दा देशभरातील १५ राज्यांत तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, बँकॉक यांसारख्या विविध १५ पेक्षा जास्त देशांत मिळून युवकांच्या जवळपास १७,००० टीम्स
मुंबई : वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत म्हणून दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. दादांची सुपुत्री आणि स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत. जन्माष्टमी निमित्त सादर होणाऱ्या या पथनाट्यांचा हा प्रयोग गेली २४ वर्षे निरंतर सुरू आहे.
यंदा देशभरातील १५ राज्यांत तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, बँकॉक यांसारख्या विविध १५ पेक्षा जास्त देशांत मिळून युवकांच्या जवळपास १७,००० टीम्स म्हणजे साधारण पावणे दोन लाख युवक 'हमने है माखन पाया' या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये २९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर, २०२६ या काळात सादर होत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय, कुठलेही आंदोलन न करता, अत्यंत निरपेक्षपणे आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून आणि या सर्वांतून वेळ काढून हे युवक पथनाट्य सादर करतात.
जीवनरूपी हंडी मधले खरं माखन (लोणी) काय आहे? आज सत्ता, संपत्ति, भाकरी किंवा हक्क केवळ यांनीच समाजाचे उत्थान करण्याचा प्रयत्न होतो आहे, परंतु हे सर्व अपूर्ण आहे. भगवंताच्या दैवी रस्त्यावर चालूनच, प्रेम आणि हृदयस्थ ईश्वरसंबंधानेच समाज खऱ्या अर्थाने समृद्धि कडे जाऊ शकतो असा काहीसा संदेश हे पथनाट्य देते. दुर्दैवाने आज जन्माष्टमी फक्त दहीहंडीचे थर, त्याची उंची, झगमगाट आणि लाखोंची बक्षिसे यातच सीमित झाली आहे. अशा विपरीत काळात उत्सवातील चुकीच्या गोष्टींवर केवळ टीका करत न बसता स्वाध्याय परिवाराचे लाखो युवक जन्माष्टमी निमित्त गेली २४ वर्षे कुठल्याही भौतिक अपेक्षेशिवाय पथनाट्ये सादर करतात हे चित्र निश्चित आशादायक आहे !