@ संध्या धुरी
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बागायती पट्ट्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग आकाराला आला आहे. शोभा पाखले यांनी निसर्गावरील निष्ठा आणि कष्टाच्या जोरावर ही क्रांती घडवली. शेतात 60 प्रकारच्या वनौषधींचा मॉडेल प्लॉट फुलवत त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली. मिश्र शेतीचा अवलंब करत परिसरातील शेतकर्यांना शेतीतंत्राची नवी दिशा दाखवली.
सांगली जिल्ह्यातील वाळवा रस्त्यावरून जाताना बहेबोरगावचा पाखले मळा लागतो. एरवीच्या पारंपरिक बागायती शेतीपेक्षा पूर्णपणे वेगळा वाटतो. रासायनिक औषधांचा दर्प नाही की, जमिनीवर साचलेल्या पांढर्या क्षारांचे थर नाहीत. त्याऐवजी शेताच्या बांधावर फुललेली औषधी झाडे आणि भुसभुशीत माती हेच इथल्या समृद्धीचे लक्षण बनले आहे.
वयाच्या 69व्या वर्षी स्वतःच्या सात एकर शेतीत सेंद्रिय प्रयोगांचे यशस्वी मॉडेल उभे करणार्या शोभा ज्ञानदेव पाखले यांनी या मळ्याचा कायापालट केला आहे. सासू-सासर्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे आवडीने धडे गिरवणार्या शोभाताईंनी पुढे या पारंपारिक व्यवसायाला सेंद्रिय संशोधनाची जोड दिली. हा प्रवास कसा सुरू झाला, याबद्दल त्या भरभरून बोलल्या.
पदवीधर ते शेतीशी जोडलेली नाळ
ज्ञानदेव पाखले यांच्याशी विवाह होण्यापूर्वी शोभाताईंचा शेतीशी संबंध नव्हता. लग्नानंतर त्यांचे आणि शेतीचे सख्य जुळले. सोबत उच्चशिक्षण पूर्ण केले. जुन्या दिवसांविषयी शोभाताई सांगतात, ”1975मध्ये आठवीत असतानाच माझा विवाह ज्ञानदेव पाखले यांच्याशी झाला. पती भारतीय हवाई दलाच्या हवामान विभागात नोकरीला होते आणि ते स्वतः उच्चशिक्षित (बी.ए. एलएल.बी.) होते. पतीने शिक्षणाचे महत्त्व ओळखून मला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. नोकरीनिमित्त काही वर्षे बाहेर राहिल्यानंतर मी पुन्हा सांगलीत स्थायिक झाले. रविवारी शांतिनिकेतन येथे जाऊन त्यांनी खंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू केले आणि 1994मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मराठी विषय घेऊन पदवीधर झाले. शिक्षण पूर्ण करीत असताना शेतीशी नाळ जोडली गेली. बहेबोरगावातील पाखले मळ्यात सासू-सासरे शेतीची संपूर्ण जबाबदारी पाहत असत. सासू-सासर्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता करता मला शेती कामाची गोडी लागली. शेतीकामाशी पूर्णपणे जोडले गेले.”
सेंद्रीय शेतीचा प्रवास
पारंपरिक आणि रासायनिक शेती सुरू असतानाच 2000मध्ये शोभाताईंच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले. त्या श्री श्री रविशंकर यांच्या ’आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. या अनुभवाविषयी त्या सांगतात, ”सुरुवातीला आम्हीसुद्धा इतर शेतकर्यांप्रमाणे शेतात भरपूर रासायनिक खते आणि औषधे वापरत होतो; पण हळूहळू लक्षात आले की, जमिनीचा पोत बिघडत चालला आहे, उत्पन्न घटत आहे आणि शेतीचा खर्च मात्र वाढत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रसायनांमुळे आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येत होते. ’आर्ट ऑफ लिव्हिंग’ आणि पंचगव्य उपक्रमांच्या संपर्कात आल्यावर मला विषमुक्त अन्नाचे महत्त्व समजले आणि मी पूर्णपणे नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा ठाम निर्णय घेतला. माझ्या निर्णयाला जोड मिळाली ती माझ्या वाचनात आलेल्या नैसर्गिक शेती पुस्तिकेची.”
”माणसाला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर आपल्याला पारंपरिक रासायनिक शेतीपद्धतीमध्ये बदल करावाच लागेल, हा विचार त्या वेळी मनात पक्का झाला,” असे शोभाताई अभिमानाने सांगतात.
त्यांनी तात्काळ घरी फोन करून जर्सी गाईंची विक्री करण्यास सांगितले आणि त्यांच्या जागी देशी गाई आणल्या. देशी गायींपासून मिळणार्या गोमयावर प्रक्रिया कशी करायची याचे प्रशिक्षण घेतले. चेन्नईजवळील कोट्टावकम् येथे जाऊन त्यांनी राजीव दीक्षित यांच्या संकल्पनेतून चालणार्या आश्रमात निरंजनभाई वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीन वर्षे पंचगव्य आणि सेंद्रिय शेतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. गाईच्या पंचगव्यापासून दैनंदिन वापरातील वस्तू, गांडूळ खत, जीवामृत आणि गोमूत्र आधारित नैसर्गिक कीटकनाशके बनवण्याचे तंत्र त्या शिकल्या.
80:20चे सूत्र आणि शेतातील प्रत्यक्ष प्रयोग
प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष अवलंब करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्या संघर्षमयी दिवसांविषयी शोभाताई सांगतात, “शेती करण्याची नवी पद्धती आपल्याला किती आणि कसे उत्पादन मिळवून देईल यावर घरातील सदस्यांना सुरुवातीला शंका होती, मात्र पती ज्ञानदेव यांनी पूर्ण पाठिंबा दिला. सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी तयार करण्यासाठी देशी गाईंच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले.“
पाखले मळ्यातील सात एकर शेतीपैकी मुख्य पीक उसाचे आहे. उसासाठी शोभाताईंनी पूर्ण रासायनिक खते वापरण्याऐवजी 80 टक्के सेंद्रिय आणि 20 टक्के रासायनिक खतांचा मेळ घातला. दर 15 ते 20 दिवसांनी ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे जीवामृताचा वापर सुरू केला. या प्रयोगातून उसाचे एकरी 65 ते 70 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. शिवाय, 30 गुंठे क्षेत्रावर त्या 100 टक्के सेंद्रिय पद्धतीने पिकांचे उत्पादन घेऊ लागल्या.
सेंद्रिय पद्धतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला, गांडुळांची संख्या वाढली आणि नांगरट न करताही माती भुसभुशीत झाली. उसाच्या आंतरपिकात त्या कडधान्ये घेतात, ज्याचा वापर घरी खाण्यासाठी आणि जीवामृतामध्ये पीठ घालण्यासाठी होतो. मागील हंगामात अवघ्या 15 गुंठे क्षेत्रावर केवळ जीवामृताचा वापर करून त्यांनी 5 टन रताळ्यांचे उत्पादन घेतले, ज्याला प्रतिटन 30 हजार रुपयांचा दर मिळाला. 80:20 नंतर तिसर्या वर्षी 60ः40 चे समीकरण आपल्या शेतात वापरले. शेतात 60 टक्क्यांवर केलेल्या सेंद्रिय नैसर्गिक शेती प्रयोगालाही चांगला प्रतिसाद लाभला. आता गेली 20 वर्षे त्या नैसर्गिक शेती करत आहेत.
“या 2026च्या मे महिन्यात एका एकरात तब्बल दोन टन रसायनमुक्त भुईमुगाचे उत्पादन घेऊन दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. माझ्या शेतातील नैसार्गिक आणि सेंद्रिय शेती उत्पादन संपूर्ण सांगली जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरले आहे,” असे शोभाताई अभिमानाने सांगतात होत्या.
प्रयोग औषधी वनस्पतींचा
शोभा पाखले यांनी आपल्या सात एकर शेतीत केवळ पारंपरिक पिके न घेता, मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असणार्या अनेक दुर्मीळ वनौषधींची समृद्ध बाग फुलवली आहे. 100 पेक्षा जास्त आजारांवर उपयुक्त ठरणारी शतावरी, नसांमधील अडथळे (ब्लॉकेज) कमी करणारी अर्जुन साल, कर्करोगाच्या काढ्यासाठी वापरला जाणारा लक्ष्मीतरू आणि 150 आजारांवर गुणकारी मानला जाणारा कडूनिंब अशा अनेक औषधी वनस्पती त्यांच्या शेतात पाहायला मिळतात. मधुमेहासाठी उपयोगी इन्शुलिन, वेदनाशामक हडजोड, संधिवातावर गुणकारी पारिजात, कॅल्शियमचा स्त्रोत असलेला शेवगा, तसेच पोटातील कृमींवर उपयोगी सीताफळ व रामफळ यांसारख्या वनस्पतींचा खजिनाच इथे आहे. याशिवाय उष्णतेवर आणि रक्ताच्या शुद्धीकरणासाठी वाळा, चकोत्रा, पत्थरचट्टा, आवळा, गुळवेल, लवंग, बराबडा, लज्जाळू, गवती चहा आणि पुदिना या वनौषधींचीही त्यांनी जोपासना केली आहे.
60 प्रकारच्या औषधी वनस्पती आणि
शिवकालीन काळा ऊस
पाखले यांच्या शेतातील 30 गुंठ्यांचा एक विशेष विभाग म्हणजे औषधी वनस्पतींचा मॉडेल प्लॉट. या अनोख्या प्रयोगाविषयी शोभाताई सांगतात, “जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वनौषधीचा वापर करता येतो. माणसाचे आरोग्य आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी औषधी वनस्पतींचा मॉडेल प्लॉट तयार केला. इथे जवळपास 60 प्रकारच्या विविध औषधी वनस्पती आणि फळझाडे नैसर्गिकरीत्या वाढतात. शेताच्या बांधावर अर्जुन, गुळवेल, लिंबू, सीताफळ, आवळा, कडुनिंब, अपराजिता वेल, सुरण, पाच प्रकारच्या तुळशी (कृष्ण, विष्णू, कापूर, लवंग) आणि मुतखड्यावर गुणकारी चकोत्रा व पत्थरचट्टा अशा वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डास पळवून लावणारी ’ओडोमास’ची वनस्पतीही इथे आहे. इथे दुर्मीळ असा ’शिवकालीन काळा ऊस’ जतन करण्यात आला आहे, ज्यापासून मी औषधी सेंद्रिय गूळ तयार करते. एकाच सरीवर तब्बल 90वं पीक (खोडवा) घेण्याचा प्रयोग या जातीच्या उसाच्या बाबतीत केला आहे. महाबळेश्वरच्या हवामानात येणार्या कॉफीचा प्रयोगही सांगलीत यशस्वी केला आहे. वर्षातून चार वेळा येणारी कॉफीची फळे वाळवून व भाजून त्यापासून शुद्ध कॉफी तयार केली जाते.
“
देशी बियाण्यांचे संवर्धन, ’नक्षत्र पत्ती’ आणि औषधी तूप
शोभा पाखले यांच्याकडे सासू-सासर्यांच्या काळापासून लागवडीखाली असलेल्या जुन्या देशी बियाण्यांचा ठेवा आहे. त्या सांगतात, आज बाजारात मिळणारी संकरित (Hybrid)) बियाणे दरवर्षी विकत घ्यावी लागतात आणि त्यांना रासायनिक खतांची जोड द्यावी लागते. देशी बियाणे हे आपल्या मातीशी आणि हवामानाशी जुळवून घेणारे असतात. मी मूग, उडीद, चवळी आणि इतर पिकांच्या दुर्मीळ देशी वाणांचे जतन केले आहे. हे बियाणे केवळ टिकून राहत नाहीत, तर त्यांपासून मिळणारे अन्न कसदार आणि चवदार असते. ”प्रत्येक शेतकर्याने स्वतःचे बियाणे स्वतः तयार केले पाहिजे, तरच शेती खर्या अर्थाने स्वावलंबी होईल,” हा संदेश देणार्या शोभाताई उडीद, मूग, चवळी यांसारख्या कडधान्यांच्या जतन केलेल्या ज्जुन्या वाणाचे बियाणे लागवडीसाठी, पेरणीसाठी त्या इतर शेतकर्यांनाही देतात.
त्यांच्याकडे सध्या साहिवाल, गीर, राठी आणि खिलार अशा 15-16 देशी गाई आहेत. या गाईंच्या दुधापासून बेलाची पाने व तुळस वापरून बनवलेले ’वैदिक तूप’ त्या तयार करतात, ज्याला चांगला दर मिळतो. याशिवाय 14 प्रकारच्या वनौषधींचा वापर करून बनवलेला सेंद्रिय गूळ आणि वनौषधींच्या पानांपासून तयार केलेला ’नक्षत्र पत्ती’ हा विशेष फॉर्म्युला त्यांनी विकसित केला आहे. या फॉर्म्युलाचा वापर करून ग्रामीण भागातील अनेक महिलांना तंबाखूची भाजकी मशेरी लावण्याच्या व्यसनातून मुक्त करण्यास मदत झाली आहे.
पहाटे चारपासून सुरू होणारी दिनचर्या
वयाच्या 69व्या वर्षीही शोभाताईंची दिनचर्या अत्यंत शिस्तबद्ध आहे. पहाटे 4 वाजता उठून योग आणि प्राणायाम करून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. याविषयी शोभाताई सांगतात, ”पहाटे उठून गाईचे गोमूत्र गोळा करणे, जीवामृत व जैविक कीटकनाशके बनवणे, जनावरांना चारा देणे, पिकांना पाणी देणे आणि शेतात मजुरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे ही सर्व कामे मी स्वतः करते. मी आवडीनने शेती करते आणि महिलांना शेती करण्यास प्रवृत्त करते. महिलांमध्ये शेती सांभाळण्याची आणि प्रयोग करण्याची मोठी ताकद असते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेती करायला जाल, तेव्हा कदाचित उत्पन्न थोडे कमी वाटेल किंवा लोक नावे ठेवतील, पण खचून जाऊ नका. हळूहळू जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पादन खर्च जवळजवळ शून्य होतो. आपल्या मातीला आणि पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर विषमुक्त शेती हा एकमेव पर्याय आहे.”
शोभाताईंप्रमाणे त्यांचे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे. पती बी.ए. एलएल.बी., मुलगा पवन पदवीधर, मुलगी नम्रता अॅरॉनॉटिकल इंजिनिअर ती दुबईत वास्तव्यास आहे. दुसरी मुलगी वर्षा बी.ए. बी.एड. तर घरातील पुतणे आणि सुना न्यायाधीश, वनाधिकारी, सहाय्यक आयुक्त व प्राध्यापक अशा पदांवर कार्यरत आहेत. मुलगा पवन आणि सून सीमा त्यांना शेतीकामात पूर्ण मदत करतात.
काही काळापूर्वी शोभाताई चार महिने मुलीकडे दुबईमध्ये राहून आल्या. तेथील वाळवंटी जमीन आणि शेतीची परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याकडची माती आणि निसर्ग किती समृद्ध आहे याची त्यांना नव्याने जाणीव झाली आणि अधिक कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली.
भविष्यातील ध्येय
सध्या नैसर्गिक शेती करणार्या 50 शेतकर्यांचा गट चालवणार्या आणि इतर शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणार्या शोभा पाखले यांची वाटचाल इथेच थांबलेली नाही. येत्या काळात मधमाशीपालन सुरू करणे, स्वमालकीची सेंद्रिय गूळनिर्मिती प्रक्रिया उभारणे आणि गेल्या 20 वर्षांपासून सात एकर शेती क्षेत्रात चाललेला 100 टक्के सेंद्रिय शेतीप्रयोग असाच अविरतपणे चालू ठेवणे हे त्यांचे पुढील नियोजन आहे.
शोभाताईंचा हा प्रवास केवळ सात एकर जमिनीपुरता किंवा रासायनिक खतांच्या शेतीला पर्याय देण्यापुरता मर्यादित राहिला नाही; तर मातीशी तुटलेले माणसाचे नाते पुन्हा घट्ट जोडणारा एक अध्याय बनला आहे. शेतात 60 प्रकारच्या वनौषधींचे जतन करत त्यांनी माणसाचे आरोग्य आणि जमिनीची सुपीकता जपण्याची नवी वाट दाखवली आहे. रासायनिक शेतीच्या चक्रात अडकलेल्या आणि वाढत्या खर्चाने खचलेल्या आजच्या बळीराजासाठी त्यांची ही धडपड नक्कीच आशेचा किरण ठरते.
सांगलीच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेली विषमुक्त शेतीची ही चळवळ आज इतर अनेक शेतकर्यांच्या आयुष्यात आनंद फुलवत आहे. मातीचे आरोग्य आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन करत भावी पिढीला निरोगी आयुष्य देणारा हा सेंद्रिय ध्यास संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी एक नवी दिशा दाखवणारा ठरत आहे.
संपर्क
शोभा पाखले ः 8999471758