राहुल गांधी हा एक चेहरा आहे, मात्र त्यामागील बौद्धिक ताकद डाव्यांची आहे. राष्ट्रवादी गटाला त्यांच्याशी संघर्ष करायचा आहे. त्याची तयारी लढाई सुरू होण्यापूर्वीच उत्तम प्रकारे करणे आवश्यक आहे. राहुल गांधींचा हा उपद्व्याप अराजकतेच्या व्याकरणाचार्याचा उपद्व्याप आहे, या दृष्टीने पाहिले तर त्याचे अर्थ लक्षात येतील.
यापूर्वीच्या लेखांत ‘पप्पू राहुल गांधी’ आणि ‘मेथड इन मॅडनेस’ असे दोन शब्दप्रयोग केले होते. राहुल गांधी यांना पप्पू म्हणू नये, कारण ते पप्पू नाहीत. अराजकतेच्या राजकरणातील ते व्याकरणाचार्य आहेत. त्यांची पद्धती वेडेपणाची वाटली तरी त्या वेडेपणात एक शहाणपण आहे, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. दुर्लक्ष केले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.
राहुल गांधी यांचा संघर्ष राजकीय आहे. केंद्रात भाजपाचे शासन आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा असे दोघेजण या शासनाचा चेहरा आहेत. हे शासन हटवून त्याजागी काँग्रेसचे शासन आणण्याची राहुल गांधी यांची धडपड आहे. संसदीय पद्धतीच्या राजकरणात यात काहीही गैर नाही. ते विरोधी पक्षनेता आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे हे कामच आहे की, अधिकारावर असलेल्या शासनाविषयी जनअसंतोष वाढवित नेणे. हे काम ते आपल्यापरिने करीत आहेत.
भारतीय समाजाचा विचार करता तो राजकीयदृष्ट्या एकजिनसी नाही. त्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की, त्याची राजकीय विचारसरणी तो कोणत्या धर्माचा आहे आणि कोणत्या जातीचा आहे यावरून ठरते. राजकीय विचारसरणीचा आधार आर्थिक धोरण, संरक्षणविषयक धोरण, परराष्ट्र धोरण, शैक्षणिक धोरण, विकासाचे धोरण, औद्योगिक धोरण हे राहत नाहीत. जातीत विभागलेल्या लोकांची मानसिकता अशी राहते की, आमचा माणूस सत्तेवर आहे का आणि धार्मिक विचारांच्या लोकांची अशी भावना असते की, आमच्या धर्माचा माणूस कुठे आहे? राजकीय खेळ जो पक्ष आणि नेता जातीय संतुलन आणि धार्मिक संतुलन कसा बसवितो यावर राहतो.
काँग्रेस या खेळातील तज्ज्ञ आहे. पं. नेहरुंपासून हा खेळ कसा खेळायचा याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले आहे. मुस्लीम समुदायाला सवलती द्यायच्या, पण फार अधिकार द्यायचे नाहीत, हे काँग्रेसचे धोेरण राहिले. मुस्लीम समाजाचे व्यक्तिगत कायदे त्या समाजाला मागास ठेवणारे आहेत. काँग्रेसचे धोेरण असे की त्यात बदल करायचा नाही. ते मागास राहिले तरच एक वोट बँक म्हणून त्यांचा वापर करता येतो. काँग्रेसनेे कधीही समान नागरी कायद्याचा विषय केलेला नाही. तो न करण्याचे कारण राजकीय स्वार्थ. मुसलमान मागास राहिला तर वोट बँक तयार होते. त्यांची मते मिळवून सत्तेवर येता येते.
हिंदू समाज जाती विभाजीत आहे. स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे बहुतेक नेते उच्चवर्णिय आहेत. जातीच्या मानसिकतेचा विचार केला तर आपला माणूस पंतप्रधान आहे, गृहमंत्री आहे, अथर्र्मंत्री आहे, हे त्या त्या जातीने जाणले आणि या जाती काँग्रेसच्या मागे उभ्या राहिल्या. महात्मा गांधीजींनी ’हरिजन सेवा संघ’ सुरू करून अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी फंड उभा केला. शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. विविध सेवाकार्ये सुरू केली. जगजीवनरामसारखे काँग्रेसमध्ये राहिले.
अस्पृश्य ही एक जात नसून तो अनेक जातींचा समूह आहे. ज्या जाती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर गेल्या, त्या स्वतंत्र विचार करणार्या झाल्या. आणि ज्या अस्पृश्य जाती काँग्रेसबरोबर राहिल्या त्या सत्तेत सहभागी होत राहिल्या. काही राज्यांत या जातीतून मुख्यमंत्री झाले; परंतु काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने एक धोरण ठेवले की, अस्पृश्य वर्गाला तर बरोबर घ्यायचे, परंतु सत्तेतील अतिमहत्त्वाच्या स्थानावर त्यांना आणायचे नाही, आले तरी त्यांना फार काळ राहू द्यायचे नाही. काही वर्ष राहिल्यानंतर बदल करायचा.
म्हणून काँग्रेस हा उच्चवर्णिय, अल्पसंख्य मुसलमान आणि ख्रिश्चन आणि अस्पृश्य वर्गातील काही जाती यांच्या मतांवर निवडून येणारा पक्ष झाला. काँग्रेसने काही मुसलमानांना केंद्रात मंत्रीपद दिले, एखादा राष्ट्रपती केला, काही राज्यांचे मुख्यमंत्री केले. काँग्रेसची ही वोट बँक साधारणपणे 1989सालापासून फुटत चालली. बहुजन समाज पार्टीने उत्तरेतील अस्पृश्य जाती, आजचा शब्दप्रयोग दलित जाती यांचे वेगळे संघटन उभे केले. राजकीयदृष्ट्या त्यांना सशक्त केले. ‘वोट हमारा, राज तुम्हारा’ अशी अर्थपूर्ण घोषणा दिली. उत्तरेतून दलित वर्ग काँग्रेसपासून राजकीयदृष्ट्या अलग झाला.
काँग्रेसची मुस्लीम मतपेटी आप पक्षाने पळविली आणि बंगालमध्ये ममताने पळविली. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी पळविली. उत्तरप्रदेशात मुलायम सिंग यांच्या समाजवादी पार्टीने पळविली. हमखास सत्तेवर बसविणारे प्रमुख गट काँग्रेसपासून अलग झाले. त्याचवेळी भाजपाच्या रूपाने जातीपातीचा विचार न करता हिंदुत्वाच्या सर्वसमावेशक भूमिकेतून विचार केला पाहिजे अशी मांडणारी प्रबळ राजकीय शक्ती उभी राहिली. भाजपाची वोट बँक सर्व जातीचे हिंदू आणि काही प्रमाणात मुसलमान झाले.
राहुल गांधींपुढील राजकीय आव्हान हे गेलेली मतबँक परत कशी मिळवायची याचे आहे. राजकीय भाषेत सांगायचे तर ते दलित कार्ड खेळत आहेत. सुरुवात पुण्यापासून झाली, पुण्याला महिलांविषयीचा त्यांनी एक स्रोत उद्धृत केला, मागील लेखात तो दिला आहे. मनुस्मृतीविषयी दलित वर्गात मोठा आक्रोश आहे. मनुचे कायदे अस्पृश्य वर्गावर अन्याय करणारे आहेत. दलित चळवळीत मनुवाद असा शब्दप्रयोग केला जातो. त्याचा अर्थ होतो, उच्च-नीचतेचा पालन करणारा वर्ग, अस्पृश्यतेचे पालन करणारा वर्ग.
या मनुस्मृतीच्या कायद्यांना आज काहीही अर्थ राहिलेला नाही. आपल्या संविधानातील कलम 14, 15, 16, आणि 17 ही सामजिक समानतेची कलमे आहेत. मनुस्मृतींच्या संदर्भात या कलमांचा अर्थ असा होतो की, मनुस्मृती आता कालबाह्य झाली आहे, तिचे कायदे आता लागू होणार नाहीत. आता संविधानाचे कायदे लागू होतील, ही वस्तुस्तिथी आहे; परंतु, लोकांना उत्तेजित करायचे असेल तर ही वस्तुस्थिती सांगून काही उपयोग नसतो. विपरीत आणि खोटे सांगितले पाहिजे आणि ते ठासून सांगितले पाहिजे. राहुल गांधी हेच काम करीत आहेत.
उत्तरांचलात भाजपाचे शासन आहे. हलदानी या शहरातील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सभा ऑॅगस्ट 2026ला झाली. या सभेत त्यांनी केंद्र शासन, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ठरावीक साच्यातील भाषण केले, त्यात नवीन काहीच नाही. विचारांचा विचार केला तर अतिशय पोचट भाषण असे त्याचे वर्णन करावे लागेल. भाषणात ते म्हणाले की, ’स्वातंत्र्य आंदोलनात संघाचे कुणी तुरुंगात गेले होते का?’ संघ संस्थापक डॉ. हेडगेवार जंगल सत्याग्रह करून तुरुंगात गेले होते, याची माहिती काँग्रेस अध्यक्षांना असायला पाहिजे. वेड पांघरूण पेडगावला जायचे हे ठरविले की, असे अर्थशून्य भाषण होते.
हे भाषण ज्या मैदानावरून झाले, त्या ठिकाणी दोन दिवसानंतर, ’श्री राम सेना धर्मार्थ सेवा न्यास’ या उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंगाजल शिंपडून ’शुद्धीकरण यज्ञ’ (हवन) केला. या सेनेचा आणि भाजपाचा काही संबंध नाही. जेथे राम तेथे भाजपा हे काँग्रेसने केलेले समीकरण आहे, त्यामुळे शुद्धीकरणाचा कार्यक्रम भाजपाने केला, असा आरोप राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. राज्यसभेत जे.पी. नड्डा यांनी स्पष्टपणे सांगितले की, शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. कोणताही शहाणा राजकीय पक्ष असला वेडाचार करू शकत नाही, हे सामान्य शहाणपण आहे. अराजकतेच्या व्याकरणाचार्यांना या सामान्य शहाणपणाशी काही पडलेले नाही.
उत्तरांचलचे मुख्यमंत्री धामी यांनी या शुद्धीकरणाचा निषेध केलेला आहे. त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की, मल्लिकार्जुन खर्गे यांची जात कोणती, हे उत्तरांचलातील लोकांना माहीत नाही. ते स्वतःच आपल्या जातीचा उल्लेख करून ‘मी दलित असल्यामुळे शुद्धीकरणाचा कार्यक्रम केला असे म्हणतात’ जातीच्या बाहेर जाऊन विचार करायचे म्हटले तर अशा प्रकारच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हा अप्रस्तुत आहे. आम्ही तेवढे पवित्र आणि तुम्ही अपवित्र असला ठेका कोणाला घेण्याचा अधिकार नाही. आपले
तत्त्वज्ञान सांगते की, ‘समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति॥
(गीता 13 अध्याय श्लोक 27)
भगवान श्रीकृष्णाचे सांगणे असे आहे की, परमेश्वराचा वास सर्व प्राणीमात्रात आहे, त्यामुळे सर्वच पवित्र आहे. अपवित्रतेचा भाव असलेलेच अपवित्र ठरतात.
राहुल गांधी यांना ही एक संधी वाटली आणि त्यांनी ओरडायला सुरुवात केली. दोष भाजपावर टाकला. भाजपाची मातृसंस्था रा. स्व. संघावर टाकला. संघ जातीयवादी आहे, हा काँग्रेसचा जुना राग आहे. हा राग सगळे काँग्रेस नेते तार सप्तकात गात असतात. ते चुकूनही संघाचे समरसतेचे कार्य, सेवावस्तीत चालणारी संघाची सेवाकार्ये, मी, मनू, संघ यांसारखे पुस्तक यांचा अभ्यास करणार नाहीत. या अभ्यासाने लोकांच्या भावना पेटविता येत नाहीत आणि लोकांच्या मतपेट्या मिळविता येत नाहीत.
चहाच्या ठेल्याचा विषय राहुल गांधींनी सुरू केला. सर्वच चहाच्या ठेल्यांवर पेपर कपमधून चहा दिला जातो. फार थोड्या चहाच्या ठेल्यावर काचेच्या ग्लासमधून चहा दिला जातो. त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. त्याचे अर्थकारण आहे. ग्लास धुवायला पाणी लागते, ते सर्वांना उपलब्ध नसते. जे थोडेबहुत चहावाले काचेच्या ग्लासमधून चहा देतात, तो ग्लास ते कसा धुतात, हे जर पाहिले तर ठेल्यावरील चहा पिण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. ग्लास धुवायला मुलगा ठेवायला लागेल, त्याला पगार द्यावा लागेल, त्यापेक्षा पेपर कपमध्ये चहा देणे हे कमी खर्चिक असते. राहुल गांधी चहाच्या पेपरकपात जात पाहतात. ’पप्पू’ शब्द आवडणारे म्हणतील, ’पप्पू’ यापेक्षा वेगळे काय म्हणतील; पण तसे नाही.
वेगळ्या कपाचा इतिहास आहे. काही वर्षांपूर्वी चहाच्या ठेल्यावर दलितांसाठी वेगळे कप ठेवले जात. विशेषतः खेड्यापाड्यांतून हे दृश्य हमखास बघायला मिळत असे, आज ते राहिलेले नाही. राहुल गांधींचे वेडेपणातील शहाणपण असे की, ते खाजवून खरूज काढीत आहेत. त्यापासून आपण बोध घेतला पाहिजे.
राहुल गांधींचा हा उपद्व्याप अराजकतेच्या व्याकरणाचार्याचा उपद्व्याप आहे, या दृष्टीने पाहिले तर त्याचे अर्थ लक्षात येतील. देशात गोंधळ घालण्यासाठी सडकेवरचे राजकारण करावे लागते. सडकेवरच्या राजकरणासाठी उच्च जातीचे लोक उतरत नाहीत, ते कँडल मार्चवाले असतात. सडकेवरच्या राजकारणासाठी समाजातील वंचित वर्गालाच उतरविणे त्यामानाने सोपे असते. त्याचा एक सिद्धांत मार्क्सने दिलेला आहे. तो म्हणतो की, ”सर्व शोषितांनी संघटित झाले पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. तुमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही.” राहुलच्या मागे अर्थहीन होत चालले मार्क्सवादी मोठ्या संख्यने उभे आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे संघटित आहेत. त्यांना फारसे जनसमर्थन नसले तरी त्यांची विध्वसंक शक्ती खूप मोठी आहे.
त्यांना एक चेहरा पाहिजे. काही काळ ते केजरीवालच्या मागे गेले. जनतेने केजरीवालला घरी बसविले. नंतर ते ममताच्या मागे गेले, ममता आज अर्थहिन झालेली आहे. तमिळनाडूच्या स्टॅलिनला तमिळ जनतेनेच अव्हेरले आहे. त्यांच्या सर्व आशा-आकांक्षा राहुल गांधींकडे आहेत. राहुल गांधी हा चेहरा आहे, त्यामागील बौद्धिक ताकद डाव्यांची आहे. राष्ट्रवादी गटाला त्यांच्याशी संघर्ष करायचा आहे. त्याची तयारी लढाई सुरू होण्यापूर्वीच उत्तम प्रकारे करणे आवश्यक आहे.