लेकी आल्या सोनपावलांनी...

विवेक मराठी    11-Sep-2026   
Total Views |
कंदिलाच्या प्रकाशात घर बघताना लेक विचारायची, ‘इथे काय आहे?’, घरातली सून सांगायची, ‘इथे सुख आहे, समृद्धी आहे...‘लेक आनंदाने म्हणायची,‘उदंड असू दे...’ माहेरचा चौसोपी वाडा फिरत लेकी माजघर, साठवणीची खोली, कोठी, शेजघर हिंडत विचारायच्या, ‘इथे काय आहे?’... आणि घरातल्या सुना सांगायच्या,‘इथे विद्या आहे...इथे धन आहे...इथे धान्य आहे...इथे गोधन आहे...वस्त्रं आहेत...भरभराट आहे’... हे ऐकून लेकी समाधानाने हसायच्या.
‘सगळं घर साफ केलं ना? माजघर झाडून गौरीची पावलं रेखली ना? उंबरठा धुऊन कुंकू लावून ठेवायचा. रांगोळीच्या पावलांमध्ये हळद पुढे आणि कुंकू मागे घालायचं, चंदनाची पावलं शेजघरातच रेखायची, तिथेच शीतलता हवी. कोठीच्या खोलीत बळदाकडे थांबायचं. तेलाचे दिवे उजळवलेत, तुपाच्या निरांजनी चारही कोन्यांत लावायच्या. डोक्यावर पांघरायचे रेशमी खण तयार ठेवलेत ना? अक्षता, दुधाची चांदीची वाटी, कोमट पाण्याचा गडू ताटात ठेवायचा. आरतीच्या तबकात सुपारीसोबत ओवाळायला कुणी अंगावरचा दागिना उतरवायचा नाही, सोन्याची वेढणी ठेवा. लेकीचं स्वागत करायला, सुनांनी अंगावरचे डाग उतरवायचे नाहीत, तो त्यांच्या अंगावर चढवलेला समृद्धीचा मान आहे. ओवाळून टाकायची खोबर्‍याची वाटी नीट ठेवलीय ना? वाजवायला झांजा घ्या, थाळ्या वाजवून पोचे पाडून ठेवाल नी मग ती तरंगती ताटली जेवायला कुणी घेणार नाही.... वर्षातून एकदा लेकी घरी येणार, हसून स्वागताला उभ राहायचं, कंबर कसून सरबराई करायची लेकींची...” पणजीची लगबग आणि उत्साह तिच्या बोलण्यात भरून राहिलेला असायचा.
पंचांग पाहून, दिवसाउजेडी सजलेल्या उजळलेल्या लेकी दारात हजर व्हायच्या... शंख, घंटा, थाळ्या, झांज़ा वाजवत ताटभर ताम्हणातून, सालंकृत लेकी अंगण ओलांडून उंबरठ्यात उभ्या व्हायच्या. ‘गौर आली सोन्याच्या पावलांनी’, म्हणत पणजी कौतुकाने आधी दुधाने मग कोमट पाण्याने लेकींचे पाय धुऊन, साजूक तुपाच्या निरांजनाने ओवाळून हळद कुंकवाचं औक्षण करून लेकींना घरात घ्यायची. हळदीकुंकवाच्या पावलांनी लेकी दोन दिशांनी घरभर फिरायच्या. आजीच्या सुनेने म्हणजे माझ्या आईने हातातला कंदील वर करून दाखवलेल्या प्रकाशात घर बघताना लेक विचारायची,‘इथे काय आहे?’, घरातली सून सांगायची,‘इथे सुख आहे, समृद्धी आहे...’लेक आनंदाने म्हणायची,‘उदंड असू दे...’ माहेरचा चौसोपी वाडा फिरत लेकी माजघर, साठवणीची खोली, कोठी, शेजघर हिंडत विचारायच्या, ‘इथे काय आहे?’... आणि घरातल्या सुना सांगायच्या,‘इथे विद्या आहे...इथे धन आहे...इथे धान्य आहे...इथे गोधन आहे...वस्त्रं आहेत...भरभराट आहे.’ हे ऐकून लेकी समाधानाने हसायच्या.
माजघरात दोन्ही दिशांना हिंडून आल्यावर दोघी एकत्र भेटून देवघरात पाटावर जाऊन बसायच्या. माहेरी सगळं समृद्ध आहे, उदंड आहे हे बघून सुखावून ऐटीत पाटावर बसून गुळाचा, दुधाचा नैवेद्यरुपी पाहुणाचार घेऊन मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आजीचा आणि तिच्या सुनेचा सुखसंवाद ऐकत बसायच्या. पणजी म्हणायची,‘आज साधंच वाढायचं, लांबून आल्यात, आरामात बसूदेत, उद्या पुरणवरण आहेच.’ मग त्या दिवशी तिच्या लेकी शेपूची भाजी आणि भाकरी जेवायच्या.
 

gauri 
 
रात्री घर निजायचं नि देवघरात मायलेकींचा सुखसंवाद सुरू असायचा. समईच्या शांत ज्योती प्रसन्न की आपली शांत, माय अन्नपूर्णा जास्त प्रसन्न? अशा वातावरणात वर्षभराची सुखं लेकीला मूकपणे सांगायची नि दुःखं लपवायची. कारण लेक वर्षातून एकदाच येते ना? घरभरातले दिवे शांतावत, आजीची सून येऊन देवघराच्या दारात उभी राहायची आणि सासूला,‘झोपायला येताय ना?’ म्हणत घेऊन जायची. दुसर्‍या दिवशी पहाटेपासून, पुरणाचा घमघमाट, एकवीस भाज्या, दोन चटण्या, अळूवडी , दोन कोशिंबिरी, बिबड्या कुरडया, खान्देशी कढी, मसालेभात, पोळ्या, पुरणपोळ्या, कटाची आमटी, खान्देशी मांडे आणि लेकीसाठी खान्देशी गव्हाच्या खिरीसोबत, शेवयांची खीर, कळीदार भात आणि साधं वरण तयार ठेवून, खास गौरींसाठी कढवलेलं ताजं खान्देशी लोणकढी तूप नैवेद्याच्या चांदीच्या ताटात वाढून ताट तयार केलं जायचं.
लेकींना जरीकाठाची साडी, रेशमी खण, हिरव्या बांगड्या, सौभाग्यवाण, शेवंतीची वेणी, हार देऊन सन्मान केला जायचा आणि हातभर ताम्हणात एकवीस तुपाच्या वातींची, पुरणाची आरती केली जायची. मध्यान्हीला दोन सवाष्णींसोबत लेकी जेवायच्या. आग्रह करकरून जेवण वाढलं जायचं. पोटभर जेवून घर तृप्त व्हायचं. घरातली माय अन्नपूर्णा सुखावायची आणि माहेरी आलेल्या पारख्यांच्या लेकी आनंदून समाधानाने विसावलेल्या भरल्या घराकडे रात्रभर डोळे भरून पाहायच्या. तिसर्‍या दिवशी, भरलेलं पोट, आनंदाने भरलेलं मन आणि माहेरचा मान घेऊन रेंगाळत्या पावलांनी, भरल्या डोळ्यांनी निघायची तयारी करायची.
सासरी परत जाताना, प्रवासात त्रास नको म्हणून ताज्या वाफाळत्या भाताला विरजलेली कवड मोडून दही लावून लेकींसमोर ठेवलं जायचं. ओटी भरून, कुंकू लावून घरातल्या सुना म्हणायच्या की,“बाई, सरबराई करायला चूक झाली असेल तर रागावू नकोस. पुढच्या वर्षी परत ये, तुझी वाट पाहू.” माय अन्नपूर्णा थरथरत्या हातांनी आणि भरल्या डोळ्यांनी हळदकुंकवाची बोटं लेकीच्या कपाळी उमटवून म्हणायची, “पुढच्या वर्षी मी असेन नसेन, तुझं माहेर नक्की असेल. उतू नकोस मातू नकोस, माहेरची वाट विसरू नकोस. परत ये आम्ही वाट पाहू...” लेकीचा तरी पाय कुठे निघायचा माहेरच्या माजघरातून? पण जायला हवंच...माहेरी सुख समृद्धी समाधान उदंड असू दे, माहेरी सगळे सुखरूप राहूदेत...असं म्हणत, आशीर्वादात, पुढच्या वर्षी सोनपावलांनी येण्याचं वचन देत, लेकी दिवसाउजेडी आपल्या घरी रवाना व्हायच्या. लेकी गेल्यावर डोळे पुसून, नातवडांच्या पाठवणीची तयारी करायला घरातल्या अन्नपूर्णा दडप्या पोह्यांना भिडायच्या.
 
gauri
 
माझ्या खापरपणजीपासून पाच पिढ्या हेच चक्र माझ्या माहेरी अव्याहत सुरू आहे. कंदिलांची जागा आता लखलखीत लाईट्सनी घेतलीय आणि चौसोपी वाड्याची जागा प्रशस्त फ्लॅटने, पण गौर आली सोन्याच्या पावलांनी म्हणणारी मी आणि वाजत गाजत आल्यावर दूधपाण्याने पाय धुवून स्वागत करणारी वहिनी नामक माय अन्नपूर्णा त्याच आहेत. माहेरी जाताना कसं नीटनेटकं जायचं म्हणून तोंडावर शेवटचा हात फिरवून तयार होणार्‍या गौरींचे हे मुखवटे हाताळणारी माझी लेक सहावी पिढी.
कामानिमित्त गाव सोडलेल्या माझ्या खापरपणजोबांनी तत्कालीन अखंड बंगालमध्ये बनवून घेतलेले हे पंचधातूचे मुखवटे महाराष्ट्रातल्या गौरींच्या मुखवट्यांपेक्षा वेगळे आहेत. बंगाली दुर्गेच्या धाटणीचा गोल चेहरा, डोळे, पापण्या आणि चाफेकळी नाक असलेले हे मुखवटे अखंड साच्यात बनवलेले आहेत. महाराष्ट्रात खोपा घातलेले गौरींचे मुखवटे उभट असतात आणि अंगभूत दागिने कोरलेले असतात. आमच्या गौरींचा डोक्यावर खोपा न घालता मानेवर केसाचा लहानसा अंबाडा बनवलाय. यामुळे यांचे चेहरे उग्र वाटत नाहीत. मुखवट्याच्या माथ्यावर केसांचा मधला भांग बनवला आहे. पुढे, मुखवट्याच्या कपाळावर बिजवरापट्टी आणि उचललेली बिंदी बनवली आहे.
वैशिष्ट्य म्हणजे, पारंपरिक दागिने कोरलेले नसून, बुगडी, खुंटबाळी आणि कुडी घालता येणारे सुबक कान, पोकळ नाकपुड्या कोरून नथ घालता येऊ शकणारं नाक आणि सुबक भुवया असलेले हे मुखवटे मानेपर्यंत बनवले आहेत. या मुखवट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही मुखवट्यांत रेसभर फरक आहे. ज्येष्ठा गौरीच्या चेहेर्‍याची गोलाई जास्त असून धाकटीचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत, आणि हे फक्त रंगवताना आणि रंगवल्यावर जाणवतं. दोन्ही मुखवट्यांच्या डोळ्यांच्या कडांना, हलकी रेघ कोरली असून भुवयांच्या कमानी खाली येतात तिथेच, शोभेल अशी ही रेघ गालांच्या उंचवट्यांवर जणू काजळाची रेघ ओढावी अशी दिसते. मुखवट्यांच्या हनुवटीही अगदी ठळक दिसतातच, पण चेहेर्‍यांचं गोबरेपण ठळक करतात.
आजवर हे मुखवटे उजळवण्यासाठी बाजारातलं कुठलंही कृत्रिम रसायन आम्ही वापरलेलं नाही. चिंच, आमसूल, चुन्याची निवळी, लिंबाची साल आणि रिठा वापरून वर्षातून एकदा हे मुखवटे उजळवले जातात. सणासाठी यांना सालंकृत सजवलं जातं. मागच्या दोन पिढ्या आम्ही हौसेने मुखवटे रंगवतोय. सण झाल्यावर हे रंग काढून टाकून, पोचे येऊ नये म्हणून हे मुखवटे सुती कापडात, कापूस ठेवून गुंडाळले जातात. खान्देशात, सणाला माहेरी येणार्‍या लेकींचं खूप कोडकौतुक केलं जातं. गौरीचा सण, असाच वाजतगाजत माहेरी जाण्याचा आणि कोडकौतुक करून घेण्याचा असतो.
श्रावण संपत आला की माहेरी जाण्याचे वेध लागतात. गौर आली सोन्याच्या पावलांनी म्हणायचं आणि माहेरी जायचं सुख अगदी आठवड्यावर येऊन ठेपलंय. आज मुखवटे रंगवायला हातात घेतले आणि हे सगळं जणू झरझर नजरेसमोर तरळून गेलं.
र्ींर्ळींशज्ञशवळींऽसारळश्र.लेा

रुपाली पारखे देशिंगकर

 
निसर्गाची आणि विशेषतः सापांची आवड छंद म्हणून जोपासताना  सर्पसंबंधित  विषयाचे पुणे, चेन्नई येथे प्रशिक्षण घेतल्यावर सापांबद्दल जनजागृतीच  काम करत असतानाच निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल सर्वसामान्यांकडे उपलब्ध असलेल्या  विस्कळीत माहितीला सोप्या  भाषेत मांडण्यासाठी निसर्ग संरक्षण आणि संवर्धन विषयाचे भारतीय वन्यजीव संस्थान- वाईल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया [ WII] डेहेराडून इथून प्रशिक्षण घेतल्यावर विश्व प्रकृती निधी [ WWF ] मध्ये मानद सल्लागार , महाराष्ट्र वनखात्यात प्रशिक्षक म्हणून कार्यरत, निसर्ग, वन्यजीव आणि पर्यटन विषयावर मराठी हिंदी इंग्रजी प्रकाशनांमध्ये  स्तंभलेखक, ब्लॉगर  म्हणून गेली काही वर्ष कार्यरत.