संघामुळे माझे आयुष्य कृतार्थ झाले...

विवेक मराठी    22-Sep-2026
Total Views |
वासंती सदाशिव गरगटे
98605 85730
 
rss
माहेरी संघाची फारशी माहिती नसलेली मी गरगटे यांच्या घरी विवाह होऊन आले आणि थोड्याच अवधीत अंतर्बाह्य संघाची झाले. आज माझे वय 83 वर्षे आहे. माझा मुलगा, दोन्ही जावई, दोन नातवंडे संघात कृतिशील आहेत. संघाच्या ऋषितुल्य अशा प्रचारकांच्या सहवासामुळे माझे आयुष्य कृतार्थ झाले आहे.
माझा विवाह 1966 साली झाला, माझे माहेर पुण्यात सदाशिव पेठेतील आणि गरगटे मंडळी सातारा जिल्ह्यातील परंतु माझे यजमान सदाशिव गरगटे हे एल.आय.सी तील नोकरी निमित्ताने मराठवाडा विभागात बीड जिल्ह्यात होते. माहेरी मला संघाची फारशी माहिती नव्हती आणि इकडे गरगटे यांचे सारे घर संघाचे होते. माझे लग्न झाले तेव्हा दाजी खेडकर जिल्हा प्रचारक व सुरेशराव केतकर विभाग प्रचारक होते. माझे यजमान बीड येथे संघाचे शहर कार्यवाह होते. घरात संघाचे अधिकारी, प्रचारक यांचे सारखे येणे जाणे होत असे त्यातून मला संघ समजत गेला. मला आठवते तसे 1972 साली परम पूजनीय श्रीगुरुजींचा प्रवास बीड येथे झाला आणि मला त्यांच्या भोजन व्यवस्थेत काम करायची संधी मिळाली. 1975 ते 1977 आणीबाणी लागली त्यावेळी माझे यजमान भूमिगत झाले त्यांचेवर अटकेची टांगती तलवार आणि घरात तीन लहान मुले पण अशाही स्थितीत मी भूमिगत संघ प्रचारक यांच्या सार्‍या व्यवस्था पाहत असे. या सर्व अतिशय खडतर परिस्थितीत मला संघ जवळून समजला.
 
 
1977मध्ये संघबंदी उठली आणि माझ्या कृतिशील कामाला सुरुवात झाली.1978 साली बीडमध्ये राष्ट्र सेविका समितीची सुरुवात झाली आणि मी समितीचे काम पाहू लागले. त्या निमित्ताने मी सगळ्या बीड जिल्ह्यात प्रवास करू लागले. या कामात मला माझे यजमान गरगटे जिल्हा प्रचारक बाबा जोशी आणि विभाग प्रचारक माधवराव कुलकर्णी यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले.1980च्या दशकात मीनाक्षीपुरम येथे मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर झाले आणि त्याला संघाने कृतीने उत्तर द्यायचे ठरवले. माननीय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेतून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदू जागरणाचे कार्यक्रम सुरू झाले. जनजागरण अभियान, गंगाजल यात्रा, आळंदीचे हिंदू संमेलन, पूजनीय डॉ हेडगेवार यांची जन्मशताब्दी आणि रामजन्मभूमी आंदोलन या सर्व कार्यक्रमात राष्ट्र सेविका समितीची मातृशक्ती खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या बीड जिल्ह्यात उभी राहिली. ज्या वेळी सामाजिक समरसता हा विषय अजून रूढ व्हायचा होता अशा वेळी बीडसारख्या ठिकाणी समितीत समाजाच्या सर्व घटकांमधील महिला सहभागी झाल्या. बीडमध्ये 1988मध्ये आम्ही 75 सेविकांचे 15 दिवसांचे शिबीर घेतले. या सर्व काळात संघाचे वसंतराव केळकर, वसंतराव भिडे, नाना ढोबळे, तात्या इनामदार, दामूअण्णा दाते, राजाभाऊ भोसले, प्रल्हादजी अभ्यंकर तसेच समितीच्या वंदनीय ताई आपटे, बकुलताई देवकुळे, प्रमिलाताई मेढे या अधिकार्‍यांचा जवळून सहवास लाभला. माहेरी संघाची फारशी माहिती नसलेली मी गरगटे यांच्या घरी विवाह होऊन आले आणि थोड्याच अवधीत अंतर्बाह्य संघाची झाले. आज माझे वय 83 वर्षे आहे. माझा मुलगा, दोन्ही जावई, दोन नातवंडे संघात कृतिशील आहेत. संघाच्या ऋषितुल्य अशा प्रचारकांच्या सहवासामुळे माझे आयुष्य कृतार्थ झाले आहे. संघाला आज 100 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि संघाने त्यानिमित्ताने पंच परिवर्तन आयाम आणले आहेत. माझे नवीन पिढीला आवाहन आहे की, त्यांनी संघाच्या कोणत्याही गतिविधीमध्ये नक्की सहभागी व्हावे. संघात गेल्यामुळे व्यक्ती स्वतः घडते आणि आपोआप समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या उन्नतीत सहभागी होते.