महाडमध्ये जमिनीची मशागत आधीपासूनच महात्मा फुले आणि आगरकरी विचारांनी खूप चांगल्या प्रकारे करून ठेवलेली होती. आता या मशागत झालेल्या समाजमनाच्या जमिनीत क्रांतीबीजाच्या पेरणीची आवश्यकता होती आणि हे काम महाड शहरात 19 मार्च 1927 रोजी भरणारी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद करणार होती.
महात्मा जोतिराव फुले आणि सुधारकाग्रणी आगरकर यांनी जातीव्यवस्थेला समूळ नष्ट करण्याचे ठरवले होते. त्याच प्रेरणेतून इतिहासातले सर्वात पुरातन, सर्वात संघटित, सर्वात चिवट, सर्वात परांपराधिष्ठित, धर्माधिष्ठित आणि जन्मजात अपरिवर्तनीय अशा विषमतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेच्या विरुद्ध लढाई सुरू केली. या लढाईला सामाजिक क्रांतीचे आणि दलित चळवळीचे रूप देण्याचे काम 19 मार्च 1927 रोजी महाड येथे भरणारी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद करणार होती.
कोणतीही क्रांती एका रात्रीत जन्माला येत नसते, त्यामागे अनेकांची अनेक दिवसांची मेहनत दडलेली असते. कोणीतरी जमीन आधी नांगरलेली असेल तरच त्या भूमीत बीजाची पेरणी होऊ शकते. महात्मा फुले आणि सुधारकाग्रणी आगरकर या दोघांच्याही विचारधारा महाड शहरात खूप आधीपासूनच एकवटून राहिलेल्या होत्या. त्यामुळे महाडमध्ये जमिनीची मशागत आधीपासूनच महात्मा फुले आणि आगरकरी विचारांनी खूप चांगल्या प्रकारे करून ठेवलेली होती. आता या मशागत झालेल्या समाजमनाच्या जमिनीत क्रांतीबीजाच्या पेरणीची आवश्यकता होती आणि हे काम महाड शहरात 19 मार्च 1927 रोजी भरणारी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद करणार होती. ही परिषद यशस्वी करण्यासाठी सुरबानाना, आर.बी. मोरे, सुभेदार विश्राम सावादकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, नानासाहेब टिपणीस, रघुनाथ मास्तर, अनंतराव चित्रे, भाईशेट वडके, गणेश आणि यशवंत टिपणीस, बापूराव जोशी, चिंतामण देशपांडे, दगडूशेट भिलारे, भानुदास कांबळे, खोडके वकील, रामचंद्र कांबळे, द.ग. साळुंखे, भिकोबा मालुसरे, गडकरी वकील, सरदार गोपीनाथराव पोतनीस आणि अशा अजून कितीतरी कार्यकर्त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले होते.
दिवसरात्र एक करून परिषदेचा प्रचार-प्रसार केला होता. त्यामुळे कोकण आणि कोकणाच्या बाहेरून पंधरा वर्षांच्या लहान मुलांंपासून तर ऐंशी वर्षाच्या वृद्धांपर्यंत प्रचंड जनसंख्या या परिषदेसाठी जमली होती. कोकण घाट, मुंबई आणि नागपूर या विभागांतून सुमारे पाच हजारांच्या वर अस्पृश्य घरादाराला कुलूप लावून पाठीवर भाकरी बांधून या परिषदेसाठी आले होते. त्यांच्या कपड्यातून दारिद्य्र ओसंडत होते; तर डोक्यावर लटकलेल्या शोषणाच्या तलवारीचा परिणाम चेहर्यावर दिसत होता. सैन्यात काम करणार्या बहाद्दुरांनी दिमाखात त्यांना मिळालेली पदके आपल्या मिलिटरीच्या कपड्यावर लटकवलेली होती. आज ते या मुक्तिसंग्रामाच्या लढाईत जणू आघाडीवर लढण्यासाठी सिद्ध झाले होते. पिण्यासाठी पाणी स्पृश्य हिंदूंकडून मिळणे शक्य नाही हे लक्षात घेऊन सुमारे चाळीस रुपये खर्च करून या परिषदेसाठी पाणी विकत घेतले गेले. पुरुषांबरोबर महिलाही परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महाडमधील सन्माननीय बापूराव जोशी, धारीया, तुळजाराम मिठादी, असे स्पृश्य पुढारीही या परिषदेसाठी आवर्जून हजर राहिले होते. याबरोबरच सीतारामपंत शिवतरकर, गंगाधरपंत सहस्रबुद्धे, बाळाराम आंबेडकर, पा.न. राजभोज, शांताराम उपशाम, रामचंद्र शिर्के असे इतर अनेक विचारवंत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिषदेला उपस्थित होते. या परिषदेला येणार्या मंडळींना आवाहन करणारे एक पत्रक सत्याग्रह कमिटीचे सेक्रेटरी सीताराम नामदेव शिवतरकर यांनी काढले होते.
त्यात परिषदेला येणार्या मंडळींना विनंती करण्यात आली होती की, ‘प्रत्येकाने येताना आपल्याबरोबर ताट, तांब्या, कांबळी व तीन दिवस पुरेल इतकी भोजनाची सामग्री आपापली घेऊन यावी, सत्याग्रह कमिटी भोजनाची व्यवस्था करणारच आहे पण तरीही प्रत्येकाने आपापली तयारी ठेवावी. तसेच ज्यांना मुंबईहून बाबासाहेबांसह आगगाडीने यायचे असेल त्यांनी तिकिटाचे पाच रुपये ’बहिष्कृत हितकरिणी’ सभेच्या कार्यालयात जमा करावेत. या सत्याग्रहामध्ये सहभागी होणार्यांत प्रत्येकाच्या छातीवर बहिष्कृत हितकरिणी सभेच्या नावाचे पदक लावलेले असावे, म्हणजे बिल्ला लावलेला असावा. तो बिल्ला ज्यांना हवा आहे त्यांनी त्या बिल्ल्याचे प्रत्येकी दोन रुपये जमा करावेत.’
महाडच्या तळभागात चवदार तळ्यापासून सुमारे दोन फर्लांग अंतरावर बांबू आणि झापांनी बांधलेल्या मंडपात स्वागताध्यक्ष संभाजी गायकवाड यांच्या भाषणाने परिषदेला सुरुवात झाली. जुनी फाटकी, मळकी वस्त्रेे परिधान केलेला पण मनात नव्या क्रांतीच्या अनेक आशा घेऊन आलेला प्रचंड अस्पृश्य जनसमुदाय समोर लांबपर्यंत बसलेला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचीच प्रत्येकाला उत्सुकता होती. बाबासाहेब आता काय बोलतील याचाच विचार परिषदेला उपस्थित असलेल्या प्रत्येक स्पृश्यास्पृश्य श्रोत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात घोळत होता. बाबासाहेबांच्या भाषणाकडे सर्वजण डोळे लावून बसले होते. बंगाली पद्धतीचे धोतर नेसलेले, साधा सदरा आणि त्यावर कोट असा पेहराव केलेल्या आणि वरून शांत दिसत असलेल्या बाबासाहेबांच्या मनात काय चालले होते हे कोणीही सांगू शकत नव्हते. बाबासाहेबांनी अतिशय सरळ आणि सुबोध पद्धतीने आपल्या भाषणास सुरवात केली. ते म्हणाले, “सद्गृहस्थहो! आज आपण माझा जो गौरव केला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची जबाबदारी मी टाळत होतो. तो माझा नेहमीचा स्वभाव आहे; पण ती मला टाळता आली नाही. टाळली तर मोठा जनक्षोभ होईल हे जाणून मी ती आज स्वीकारली आहे आणि तदनुसार आपणापुढे उभा आहे.“ त्यांच्या दाटून आलेल्या कंठाने समोर जमलेल्या प्रत्येकाच्या मनात कोलाहल सुरू झाला.
बालपणीच्या अनेक आठवणींनीच बाबासाहेबांच्या मनात फेर धरला असावा. दापोलीच्या परिसरातील करुण आणि गंभीर चित्र यावेळी बाबासाहेबांनी आपल्या शब्दातून श्रोत्यांसमोर उभे केले. ते म्हणाले, “ज्याला त्याला आपल्या मूळस्थांनाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच. माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले होते. माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो. परंतु परिस्थितीमुळे मी पाच-सहा वर्षांचा असतानाच घाटाचा पायथा सोडून घाटमाथ्यावर गेलो. तेथे माझे आजपर्यंतचे आयुष्य गेले. आज पंचवीस वर्षांनी मी घाटाखाली उतरत आहे. जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारला आहे. त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंदच वाटणार आहे. परंतु आजच्या प्रसंगी मला जितका आनंद तितकाच खेदही होतो, असे म्हंटल्याशिवाय माझ्याने राहावत नाही. एक वेळ अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. एकेकाळी अस्पृश्य जातीच्या मंडळींनी हा प्रदेश गजबजलेला होता. पांढरपेशे वगळल्यास इतर वर्गाच्या तुलनेने पाहता येथील अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता.”
समाजाच्या उन्नतीच्या तत्कालीन कारणांचा उहापोह करत, आपल्या समाजाला उपदेश करताना बाबासाहेब पुढे म्हणाले, “माझे मत असे आहे की, आम्ही सरकारला नेहमी अनुकूल असतो म्हणूनच सरकार आमची उपेक्षा करते. सरकार देईल ते घ्यावयाचे, सांगेल ते ऐकावयाचे आणि राहवील तसे रहावयाचे, अशी आमची दास्यवृत्ती बनली आहे. अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांच्या मनावर जो जुन्या, खुळचट, अनिष्ट विचारांचा गंज चढला आहे, तो धुऊन निघाला पाहिजे. आचार विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही, तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बीज कधीही रुजणार नाही. सद्यस्थितीत त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही. एक मुलगा बी.ए. झाल्याने जो फायदा आपल्या समाजात होईल तसा एक हजार मुले चौथी शिकली तरी होणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “मृत जनावराचे मांस वर्ज्य करण्याची प्रतिज्ञा करा. आपापसातील उच्चनीच भावना सोडून द्या. महारांना गावात इज्जत नाही, मानमरातब नाही. त्यांचा स्वाभिमान नष्ट झाला आहे. शिळ्या व उष्ट्या तुकड्यासाठी माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची व शरमेची आहे. वडिलांची ‘री’ ओढणे हा महामंत्र सोडा. सर्वच जुने ते सोने म्हटले तर नवीन सुधारणा कधीच होणार नाही.’ हे सांगताना पुढे अत्यंत अभिमानाने ते म्हणतात,“सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू म.जोतिराव फुले यांचे एक निष्ठावान सहकारी व उत्साही शिष्य गोपाळबाबा वलंगकर यांनी ‘अनार्य दोष परिहारक मंडळी’ ही संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे 1893साली स्थापून महाराष्ट्रात अस्पृश्यता निवारण्याची चळवळ प्रथम सुरू केली होती.”
आपले भाषण पूर्ण करताना ते म्हणाले,“सद्गृहस्थहो! तुम्ही आपल्यासाठी नाही तर आपल्या संततीसाठी मी जे सांगतो त्याकडे लक्ष द्या. आज आपणास भाकरी मिळते आहे तेवढी बस्स आहे. या मोठ्या भानगडी आम्हाला नको. अर्धी सोडून सगळीच्या मागे कोणी जावे? असा आपण प्रोक्तपणे प्रश्न करावा, पण मी आपणास इशारा देतो की, मी सांगतो त्या दिशेने तुम्ही प्रयत्न केला नाही तर आज जी चतकोर भाकरी मिळते आहे तीही उद्या मिळणार नाही. जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये. आपल्यातील जे काही लोक पेन्शनर आहेत त्यांनी या गोष्टीत लक्ष घालावे, हे त्यांचे कर्तव्य आहे. ते या स्वजनोद्धाराच्या महत्कार्यात पुढाकार घेतील अशी आशा ठेवून मी माझे भाषण पुरे करतो.”
बाबासाहेबांच्या भाषणाने नवी सकाळ झाल्याचा भास अंधारात खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजाला झाला असल्यास नवल नाही. त्यांना पुढची दिशा मिळाली, जीवनाचा महामंत्र सापडला. अनेक स्वप्ने मनात तरळायला लागली. तेथे जमलेल्या प्रत्येक मनात आशेचा एक नवा अंकुर फुटायला सुरवात झाली.
बाबासाहेबांच्या या जादुई आणि क्रांतिदायी भाषणानंतर गावातील वरिष्ठ वर्गातील पुढार्यांची भाषणे झाली. बापूराव जोशी, तुळजाराम शेट, शंकरभाई धारीया यांनी विचार मांडला की अस्पृश्य वर्गाने चळवळ करताना समाजात द्वेष अथवा तेढ उत्पन्न होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यानंतर चांभार समाजातील भानुदास कांबळे यांनी आपल्या भाषणात समाजावर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडली आणि सत्यशोधक विचारांचा समाजात प्रसार होणे किती आवश्यक आहे याचे प्रतिपादन केले. त्यानंतर, भाई अनंतराव चित्रे, गंगाधर सहस्रबुद्धे, बापूसाहेब सहस्रबुद्धे, कमलकांत चित्रे, सुरबानाना टिपणीस यांचीही आवेशपूर्ण भाषणे झाली. त्यामधून ’अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे आणि तो धुवून काढण्यासाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने एका पायावर सदैव सिद्ध असले पाहिजे,’ असा विचार पुढे आला.
शेट तुळजारामभाई यांनी विचार मांडला की, अस्पृश्यांना स्पृश्यांप्रमाणेच नागरिकत्वाचे हक्क मिळाले पाहिजेत, म्हणून महाड नगरपालिकेचा ठराव अस्पृश्यांनी कृतीत आणावा. यावेळी मंजूर करण्यात आलेल्या दहा ठरावांत मुख्यत्वे करून बहिष्कृत वर्गाची मेलेल्या जनावराचे मांस खाण्याची चाल सरकारने कायद्याने बंद करावी, शिक्षण आणि दारुबंदी याबाबत सक्ती करण्यात यावी, स्पृश्यांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे हक्क बजावण्याच्या कामात सहकार्य करावे अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला होता. सगळ्यांची भाषणे संपेपर्यंत दिवसही संपला होता. संध्याकाळ झाली. अतिशय शांततेत असा दिवस गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावी भाषणाने सारा जनसमुदाय अजूनही मंत्रमुग्ध होता. तो दिवस जणू बाबासाहेबांच्याच भाषणाने भरून राहिला होता.