@ गजानन कुलकर्णी
पुस्तकाचे नाव - दिनकर-एक संघर्षपूर्ण जीवन!
प्रकाशक ः अजय दिनकर डांगे
मूल्य ः रु. 100/-
संपर्क ः 8225001350
‘दिनकर - एक संघर्षपूर्ण जीवन’ या पुस्तकात संघशरण दिनकर डांगेजी यांच्या जीवनाचा सारांश शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दिनकर’ हे संपूर्ण सृष्टीला जीवन देणार्या सूर्याचेच एक नाव आहे. सूर्याच्या नावाशी जोडलेले ‘दिनकर’ हे नावही त्याचप्रमाणे आपल्या अस्तित्वाने केवळ इतरांना साहाय्य करणार्या एका कर्तव्यरूप जीवनाचे प्रतीक होते. रा. स्व. संघाचे शताब्दी वर्ष आणि दिनकरजी डांगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानंतर या पुस्तक प्रकाशनाचा योग आला आहे. हा नियतीचा एक विलक्षण योगच म्हणावा लागेल.
कतेच ’दिनकर-एक संघर्षपूर्ण जीवन!’ हे एक सच्चा संघ स्वयंसेवक व राष्ट्रभक्त असलेल्या दिनकरराव डांगे यांचे जीवनकार्य, त्यांच्या परिचित व संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या त्यांच्या विषयीच्या उदात्त स्मृतींचे संकलन असलेले पुस्तक वाचण्यात आले.
दिनकरराव हे मूलतः दुर्ग-भिलाई येथील राहणारे असले तरी संघकार्य व राष्ट्रकार्य यासाठी त्यांनी भारतातील अनेक प्रांतात सतत प्रवास केला आहे. यामुळेच त्यांना हिंदी, बंगालीसह अनेक प्रांतीय भाषा सहजपणे अवगत होत्या.
एका संघ स्वयंसेवकाचे आयुष्य हे राष्ट्रप्रेमाने किती झपाटलेले असते, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना ठायी ठायी येतो. संघ हे त्यांचे ध्येय होते!
1977साली आणीबाणीच्या पश्चात जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळी कोणतीही मागणी केली नसताना, जनता पक्षाकडून दिनकररावांना दुर्ग-भिलाईमधून उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी निवडून येण्याची खात्री असतानाही, या निःस्पृह माणसाने ’हीच संधी इतरांना द्यावी,’ अशी विनंती अतिशय नम्रपणे केली होती. मात्र या विनंती नंतरही केवळ पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाचा मान ठेऊन निवडणूक लढवली व निवडूनही आले. दिनकररावांच्या मनाचा मोठेपणा दाखविणारे असे अनेक प्रसंग पुस्तक वाचतांना आढळून येतात.
पुस्तक आकारास येण्याची कहाणीही मोठी विलक्षण आहे. 1950च्या सुमारास बंगालमध्ये संघ प्रचारक म्हणून काम करीत असताना, एकदा दिनकररावांना जेव्हा थांबावेसे वाटले, तेव्हा त्यांनी आपल्या मनातील ही अस्वस्थता एका पत्राद्वारे एकनाथजी रानडे (त्याच भागातील संघांचे ज्येष्ठ प्रचारक) यांच्याकडे व्यक्त केली. त्याला एकनाथजींनी उत्तरादाखल लिहिलेल्या आपल्या सहा पानी पत्रातून, आपण या कार्यात राहाणे किती आवश्यक आहे हे साधार पटवून दिले. यातील, ’अगर दिनकर ही ढल गया, तो कौन स्थिर रहेगा?’ यांसारखी वाक्ये राष्ट्रकार्याचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित करणारी आहेत. केवळ एकनाथजींच्या या पत्रातील मजकुराने दिनकररावांचे मनातील मळभ दूर झाले व ते पूर्ववत उत्साहाने आपल्या कार्यात सक्रिय झाले.
हेच पत्र, पुस्तकाचे संपादन करणारे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत जोशी, यांच्या हाती लागले आणि दिनकररावांचे हे उदात्त कार्य पुस्तकरूपाने सर्वांसमोर यावे या विचाराने ते झपाटले गेले. परिणामी एक छान पुस्तकवजा ग्रंथ महनीय आठवणींचा गुलदस्ताच जणू, तयार झाला.
पुस्तकातून ’एक समर्पित स्वयंसेवक’ हे दिनकररावांचे व्यक्तिमत्त्व जसे वाचकांना जाणवते, तसेच पुस्तकाच्या उर्वरित अर्ध्या भागातून ते आपल्या परिवाराप्रती भैय्या काका म्हणून किती सजग व कर्तव्य तत्पर होते, याचीही जाणीव वाचकांना निश्चितच होते. डांगे परिवाराचे ते एक खर्या अर्थाने आधारस्तंभ होते.
याखेरीज ’गोवा मुक्तिसंग्राम’ यात त्यांनी घेतलेला सहभाग व सोसलेल्या हालअपेष्टा, काश्मीर मुक्तीसाठी काश्मीरमध्ये जाऊन केलेले आंदोलन, देशाचे विभाजन व फाळणीचे वेळी उसळलेला हिंसेचा डोंब यामुळे व्यथित होणे व नैराश्यात जाणे, त्यांचा लोकसंपर्क व संपर्कात आलेल्या असंख्य व्यक्तींशी मित्रत्वाचे सच्चे व प्रेमळ नाते, साधेपणाचे जीवन व राहणीमान, एक नि:स्वार्थी जन प्रतिनिधी, मनात सदैव असलेली ओतप्रोत राष्ट्रप्रेमाची भावना वागण्या बोलण्यातून प्रतीत होणे, स्त्री शिक्षणास त्यांनी दिलेले अप्रतिम महत्त्व व केलेले कार्य यासारख्या असंख्य गुण विशेषणांचे दर्शन पुस्तक वाचताना होते.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिनकररावांचा करारी; परंतु तेवढाच सोज्ज्वळ असलेला चेहेरा अतिशय रेखीव पद्धतीने साकारला आहे. पुस्तकाची बांधणी दर्जेदार व टाईप सेटिंग सुस्पष्ट असल्याने वाचताना हुरूप येतो.
राष्ट्र भक्तीसाठी आपले जीवन समर्पित करणार्या एका महान संघ स्वयंसेवकांच्या जीवनातील तेवढ्याच उदात्त आठवणींचे संकलन असलेले अतिशय दर्जेदार पुस्तक आम्हापर्यंत पोहोचविल्याबद्दल संपादक लक्ष्मीकांत जोशी व या कार्यातील त्यांचे सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात. त्यांच्या प्रयत्नामुळे तयार झालेल्या या ग्रंथातून एका समर्पित संघ स्वयंसेवकांची संघर्षमय जीवनगाथा वाचकांसाठी निश्चितच उपलब्ध झाली आहे.