेम व बंधुभाव निर्माण करण्याचा एक जीवनविचार.. जगभरात आणि तळागाळात ‘स्वाध्यायी’ जगण्याचे मूल्य ‘दादाजी’ तथा ‘दादा’ म्हणजेच ज्येष्ठ तत्त्ववेत्ते पांडुरंगस्त्री आठवले यांनी रुजविले. दादा त्यांच्या प्रवचनातून नेहमीच सांगत की, सातत्याने सद्विचारांचे रवंथ करणे म्हणजे ‘स्वाध्याय’ आणि त्या स्वाध्यायासाठी सत्कृती निरंतर घोटावी लागते. दादांच्या या विशाल ‘स्वाध्याय’ कार्याची गंगोत्री म्हणजे श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा. यंदा या पाठशाळेने शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले आहे. पाठशाळेची शंभर वर्षे आणि दादांच्या जीवनाचा आधारस्तंभ दादांची पत्नी पूजनीय निर्मलाताईंचे जन्मशताब्दी वर्ष एकत्र यावे, हा जगभरात विखुरलेल्या स्वाध्यायींसाठी एक दुर्मीळ आणि भाग्याचा योग आहे. त्यानिमित्ताने पांडुरंगशास्त्री आठवले आणि निर्मलाताई यांच्या सुपुत्री तसेच स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्याशी साधलेला हा संवाद. बदलत्या प्रवाहात 'स्वाध्याया’चे विचार माणसाला स्वतःकडे परत कसे घेऊन जातात, हे सांगणारी ही विशेष मुलाखत.
यंदाचे वर्ष हे स्वाध्यायी परिवारासाठी विशेष आहे. पूजनीय वैजनाथशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीता पाठशाळे’चे शतकमहोत्सवी वर्धापन वर्ष आणि स्वाध्याय परिवाराच्या आधारस्तंभ पूजनीय निर्मलाताई यांचे जन्मशताब्दी वर्ष असा हा दुर्मीळ योग यंदा जुळून आलेला आहे. नेमकी काय भावना आहे आपली?
धनश्रीदीदी : श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेचा हा शतक वर्षाचा प्रवास केवळ एका संस्थेचा प्रवास नाही, तर तो मानवी मूल्यांच्या जपणुकीचा, शुद्ध वैचारिक क्रांतीचा आणि निस्सीम ईश्वरभक्तीचा इतिहास आहे. आमच्या तात्यांनी वैजनाथशास्त्री आठवलेंनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्याच्या सावलीत लाखो जीव तृप्त होत आहेत. या महान प्रवासाची मूक साक्षीदार राहून, या विचारांच्या मुशीत स्वतःला घडवता आले, हेच माझ्या जीवनाचे सर्वात मोठे संचित आहे.
या शतकभराच्या प्रदीर्घ प्रवासापैकी किमान निम्म्या प्रवासाचा साक्षीदार होता येणे, ही एकाच वेळी भाग्याची आणि तितकीच अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. कोणत्याही प्रवाहाचा भाग असताना, त्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता, तटस्थपणे आणि वेगळे होऊन त्या प्रवासाकडे पाहणे कठीण असते. कारण जेव्हा तुम्ही त्या प्रवाहाचे अविभाज्य अंग असता, तेव्हा तुमचे डोळे केवळ त्या प्रवाहातच उघडलेले असतात. माझ्यासाठीही हे असेच घडले. मला ’स्वाध्याय’ व्यतिरिक्त सुरुवातीला काहीच माहिती नव्हते. रविवारची सकाळ म्हणजे ‘पाठशाळा’, शनिवार-रविवार म्हणजे ‘तत्त्वज्ञान विद्यापीठ’, हेच माझ्या आयुष्याचे परम समीकरण होते.
श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेची स्थापना कशी झाली?
धनश्रीदीदी : पाठशाळेच्या स्थापनेचा इतिहास रंजक आहे. सुरुवातीला मुंबईच्या पिकेट रोडवर नरहरशास्त्री गोडसे एक पाठशाळा चालवत होते. गोडसेंच्या वृद्धापकाळामुळे पाठशाळा परंपरा पुढे चालवणारी सक्षम व्यक्ती हवी होती. तेव्हा कुणीतरी त्यांना सुचवले की, तुमचाच भाचा वैजनाथशास्त्री पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उत्तम शिकवतो आहे. तात्यांनी मामांच्या आग्रहास्तव पुण्यातील नोकरी सोडली. ते मुंबईत आले. पुढे नरहरशास्त्रींच्या कुटुंबातील मंडळी त्यांच्या पाठशाळेच्या प्रचारप्रसाराच्या कार्यास तयार झाल्यावर, तात्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र जागा शोधण्याचे ठरवले. मुंबईत जागा शोधत असताना तात्या भुलेश्वर भागातील माधवबाग परिसरात असणार्या लक्ष्मी नारायण हॉलपाशी आले. त्यांना समोरासमोर असणारे दोन हॉल दिसले. त्या काळी मुंबईचे वातावरण आजच्यासारखे नव्हते. तात्या जेव्हा ती जागा पाहत होते, तेव्हा त्या जागेच्या गच्चीवर त्यांना एक मोर नाचताना दिसला. मुंबईसारख्या महानगरात मोराचे दर्शन होणे, हा तात्यांना ’सरस्वतीचा संकेत’ वाटला आणि त्यांनी तोच हॉल भाड्याने घेण्याचे निश्चित केले. या घटनेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख पू. धनश्रीदीदी तळवलकर
सुरुवातीच्या काळात पाठशाळेला कसा प्रतिसाद मिळाला?
धनश्रीदीदी : सुरुवातीच्या काळात तात्यांना ऐकायला जेमतेम 15 ते 20 लोक येत असत. यातले सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे, तिथे येणारे बहुतांश श्रोते हे गुजराती भाषिक होते, एकही मराठी माणूस सुरुवातीला तिथे येत नव्हता. सामान्यतः मराठी माणसाला अधिक वाचनप्रिय, ज्ञानार्थी आणि सुशिक्षित मानले जाते, तरीही सुरुवातीला पिकेट रोड आणि नंतरच्या या श्रीमद्भगवतगीता पाठशाळेत गुजराती श्रोत्यांचीच संख्या अधिक होती. यामागे एक विशिष्ट वैचारिक कारण होते. महाराष्ट्रात तत्कालीन काळात ’कथा-कीर्तन’ ऐकण्याची मोठी परंपरा होती. मात्र, तात्या किंवा दादांनी कधीही पारंपरिक कीर्तन केले नाही. ते केवळ एका विषयावर आधारित अभ्यासपूर्ण ’विचार सत्र’ किंवा व्याख्यान घेत असत. परंतु, हा दादांचा गुजरातशी संबंध जोडण्याचा आणि पुढे जाऊन स्वाध्याय कार्याचा वैश्विक विस्तार करण्याचा एक ’दैवी संकेत’ असावा, असेच मला वाटते.
तुमचा पाठशाळेशी संबंध नेमका कधीपासून आला?
धनश्रीदीदी : माझे बालपण दादांच्या आणि पाठशाळेच्या छायेतच घडले. रविवारची सकाळ म्हणजे पाठशाळा आणि शनिवार-रविवारची संध्याकाळ म्हणजे तत्त्वज्ञान विद्यापीठ, असा हा नित्यक्रम असायचा. दोन-अडीच वर्षांची असल्यापासून दादा-ताई पाठशाळेत घेऊन जात असत. पुढे साधारण पाच वर्षांची झाल्यावर दादांच्या रोजच्या पाठशाळेतील बालसंस्कार केंद्रातही प्रवेश झाला. दादा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ’गीतेवर’ बोलायचे आणि रविवारी सकाळी ’उपनिषदांवर’ प्रवचन घ्यायचे. शाळा सुरू झाल्यावर मधली दोन ते तीन वर्षे संध्याकाळच्या पाठशाळेत खंड पडला; पण दादांनी माझा पाठशाळेशी असलेला संबंध इतका दृढ केला की, पुढे माझे औपचारिक शिक्षण ’विनयाधिगम’ या एका वेगळ्या प्रयोगात झाले आणि त्या प्रयोगाचे केंद्रही हीच पाठशाळा ठरली.
swadhyay parivar

स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख पू. धनश्रीदीदी तळवलकर यांना मुलाखतीदरम्यान सा. ‘विवेक’च्या संपादक कविता मयेकर यांनी नुकताच प्रकाशित झालेला ‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांक भेट दिला. यावेळी दीदींनी आपल्या परिवाराचे आणि श्रीगुरुजींचे नाते किती जिव्हाळ्याचे होते, याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. वैजनाथशास्त्री आठवले (तात्या) यांना भेटण्यासाठी श्रीगुरुजी घरी यायचे. त्यावेळी श्रीगुरुजींचा सहवास आम्हाला लाभला आहे. त्यामुळे ‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांक नक्कीच माझ्यासाठी अमूल्य भेट आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
त्या औपचारिक शिक्षण प्रयोगाविषयी सांगा. दादांचा ’विनयाधिगम’ शिक्षण प्रयोग तो हाच का?
धनश्रीदीदी : दादांनी माझ्यासाठी आणि इतर आठ ते दहा मुलींसाठी ’विनयाधिगम’ नावाचा एक खाजगी आणि अनौपचारिक शिक्षणाचा प्रयोग सुरू केला. पाचवीपासून ’पाठशाळा’ हीच माझी शाळा झाली. सोमवार ते शुक्रवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे शिकायचो. दादांनी ’विनयाधिगम’च्या माध्यमातून राबवलेला हा होमस्कुलिंगचा प्रयोग केवळ मूल्यांवर आधारित, मानवी संबंध जोडणारा आणि निखळ ज्ञान देणारा एक पवित्र यज्ञ होता.
आपल्या घराण्यातही अशा ’विनयाधिगम’ या प्रकारातील शिक्षणाची परंपरा आधीपासून होतीच ना?
धनश्रीदीदी : होतीच की. आमच्याच घरामध्ये दादांच्या आजोबांनी अण्णांनी म्हणजेच लक्ष्मणशास्त्री आठवले यांना आपल्या नातवातील (पांडुरंगशास्त्रींमधील) वेगळेपण जाणवले. त्यामुळे ‘सरस्वती संस्कृत पाठशाळा’ सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. अण्णांच्या इच्छेनुसार आणि तात्यांच्या पुढाकाराने ही संस्था उभी राहिली, जिथे घरामध्येच इतर काही मुले राहून शिक्षण घेत होती. पुढे तात्यांच्या पुढाकाराने 16 ऑक्टोबर 1926 साली दसर्याच्या दिवशी श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा सुरू झाली. या पाठशाळेचा आणि आमच्या कुटुंबाचा इतिहास हा चौकटीबाहेरच्या विचारांवर आधारलेला आहे. दादा सहा वर्षांचे असताना अण्णांनी तात्यांना आदेश दिला की, या मुलासाठी एक स्वतंत्र शाळा काढायची आणि त्याला कोणत्याही बंधनाशिवाय स्वतंत्र, अनौपचारिक शिक्षण द्यायचे. अण्णांच्या या आज्ञेचे पालन करत तात्यांनी दादांसाठी एक वेगळी शाळा सुरू केली, जिथे दादा मुक्तपणे शिकले. आमच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य मुख्य प्रवाहातील औपचारिक शिक्षण घेत असताना, दादांसाठी मात्र अण्णांच्या सांगण्यावरून हा विशेष प्रयोग करण्यात आला होता. स्वतःची शिक्षणपद्धती उभी केली. पुढे माझ्या शिक्षणाची वेळ आली, तेव्हा दादांनी याच धर्तीवर स्वतःचे एक वेगळे लॉजिक आणि त्यावर आधारित सिलॅबस ’विनयाधिगम’मध्ये तयार केला.
पू. निर्मलाताई
'विनयाधिगम’च्या अभ्यासक्रमाचे नेमके वेगळेपण काय सांगाल?
धनश्रीदीदी : दादांचा असा ठाम विश्वास होता की, बालपणी मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी केवळ ‘भाषा’ शिकवणे पुरेसे असते. लहान वयात मुलांवर इतर विषयांचा कोणताही अतिरिक्त बोजा न टाकता, जर त्यांना फक्त भाषांचे उत्तम ज्ञान दिले, तर त्यांची आकलनशक्ती वाढते, बुद्ध्यांक सुधारतो आणि त्यांचा मेंदू प्रगल्भ होतो. एकदा भाषांवर प्रभुत्व आले की, व्यक्ती मोठेपणी कोणताही इतर विषय स्वतः वाचून, समजून सहज अभ्यास करू शकते. दादांच्या या शैक्षणिक सिद्धांताचा पहिला प्रयोग म्हणून माझ्यासाठी ’विनयाधिगम’ ही शाळा सुरू झाली. पाचवी ते दहावी या काळात केवळ संस्कृत, इंग्रजी आणि हिंदी या तीनच भाषा शिकले; पण घरामध्ये आमची बोलीभाषा मराठी आहे. दादा बाहेर गुजरातीमध्ये बोलत असले, तरी घराच्या उंबरठ्याच्या आत शुद्ध मराठीव्यतिरिक्त दुसरी कोणतीही भाषा बोलत नसत. त्यातच ‘विवेक’ साप्ताहिक आणि इतर साप्ताहिके, पाक्षिके, दैनिके घरात येत असल्याने विविधांगी साहित्याचा परिचय होत गेला.
swadhyay parivar
तुमचे ’विनयाधिगम’नंतरचे पुढचे शिक्षण कसे होते?
धनश्रीदीदी : अकरावीत आल्यावर ’विनयाधिगम’ या शैक्षणिक प्रयोगाला वेगळे वळण मिळाले. तेव्हा जुनी अकरावी होती. जी एसएससीची परीक्षा म्हणून ओळखली जात होती. विनयाधिगम शिक्षणपद्धतीमुळे एसएससीची परीक्षा द्यायचीच नाही, या भ्रमात मी व माझ्या सहपाठी असल्यामुळे एकंदरीतच आम्ही मजेत होतो; मात्र ताई (ताई म्हणजे आई) आम्ही मुलींनी एसएससी परीक्षा द्यायची यावर ठाम होती. ती दादांना म्हणाली, ”आपल्या मुलीचे काहीही होईल; पण तुमच्या विश्वासावर शिकणार्या इतर मुलींचे काय? एसएससीचे प्रमाणपत्र नसेल तर भविष्याचे काय? ’विनयाधिगम’ प्रयोग यशस्वी झालाय की नाही, हे सिद्ध करण्यासाठी तरी परीक्षा घेऊन बघा.“ दादांनी हे आव्हान स्वीकारले. दादांनी अचानक ठरवले की, आता सर्व विषयांसह एसएससीची परीक्षा द्यायची! दुसरी अडचण म्हणजे आमच्याच मुलुंडच्या ’ज्ञान सरिता’ या गुजराती माध्यमाच्या शाळेतूनच परीक्षा द्यावी लागणार होती आणि मला गुजराती बोलता येत असले, तरी लिहिता-वाचता येत नव्हते. परीक्षा गुजरातीतूनच द्यावी लागणार असल्याने मी बालवर्गाप्रमाणे गुजराती लिपी शिकायला सुरुवात केली. साधारण वर्षभरात लिपी शिकणे, विज्ञान, इतिहास, भूगोल हे सर्व आधी कधीच न शिकलेले विषय आत्मसात करणे आणि परीक्षा देणे हे माझ्यासाठी आव्हान होते. या प्रवासात ताई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. ती अनौपचारिक शाळा शंभर टक्के यशस्वी ठरली. माझ्यासोबतच्या त्या सर्व मुली चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आणि मी स्वतः डिस्टिंक्शन मिळवले. पुढच्या शिक्षणासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले. माझ्या शैक्षणिक प्रवासात ‘पाठशाळा’ ही केवळ वास्तू नव्हती; तर ती विचार, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचे विद्यापीठ होते.
पाठशाळेच्या इतिहासात 1942 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ते का?
धनश्रीदीदी : ‘श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा’साठी 1942 हे वर्षं दिशाबदलाचे ठरले. ज्याला आपण खांदेपालट म्हणूयात. तर त्याचे झाले असे, पूजनीय तात्या अचानक आजारी पडले. आजारपाणात त्यांचा आवाज गेल्यामुळे त्यांना बोलणे अशक्य झाले. पाठशाळेत नित्यनियमाने बौद्धिक सत्रे व्हायलाच हवी होती; मग आता बोलायचे कोणी? नेमके त्याच वेळी दादा रोह्यावरून अभ्यास पूर्ण करून मुंबईला आले होते. तात्यांनी दादांना सांगितले, ”माझा आवाज काही केल्या मला साथ देत नाहीये, आता तुला बोलावे लागेल.” दादा थोडे संकोचले; कारण त्यांचे गुजराथी भाषेवर प्रभुत्व नव्हते. दादांनी आपली अडचण सांगितल्यावर तात्या सहजतेने म्हणाले, ”त्यात काय मोठे आहे? गुजराती येण्या न येण्याने फरक पडत नाही. मूळ विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुला जशी मोडकी-तोडकी भाषा सुचेल, तसे बोल!” अशाप्रकारे दादांनी 1942मध्ये पाठशाळेत बोलायला सुरुवात केली. या प्रसंगानंतर तात्यांचा विशाल दृष्टीकोन सर्वांनी पाहिला. दादांनी एकदा व्यासपीठ सांभाळल्यानंतर तात्या स्वतःहून मागे झाले आणि त्यांनी पुन्हा कधीही नियमित प्रवचन केले नाही. आता तू बोलतो आहेस, तर तूच पुढे चालव, असे म्हणत त्यांनी संपूर्ण सूत्रे मुलाच्या हाती सोपवली. तात्या केवळ वर्षातून एकदा, पाठशाळेच्या स्थापनादिनी म्हणजेच दसर्याला बोलायचे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तात्या व्हीलचेअरवरून दादांचे प्रवचन ऐकायला येत; पण दादांच्या कार्यात त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. आपल्या मुलावर दाखवलेला हा अथांग विश्वास आणि स्वतःची विरक्ती, याच बळावर पाठशाळा पुढे यशस्वीपणे चालली.
तुम्ही या कार्याची धुरा कशी वाहिलीत?
धनश्रीदीदी : खरे सांगायचे तर, मी कधीच स्वतःला या भूमिकेत पाहिले नव्हते. पाठशाळेत स्वाध्यायी म्हणून काम करत होते. जेव्हा दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोलून थकायचे, तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून एखादा तास वर्ग घेणे किंवा प्रश्नोत्तरांचे सत्र सांभाळणे, एवढेच माझे काम असायचे. एका गीता जयंतीच्या प्रसंगी दादांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना बोलणे अशक्य झाले. उत्सव केंद्रांसाठी आधीच रेकॉर्डिंग करून कॅसेट्स पाठवाव्या लागायच्या. ती वेळ टळणे शक्य नव्हते. तेव्हा दादांनी मला रेकॉर्डिंग रूममध्ये बोलावून बोलण्यास सांगितले. मी घाबरून म्हणाले, ”मला हे जमणार नाही.” त्यावर दादांनी समजावले, ”समोर कागद ठेव आणि बोल. कागद ठेवून समोर बघून कसे बोलायचे?”असे मी विचारल्यावर दादा म्हणाले, ”मीसुद्धा रेकॉर्डिंगला समोर कागद का ठेवतो माहिती आहे? कारण आपल्याला हे रेकॉर्डिंग एकाच वेळी तीन भाषांमध्ये करायचे असते. एका भाषेत जे बोललो, तोच आशय दुसर्या भाषेत आला पाहिजे. तिथे ऐनवेळी सुचेल ते बोलून चालत नाही, तर ठरवलेला नेमका विचार द्यायचा असतो.” अशा प्रकारे एका गीता जयंतीला मी अनपेक्षितपणे प्रवचनांच्या माध्यमातून सुरुवात केली. त्यात आजही खंड पडलेला नाही.
ताईंच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांची उणीव नक्कीच भासत असणार...
धनश्रीदीदी : ताई देहरूपाने आमच्यासोबत नाही. परंतु, माझ्या मनात तिच्या नसण्याचे दुःख कमी आणि तिच्या असण्याची जाणीवच जास्त आहे. मला कधी असे वाटतच नाही की मी ताईंचे शंभरावे वर्ष तिच्या पश्चात साजरे करते आहे. ती इथेच आहे आणि तिच्यासाठीच मी हे सगळे करते आहे, हीच भावना माझ्या मनात उत्साह निर्माण करते. त्यामुळे मी याकडे कधीही ‘श्रद्धांजली’ म्हणून पाहत नाही. ताईच्या शिस्तीत वाढल्यामुळे आजही कोणतीही गोष्ट करताना हे तिला आवडेल का? तिला हे चालले असते का? हा विचार सतत मनात असतो. व्यक्ती समोर नसतानाही तिची ही शिस्त पाळणे, हे एक प्रकारचे गोड दडपण आहे आणि तिला आवडेल अशाच कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
दादांच्या विचारांचा प्रसार आणि स्वाध्यायाचे हे मोठे कार्य उभे राहण्यात ताईंची साथ किती महत्त्वाची होती?
धनश्रीदीदी : तात्यांनी तयार केलेल्या पाठशाळेमुळे दादांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. तसेच, संसारात ताईंसारखी खंबीर साथ मिळाली. अर्थात ताईंसारखी खंबीर साथ देणारी सहधर्मचारिणी मिळाली नसती तरी दादांनी काम केले नसते असे नाही, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपले कार्य पूर्णच केले असते; पण जेव्हा संसारात असे निस्सीम सहकार्य मिळते, तेव्हा त्या कार्यात एक वेगळे माधुर्य आणि विशेष आनंद निर्माण होतो. म्हणूनच, दादा आणि ताई हे दोघेही आमच्या समग्र स्वाध्याय परिवाराचे खर्या अर्थाने ‘हेड ऑफ द फॅमिली’ कुटुंबप्रमुख होऊ शकले; कारण दोघांचेही समर्पण तेवढेच अथांग होते.
दादांच्या विचारांचा प्रभाव समाजातील कोणत्या घटकावर सर्वाधिक पडला?
धनश्रीदीदी : दादांनी जो विचार पेरला, त्याचा प्रभाव आज प्रत्येक घटकावर आहे. लोकांना वाटते की दादांचे कार्य मुख्यतः विद्वान किंवा मोठ्या व्यक्तींमध्येच झाले असेल. प्रत्यक्षात तसे नाही. दादांचा सर्वात मोठा प्रभाव सामान्य आणि सुशिक्षित मध्यमवर्गावर पडला. या वर्गाला स्वाध्यायाशी जोडणे यामागे दादांचे दोन महत्त्वाचे गुण होते. पहिला म्हणजे, दादांचा प्रत्येक व्यक्तीशी आलेला वैयक्तिक संबंध आणि त्यांचा वैयक्तिक प्रभाव. दुसरा गुण म्हणजे, दादांचे विचार; जे सामान्य माणूस आणि सुशिक्षित मध्यमवर्गीयांसाठी वेगवेगळे नव्हते. दादांचा मुख्य फोकस केवळ ’माणूस’ या घटकावर होता. त्यांनी कधीही समाजाचे वर्गीकरण केले नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रथम ‘माणूस’ होती. मग तो बहुजन, अभिजन (प्रतिष्ठित), शेतकरी, देवीपूजक (वाघरी), सागरपुत्र (कोळी), वनवासी (आदिवासी), ब्राह्मण, भावलक्षी (दलित) अधिकारी किंवा उद्योगपती यांच्यापैकी कोणीही असो दादांचा संवाद थेट त्या माणसात वसलेल्या ईश्वराशी असायचा. दादांनी कधीच माणसाकडे त्याच्या स्थिती, वर्ण, धर्म, व्यवसाय यांसारख्या चष्म्यांतून बघितले नाही..
swadhyay parivar
दादांच्या प्रवचनशैलीत असे काय वेगळेपण होते?
धनश्रीदीदी : दादांच्या प्रवचनाचा मुख्य फोकस हा केवळ ’माणूस’ या घटकावर होता. मी सागरपुत्र असेन, देवीपूजक असेन, भावलक्षी (दलित), क्षत्रिय किंवा ब्राह्मण असेन; पण अखेर मी आधी ’माणूस’ आहे, ही जाणीव त्यांनी प्रत्येकात जागी केली. दादांनी त्यांच्या प्रवचनात कधीही तुम्ही असे करा, असे वागा असा थेट उपदेश केला नाही. त्यांची प्रवचने नीट ऐकल्यावर असे लक्षात येईल की तिथे आदेशात्मक भाषा नसे. त्यांच्या वाक्यांची रचनाच मी जर माणूस असेन, तर मी विचार केला पाहिजे, अशी असायची. ’मी जर माणूस असेन, तर मी कृतज्ञ राहिले पाहिजे’; ’मी जर माणूस असेल, तर मी देवाकडे या दृष्टीने पाहिले पाहिजे’. या वाक्यांमधून समोरच्याने आधी स्वतः हे ठरवायचे आहे की ‘मी माणूस आहे का? आणि ’जर मी माणूस आहे, तर मग मी कसे वागले पाहिजे’, हा विवेक स्वतःचा स्वतः जागा करायचा. दादांना अगदी हेच अभिप्रेत होते. दादांच्या या व्याख्या माणसासाठी असल्यामुळे त्यांच्या प्रवचनांत मध्यमवर्गीय, सामान्य, महिला, युवक आणि लहान मुलेही सामावून गेली. दादांचे प्रवचन केवळ आपल्यातल्या माणसाशी संवाद साधत असे आणि त्यालाच साद घालत असे. 1942पासून ते 2003मध्ये देहरूपाने दूर होईपर्यंत, दादांनी वयाच्या 82व्या वर्षापर्यंत अविरतपणे बोटाला धरून दिशा दाखवण्याचे काम केले. हा 60 वर्षांचा अविरत प्रवास म्हणजे एक फार मोठा ज्ञानयज्ञच होता.
स्वाध्याय परिवार म्हटला की ’भावफेरी’, ’भक्तिफेरी’, ’कृतिभक्ती’, ’स्वाध्याय’, ’योगेश्वर कृषी’ अशा अनेक संकल्पना ऐकायला मिळतात. या संकल्पनांचे मूळ नेमके काय आहे?
धनश्रीदीदी : या सर्व संकल्पनांचे मूळ पाहिले तर ते अत्यंत बेसिक आहे आणि जे आपल्या जुन्या परंपरेशी जोडलेले आहे. ’स्वाध्याय’ या शब्दातच ”स्व’चा अध्याय’ म्हणजेच स्वतःचा अभ्यास दडला आहे. आदि शंकराचार्यांनी ’कोडहं? कस्त्वंं? कुत आयातः?’ (म्हणजे कोण आहे? तू कोणाचा आहेस? कुठून आला आहेस?) हे जे प्रश्न विचारले, ते स्वतःसाठी विचारले नव्हते. त्यांना तर याचे ज्ञान होतेच; पण सामान्य माणसाला हे प्रश्न पडावेत आणि त्याने स्वतःचा अभ्यास करावा, म्हणून त्यांनी हे विचारून ठेवले.
’स्व’चा हा अभ्यास करण्यासाठी श्रवण, वाचन आणि चिंतन या गोष्टी आवश्यक ठरतात. या चिंतनातूनच ’कीर्तन’ संकल्पना जन्माला आली. आपल्याकडे जुन्या काळात ’चिंतनिका पद्धती’ होती, जो अभ्यासाचाच एक भाग होता. समजा आपण दोघे एकत्र शिकतोय, तर मला जे समजले आहे ते मी तुम्हाला समजवून सांगायचे; यालाच चिंतनिका म्हणतात. अशा पद्धतीने जेव्हा आपण दुसर्याला शिकवतो, तेव्हा आपला स्वतःचा अभ्यास अधिक पक्का होतो.
आम्ही स्वाध्यायात ज्या ’भावफेरी’ किंवा ’भक्तिफेरी’ला जातो, तो या कीर्तनाचाच एक भाग आहे. आम्ही जो अभ्यास केला, जे वाचले आणि समजून घेतले, ते दुसर्याला सांगणे म्हणजेच भावफेरी. मला आलेली देवाची आठवण, मला झोप येते म्हणजे नक्की काय होते, किंवा माझे अन्न कोण पचवते, मला सकाळी कोण उठवते. या गोष्टी जेव्हा आपण विज्ञानाच्या आधारे सांगतो, तेव्हा विज्ञानाच्या पलीकडेही काहीतरी आहे, याची जाणीव होते. आपल्या आतमध्ये जी चेतना आहे, जे माणुसकीचे अधिष्ठान आहे, ते समजून घेणे आणि तेच खेड्यापाड्यात किंवा शहरात जाऊन इतरांना सांगणे, हाच या फेर्यांमागचा मूळ हेतू आहे. त्यामुळे संकल्पनांना शब्द जरी वेगवेगळे वापरले असले, तरी त्यामागची मूळ भूमिका माणसाला स्वतःचा अभ्यास करायला शिकवणारी आणि अत्यंत मूलभूत अशीच आहे.
दादांनी नेहमी ’कृतिभक्ती’वर भर दिला. त्यामागचा विचार काय होता?
धनश्रीदीदी : दादांचे एक अत्यंत स्पष्ट मत होते. प्रेम केवळ शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. ते कृतीत उतरले पाहिजे. आपण आईवर प्रेम करतो असे म्हणतो. पण तिच्या कामात हातभार लावत नसलो, तर त्या प्रेमाला अर्थ काय? देवावर श्रद्धा आहे असे म्हणायचे; पण देवासाठी काहीच करायचे नाही. हे दादांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी भक्तीला कृतीची जोड दिली. त्यातून ’कृतिभक्ती’ ही संकल्पना निर्माण झाली. कृतिभक्ती मागे समाजकारण हा उद्देश नव्हता. तो भक्तीचा विस्तार होता. समाजसेवा हा त्याचा परिणाम असू शकतो; पण उद्देश देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा होता. दादा नेहमी म्हणायचे, ”कर्म करा, पण अपेक्षेने नाही.” म्हणून कृतिभक्तीत प्रसिद्धी नाही. स्पर्धा नाही. श्रेयाची अपेक्षा नाही..केवळ समर्पण आहे.
'योगेश्वर कृषी’ संकल्पना कशी निर्माण झाली?
धनश्रीदीदी : ‘कृतिभक्ती’चे उत्तम उदाहरण म्हणजे ‘योगेश्वर कृषी’ ही संकल्पना. या संकल्पनेत देवासाठी शेती करण्याच्या कृतीचा समवेश आहे. जेव्हा एखादा सामान्य शेतकरी दादांना सांगायचा की, ‘मला बोलता येत नाही. मला फक्त शेती करता येते.’ तेव्हा दादा त्यांना सांगायचे, “मग देवासाठी शेती कर!” या संकल्पनेतून 10 ते 12 शेतकरी एकत्र येऊन एका प्लॉटवर शेती करतात. ती शेती पूर्णपणे देवाच्या नावाने केली जाते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे कोणा एकाच्या स्वत:च्या कर्तृत्त्वाचे किंवा नशिबाचे नसते, तर ती प्रत्येकाने आपली कार्यक्षमता पणाला लावून पुजारी भावनेने केेलेली भक्ती असते. हे अत्यंत शुद्ध आणि पवित्र उत्पन्न असून ते खर्या अर्थाने ‘महालक्ष्मी’ आहे. अशिक्षित कमी शिकलेल्या शेतकरी बांधवाला दादांचे तत्त्वज्ञान खूपच जवळचे वाटते. सध्या देशभरातील नऊ हजारपेक्षा जास्त गावांमध्ये ‘योगेश्वर कृषी‘ ही संकल्पना यशस्वीपणे सुरू आहे. या गावांमधील अधिक लोक स्वाध्याय विचारांचा सहजपणे अंगीकार करून आपले जीवन जगत आहेत.
वृक्ष मंदिर म्हणजे नेमके काय?
धनश्रीदीदी : आपल्या संस्कृतीत वड, पिंपळ यांसारख्या झाडांची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे; परंतु काळाच्या ओघात ती केवळ महिलांपुरती किंवा विशिष्ट अंधश्रद्धेपुरती मर्यादित राहिली होती. दादांनी या परंपरेला वैज्ञानिक आणि तार्किक अधिष्ठान दिले. दादांनी सुचविलेले तत्त्व अत्यंत साधे आणि तितकेच प्रभावी आहे. आपण झाडाच्या मुळाला पाणी घालतो. ते पाणी गुरुत्वकर्षणाच्या विरोधात जाऊन वरच्या पानातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचते. सामान्यात: जमिनीखालचे पाणी वर चढण्यासाठी आपल्याला मोटार नाहीतर पंप लावावा लागतो; मग झाडामध्ये असा कोणता पंप बसवला आहे? तर पाणी वर पोहोचवणारी जी अंत:स्थ शक्ती म्हणजे ईश्वर. दादा म्हणतात हे केशाकर्षण नसून केशवाकर्षण आहे. 20 गावांतील लोक एकत्र येऊन एका ठरावीक जागेवर झाडांची लागवड करतात. त्यांचे संगोपन करतात. ती जागा वृक्षमंदिर म्हणून ओळखली जाते. तर अशी आहे आमची वृक्षमंदिर ही संकल्पना. या वृक्षमंदिर संकल्पनेमुळे 20 गावांमध्ये आपापसांतील वैर संपून एकोपा निर्माण झाला आहे. तिथे 24 तास राहून झाडांची सेवा करणारा माणूस स्वत:ला मजूर समजत नाही; तर ’पुजारी’ या भावनेने तिथे भक्ती करतो.
दादांचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना इतके सहज कसे समजले?
धनश्रीदीदी : गीता, उपनिषदे, वेदांत या विषयांतील क्लिष्ट वाटणारी तत्त्वाज्ञानाची सूत्रे सर्वसामान्यांना साध्या, सोप्या आणि रोजच्या जगण्याच्या भाषेतून उदाहरणे देऊन समजावून सांगितली. म्हणून सामान्य माणसालाही दादांचे तत्त्वज्ञान आपले वाटते. त्यामुळे त्यांचा विचार लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचला.
दादा आणि इतर धार्मिक नेत्यांमध्ये मूलभूत फरक काय आहे?
धनश्रीदीदी : समाजातील इतर धार्मिक नेते किंवा संतांपेक्षा दादांचा ट्रॅक पूर्णपणे वेगळा होता. आजचे बहुतांश संतपुरुष हे जगासाठी निवृत्तवादी आणि स्वत:साठी प्रवृत्तीवादी असतात; मात्र दादांचे अगदी याच्या उलट होते. दादा स्वत:साठी पूर्णपणे निवृत्तीवादी, विरक्त होते आणि समाजासाठी प्रवृत्तीवादी, कर्तव्यशील होते. त्यांचे म्हणणे होते की, केवळ बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष कर्म करावे लागेल. याच विचारातून दादांच्या कृतिप्रवण व्यक्तिमत्त्वाचा आदर करण्यासाठी 19 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आपण ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. कॅलेंडरमध्ये ’शिक्षक दिन’, ’बालक दिन’, ’मुद्रण दिन’, ’ग्राहक दिन’ असे अनेक दिवस असतात; मग ज्या शक्तीने माणसाला त्याच्या ‘मनुष्यत्वाचा’ खरा अभिमान आणि गौरव शिकवला, त्या माणसाच्या गौरवाचा दिवस असायलाच हवा, हा विचार करून ‘मनुष्य गौरव दिन’ हे नाव आणि संकल्पना आम्ही म्हणजे सबंध परिवाराने दादांना दिले, जे आमचे एक छोटेसे योगदान होते.
स्वाध्याय परिवाराचे कार्य वनवासी समाजापर्यंत कसे पोहोचले? सुरुवातीचा अनुभव कसा होता?
धनश्रीदीदी : वनवासी समाजापर्यंत पोहोचणे हा स्वाध्याय परिवाराच्या प्रवासातील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक होता. वनवासी बांधव अत्यंत बुद्धिमान आणि अनुभवसंपन्न असतात. अनेक वर्षे विविध संस्था त्यांच्याकडे काही ना काही देण्यासाठी, योजना सांगण्यासाठी किंवा मदत करण्याच्या भूमिकेत गेल्या होत्या. त्यामुळे आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या वस्त्यांवर गेलो, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा, ’तुम्ही आमच्यासाठी काय आणले आहे?’ आम्ही उत्तर द्यायचो, ’काहीच नाही. आम्ही फक्त तुम्हाला भेटायला आलो आहोत.’ त्यांना हे उत्तरच समजत नव्हते. शेवटी विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. तो सततच्या संपर्कातून निर्माण होतो. आमचे कार्यकर्ते पुन्हापुन्हा त्यांच्या गावात जाऊ लागले. त्यांच्या घरी बसले. त्यांच्यासोबत जेवले. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. त्यांच्याकडून काही घेण्याचा किंवा त्यांना काही देण्याचा व्यवहार नव्हता. फक्त नाते जोडण्याचा प्रयत्न होता. हळूहळू त्यांना जाणवले की हे लोक खरोखरच आम्हाला आपले मानतात. आणि तिथूनच खरी सुरुवात झाली. समाजातील उपेक्षित घटकांना आपलेसे केले. त्यांना ’भाव’दिला. दादांना कोणालाही दयेचा विषय बनवायचा नव्हता. ते म्हणायचे, ”त्यांना दया नको आहे. त्यांना सन्मान हवा आहे.” म्हणूनच त्यांनी दलित बांधवांना वेगळ्या नजरेने पाहिले. त्यांना ’भाव’ देऊन ’भावलक्षी’ संबोधिले. समाजाचे उपेक्षित घटक नसून आपल्या ’स्वाध्याय’ परिवाराचे सदस्य आहेत, ही भावना त्यांनी जागवली. यामुळे संबंध बदलले.’सेवक’ आणि ’लाभार्थी’ हे नाते संपले. ’भाऊ’ आणि ’भावंड’ हे नाते निर्माण झाले.
आज स्वाध्यायात मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी आहेत. त्यांना जोडण्यात यश कसे मिळाले?
धनश्रीदीदी : आजच्या काळात तरुण पिढी आत्मकेंद्री होत चालली आहे, असे म्हटले जाते; परंतु स्वाध्याय परिवारात आज लाखोंच्या संख्येने तरुण जोडलेले दिसतात. आजच्या तरुणाला पटेल, रुचेल आणि त्याच्या बुद्धीला पटेल अशा भाषेत दादांनी तत्त्वज्ञान आणि स्वाध्यायाचा विचार मांडला. स्वाध्यायात युवकांसाठी केवळ प्रवचने दिली जात नसून, त्यांच्या आवडीचे खेळ, वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविले जातात. या निबंध किंवा वक्तृत्त्व स्पर्धांचे विषय कुठलेही नसून, ते आपल्या गौरवशाली संस्कृतीशी आणि गीतेशी जोडलेले असतात. दर आठवड्याला ‘युवा केंद्र’ चालवली जातात. यात वर्षाचे 52 स्वतंत्र विषय अभ्यासले जातात. यात विविध गुणदर्शन तसेच चरित्रदर्शन घडवले जाते. स्वाध्यायच्या वेगवेगळ्या उपक्रमांतून विचारांचे आदान-प्रदान होते. या खेळीमेळीच्या वातावरणामुळे आजचा तरुण हा स्वाध्याय विचारांशी मनापासून जोडला गेला आहे.
स्वाध्याय परिवाराचा अमेरिकेत झालेला ‘आप्तवंदनम्’ कार्यक्रम
स्वाध्यायाचे कार्य भारताबरोबरच परदेशातही विस्तारले आहे...
धनश्रीदीदी : होय तर. स्वाध्याय परिवाराचे कार्य केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेतील 37 राज्यांसह जगातील अनेक देशांमध्ये विस्तारले आहे. या अथांग कार्याचे नियोजन, समन्वय आणि निर्देशन कसे केले जाते, या प्रश्नाचे उत्तर ’परिवार’ या एकाच शब्दात दडलेले आहे. ’परिवार’ म्हणजे कुटुंब. वैश्विक पातळीवर काम करताना स्वाध्याय परिवाराची सर्वात मोठी ताकद आणि वेगळेपण म्हणजे ‘आम्ही कधीही ‘हिंदू धर्म’ लादण्यासाठी किंवा याचा प्रचार करण्यासाठी जात नाही. कोणाचेही धर्मांतर हा आमचा हेतू नव्हता आणि नाही. स्वाध्याय विचारांशी जोडलेला मुसलमान एक ‘चांगला मुसलमान बनू दे’ आणि ख्रिश्चन एक ‘चांगला ख्रिश्चन बनू दे’. शेवटी जगातील प्रत्येक मूळ धर्म हा मानव कल्याणाचाच विचार मांडतो. दादांनी धर्माचा नाही तर भक्तीचा (devotion) विचार मांडला. दादा नेहमी म्हणायचे की devotion हे religionच्या खूप वर आहे.
या मुलाखतीद्वारे तुम्ही काय संदेश द्याल?
धनश्रीदीदी : माणूस विचारशील व्हावा, भक्तिपूर्ण व्हावा तसेच कर्मप्रवणसुद्धा व्हावा, हाच त्याच्या विकास आहे. श्रीमद्भगवद्गीता अशाच सर्वांगीण परिवर्तनासाठी आग्रही आहे. श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेने माणसाला वैचारिक स्पष्टता आणि स्थैर्य दिले; तर प्रभूबरोबर असलेला संबंध समजावून ’भक्तिपूर्ण कृती’ हा माणसाचा स्वभाव बनवला. भारतासारख्या विविधता आणि प्रांतांच्या देशातही स्वाध्याय कार्य तितक्याच सहजतेने पसरले आहे. आम्ही तथाकथित राजकारण, समाजकारण आणि इतकेच नव्हे तर, ’धर्मकारणा’पासूनही पूर्णपणे दूर आहोत. आम्ही कोणाच्याही स्पर्धेत नाही; त्यांचा रस्ता वेगळा आहे आणि स्वाध्यायाचा रस्ता हा आत्मीयतेचा, भक्तीचा असा पूर्णपणे वेगळा आहे. पण दादांच्या शिकवणीमुळे आम्हाला मात्र जगातील प्रत्येक माणूस हा ’आमचाच’ वाटतो. हाच स्वाध्यायाचा खरा वैश्विक भाव आणि शतकभराच्या या ज्ञानयज्ञाचे अंतिम संचित आहे.
शब्दांकन - विवेक टीम