संघर्ष काय आहे, हे नीट समजून घ्यायला पाहिजे, त्याच्याशी लढायचे आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे; परंतु लढण्याची आयुधे अतिशय विचारपूर्वक निवडली पाहिजेत. या काळात जेवढा व्यापक जनसंपर्क होईल आणि संघाने दिलेली पंचसूत्री जेवढ्या अधिक प्रमाणात जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे प्रयत्न होतील तेवढ्या प्रमाणात हे सर्व आसुरीवृत्तीचे व्याकरणाचार्य आपल्या वाणीने आणि कृतीनेच अस्ताला जातील.
राहुल गांधी यांचा राजकीय संघर्ष भाजपाशी आहे आणि वैचारिक म्हणजे आयडॉलॉजीकल संघर्ष संघाशी आहे. राहुल गांधींच्या राजकीय आव्हानाला तोंड देण्यास भाजपाचे नेतृत्व समर्थ आहे. नेतृत्व समर्थ असले तरी, दुय्यम, तिय्यम स्तरावरचे कार्यकर्ते आणि नेते जर गाफिल राहिले, झोपून राहिले, विषयाचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतले नाही, आपल्याच पदाच्या मस्तीत मग्न राहिले तर, ‘परमेश्वर त्यांचे रक्षण करो!’ असे आपण म्हणू.
राहुल गांधी यांनी संघाशी जो वैचारिक संघर्ष सुरू केला आहे, तो नवा नाही. पंडित नेहरू त्याचे बाप आहेत, श्रीमती इंदिरा गांधी त्यांच्या कन्या आहेत. राजीव गांधी यांना फारसा काळ मिळाला नाही, पण त्यांनी हा वारसा चालविला असता का? असा प्रश्न आहे. त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी हा वारसा पुढे चालविला आहे.
नेहरू घराणे म्हणजे काँग्रेस, असे समीकरण आहे. नेहरू घराण्याने काबीज केलेल्या काँग्रेसचा संघाशी कोणकोणत्या वैचारिक मुद्द्यांवर संघर्ष आहे, हे प्रथम समजून घेऊया आणि ते थोडक्यात समजून घ्यावे लागेल.
* पहिला विषय आहे, ’आयडिया ऑफ इंडिया’चा, म्हणजे भारतीयत्वाच्या संकल्पनेचा. संघाचे म्हणणे असे आहे की, भारतीय संस्कृतीला, जीवनमूल्यांना, भारतीय आदर्शांना स्वीकारणारे सर्व हिंदू आहेत. त्याचा उपासनापंथांशी काही संबंध नाही. उपासनेचे मार्ग वेगवेगळे आहेत आणि ते तसेच राहतील, ही आपली विविधता आहे. काँग्रेसची म्हणजे नेहरू घराण्याची विचारधारा अशी आहे की, या देशाची संमिश्र संस्कृती आहे, मुस्लीम आक्रमकांचे त्यात योगदान आहे, त्यांनादेखील आपले मानले पाहिजे. बाबरी ढाच्याचे पतन चांगली गोष्ट नाही. ती आपल्या सर्वसमावेशक विचाराला मारक आहे. मुस्लीम आक्रमकांची भयानक कृत्ये इतिहासाच्या पुस्तकात सांगू नयेत, ती दडपून ठेवावीत, त्यांच्याशी संघर्ष करणारे इतिहास काळातील शूरवीर यांचा फारसा उदोउदो करू नये. ही काँग्रेसची ’आयडीया ऑफ इंडिया’ आहे.
* या संकल्पनेत संपूर्ण वंदे मातरम् बसत नाही. संपूर्ण वंदेमातरम्मध्ये भारतमातेची देवता म्हणून आराधना केलेली आहे. ती भारतीय संकल्पना आहे. तिलाच लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा म्हटलेलं आहे. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा ही प्रतीके आहेत. लक्ष्मी वैभवाचे, सरस्वती ज्ञानाचे आणि दुर्गा शक्तीचे प्रतीक आहे. वेगवेगळ्या शक्तींची प्रतिकात्मक पूजा ही आपली खासियत आहे.
* नेहरू-राहुल गांधी विचाराला ती मान्य नाही. म्हणून ते म्हणतात की, ‘आम्ही संपूर्ण वंदे मातरम् म्हणणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा.’ याचा अर्थ होतो, आम्ही ही प्रतिकात्मक संस्कृती मानणार नाही. कारण ती मुसलमानी मौला-मौलवींना मान्य नाही, आणि ती तर आमची व्होट बँक आहे.
* संघाशी वैचारिक संघर्षाचा राहुल गांधी यांनी शोधलेला विषय, संघ हा संविधान न मानणारा आहे. ’संविधान’ यावर संघाचा अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी बारा पुस्तके आहेत आणि सर्व देशातील संघात ती वाचली जातात. मोहनजी भागवत अनेक ठिकाणच्या सार्वजनिक भाषणांत संविधानाची उद्देशिका वाचून दाखवितात. तरीही राहुल गांधी संघ संविधानविरोधी आहे, ही तबकडी वाजवीत राहतात.
* याचे कारण, सैद्धांतिक नाही. याचे कारण वेगळे आहे. सर्वसामान्य माणूस संविधान वाचू शकत नाही. वाचण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते समजणार नाही. आपले संविधान हे वंचित वर्गाला न्याय देणारे, त्याला सन्मान देणारे आणि त्याला सुरक्षा देणारे आहे. या तिन्ही गोष्टींची अनुभूती समाजातील वंचित वर्ग यात दलित जाती, अन्य मागास जाती, आदिवासी असे सर्व वर्ग येतात. या वर्गाचा हा अनुभूतीचा विषय आहे की, संविधानामुळे आम्ही आज सुरक्षित आहोत.
* तुमची सुरक्षितता, संघाची विचारधारा धोक्यात आणणार आहे, हे राहुल गांधींना सांगायचे आहे. म्हणून ते संविधानाचा विषय करतात. त्यांच्या आजीने 42वी घटनादुरुस्ती आणून आजच्या संविधानाची वाट लावण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद केला जातो. परंतु या युक्तिवादाला फक्त अकॅडमिक अर्थ आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने त्याला काही अर्थ नाही. कारण त्याला 42वी घटनादुरुस्ती म्हणजे काय, हेच माहीत नाही. ती सुमारे 52 वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर दोन पिढ्या आल्या. या पिढ्यांना या इतिहासाशी काही घेणेदेणे नाही. म्हणून निरर्थक वादाच्या फंद्यात शहाण्या माणसाने पडू नये.
* राहुल गांधी यांचा दुसरा वैचारिक आधार असा आहे की, संघाची विचारधारा ही प्रभुत्ववादी विचारधारा आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत ती पसरत चालली आहे. शासन संघ स्वयंसेवकांच्या हाती आहे, घटनात्मक अनेक संस्था संघविचारधारा काबीज करीत चालली आहे. देश एक विचाराचा करण्याचा हा डाव आहे, तो धोकादायक आहे.
* हा धोका कोणाला आहे, हे समजून घेतले पाहिजे. हा धोका पाश्चात्त्य विचारधारेवर ज्यांची डोकी चालतात त्यांना आहे. मार्क्सवाद्यांना आहे, नक्षलवाद्यांना आहे, जिहादींना आहे आणि फसवणूक करून धर्मांतर करणार्या धर्मांतरांना आहे. भारतीयत्व जगणार्या कोणालाही यापासून कसलाही धोका नाही. उलट, त्यांच्या जीवनमूल्यांची आणि त्यांच्या आशा-आकांक्षांची अभिवृत्ती होत चालली आहे.
* नेहरू-इंदिरा आणि राहुल गांधी यांचा संघाशी वैचारिक संघर्षाचा मुद्दा हिंदू समाजातील अस्पृश्य जाती आणि त्यांची स्थिती हा आहे. नेहरू आणि इंदिरा गांधींनी त्यांच्यासाठी काय केले, हे ते सांगत नाही आणि आपणही प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. त्यासाठी उपयोगी पडणारी जी नावं आहेत, त्यातील एक नाव आहे, मनू. दुसरे नाव आहे, पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरा मुद्दा आहे, देशभर होणारे दलितांवरील अन्याय-अत्याचार. हे तीनही विषय वंचित समाजाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहेत. भावनेला हात घालणारे आहेत. राहुल गांधी पप्पू नाहीत, आणि त्यांचे डोके जे लोकं चालवितात ते या भावना कशा भडकवायच्या या शास्त्रातील महाविशारद आहेत.
* राहुल गांधी यांचा खेळ तसा नवा नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल भागवत पुराणात या खेळाची मूलतत्त्वे सांगितली आहेत. संविधानाचे शिल्पकार, के. मुन्शी यांचे ‘कृष्णावतार’ या शीर्षकाचे सात खंड आहेत. त्यातल्या पहिल्या खंडातील हा संवाद सारांश रूपाने असा आहे. ‘कंस हा कृष्णाच्या भीतीने पछाडलेला आहे. कंसाच्या एका मंत्र्याचे नाव आहे, बहुक. हा बहुक जरासंधाने म्हणजे कृष्णाच्या सासर्याने कंसाकडे पाठविला होता, तो कुटील राजनीतीतज्ज्ञ आहे. कंस त्याला विचारतो, “लोकांना आपण मुक्तिदाता येणार आहे, यापासून कसे परावृत्त करू शकतो?” बहुक म्हणतो, “लोक हे भीरू असतात. जर तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती केली तर ते तुम्हाला सलाम करू लागतील; परंतु त्यामुळे तुम्ही त्यांची आशाशक्ती काही मारू शकत नाही.”
* नंतरचा संवाद थोडा संक्षिप्त करायचा तर, कंस विचारतो की, “त्यांची इच्छाशक्ती कशी मारता येईल?“ बहुकाचे उत्तर असे की, “ही मंडळी लोभाला बळी पडत नाहीत, कोणाला घाबरत नाहीत, कोणाचा द्वेष करीत नाहीत, स्वत:साठी त्यांना काहीही मिळवायचे नाही, आणि त्यामुळे ते शक्तिमान आहेत.’‘ (संघ स्वयंसेवकांचे वर्णन) एवढेच नाही तर, समाजात ब्राह्मणांचा वर्ग आहे, (त्यागी, तपस्वी, ज्ञानी लोकांचा, जातीचा नव्हे.) ते आत्मसंयमाचे पालन करतात. त्यांचा वेदवाणीवर विश्वास आहे. ते परमेश्वराचे स्मरण करून धर्मोपदेश करीत असतात. ते तुमचे म्हणजे कंसाच्या आज्ञा मानणार नाहीत. (आजच्या भाषेत प्रचारक वर्ग.)
* यावर कंस म्हणतो की, ‘मी या लोकांना विकत घेईन. माझ्याकडे प्रचंड धन आहे, ते मी त्यांना देईन. एवढ्याने भागले नाही, तर मी त्यांची हत्या करीन.‘ यावर बहुक म्हणतो की, ‘असे काही करू नका. कारण पैशाने विकत घेणारी ही माणसे नाहीत. आणि त्यांना शारीरिक इजा पोहोचवली तर, लोक तुम्हाला खातील.‘
* मग यावर मार्ग कोणता? त्यावर बहुकाने दिलेले उत्तर आजचे आपले राहुल गांधी व्यवहारात आणत आहेत. ते उत्तर असे, बहुक म्हणतो, “या त्यागी, तपस्वी, सेवाभावी लोकांना नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे, तुम्ही तुमचा राजकोश लोकांसाठी मोकळा करा. अशा विचाराचा प्रचार करा की, खाणे, पिणे, मौज, मजा यातच आनंद आहे. (रात्रीच्या रेव्ह पार्टी) परिवार विखंडीत करा, महिलांना हे सांगा की, शील-मर्यादा याला काही अर्थ नाही. जीवनाचा उपभोग घ्या. मुलांना हे सांगा की, म्हातार्या आईवडिलांची कसली चिंता करता, ते भूमीला भार झालेले आहेत. जर लोकं या मार्गाने जाऊ लागले आणि उपभोग घेणे हीच त्यांची जीवनवृत्ती झाली तर, साधू, संन्याशी यांच्याकडे ते कुत्सित नजरेने बघायला लागतील. असे झाले म्हणजे, उत्तम चारा-पाणी प्राप्त झालेल्या पशुंच्या कळपांसारखे लोक होतील. त्यांच्यावर राज्य करणे सोपे जाईल.”
* राहुल गांधींची सध्या होणारी भाषणे बहुकाचा उपदेश व्यवहारात आणणारी भाषणे आहेत. भगवान श्रीकृष्णाने त्यांना आसुरी प्रवृत्ती म्हटले आहे आणि त्याचे वर्णन सोळाव्या अध्यायात अतिशय उत्तम प्रकारे केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, (गीताई अध्याय 16)
म्हणती लटिकें विश्व निराधार निरीश्वर
काम-मूलक हें सारें कोठलें सह-कार्य तें।
हे आज लाभलें आतां तो जोडीन मनोरथ
हें आहे तें हि होईल माझें चि सगळें धन
मीं मारिला चि तो शत्रु मारीन दुसरे हि जे
मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी।
हा वैचारिक संघर्ष वैचारिक खंडनमंडनाचा नाही. कारण ज्यांनी संघर्ष सुरू केला आहे, ते खंडनमंडनाच्या पलीकडे पोहोचलेले आहेत. या संघर्षात जीवंत जागती उदाहरणे लोकांपुढे आणावी लागतील. संघसृष्टीचा विचार करता अशी लाखो उदाहरणे आहेत. ती प्रकर्षाने समाजापुढे आणली पाहिजेत. लाखो सेवाकार्य चालतात. छत्रपती संभाजीनगरचे एक डॉ. हेडगेवार रुग्णालय घेतले तर, ते सगळ्या मनुवादाला आणि संविधान विरोध संकल्पनेसाठी जिवंत उत्तर आहे. अशी कार्ये लहान-मोठ्या प्रमाणात सर्व देशभर, देशातील सर्व जिल्ह्यात चालू आहेत.
त्यांचे चेहरे तयार केले पाहिजेत. प्रत्यक्ष असलेले चेहरे प्रकर्षाने पुढे आणले पाहिजेत. संघकामात सर्व जातिवर्गातील स्त्री-पुरुष आपआपल्या क्षमतेप्रमाणे योगदान देत असतात. ते वेगवेगळ्या पदांवर आहेत. त्यांना समाजापुढे आणले पाहिजे. राहुल गांधी आणि त्याच्या मागे असणारी डावी गँग यांना एकच धंदा करायचा आहे, तो म्हणजे बिनबुडाचे आरोप करत राहायचे. इंग्रजीत त्याला ’हीट अँण्ड रन’ असे म्हणतात. राजकीय लढाईतील ती एक खेळी आहे. राहुल गांधींसारख्यांनी आरोप करावेत आणि कोणीतरी त्याला उत्तर द्यावे हा कोणतेही फळ न देणारा उद्योग आहे. एक गुरू राजाला शिक्षा करतो की, मोठा दगड ढकलत ढकलत डोंगराच्या टोकावर घेऊन जा. राजा अतिशय परिश्रमाने ते काम करतो, पण दगड तिथे राहत नाही, तो गुरुत्वाकर्षणाने वेगाने खाली येतो. आणि हे काम राजाचा प्राण जाईपर्यंत चालू राहाते. राहुल गांधी आणि त्यांच्या गँगशी वैचारिक वादविवादाचा विषय हा असा आहे, निरर्थक, परिणामशून्य आणि कारण नसताना आपल्याला थकविणारा.
म्हणून हा संघर्ष काय आहे, हे नीट समजून घ्यायला पाहिजे, त्याच्याशी लढायचे आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे; परंतु लढण्याची आयुधे अतिशय विचारपूर्वक निवडली पाहिजेत. या काळात जेवढा व्यापक जनसंपर्क होईल आणि संघाने दिलेली पंचसूत्री जेवढ्या अधिक प्रमाणात जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे प्रयत्न होतील तेवढ्या प्रमाणात हे सर्व आसुरीवृत्तीचे व्याकरणाचार्य आपल्या वाणीने आणि कृतीनेच अस्ताला जातील.