ज्ञानेश्वरी अभिजात ग्रंथसंपदा

विवेक मराठी    05-Aug-2026   
Total Views |
 
vivek
ज्ञानदेवांनी अत्यंत विचारपूर्वक भगवद्गीतेची निवड करून त्यातील सुसेव्य धर्मविचारांवर मराठीत अत्यंत सुलभ व रसाळ असा भाष्यग्रंथ लिहिला. तो भाष्यग्रंथ, ती गीता टीका म्हणजेच ज्ञानदेवांची ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ होय. ज्ञानेश्वरी हा विठ्ठलभक्त-वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ म्हणून लोकप्रिय असला तरी तो संप्रदायापुरता, मराठीपुरता, देशापुरता मर्यादित, संकुचित नाही. ज्ञानेदवांच्या विश्वकल्याणार्थ समर्पित विश्वमनाचे ‘ज्ञानेश्वरी’ हे विश्वात्मक दर्शन आहे. ज्ञानेश्वरी हा भक्ती संप्रदायाचा धर्मग्रंथ असला तरी ही भक्ती डोळस आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन इतिहासामध्ये 13व्या शतकातील ‘संत ज्ञानदेव’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ यांचे योगदान कालातीत आहे. संत ज्ञानदेवांना पूज्यभावाने ‘माउली’ म्हणून संबोधले जाते तसेच त्यांच्या ज्ञानेश्वरीलाही ‘माउली’ म्हणून गौरवले जाते. ग्रंथलेखक आणि त्याची साहित्यकृती अशा दोघांनाही ‘माउली’ अशा एकाच हृद्य विशेषणाने गौरवले जाणे, हे विश्वातील एकमेवाद्वितीय उदाहरण आहे. हीच ‘ज्ञानदेव’ व ‘ज्ञानेश्वरी’ची थोरवी आहे. मराठी भाषेच्या उषःकाली ‘ज्ञानेश्वरी’सारखे विदग्ध रससंपन्न, तात्त्विक काव्यलेणे आपणास लाभले हे अभिजात मराठीचे भाग्य आहे. आज ज्ञानेश्वरीला 700 वर्षे होऊन गेली आहेत पण त्या ग्रंथाची लोकप्रियता व प्रभाव अक्षुण्ण आहे. ‘भावार्थ दीपिका’, ‘ज्ञानदेवी’, ‘ज्ञानेश्वरी’ अशा अनेक नावांनी हा ग्रंथ ओळखला जातो, पण स्वतः ज्ञानदेव त्याला ‘गीतार्थ’, ‘देशिकार लेणे’ धर्मकीर्तन म्हणतात.
 
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ।
एक तरी ओवी अनुभवावी ॥
 
संत ज्ञानदेवांचे ज्येष्ठ संतसांगाती नामदेव महाराज यांनी वरील शब्दांमध्ये ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाची आध्यात्मिक महती गायलेली आहे.नव्या साहित्यिक भाषेत नामदेवांची ही ओवी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाची समकालीन समीक्षा आहे. अशीच आस्वादक समीक्षा संत जनाबाई, संत चोखामेळा या समकालीन आणि संत एकनाथ, संत तुकाराम या उत्तरकालीन संतांनी केलेली आहे. ही संतसमीक्षा ‘ज्ञानेश्वरी’चे अनन्यसाधारण योगदान व सर्वोच्च स्थान यांचे विलोभनीय दर्शन आहे. आधुनिक आंग्ल काळात थोर विद्वान, द्रष्टे, पत्रकार-संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी पुढाकार घेऊन ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली मुद्रणप्रत(इ.स.1845) प्रकाशित केली आणि नवशिक्षित-विचारवंत-सुधारक यांना ज्ञानेश्वरीतील विचारदर्शन घडवले. भागवत धर्म मंदिराचा पाया घालणारी ‘ज्ञानेश्वरी’, विदग्ध रसाळ काव्य आणि तत्त्वग्रंथ म्हणून नवशिक्षितांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू झाली.आज ज्ञानेश्वरीला सातशे वर्षे होऊन गेली आहेत पण ज्ञानेश्वरीची श्रद्धावंत, साहित्यिक, विचारवंत वर्गातील लोकप्रियता-मोहिनी कायम आहे.
 
‘ज्ञानेश्वरी’कालीन स्थिती-गती
 
कोणत्याही व्यक्ती व ग्रंथाचे यथार्थ मूल्यमापन त्या व्यक्तीच्या काळातील एकूण सामाजिक, धार्मिक, स्थितीगतीच्या पार्श्वभूमीवरच होऊ शकते. ज्ञानदेवांच्या काळात महाराष्ट्रात देवगिरीच्या यादव राजांचे राज्य होते. त्याकाळचे सर्व लोकजीवन हे धर्माने बद्ध होते. सर्वत्र धर्माचा पगडा होता. विविध प्रकारे धार्मिक विधीनिषेध, सोवळेओवळे, जातीय भेदाभेद आणि व्रतवैकल्यांनी जखडलेले कर्मकांड असा सारा समाज मूठभर धर्ममार्तंडांच्या वर्चस्वाखाली होता. सारे धर्मग्रंथ व शास्त्रे संस्कृतमध्ये असल्याने मूळ वैदिक वाङ्मयातील धर्मतत्त्वापासून सर्वसामान्य माणूस वंचित होता. क्षुद्रदेवता पूजनाने व अंधश्रद्धेने ग्रासलेला होता. अशा काळात संस्कृत भाषेमध्ये ग्रंथलेखनाचे बंधन झुगारून ज्ञानदेवांनी चक्क मराठी भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ लिहून क्रांतीध्वजा फडकविली. एवढेच नव्हे तर ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यावर भाष्य न लिहिता ज्ञानदेवांनी अत्यंत विचारपूर्वक भगवद्गीतेची निवड करून त्यातील सुसेव्य धर्मविचारांवर मराठीत अत्यंत सुलभ व रसाळ असा भाष्यग्रंथ लिहिला. तो भाष्यग्रंथ, ती गीता टीका म्हणजेच ज्ञानदेवांची ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ होय! काही संत या ग्रंथाला ‘ज्ञानदेवी’ म्हणतात.
 
 
श्रोतृसंवादरूप निर्मिती
 
देवगिरीच्या यादव राजघराण्यातील ‘राजा रामचंद्र’ यांच्या काळात शके 1212 (इ.स.1290) मध्ये, आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘नेवासे’ येथे ‘ज्ञानेश्वरी’चे लेखन सिद्धीस गेले. लेखकाने एकांतात बैठक मारून केलेले हे ग्रंथ लेखन नसून नेवासे येथील मंदिरात, आपले गुरू संत निवृत्तीनाथ, विद्वान साधक, सामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला, व्यापारी अशा विविध प्रकारच्या श्रेणीतील श्रोतृवर्गापुढे गीतेवर केलेले ओवीबद्ध निरुपण आहे. श्रोत्यांमध्ये श्रद्धेने बसलेल्या सच्चिदानंदबाबा यांनी ते लिहून त्यास ग्रंथरूप दिले. त्यामुळे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे स्वरूप हे संवादरूप आहे. ‘भगवद्गीता’ हा सुद्धा महर्षी व्यास कृत ‘श्रीकृष्ण-अर्जुन’ संवाद आहे. ज्ञानेश्वरीच्या लेखनामध्ये समोरचे श्रोते व पाठीशी असलेले श्रीगुरू यांचे योगदान स्वतः ज्ञानदेवांनीच अनेक ठिकाणी व्यक्त केलेले आहे. एवढेच नव्हे तर ज्ञानेश्वरीचे सारे श्रेय विनम्रभावाने त्यांनी श्रद्धावंत सुधी श्रोते आणि श्रीगुरू निवृत्तीनाथ यांना देण्यात धन्यता मानली आहे. श्रोत्यांबद्दल कमालीचा आदरभाव व्यक्त करीत ज्ञानदेव श्रोत्यांना ‘तुम्ही महेशाचिया मूर्ती’ असे म्हणतात. श्रोत्यांना असा देवत्वाचा मान देऊन व्याख्यान करणारे, ज्ञानदेव हे पहिले वक्ते आहेत.
 
गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी
 
ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची ‘गीता टीका’ आहे. पण पूर्वपक्ष, उत्तरपक्ष, खंडनमंडन अशा पारंपरिक पठडीतील ती टीका, नसून भावार्थाचे दर्शन घडविणारा काव्यरूपी शब्दविलास आहे. ती ‘अभिनव वाग्विलासीनी’ आहे. गीतेतील तत्त्वविचार ज्ञानेश्वरीत कवित्व, रसिकत्व आणि परतत्त्व यांचा मधुर मिलाप होऊन प्रकटलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या गीता टीकेचा उद्देश स्वतःचे पांडित्य दाखविण्याचा नाही, तसे असते तर त्यांनी पूर्व परंपरेनुसार गीतेवर संस्कृत भाषेत टीकाग्रंथ लिहिला असता. पण ज्ञानदेवांचा उद्देश संस्कृत गीतेतील ब्रह्मविद्या-धर्मविचार, सर्वसामान्य मराठी माणसासाठी मराठीतून कथन करण्याचा आहे. ‘तीरे संस्कृताची गहनें। तोडोनिया मर्हाठीया शब्दसोपाने। रचिली धर्मनिधाने। निवृत्तिदेवे॥’ (ज्ञा.11/9) असे त्यांच्या कार्याचे स्वरूप त्यांनीच ज्ञानेश्वरीत स्पष्टपणे व्यक्त केलेले आहे. देशी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याची प्रतिज्ञा करून त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ नावाचे ‘देशिकार लेणे’ निर्माण केलेले आहे. ज्ञानेश्वरीचे हे स्वरूप लक्षात घेऊन ‘गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी।’ अशा शब्दात संत नामदेव ज्ञानेश्वरीचा गौरव करतात. ‘ब्रह्मानंदलहरी’ विशेषणाने आध्यात्मिक थोरवी गातात. स्वतः ज्ञानदेव ज्ञानेश्वरीतील एका ओवीत आपल्या टीकेस ‘गीतार्थ’ म्हणतात.
 
तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थें विश्व भरूं।
आनंदाचे आवारूं । मांडू जगा ॥ (ज्ञा.13/1160)
 
गीतार्थाने ‘विश्व’ भरून टाकण्याचा व सारे ‘जग’ अद्वैय आनंदाचे अंगण करण्याचा ठाम मनोदय ज्ञानदेव या ओवीतून व्यक्त करतात. या ओवीतील ‘विश्व’, ‘जग’ हे शब्द ज्ञानदेवांचे लक्ष्य कसे प्रारंभापासूनच विश्वात्मक आहे ते दर्शवतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा विठ्ठलभक्त-वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ म्हणून लोकप्रिय असला तरी तो संप्रदायापुरता, मराठीपुरता, देशापुरता मर्यादित, संकुचित नाही. ज्ञानेदवांच्या विश्वकल्याणार्थ समर्पित विश्वमनाचे ‘ज्ञानेश्वरी’ हे विश्वात्मक दर्शन आहे. ‘विश्व हेचि माझे घर।’ म्हणत ज्ञानेश्वरीच्या शेवटी ‘आता विश्वात्मके देवे।’ असे विश्वात्मक देवाकडे ते पसायदान मागतात. विश्वबंधुत्वाच्या विशाल, व्यापक दृष्टिचा जो पाया ज्ञानदेवांनी घातला त्यावरच पुढे संत नामदेव, एकनाथ, तुकाराम महाराज, बहिणाबाई आदी संतपरंपरेने भक्तीप्रेमाचा कळस चढवलेला आहे.
 
गीता आणि श्रीमद् भागवत हे वारकरी भक्तीपरंपरेचे अधिष्ठानात्मक प्रमाण ग्रंथ आहेत. दोन्ही ग्रंथ श्रीकृष्णाशी संबंधित आहेत. गीता हा कृष्णाचा तत्त्वविचार आहे तर श्रीमद् भागवत श्रीकृष्णाच्या जीवनलीला आहेत. पंढरीचा पांडुरंग हा भगवान कृष्णाचा प्रेमावतार असून, वारकरी भक्तांचे इष्ट दैवत आहे. त्यामुळे श्रीकृष्णाशी निगडित गीता भागवतासह सारे साहित्य वारकर्‍यांना प्राणप्रिय आहे. अनेक संतांनी ज्ञानेश्वरांना श्रीकृष्णाचा अवतार मानलेले आहे. संत एकनाथ महाराज काय म्हणतात पहा -
अर्जुना संकट पडता जडभारी । गीता सांगे हरी कुरुक्षेत्री ॥
 
तोंचि अवतार धरी अलंकापुरी ।.....
गीता शोधुनिया अर्थ तो काढिला ।
ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥
 
श्रीकृष्णानेच ज्ञानेश्वरांचा अवतार घेऊन ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली अशी बहुसंख्य भाविकांची उपासकाची श्रद्धा आहे.
‘ज्ञानेश्वरी’चे स्वरूप
ज्ञानेश्वरी हा गीतेचा भावार्थ आहे. श्रीमद् भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत तसे ‘ज्ञानेश्वरी’ 18 अध्यायी आहे. गीतेत संस्कृतचे 700 श्लोक आहेत तर ज्ञानेश्वरीत त्याचा विस्तार सुमारे 9000 ओव्यांमध्ये झालेला आहे. गीतेमधील कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग तसेच विविध विषयाचे ज्ञानदेवांनी अत्यंत सुलभ मराठीत ओवीबद्ध धर्मकीर्तन केलेले आहे. भक्ती प्रसार हा त्यामागे मुख्य हेतू असून भक्ती हे सर्वश्रेष्ठ आणि सोपे साधन आहे असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे.
 
ओम नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥
 
या ओवीने ज्ञानेश्वरीचा श्रीगणेशा होतो. ज्ञानदेवांचे हे प्रारंभीचे मंगलाचरण ‘वाङ्मय गणेशाचे’ वंदन आहे. समग्र भारतीय वैदिक साहित्याचे मोठ्या कौशल्यपूर्ण साक्षेपाने ज्ञानदेव या मंगलाचरणातून गणेशरूपात दर्शन घडवतात. ज्ञानदेवांची ‘मंगलाचरणे’ त्यांच्या स्वयंप्रज्ञ कल्पनाविलासाचे मनोज्ञ, विलोभनीय शब्ददर्शन आहे. ज्ञानदेव हे शब्दप्रभु आहेत. ‘उपमा’, ‘रूपक’ यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यांचे शब्द रसाळ आहेत, मवाळ आहेत. तसेच ते ‘कल्लोळ अमृताचे’ आहेत.
 
माझिया मराठीचा बोलु कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ॥
 
असा मराठी भाषेचा स्वाभिमान ते व्यक्त करतात. संस्कृत गीतेवर भारतीय प्रादेशिक भाषेत झालेल्या टीका ग्रंथात ‘ज्ञानेश्वरी’ सर्वश्रेष्ठ आणि ‘आद्य’ आहे. संस्कृत गीतेवर प्रादेशिक भाषेत टीका लिहिणारे ज्ञानदेव हे पहिले भाष्यकार आहेत. ज्ञानेश्वरीला स्वतः ज्ञानदेव ‘धर्मकीर्तन’ म्हणतात, ‘वाग्यज्ञ’ म्हणतात. ज्ञानेश्वरीतील ही शेवटची समाप्तीची ओवी पहा -
 
किंबहुना तुमचे केले। धर्मकीर्तन हे सिद्धी गेले।
एथ जी माझे उरले। पाईकपण॥
 
अशा विलक्षण विनम्र भावाने ज्ञानदेव ज्ञानेश्वरीची समाप्ती करतात आणि विश्वात्मक देवाला हा वाग्यज्ञ अर्पण करून ‘पसायदान’ मागतात. पसायदानाच्या नऊ ओव्या म्हणजे एका विश्वमनाचे विश्वात्मक देवाकडे मागणे आहे. ते व्यक्तिगत नसून सार्‍या विश्वातील प्राणीमात्राच्या मंगलार्थ आहे. राष्ट्रसंघाचे (UNO) विश्वगीत व्हावे अशा विश्वमांगल्याची महानमंगल मनोकामना त्यामध्ये आहे.
 
ज्ञानेश्वरी ः विवेकाची गोष्ट
 
श्रेष्ठ दर्जाचा काव्यग्रंथ म्हणून साहित्यिकांनी ज्ञानेश्वरीचे विविध अंगानी रसग्रहण केलेले आहे. श्रेष्ठ तत्त्वज्ञान ग्रंथ म्हणून विचारवंतांनी तिचा गुणगौरव केलेला आहे. वारकरी भक्ती परंपरेचा - भागवत धर्माचा पायाभूत ग्रंथ म्हणून आध्यात्मिक, पारमार्थिक महानुभव-मठपतींनी तिला शिरोधार्य मानलेले आहे तर, सर्वसामान्य भाविक, उपासक, श्रद्धावंतांनी ‘माउली’ म्हणत तिला मनमंदिरात स्थापन केलेले आहे. अशा विविध प्रकारे ज्ञानेश्वरीची मोहिनी एकाच वेळी सर्वसामान्य भाविक आणि अभ्यासक, संशोधक, विचारवंत यांना आकर्षित करीत आली आहे.
 
ज्ञानेश्वरी हा भक्ती संप्रदायाचा धर्मग्रंथ असला तरी ही भक्ती डोळस आहे. या भक्तीला ज्ञानाचा डोळा आहे. ज्ञानदेवांच्या पुढील दोन ओव्या ज्ञान, बुद्धी यांचे त्यांच्या विचारात कसे प्राधान्य आहे ते दर्शवितात -
 
मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धिच्या डोळा देखावे ॥ (ज्ञा.6.484)
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान ।
ते निर्दोष होआवे ॥ (ज्ञा.9.350)
 
ज्ञानेश्वरीच्या तिसर्‍या अध्यायात ज्ञानदेवांनी अर्जुन-श्रीकृष्णाचा संवाद रंगवला आहे. त्यामध्ये श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, ‘माझ्या या मोहग्रस्त संभ्रमी अवस्थेत तुम्ही मला ‘विवेक’ सांगावा.’
 
मी आधीचि काही नेणे । बरी कवळिलो मोहे येणे ।
कृष्णा विवेकु या कारणे । पुसिला तुज ॥ (3.10)
म्हणोनि आइके देवा । हा भावार्थु आता न बोलावा ।
मज ‘विवेकु’ सांगावा । मर्हाटी जी ॥ (3.17)
 
श्रीकृष्णाला गुरू, माउली म्हणून संभ्रमी अर्जुनाने शरणभावाने विवेक सांगा म्हणून प्रार्थना केली आणि म्हणून पुढे श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो सर्व ‘विवेक विचार’ आहे. विवेकाची गोष्ट आहे.अशा प्रकारे ज्ञानेश्वरी डोळस भक्ती विचार आहे. ही भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे.
 
‘ज्ञानेश्वरी’वर आजवर शेकडो ग्रंथ आणि पीएच.डी. प्रबंध लिहिले गेलेले आहेत. तसेच अनेक अभ्यासक-संशोधक विचारवंत यांची अनेक प्रकारची मतमतांतरे-वाद आहेत. अशा ज्ञानेश्वरीची ओळख एका लेखात होणेच शक्य नाही. पण हा लेख वाचून वाचकांनी मूळ ‘ज्ञानेश्वरी’कडे वळावे आणि आपला मराठीतील अभिजात वाङ्मय वारसा समजून घ्यावा एवढाच हेतू आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील ‘ज्ञानेश्वरी’ हा एक प्राकृत भाषेतील अमृतठेवा आहे .
 
- लेखक संतसाहित्याचे उपासक, अभ्यासक आहेत.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.