आज आम्ही स्वतंत्र आहोत, खरेच स्व-तंत्र आहोत का? स्वातंत्र्याबरोबर येणार्या जबाबदार्या आम्हाला नको आहेत. अनेकांना असे वाटते की, स्वैराचार करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. तोंडाला येईल ते बडबडणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. हीच स्वतंत्र्याची व्याख्या आहे का? आपण स्वतंत्र आहोत म्हणजे स्व-तंत्राप्रमाणे विचार करणारे आहोत आणि आपल्या तंत्राने स्वतःची उन्नती करून घ्यायची आहे आणि समाजाचीदेखील उन्नती करायची आहे.
ब्रिटिशांच्या ताब्यातून 15 ऑगस्ट 1947ला भारत मुक्त झाला, याला ‘राजकीय स्वातंत्र्य’ म्हणतात. सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करायचे, याची मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेने दिली, तिचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला.
भारत इंग्रजाच्या गुलामीत असतानादेखील आपले सत्त्व आपण टिकवून ठेवले. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, रमण महर्षी, योगी अरविंद, लो. टिळक, स्वातंत्र्यवीर वीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार अशी सत्त्वाची जपवणूक करणारी असंख्य नावे आहेत. ही थोर मंडळी राजकीय पारतंत्र्यातही स्वतंत्र होती. त्यांना परतंत्र करण्याची शक्ती महासत्ता ब्रिटनमध्ये नव्हती.
त्यांचे जीवन हे सांगते की, आपण स्वतंत्र आहोत. स्व- तंत्राप्रमाणे विचार करणारे आहोत आणि आपल्या तंत्राने स्वतःची उन्नती करून घ्यायची आहे आणि समाजाचीदेखील उन्नती करायची आहे.
ज्यांचे जीवन हे सांगते की, स्वतंत्र असणे, ही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. स्वतंत्र असल्याने अनेक प्रकारच्या जबाबदार्या येतात. जबाबदार्यांशिवाय स्वातंत्र्य अर्थहीन असते. स्वातंत्र्याची पहिली मोठी जबाबदारी स्वतःला घडविण्याची आहे. दुसरी जबाबदारी समाजऋणातून मुक्त होण्याची आहे. तिसरी जबाबदारी राष्ट्रऋणातून मुक्त होण्याची आहे. चौथी जबाबदारी पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याची आहे. ही सर्व कर्जे जन्मतः प्राप्त होतात. त्यातून मुक्ततेचा मार्ग ज्याचा त्याला शोधावा लागतो, याला स्वातंत्र्य म्हणतात.
आपला स्वातंत्र्याचा अर्थ कोणता? अनेकांना असे वाटते की, स्वैराचार करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. तोंडाला येईल ते बडबडणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. थोरामोठ्यांविषयी अभद्र बोलणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. वाट्टेल ते खाणे, धांगडधिंगा करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. संस्थांविषयी वाईट भाषेत बोलणे म्हणजे स्वातंत्र्य आहे. आणि ते आम्हाला राज्यघटनेने दिलेले आहे असे निर्लज्जपणे सांगणे हा घटनेचा व घटनाकारांचा अपमान आहे.
स्वतंत्र तोच असतो जो सारासार विचार करू शकतो. स्वतंत्र तोच असतो जो कोणत्याही खोट्या कथानकाला बळी पडत नाही. स्वतंत्र तोच असतो जो चुकीच्या माहितीचा शिकार होत नाही. स्वतंत्र तोच असतो जो कुणीतरी ठरवलेल्या विषयसूचीवर काम करीत नाही. स्वतंत्र असण्यासाठी बुद्धी स्वतंत्र हवी आणि स्वतः निर्णय करण्याची क्षमतादेखील हवी. आज आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु स्वातंत्र्याबरोबर येणार्या जबाबदार्या आम्हाला नको आहेत. मग त्या विवाहाच्या जबाबदार्या असतील, कुटुंबाच्या जबाबदार्या असतील, मुलांच्या संगोपनाच्या जबाबदार्या असतील किंवा वृद्ध मातापित्यांची काळजी घेण्याच्या जबाबदार्या असतील. जबाबदारीपासून पळून जाणे हा भ्याडपणा आहे, त्यात कसलेही शौर्य नाही.
आज आम्ही स्वतंत्र आहोत, खरेच स्व-तंत्र आहोत का? हातातील मोबाईलचे आपण गुलाम झालेलो आहोत. तरुण पिढी दिवसातील किती तास मोबाईल किंवा टॅबवर घालविते, हे आपण रोज पाहातो. तुम्ही रेल्वेत बसा किंवा बसमध्ये बसा 30-40 जण असतील तर, 25-30 जणं मोबाईल उघडून बसलेले असतात.
हा मोबाईल काय करतो? तो तुमची विचारशक्ती मारून टाकतो. तो तुम्हाला वेगवेगळ्या रिल्स, व्हिडिओ यात नाचवत राहातो. ज्याचा आपल्या क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने फारसा उपयोग नसतो. त्यातून कोणतेही ज्ञान मिळत नाही. वासना जागृत होतात. नको त्या इच्छा जागृत होतात आणि बहुतेक वेळा दिशाभूल होते आणि आपण भरकटत जातो आणि तरीही वर तोंड करून म्हणणार,‘मी स्वतंत्र आहे’. मला घटनेने विचार, अभिव्यक्ती, उपासना, संचार याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. ते कशाशी खातात याची माहिती शून्य.
स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात स्वतंत्र बुद्धीचा एक किस्सा नुकताच मी वाचला. वाचल्यानंतर तो तसाच असेल की तो रचलेला आहे? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. परंतु त्यात फार मोठे मर्म आहे, म्हणून तो इथे देतो. विवेकानंद रेल्वेतून प्रवास करीत होते. समोर दोन विदेशी महिला बसल्या होत्या. विवेकानंदांच्या पोशाखावरून त्यांच्या आपापसात उपरोधी बोलणे चालू होते. विवेकानंदांच्या हातातील घड्याळ काढून घेण्याची युक्ती त्या शोधतात.
विवेकानंदांना त्या म्हणतात,“मुकाट्याने ते घड्याळ आम्हाला दे. नाही तर पोलिसांना बोलावून आरडाओरडा करू की आणि सांगू याने आमचा विनयभंग केला“. विवेकानंदांनी बहिरे असल्याचे सोंग केले. महिला त्यांच्याशी खुणेने बोलू लागल्या. विवेकानंद त्यांना म्हणाले,“तुम्हाला जे सांगायचे आहे ते लिहून द्या”. त्यांनी एका कागदावर लिहून दिले. विवेकानंदांनी ते वाचले आणि म्हणाले आता पोलिसांना बोलवायला काही हरकत नाही. त्या महिलांची बोबडी वळली.
याला म्हणतात स्वतंत्र बुद्धी. विचार करण्याची शक्ती, ती जागृत ठेवणे, तिच्या जागृतीचा सतत प्रयत्न करणे म्हणजे स्वतंत्र असणे होय. मोबाईलची गुलामी ही इंग्रजांच्या गुलामीपेक्षाही भयानक आहे. यातून स्वतःला मुक्त करुन घेणे आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे.