कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अचूक शेती

विवेक मराठी    21-Sep-2026
Total Views |
Agricultural Technology
हवामान बदलाच्या युगातीलकृषी तंत्रज्ञानाचा नवा आयाम
 
 Agricultural Technology
बदलते हवामान पाहता स्वयंचलित हवामान केंद्रातून मिळणारी स्थानिक माहिती, AIची विश्लेषण क्षमता, DBATUचे तांत्रिक ज्ञान, KVKचे कृषिमार्गदर्शन आणि शेतकर्‍यांचा अनुभव यांचा एकत्रित वापर केल्यास शेती अधिक अचूक, किफायतशीर, सुरक्षित आणि हवामान-स्मार्ट बनू शकते. म्हणून या उपक्रमाकडे केवळ ‘AI आधारित शेती प्रकल्प’ म्हणून न पाहता ‘शाश्वत शेतीची लोक चळवळ’ म्हणून पाहण्याची गरज आहे.
शेती ही केवळ उत्पादन घेण्याची प्रक्रिया नसून ती निसर्ग, माती, पाणी, हवामान आणि मानवी ज्ञान यांचा समन्वय आहे. मात्र बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढते तापमान, आर्द्रतेतील बदल, अवकाळी पर्जन्य आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे पारंपरिक शेतीसमोरील आव्हाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्‍याला केवळ आज हवामान कसे आहे? एवढी माहिती पुरेशी नाही; तर माझ्या पिकाच्या सध्याच्या अवस्थेत या हवामानाचा काय परिणाम होणार आणि मला आता काय करायला हवे? या प्रश्नाचे उत्तर आवश्यक आहे. याच ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence (AI), स्वयंचलित हवामान केंद्रे, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), स्थानिक पातळीवरील हवामान माहिती आणि कृषी तज्ज्ञांचे ज्ञान यांचा संगम महत्त्वाचा ठरतो. ’दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई’ आणि ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे’ यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले ’स्वयंचलित हवामान केंद्र’ हा या दिशेने महत्त्वाचा प्रारंभ आहे. या केंद्रातून मिळणार्‍या स्थानिक हवामानविषयक माहितीचे AI आधारित विश्लेषण करून शेतकर्‍यांना योग्य वेळी योग्य कृषी सल्ला देण्याची संकल्पना पुढे नेत आहोत. ही केवळ एखादी तांत्रिक योजना नसून भविष्यात माहितीवर आधारित, संसाधनांची बचत करणारी आणि हवामान बदलाशी जुळवून घेणारी शाश्वत शेती उभारण्याची चळवळ बनत आहे.
 
 
ही केवळ एखादी तांत्रिक योजना नसून भविष्यात माहितीवर आधारित, संसाधनांची बचत करणारी आणि हवामान बदलाशी जुळवून घेणारी शाश्वत शेती उभारण्याची चळवळ बनू शकते.
 
DBATU आणि KVKची भूमिका व कार्यप्रणाली
 
KVKअंबाजोगाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणारा हा उपक्रम स्थानिक शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष गरजा, कृषीज्ञान, IoT , कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा विश्लेषण आणि क्षेत्रीय संशोधन यांचा समन्वय साधणारा आहे. या उपक्रमाची दिशा निश्चित करण्यासाठी दि. 16-07-2026 रोजी अंबाजोगाई येथे विद्यापीठ आणि घतघच्या संयुक्त पथकाने स्थानिक शेतकर्‍यांसोबत विचार मंथन (Brainstorming) सत्र आयोजित केले. या सत्रामध्ये स्थानिक पिकांच्या समस्या, हवामानातील अनिश्चितता, पर्जन्यमानातील बदल, सिंचनाची गरज, कीड-रोगांचा प्रादुर्भाव तसेच शेतकर्‍यांना आवश्यक असलेली हवामान व कृषीविषयक निर्णय-साहाय्य माहिती याबाबत प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली. या संवादातून प्राप्त झालेल्या सूचना व निष्कर्षांच्या आधारे पुढील तांत्रिक व संशोधनात्मक दिशा निश्चित करण्यात आली.
 
 
अंबाजोगाई परिसरातील सोयाबीन, तूर, कापूस, आंबा इत्यादी प्रमुख पिकांच्या संदर्भात पिकांची वाढ व स्थिती, मातीची स्थिती, हवामान, पावसाचे स्वरूप, सिंचनाची गरज, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनावर होणारा परिणाम यांचा सखोल व सतत अभ्यास KVK अंबाजोगाई येथील शास्त्रज्ञ करीत असतात. KVK अंबाजोगाईचे स्थानिक कृषी ज्ञान व क्षेत्रीय अनुभव यांना IoT आधारित उपकरणे आणि स्वयंचलित हवामान केंद्रातून उपलब्ध होणार्‍या तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, मातीतील आर्द्रता इत्यादी माहितीची जोड दिली जाते.
 
 Agricultural Technology
 
संकलित कृषी व हवामानविषयक माहितीचे DBATU येथे तांत्रिक विश्लेषण केले जाते. अख, AI, Machine Learning आणि Data Analyticsच्या साहाय्याने उपलब्ध डेटामधील नमुने, परस्पर संबंध आणि बदल ओळखून स्थानिक परिस्थितीनुसार पिकांची स्थिती, पाण्याची गरज, हवामानाचा पिकांवरील संभाव्य परिणाम तसेच रोग-किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता याबाबत अंदाज विकसित केले जातात. या तांत्रिक निष्कर्षांची KVKच्या कृषी तज्ज्ञांकडून स्थानिक परिस्थितीच्या संदर्भात पडताळणी केली जाते.
 
 
दिनांक 14-08-2026 रोजी KVK अंबाजोगाई येथे विद्यापीठ, KVKअंबाजोगाईचे पथक आणि स्थानिक शेतकरी यांच्यादरम्यान पुढील चर्चा घेण्यात आली. या चर्चेमध्ये दिनांक 16-07-2026 रोजी स्थानिक शेतकर्‍यांसोबत झालेल्या विचारमंथनातून समोर आलेल्या मुद्द्यांचा, उपलब्ध हवामान व कृषिडेटाचा तसेच त्यावर आधारित विश्लेषण व संभाव्य अंदाजांचा आढावा घेण्यात आला. शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष अनुभवांशी तांत्रिक विश्लेषणातून प्राप्त निष्कर्षांची सांगड कशी घालता येईल आणि त्यातून अधिक उपयुक्त व स्थानिक परिस्थितीला अनुरूप कृषिनिर्णय-साहाय्यप्रणाली कशी विकसित करता येईल, यावर विशेष चर्चा करण्यात आली.
 
 
या प्रक्रियेत AIकडून प्राप्त होणारे निष्कर्ष अंतिम कृषिसल्ला म्हणून न स्वीकारता, त्यांचे KVKच्या कृषितज्ज्ञांकडून स्थानिक परिस्थितीशी सुसंगततेच्या दृष्टीने परीक्षण केले जाते. त्यानंतर शेतकर्‍यांसाठी आवश्यकतेनुसार साध्या आणि कृती योग्य स्वरूपातील सूचना विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता काय करावे? या शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्नाला वेळेवर आणि परिस्थितीनुरूप उत्तर देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
 
 
या संपूर्ण उपक्रमाची कार्यपद्धती ”शेतकर्‍यांच्या समस्या विचारमंथन डेटासंकलन AIआधारित विश्लेषण कृषितज्ज्ञांचे परीक्षण कृतीयोग्य सल्ला शेतातील परिणाम पुनर्मूल्यांकन” अशी सतत विकसित होणारी संशोधन साखळी म्हणून पाहता येते. शेतातील प्रत्यक्ष अनुभव आणि परिणाम पुन्हा पुढील विश्लेषणासाठी वापरले जात असल्यामुळे प्रत्येक हंगामातील नवीन माहितीच्या आधारे प्रणाली अधिक स्थानिक, अचूक आणि उपयुक्त बनविण्याची संधी उपलब्ध होते.
 


 Agricultural Technology 
 
या उपक्रमात DBATUची तांत्रिक व विश्लेषणात्मक क्षमता आणि KVK अंबाजोगाईचे स्थानिक कृषिज्ञान व क्षेत्रीय अनुभव यांची सांगड घातली जात आहे. परिणामी, तंत्रज्ञानाचा केवळ शेतीमध्ये वापर करण्याऐवजी शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष समस्यांपासून सुरू होऊन डेटा, AI आणि कृषितज्ज्ञांच्या ज्ञानाच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणारी निर्णयाधारित कृषिप्रणाली विकसित करण्यात येत आहे.
 
शेताचे डिजिटल हवामान निरीक्षण केंद्र
 
KVK अंबाजोगाई येथे स्थापित हवामान निरीक्षण केंद्राची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
 
* सर्वसमावेशक हवामानविषयक माहिती संकलन - तापमान, आर्द्रता, वार्‍याचा वेग, वार्‍याची दिशा, पर्जन्यमान, वातावरणीय दाब, सौर किरणोत्सर्ग तसेच इतर हवामानविषयक घटकांचे मोजमाप आणि निरीक्षण केले जाते.
 
* अंतर्गत 4 ते 16 वाहिन्यांचा डेटा लॉगर - हवामानविषयक 10 लाखांहून अधिक नोंदी साठविण्याची क्षमता असून, निर्धारित कालावधीनुसार माहितीचे स्वयंचलित संकलन केले जाते.
 
* दूरस्थ प्रवेश (Remote Login) व संपर्क सुविधा - 4G, GSM, GPRS, Wi-Fi, Ethernet  आणि उपग्रह दळणवळण यांसारख्या सुविधांद्वारे हवामानविषयक माहिती कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही वेळी पाहता येते.
 
* क्लाउड-आधारित डॅशबोर्ड - कोणत्याही उपकरणावरून वास्तविक वेळेतील विश्लेषण, आलेखांच्या माध्यमातून तुलनात्मक माहिती आणि अहवाल निर्मितीची सुविधा उपलब्ध होते.
 
* गरजेनुसार विस्तारक्षम प्रणाली - वापराच्या गरजेनुसार अतिरिक्त सेन्सर जोडणे, इंटरफेसमध्ये आवश्यक बदल करणे आणि नवीन तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे शक्य होते.
 
* त्वरित सूचना प्रणाली - हवामानातील कोणताही घटक निर्धारित मर्यादेपेक्षा वाढला किंवा कमी झाला, तर SMS, ई-मेल किंवा डॅशबोर्डद्वारे त्वरित सूचना प्राप्त होतात.
 
या केंद्राकडे केवळ ‘हवामान सांगणारे उपकरण’ म्हणून न पाहता शेतासाठी सतत डेटा निर्माण करणारे डिजिटल निरीक्षण केंद्र म्हणून पाहणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या दिवशी तापमान वाढले, आर्द्रता विशिष्ट पातळीवर राहिली आणि त्याच वेळी पावसाची शक्यता निर्माण झाली, तर या सर्व घटकांचा स्वतंत्रपणे विचार करण्याऐवजी त्यांचा एकत्रित परिणाम AI प्रणाली तपासू शकते.
 
 
यातून पुढे प्रश्न निर्माण होतो : या हवामान परिस्थितीचा सध्या शेतात असलेल्या पिकावर काय परिणाम होईल? याचे उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणजे AI आधारित precision farming. . हवामान केंद्रापासून AI सल्ल्यापर्यंतचा प्रवास या संपूर्ण प्रक्रियेची कल्पना पुढीलप्रमाणे करता येते :
 
 
अशी व्यवस्था निर्माण झाली तर ही एक Learning Agricultural System बनू शकते-म्हणजे प्रत्येक हंगामातून शिकणारी आणि पुढील हंगामात अधिक चांगला सल्ला देणारी प्रणाली.
 
 
सोयाबीन : अंबाजोगाई व परिसरात सोयाबीन हे प्रमुख खरीप पीक आहे. सोयाबीनच्या वाढीवर पाऊस, तापमान आणि आर्द्रता या हवामान घटकांचा मोठा प्रभाव असतो. पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थांमध्ये हवामानानुसार कृषी व्यवस्थापनात आवश्यक बदल करणे गरजेचे असते. स्वयंचलित हवामान केंद्रातून प्राप्त माहितीच्या आधारे सोयाबीन पिकासाठी पेरणी, तण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड-रोगव्यवस्थापन आणि फवारणीचे नियोजन याबाबत हवामानाधारित संदेश देता येतील. विशेषतः पावसाची शक्यता असताना फवारणी टाळण्याचा किंवा योग्य वेळ निवडण्याचा सल्ला मिळाल्यास अनावश्यक फवारण्या आणि त्यावरील खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते तसेच रोग किंवा किडीचा धोका वाढण्यास अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेपूर्वी करता येतील.
 
 
तूर : तूर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. तुरीमध्ये पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हवामानाचा परिणाम बदलतो. विशेषतः फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत तापमान, पर्जन्यमान व आर्द्रतेतील बदल उत्पादनावर परिणाम करू शकतात. हवामान केंद्रातून मिळणार्‍या माहितीचे विश्लेषण करून तूर पिकातील विविध कृषिकामांचे नियोजन करण्यास शेतकर्‍यांना मदत होईल. हवामान परिस्थितीनुसार कीड व रोगांचा संभाव्य धोका ओळखून योग्य वेळी कृषी संदेश देणे शक्य होईल. त्यामुळे शेतकर्‍यांना अनावश्यक फवारण्या टाळून गरजेनुसार आणि योग्यवेळी उपाययोजना करता येतील.
 
 
आंबा : अंबाजोगाई परिसरात आंबा पिकालाही महत्त्व आहे. आंबा पिकामध्ये मोहोर येण्यापासून फळधारणा आणि फळांच्या वाढीपर्यंतच्या विविध अवस्थांमध्ये हवामानाचा मोठा प्रभाव असतो.तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि वार्‍याची स्थिती या नुसार मोहोराचे संरक्षण, कीड-रोग व्यवस्थापन आणि फवारणीचे नियोजन करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर स्वयंचलित हवामान केंद्रातून प्राप्त माहिती आणि AI आधारित विश्लेषणाचा उपयोग करून आंबा उत्पादकांना स्थानिक हवामान परिस्थितीनुसार वेळेवर कृषी सल्ला उपलब्ध करून देता येईल. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादकता सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
 
 
शेतकर्‍याच्या मोबाईलमध्ये येणारा ’स्मार्ट कृषिसल्ला’
 
 
तंत्रज्ञानाचे खरे यश हे ते शेतकर्‍यापर्यंत किती सहज पोहोचते यावर अवलंबून आहे. म्हणूनच हवामान केंद्रात किंवा संगणकात डेटा साठवून ठेवणे पुरेसे नाही. त्या डेटाचे शेतकर्‍याला समजेल अशा भाषेत रूपांतर होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, गुंतागुंतीचा डेटा दाखविण्याऐवजी ”पुढील 24 तासांत पावसाची शक्यता असल्यामुळे आज फवारणी टाळा.” किंवा ”तापमान व आर्द्रतेच्या परिस्थितीमुळे रोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शेताची पाहणी करा ”. अशा प्रकारचे स्पष्ट, छोटे आणि कृतीयोग्य संदेश मोबाईल, Whats App किंवा इतर डिजिटल माध्यमांतून शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना मूळ उपक्रमातही मांडण्यात आली आहे. ही चळवळ यशस्वी होण्यासाठी केवळ DBATU, दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई किंवा AI पुरेसे नाही. शेतकरी हा या संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. या चळवळीत सहभागी असलेले शेतकरी सध्या पुढीलप्रमाणे उपक्रम राबवत आहेत: आपल्या शेताची आणि पिकाची माहिती नियमितपणे उपलब्ध करून देणे, पिकाची अवस्था, रोग-किडीची लक्षणे किंवा इतर समस्या याबाबत माहिती देणे, मिळालेला AI आधारित सल्ला समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करणे, प्रत्येक सल्ल्याचा परिणाम नोंदविण्यास सहकार्य करणे, अनावश्यक फवारणी, सिंचन किंवा निविष्ठांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करणे, आपल्या अनुभवांची इतर शेतकर्‍यांसोबत देवाणघेवाण करणे.
 
ड्रोन तंत्रज्ञानाशी जोडलेली भविष्यातील दिशा
 
RUSA कार्यक्रमांतर्गत होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई यांच्या पुढाकाराने कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे ड्रोन लॅबची उभारणी करण्यात आली आहे. त्यामागे डॉ. राजनिश कामत (तत्कालीन कुलगुरू) यांचा पुढाकार असल्याचे नमूद करणे महत्त्वाचे आहे. या ड्रोनमधील हायपर स्पेक्ट्रल फोटोग्राफीच्या सुविधेचा प्रस्तुत उपक्रमाशी जोड देत अधिक प्रभावीपणे पिकांवर पडणार्‍या रोगाची पूर्वसूचना देण्यासाठी उपयोग करणार आहोत. हवामान केंद्रातून मिळणार्‍या स्थानिक हवामानविषयक माहितीबरोबर पिकांची हायपरस्पेक्ट्रल छायाचित्रे, पिकांची वाढीची अवस्था आणि पिकांच्या आरोग्याशी संबंधित दृश्य माहिती एकत्रित केल्यास अख आधारित विश्लेषण अधिक सक्षम करता येईल. त्यामुळे हवामानातील बदलांचा पिकांवर होणारा परिणाम (रोगराई) अधिक अचूकपणे ओळखणे, पिकांची स्थिती समजून घेणे आणि भविष्यातील उत्पादन किंवा जोखमींचे (नुकसानीचा अंदाज) अधिक चांगले भाकीत करण्यासाठी एकात्मिक प्रणाली विकसित करण्याची संधी निर्माण होईल.
 
 
ही योजना नसून शाश्वत शेतीची चळवळ का?
 
 
एखादे हवामान केंद्र बसविणे किंवा AI प्रणाली विकसित करणे हा या उपक्रमाचा शेवट नाही. खरी गरज आहे ती शेतकरी, तंत्रज्ञान, कृषितज्ज्ञ आणि संशोधन संस्था यांना सतत जोडून ठेवण्याची. आज एक शेतकरी सहभागी होईल; उद्या दहा शेतकरी सहभागी होतील; पुढे गावातील अनेक शेतकरी सहभागी होतील. प्रत्येक शेतातून मिळणारा अनुभव, हवामान डेटा आणि पिकाचा प्रतिसाद या चळवळीला अधिक सक्षम बनवू शकतो.
 
अशा प्रकारे :
* एक शेत एक डेटा स्रोत
* अनेक शेत स्थानिक कृषिज्ञानाचा मोठा डेटाबेस
* डेटा + AI + कृषितज्ज्ञ अधिक अचूक निर्णय
* अचूक निर्णय कमी खर्च आणि संसाधनांची बचत
* संसाधनांची बचत शाश्वत शेती
अशी साखळी निर्माण होऊ शकते.
 
पुढील दिशा
 
भविष्यात या उपक्रमाचा विस्तार केवळ हवामान माहितीपर्यंत मर्यादित न राहता मातीतील ओलावा, सिंचन व्यवस्थापन, पीक आरोग्य, रोग-किडींची ओळख, उत्पादनाचा अंदाज आणि बाजाराशी संबंधित माहिती अशा विविध क्षेत्रांत करता येऊ शकतो. मूळ उपक्रमातही अधिक गावांतील शेतकर्‍यांपर्यंत आणि इतर पिकांपर्यंत विस्ताराची मोठी संधी नमूद करण्यात आली आहे. तसेच हवामान आणि पिकांच्या प्रतिसादाचा सातत्याने अभ्यास करून स्थानिक परिस्थितीसाठी अधिक अचूक सल्ला विकसित करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या विस्तारात DBATUचे तंत्रज्ञान व संशोधन, दीनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाईचे कृषी ज्ञान व क्षेत्रीय अनुभव, AIची विश्लेषण क्षमता आणि शेतकर्‍यांचा प्रत्यक्ष सहभाग हे चार प्रमुख आधारस्तंभ ठरू शकतात.
 
 
निष्कर्ष - शेतकर्‍याच्या हातात तंत्रज्ञान, निर्णयात अचूकता आणि शेतीत शाश्वतता - बदलते हवामान हे आजचे वास्तव आहे. त्यावर मात करण्यासाठी केवळ अधिक उत्पादन घेण्याचा विचार पुरेसा नाही. उपलब्ध पाणी, माती, कृषिउत्पादन साधनांचा आणि आर्थिक संसाधने यांचा काटकसरीने आणि शास्त्रीय पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. स्वयंचलित हवामान केंद्रातून मिळणारी स्थानिक माहिती, AIची विश्लेषण क्षमता, DBATUचे तांत्रिक ज्ञान, KVKचे कृषिमार्गदर्शन आणि शेतकर्‍यांचा अनुभव यांचा एकत्रित वापर केल्यास शेती अधिक अचूक, किफायतशीर, सुरक्षित आणि हवामान-स्मार्ट बनू शकते. म्हणून या उपक्रमाकडे केवळ ’AI आधारित शेती प्रकल्प’ म्हणून न पाहता शाश्वत शेतीची लोक चळवळ म्हणून पाहण्याची गरज आहे. या चळवळीचा साधा पण प्रभावी संदेश असा असू शकतो :
 
अचूक हवामान माहिती + AI विश्लेषण + DBATUचे तंत्रज्ञान + KVKचे कृषी मार्गदर्शन + शेतकर्‍यांचा सक्रिय सहभाग = शाश्वत, स्मार्ट आणि सक्षम शेती.
 
मागील लेखात(भाग-1) मांडलेल्या ”अचूक हवामान माहिती + कृत्रिम बुद्धिमत्तेचे विश्लेषण + कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन = हवामान-स्मार्टशेती” या संकल्पनेला आता शेतकर्‍यांच्या सक्रिय सहभागाची जोड देणे ही या चळवळीची पुढील आणि अत्यंत महत्त्वाची पायरी ठरू शकते.
 
लेखक :
डॉ. उपेंद्र कुलकर्णी- संचालक, दीनदयाळ शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, (KVK), अंबाजोगाई (9175073286)
डॉ. ब्रिजेश अय्यर - प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे-रायगड (9403002289)
प्रमोद रेणापूरकर- कृषी अभियंता, कृषी विज्ञान केंद्र, (KVK), अंबाजोगाई (7588566691)
डॉ. वसंत देशमुख- वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, (KVK), अंबाजोगाई