@डॉ. रवी रमेशचंद्र

ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारताने 12-13 सप्टेंबर दरम्यान ‘भारत मंडपम’ येथे 18व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेचे आयोजन केले होते. हे आयोजन भारत आणि संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना तिरुक्कुरळची प्रत भेट देऊन जनसंपर्क व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा संदेश दिला. तिरुक्कुरळ हा प्राचीन भारतातील एक कालजयी नीतीग्रंथ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भारतीय संत तिरुवल्लुवर यांच्या ’तिरुक्कुरळ’ या अजरामर तमिळ ग्रंथाचा रशियन अनुवाद भेट दिला. या प्रसंगी बोलताना त्यांनी नमूद केले की, संत तिरुवल्लुवर यांनी या ग्रंथात मानवी जीवनाच्या अनेक पैलूंचे सखोल विश्लेषण केले आहे. मोदींनी पुतिन यांना दिलेल्या या खास भेटीमुळे ब्रिक्स (BRICS) देशांमधील सांस्कृतिक व सभ्यतागत संवादाच्या महत्त्वावर एक व्यापक चर्चा सुरू झाली आहे. ब्रिक्समधील प्रमुख राष्ट्रांना स्वतःची प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळेच,जी-20च्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा संस्कृती आणि विचारसरणीवर आधारित मुत्सद्देगिरीवर (Cultural Diplomacy) भर दिला आहे.
’BRIC’ ही संकल्पना मूलतः ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या देशांचा समूह म्हणून सुरू झालेली आहे. ’गोल्डमन सॅक्स’चे अर्थतज्ज्ञ जिम ओ’नील यांनी 2001मध्ये प्रथम या शब्दाचा वापर केला होता. त्यांनी असा अंदाज वर्तवला होता की, 21व्या शतकात या चार देशांचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) दर लक्षणीयरीत्या वाढलेले असतील आणि ते जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाकतील. पुढे 2006मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या 61व्या आमसभेदरम्यान या समूहाची औपचारिक बैठक होऊन आर्थिक व राजकीय सहकार्याला गती देण्यात आली.
आज ‘ब्रिक्स’ हा जगातील पाच मोठ्या आणि इतर महत्त्वाच्या विकसनशील देशांचा समूह आहे. जागतिक लोकसंख्येच्या 41% तर जागतिक जीडीपीच्या 24% आणि जागतिक व्यापाराच्या 16% भागाचे ‘ब्रिक्स’ समूह प्रतिनिधित्व करतो. अधिक शाश्वत, न्याय्य आणि परस्पर फायदेशीर विकासासाठी बहुपक्षीय सहकार्य वाढवणे हे ब्रिक्सचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी सहकार्याचे तीन प्रमुख मार्ग (Tracks) निश्चित करण्यात आले आहेत:
मार्ग क्र. 1 ( ट्रॅक 1 डिप्लोमसी) : राष्ट्रीय सरकारांमधील औपचारिक राजनयिक संवाद.
मार्ग क्र. 2 (ट्रॅक 2 डिप्लोमसी) : सरकारी संस्था, व्यापारी परिषद आणि सार्वजनिक उपक्रमांद्वारे सहकार्य.
मार्ग क्र. 3 (ट्रॅक 2 डिप्लोमसी) : नागरी समाज आणि परस्पर जनसंपर्काद्वारे (People-to-People Connect) ’सॉफ्ट पॉवर’ मुत्सद्देगिरी.
यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारताने 12-13 सप्टेंबर दरम्यान ’भारत मंडपम’ येथे 18व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेचे आयोजन केले होते. हे आयोजन भारत आणि संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना तिरुक्कुरळची प्रत भेट देऊन जनसंपर्क व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा संदेश दिला. तिरुक्कुरळ हा प्राचीन भारतातील एक कालजयी नीतीग्रंथ आहे. यात 1,330 द्विपदी (कुरळ) असून त्यांची 133 अध्यायांमध्ये विभागणी केली आहे.
ग्रंथाचे तीन मुख्य भाग आहेत
1. आरम (धर्म/सदाचार): मानवी जीवनाच्या नैतिक मूल्यांवर भर.
2. पोरुल (अर्थ/राजकारण व समाज): शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण, ज्ञान, मैत्री, परिश्रम आणि राज्याची सुरक्षितता यावर मार्गदर्शन.
3. इन्बम (काम/गृहस्थ जीवन): प्रेम आणि कौटुंबिक जीवनाशी संबंधित.
हाच ग्रंथ का?
सुमारे 2000 वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आजही व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या नैतिक, आर्थिक व राजनैतिक मार्गदर्शनासाठी तितकाच प्रासंगिक आहे. रशिया आणि भारत दोघे जुने राष्ट्र आणि सभ्यता आहेत. दोन्ही देशांमध्ये आरम, पोरुळ आणि इंबाम, म्हणजेच धर्म, अर्थ, काम या तिघांचा सामाजिक जीवनात विशेष महत्त्व आहे. तिरुक्कुरळच्या माध्यमातून दार्शनिक पद्धतीने जागतिक पातळीवर मानवीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रशियाला खासकरून हा ग्रंथ देण्यात आला आहे.
तिरुक्कुरळ आणि राजनैतिक सिद्धांत
तिरुक्कुरळमधील मुत्सद्देगिरी प्रामुख्याने दूत (राजदूत), मैत्री, तह आणि राज्याची सुरक्षा यांवर आधारित आहे.
1. गुप्तहेर व्यवस्था व माहितीविषयक मुत्सद्देगिरी (’ओत्राडल्’ - अध्याय 59):
संत तिरुवल्लुवर यांनी नीतीशास्त्र आणि गुप्तहेर यंत्रणेला राजाचे दोन डोळे मानले आहे. ’ओटुम उरैसा नूलुम इवैयिरण्डुम्’ (कुरळ 581) नुसार, गुप्तहेरांशिवाय राजा अंध असतो. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्ञान नसलेला राज्यकर्ता कधीही स्थैर्य प्राप्त करू शकत नाही. ’विनैसैवार थामसुट्रम वेण्डादार’ (कुरळ 584) मध्ये ते सांगतात की, कुशल शासकाने शासकीय अधिकारी, निकटवर्तीय आणि विरोधक या तिन्ही घटकांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे.
2. दूताचे गुण व भाषाप्रभुत्व (’थूथु’ - अध्याय 69):
राजदूतामध्ये देशप्रेम, कुशाग्र बुद्धिमत्ता, वाक्पटुता, निष्ठा आणि दूरदृष्टी असणे आवश्यक आहे (कुरळ 681, 682). राजदूत निडर आणि स्वाभिमानी असावा (कुरळ 689). योग्य वेळ आणि प्रसंगाचे भान ठेवून संवाद साधणाराच खरा दूत ठरतो (कुरळ 685, 686). भारताच्या परंपरेत रामायणातील हनुमान व अंगद आणि महाभारतातील श्रीकृष्ण यांची दूत म्हणून भूमिका अनुकरणीय आहे. दूताची वाणी कटू असल्यास सहकार्याऐवजी युद्ध ओढवू शकते.
3. माहितीच्या पडताळणीचा ’त्रिकोण’ नियम:
तिरुक्कुरळनुसार (’ओट्रोट्रि उणराम्मै आळ्का उडन्मूवर्’ - कुरळ 588, 589), एका गुप्तहेराच्या माहितीची खातरजमा दुसर्याकडून केली पाहिजे. एकमेकांशी संबंध नसलेल्या तीन वेगळ्या गुप्तहेरांनी एकाच माहितीची पुष्टी केल्यावरच ती सत्य मानून निर्णय घेतला पाहिजे.
4. मित्र राष्ट्रांची निवड व आंतरराष्ट्रीय संबंध (अध्याय 79 व 80):
मैत्री नेहमी पारखून केली पाहिजे. संकटकाळात न मागता मदतीला धावून येणाराच खरा मित्र असतो. 1971 च्या बांगलादेश युद्धापासून आजपर्यंत रशियाने नेहमी भारताला साथ दिली आहे. मात्र, वरून मित्र दिसणार्या पण आतून शत्रूभाव ठेवणार्या राष्ट्रांपासून सावध राहण्याचा इशाराही तिरुवल्लुवर देतात. चीन आणि अमेरिकेसारख्या देशांच्या संदर्भात हा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
आधुनिक जागतिक संदर्भात प्रासंगिकता
आज संपूर्ण जग युद्ध, शांततेचा अभाव, गरिबी आणि हिंसेने ग्रासलेले असताना ‘ब्रिक्स’ परिषदेत तिरुक्कुरळची चर्चा होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. तिरुवल्लुवर यांच्या मते, युद्धापेक्षा शांततेला प्राधान्य दिले पाहिजे. युद्धात नेहमी विनाश होतो, त्यामुळे मुत्सद्दी वाटाघाटींमधूनच मार्ग काढला पाहिजे.
भारत, रशिया, चीन आणि ब्राझील या सर्व देशांना प्राचीन संस्कृती आणि समृद्ध दार्शनिक वारसा लाभला आहे. रशियाचे राजकीय विश्लेषक अलेक्झांडर डुगीन हे संस्कृतीविषयक संवादांचे महत्त्व जाणून आहेत. अलेक्झांडर डुगीन यांचा पुतिन यांच्यावर वैचारिक प्रभाव आहे. तिरुक्कुरळमुळे दोन्ही देशांमध्ये ज्ञान आणि मुत्सद्देगिरीचे नवे आयाम विकसित होतील. ब्रिक्स देश आपल्या या अनमोल सांस्कृतिक वारशाच्या (‘ट्रॅक -3 डिप्लोमसी’च्या) जोरावर लवचिकता (Resilience), नाविन्यता (Innovation), सहकार्य आणि शाश्वतता (Sustainability) हे ध्येय साध्य करू शकतात. जेव्हा जेव्हा ’मानवता प्रथम’ हा विचार पुढे येईल, तेव्हा संत तिरुवल्लुवर यांचे विचार जगाला दिशा दाखवणार्या दीपस्तंभासारखे अढळ आणि प्रकाशमान राहतील.
लेखक सहयोगी प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय अध्ययन संस्था, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथे आहेत.