@ अपेक्षा तारे
9423151476
माहेर-सासर अशी दोन्ही कुटुंबे सुरूवातीला संघस्पर्श न झालेली, परंतु काही काळानंतर संघाशी जोडली गेली, ती कायमचीच. त्यांच्यामुळेच संघकार्याबद्दल जशी माहिती होऊ लागली, तसेच कुतूहल, आदर आणि मुख्य म्हणजे संघसमर्पित जीवन अंगवळणी पडले. आता संघ हा जगण्याचा श्वास झाला आहे, इतके आमचे कुटुंब संघमय झाले होते.
माझे वडील नारायण विठ्ठल काटदरे सरकारी नोकरीत होते तोपर्यंत ते कधी संघशाखेत गेल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे घरी प्रचारक, संघस्वयंसेवक यांचा राबता कधीच नव्हता; परंतु रिटायरमेंटनंतर ’पद्मावती शाखा, पुणे-9’ येथे ते सक्रिय स्वयंसेवक होते आणि वनवासी कल्याण आश्रमासाठी काम करीत असल्याचे मला आठवते.
माझा विवाह अकोला येथील दंतचिकित्सक डॉ. अरुण तारे यांच्याशी झाला. तेही सुरुवातीला संघशाखेत जात नव्हते. नंतर मात्र काही वर्षांनी ते संघस्थानावर नियमितपणे जाऊ लागले. त्यामुळे घरी स्वयंसेवकांचे, प्रचारकांचे येणेजाणे सुरू झाले. मलाही हळूहळू संघकार्याबद्दल माहिती होत गेली. सुरुवातीला अचानकपणे जेवायला येणारे प्रचारक किंवा इतर कार्यकर्ते पाहून कपाळावर बारीकशी कां होईना पण आठी उमटत असे. नंतर मात्र त्यांचे अचानक येणे माझ्या अंगवळणी पडले आणि अत्यंत कमी खर्चात काम करणार्या, गरजा अत्यंत कमी असलेल्या या प्रचारकांबद्दल माहिती होत गेली. त्या माहितीमुळे त्यांच्याविषयी एक प्रकारे कुतूहल मिश्रीत कौतुक वाटायला लागले. शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायात न गुंतता राष्ट्रकार्याला वाहून घेतलेल्या या तरुणांबद्दल आदर वाटायला लागला आणि एक गृहिणी म्हणून त्यांना आनंदाने जेवायला घालणे हीदेखील एक प्रकारे समाजसेवा आहे याची जाणीव झाली.
काही वर्षांनी डॉ. अरुण तारे नगर संघचालक झाले. गंमत म्हणजे माझे सासरे डॉ. वसंत तारे हेही नांदुरा येथे संघचालकपदी होते आणि माझ्या सासूबाईंचे वडील दाजीसाहेब बेदरकर हेदेखील अकोट येथे नगर संघचालक पदी होते. असा तीन पिढ्यांचा संघचालक पदाचा इतिहास जरा दुर्मीळच असेल. घरदार सोडून, प्रचारक म्हणून अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम भागात जाणार्या समीर क्षीरसागरसारख्या प्रचारकांबद्दल कुतुहल, कौतुक आणि आदरही वाटायला लागला. नेहमी घरी येणार्या रवींद्र भुसारी, मुकुंद देव यांच्यासारख्या प्रचारकांमुळे माझ्या मुलांवर कळत न कळत संस्कार होत गेले. माझी मुलगी तर या दोघांशी चर्चा, वाद-विवाद करीत असे आणि त्यातून तिला खूप माहिती मिळत असे.
एकदा संघाचे घर म्हटल्यावर अनेक मान्यवरांचे येणे-जाणे सुरू झाले. लालकृष्ण अडवाणी, अशोकजी सिंघल, नानाजी देशमुख, सरसंघचालक सुदर्शनजी, बाळासाहेब देवरस, विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत या आणि इतर अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींनी आमच्या घरी पायधूळ झाडली. माननीय सुदर्शनजींमुळे आमच्या घरी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते. जिथे सुदर्शनजी असतील तिथेच मी राहणार असे मोदीजींनी ठरवल्यामुळे आम्हाला ते भाग्य लाभले. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.
बाबासाहेब पुरंदरे तर आम्हाला मुलगा आणि सून मानत. त्यांचा आनंददायी सहवास तर आम्हाला खूप लाभला. मी पीएच. डी. करते आहे, असे कळल्यावर दत्तोपंत ठेंगडींनी इतक्या वाचनीय पुस्तकांची नावे सांगितली की, ती ऐकूनच माझी छाती दडपली. त्या काळात आतासारखे मोबाईल नव्हते. त्यामुळे कोणाबरोबरच आमचे फोटो नाहीत; पण मेंदूच्या कॅमेर्यात मात्र त्या स्मृती अजूनही ताज्या आहेत. अजूनही मोदीजींना पाहिल्यावर जाणवलेला त्यांचा गोरापान, तेजस्वी आणि करारी पण तरीही एक वेगळेच मार्दव असलेला चेहरा लक्षात आहे. प्रत्यक्षात ते कितीतरी गोरेपान आणि ओजस्वी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चुंबकीय तरीही ठरावीक अंतर राखणारी शक्ती जाणवते.
दसरा उत्सवाला तर घरातील सर्वांची हजेरी असेच. पण एकदा संघाच्या दिवाळी बैठकीचा अनुभवही मिळाला. अकोल्यातल्या संघाशी संबंधित घरातील बायकांनी फराळ बनवला होता. सगळ्या स्वयंसेवकांना ओवाळले होते. बौद्धिक वर्गाला आमची उपस्थिती होती. रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या मा. अशोकजी सिंघल यांचे भाषण ऐकण्यास आम्ही उत्सुक होतो; परंतु मी चुकत नसेल तर मदनदासजी देवी यांनी तो बौद्धिक वर्ग घेतला. तो सगळाच अनुभव अवर्णनीय होता.
व्यक्तिमहत्त्व आहे; पण व्यक्तिपूजा नाही. हिंदू धर्माची पताका फडकत रहावी; तिलाच व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ मानून वंदन करावे; हा विचार नवीन होता. म्हणजे आम्ही त्यापासून दूर होतो. कार्य करत रहायचे, सदैव संकटमोचकाच्या भूमिकेत रहायचे; परंतु त्याचा गवगवा नाही ह्या तत्त्वाचा अवलंब करून हे ’विश्वची माझे घर मानायचे हे सर्व हळूहळू संघामुळे समजत गेले, उलगडत गेले. सर्व संघाच्या लोकांचा हा विचार आहे की नाही हे मला ठाऊक नाही, परंतु विशिष्ट धर्माच्या लोकांच्या रिक्षात बसायचे नाही; त्यांच्याकडून काही खरेदी करायचे नाही; हे माझ्या सासर्यांचे तत्त्व होते. त्यानुसार ते आयुष्यभर वागले. सुरुवातीला ’असे का’, हा विचार यायचा, ’एवढे कायपण’, असेही वाटायचे; पण आता त्याचे महत्त्व कळते आणि शक्यतो तसे वागण्याचा प्रयत्न होतो.
पुण्याला तळजाईवर झालेले महाशिबिर आणि नागपूरचे महाशिबिर दोन्ही चांगली लक्षात आहेत. दोन्ही वेळी घराघरांतून गुळाच्या पोळ्या करून पाठवलेल्या आठवत आहेत. नागपूरच्या शिबिरानंतर दोनच दिवसांनी आमच्या मुलीचे लग्न जमले. तर सासूबाई म्हणाल्या, ”मुलीचे लग्न जमवायला महाशिबिर भरवावे लागले, त्याचाच पायगुण“. इतके आमचे कुटुंब संघमय झाले होते.
रवींद्रजी भुसारींसारखे प्रचारक तर आमच्या कुटुंबाचे जणू एक सदस्यच झाले होते. इतके की आमच्या घरगुती समस्यांची चर्चा आम्ही त्यांच्याशी करू शकत होतो.
देशविदेशात संघशाखा, आपले घरदार, आप्तस्वकीय सोडून विदेशात संघ प्रचारासाठी गेलेले राम वैद्य यांच्यासारखे प्रचारक, ठाम पक्की राष्ट्रप्रेमी विचारधारा, निःस्पृह आयुष्य, केव्हाही मदतीला तत्पर असणारे स्वयंसेवक विद्या भारती, संस्कार भारती, वनवासी कल्याणा अश्रमासारख्या समाजाभिमुख सेवाभावी शाखा यांमुळे तीन-तीन बंदीतून तावून सुलाखून निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शतायुषी होत आहे.
आमच्यासारख्या अनेकांचे जीवन घडवणार्या ’संघ’ आणि ’संघविचाराला’ शतश: प्रणाम!