शेतीत उत्पादन घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविणेही आता गरजेचे झाले आहे. विशेषतः भात उत्पादक शेतकर्यांसाठी ही संधी अधिक महत्त्वाची आहे. शेतातून निघालेला भात थेट बाजारात विकण्याऐवजी त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून तांदूळ तयार केला, तर शेतमालाला मूल्यवर्धनाची नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागात मिनी राईस मिल सुरू करणे हा शेतकरी आणि नवउद्योजकांसाठी चांगला व्यवसाय पर्याय ठरू शकतो.
ही मिल उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) या दोन योजनांचा आधार घेता येऊ शकतो. योग्य प्रकल्प आराखडा, स्वतःचा हिस्सा आणि बँक कर्जाच्या माध्यमातून या व्यवसायाची सुरुवात करण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. पात्र प्रकल्प खर्चाच्या 35टक्क्यांपर्यंत क्रेडिट-लिंक्ड अनुदान, कमाल 10लाख रुपयांपर्यंत मिळण्याची तरतूद आहे. अर्जदाराला प्रकल्प खर्चातील किमान 10टक्के हिस्सा स्वतः उभारावा लागतो. योजनेच्या नियमांनुसार पात्र व्यक्ती, भागीदारी संस्था आणि स्वयंसाहाय्यता गटांना लाभ घेता येतो.
मिलसाठी आवश्यक यंत्रसामग्री, तांत्रिक बांधकाम आणि इतर पात्र खर्चाचा विचार करून प्रकल्पाची आखणी करावी. जमीन खरेदी किंवा भाड्याच्या जागेचा खर्च पात्र प्रकल्प खर्चात कसा ग्राह्य धरला जातो, याची अद्ययावत माहिती अर्ज करण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे.
कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत काढणीनंतरच्या कृषी पायाभूत सुविधा, प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाशी संबंधित प्रकल्पांना कर्जाची सुविधा मिळू शकते. पात्र कर्जावर तीन टक्के व्याज सवलत मिळण्याची तरतूद आहे.
महत्त्वाचे म्हणजे सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केवळ अर्ज करणे पुरेसे नसते. व्यवसायाची व्यवहार्यता स्पष्ट करणारा प्रकल्प अहवाल तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. मिनी राईस मिलची क्षमता किती असेल, कोणती यंत्रसामग्री लागेल, त्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे, कच्चा माल कुठून मिळणार, तयार तांदळाची बाजारपेठ कोणती असेल, उत्पादन खर्च किती येईल आणि अपेक्षित उत्पन्न किती असेल याचा सविस्तर अंदाज प्रकल्प अहवालात असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट किंवा पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि व्यवसायाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतात.
या संदर्भात अर्ज आणि अधिकृत माहिती pmfme.mofpi.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एआयएफची माहिती agriinfra.dac.gov.inप या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येते. अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, व्यवसायाचा प्रकार, प्रस्तावित प्रकल्प आणि अंदाजित खर्चाची माहिती द्यावी लागते.
टीप : सदर योजेनेची पात्रता, अनुदान, कर्ज व व्याज सवलतीच्या अटी वेळोवेळी बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट, बँक आणि शासकीय यंत्रणेकडून अद्ययावत नियम तपासावेत.
- प्रतिनिधी